जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावपासून 18 कि.मी. अंतरावर असलेले पाटणादेवी हे जागृत आदिशक्ती चंडिकादेवीचे बाराव्या शतकातील पुरातन मंदीर आहे. हे मंदीर सातमाळेच्या सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी उंच चौथऱ्यावर धवलतीर्थापासून उगम पावलेल्या डोंगरी नदीच्या किनारी आहे. जवळच असलेल्या पाटणा या लहान गावाच्या नावामुळे हे ठिकाण पाटणादेवी या नावाने ओळखले जाते.
मंदिराजवळचा परिसर अतिशय नयनरम्य आणि मनमोहक अशा निसर्ग सौंदर्याने बहरलेला आहे. तिन्ही बाजूने अर्धचंद्रकार सह्याद्री पर्वताचे उंच कडे, विविध वृक्ष, डोंगरातून खळखळ वाहणारे ओढे यामुळे मन मोहून जाते.
विशेषत: पावसाळ्यात ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये येथील वातावरण मनाला प्रसन्न करणारे शांत व आल्हाददायक असते. या दिवसात मंदिराच्या चौथऱ्यावरून मंदिराचा भोवतालचा परिसर म्हणजे वनराईने नटलेले पर्वताचे उंच कडे, रंगबिरंगी फुलाफळांनी बहरलेले वृक्ष, खळखळ वाहणारेओढे हेसर्व निसर्गरम्य दृश्य पाहताना मन निसर्गाशी एकरूप होवून जाते. अशा रमणीय ठिकाणाचा पूर्व इतिहास तितकाच ऐतिहासिक व महत्वाचा आहे. मंदिरात दोन गाभारे असून एका गाभाऱ्यात देवीची मुर्ती व दुसऱ्या गाभाऱ्यात शिवपार्वतीची मुर्ती आहे. या दोन गाभाऱ्यांमधील कक्षेत विष्णूची मुर्ती आहे. या परिसरात सापडलेल्या असंख्य मुर्ती व शिल्प हे येथे एका खोलीत ठेवण्यात आले आहे.
मंदिराच्या पूर्व दिशेला दोन कि.मी. डोंगर चढून गेल्यावर सुप्रसिद्ध पितळखोरे लेणी आहे. अजिंठा लेण्याच्या समकालीन ही लेणी असून अतिशय भव्य अशी आहे. या लेण्याजवळून वाहणारा पाण्याचा प्रवाह उंच कड्यावरून खाली कोसळतो. यामुळे देवी मंदिराच्या पूर्वेस उजव्या बाजूला मोठा धबधबा तयार होतो. त्याला धावलतीर्थ किंवा धारातीर्थ म्हणतात.
उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याखाली खडकात तयार झालेल्या खोलगट भांड्यासारख्या डोहातून पाण्याचे फवारे दूरवर उडतात आणि पर्यटकांना आल्हाददायक आनंद देऊन जातात. पाटणादेवी मंदिरापासून एक कि.मी. अंतरावर जुन्या पाटणा गावाचे अवशेष आहेत. हा परिसर पुराणवास्तू शास्त्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असून अतिप्राचीन सामुहिक ग्राम रचनेचे पुरावे याठिकाणी पहावयास मिळतात. याच परिसरातून आणखी एक वास्तुशिल्पीदृष्ट्या चांगले मंदीर आहे. त्याला हेमाडपंथी माहेश्वर मंदीर असे म्हणतात.
मंदिराचा गाभारा, अंतराळ, उघडा मंडप, मुख मंडप इ. भाग आहे. मंदिरातील मंडपात मोठा नंदी लक्ष वेधून घेतो. या मंदिराच्या मागील बाजूस जुन्या पाटणे गावाच्या दक्षिणेस एक पडका किल्ला आहे, त्यास बिज्जलगड असे म्हणतात. या गडाच्या उत्तर-पश्चिम बाजूस शृंगारचावडी नावाचे अतिप्राचीन दुर्मिळ असे लेणे आहे. त्यातील बहुतेक प्रतिमा शृंगारिक असून त्या खाली नक्षी पट्ट्या आहेत. शृंगारचावडी लेण्यांच्या शेजारी महेश्वर मंदिराकडे उतरताना सीता न्हाणी व नागार्जुन अशी दोन लेणी आहेत. या उंच प्रदेशातून उत्तरेकडे पसरलेल्या वनराजीचे दृश्य अतिशय विहंगम वाटते. निसर्ग सौंदर्याबरोबरच पुराण वास्तुशिल्पे, शून्याचा वेध घेणारे गणिततज्ज्ञ भास्कराचार्य यांचे गणितीपीठ बघताना पर्यटक वेळ-काळाचे भान विसरुन जातात.
आज मंदीर भारतीय पुरातन विभागाच्या निगराणीत आहे. येणाऱ्या भाविक, पर्यटक, अभ्यासकांसाठी वनखात्यामार्फत विश्रामगृहे व निसर्गवाचन केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. तर चला जाऊया पाटणादेवीला…
-निलेश परदेशी,
चाळीसगाव, जि.जळगाव. (मो.नं.7588646750)
0 comments:
Post a Comment