दिवाळीच्या सुट्या आणि थंडीची चाहूल या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात पर्यटन हंगाम बहरला असून विशेषतः मालवण येथील स्कुबा डायव्हिंग आणि किल्ले दर्शनाच्या ओढीने दिवसेंदिवस पर्यटकांचा ओघ वाढत असल्याचे चित्र सध्या सिंधुदुर्गात दिसत आहे.
गेल्या सहा सात दिवसात मालावांचा सागरी किनारा देशी-विदेशी पर्यटकांनी फुलून गेला असून या काळात पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे. बंदर विभागाच्या आकडेवारी नुसार दिवाळी सुटीच्या कालावधीत आतापर्यंत 20 हजार पर्यटकांनी सिंधुदुर्ग किल्ला भ्रमंती केली आहे. तर 1300 पेक्षा जास्त पर्यटकांनी स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेतला आहे. यातून शासन तिजोरीत कर स्वरूपात चार लाखाचा महसूल जमा झाला आहे.
1 मे 1981 रोजी स्थापन झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पर्यटन हे मुख्य बलस्थान आहे. या जिल्ह्याची पर्यटनाची क्षमता लक्षात घेऊन शासनाने 30 एप्रिल 1997 साली हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला आहे. अशा स्वरूपाची शासकीय मान्यता असलेला सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून स्थानिक रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाने विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष गती दिली आहे. पर्यटन विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे मालवण येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हिंग ट्रेनिंग सेंटर विकसित करण्यात आले आहे. या सुविधेमुळे पर्यटकांना समुद्रांतर्गत जीवसृष्टीचा स्नार्कलींग तसेच स्कुबा डायव्हिंग करून प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. पर्यटकांसाठी ही बाब पर्वणी ठरली असून त्यामुळे मालवण येथील स्कुबा डायव्हिंग हे देशी-विदेशी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरले आहे.
शासनाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन सेवा संस्थेला स्कुबा डायव्हिंगकरिता अधिकृत मान्यता देण्यात आली असून एक खिडकी योजनेखाली मालवणातील सर्व स्कुबा डायव्हिंग व्यावसायिक एकत्रित आले आहेत. स्कुबा डायव्हिंगसाठी संस्थेच्यावतीने एका पर्यटकामागे 1725 रुपये घेतले जातात. त्यानुसार या हंगामात गेल्या चार-पाच दिवसात सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन सेवा संस्थेचा जवळपास 23 लाख 30 हजार पेक्षा अधिक रुपयांचा व्यवसाय झाला आहे. याचा लाभ सर्व स्थानिक स्कुबा डायव्हिंग व्यावसायिकांना मिळणार आहे.
दरम्यान सिंधुदुर्ग किल्ला दर्शनासाठी दि. 13 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत 20 हजार 641 पर्यटकांनी भेट दिली असून त्यानुसार दि. 13 नोव्हेंबर रोजी 2899, दि. 14 नोव्हेंबर रोजी 4625, दि. 15 नोव्हेंबर रोजी 5185, दि. 16 नोव्हेंबर 4267 तर दि. 17 नोव्हेंबर रोजी 3665 पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी होडी वाहतूक संघटनेच्यावतीने प्रती पर्यटक 53 रुपये घेतले जातात. त्यानुसार पर्यटक प्रवासी होडी वाहतुकीच्या व्यवसायातून स्थानिक व्यावसायिकांना गेल्या चार- पाच दिवसात 10 लाख 93 हजार पेक्षा अधिक रुपयांचा व्यवसाय झाला आहे. याशिवाय जिल्ह्यातील देवबाग, तारकर्ली, तोंडवली, वेंगुर्ला, सागरेश्वर तसेच इतर सागरी किनारे त्याचबरोबर देवगड, विजयदुर्ग, रांगणागड या आणि यांसारखे इतर किल्ले, गड व पर्यटन स्थळांनाही मोठ्या प्रमाणात पर्यटक भेटी देत आहेत. एकूण सिंधुदुर्गात पर्यटन हंगामाला चांगली सुरूवात झाली असून त्या अनुषंगाने स्थानिक व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध होत आहे.
आर्थिक विकासाचे व रोजगाराचे प्रमुख साधन म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाचे महत्व लक्षात घेता गेल्या वर्षभरात ग्रामीण पर्यटन, सागरीय तटीय क्षेत्रांचा विकास, पर्यटन स्थळांचा विकास, दळणवळणाच्या सोयी या व यासारख्या पर्यटन व्यवसायाच्या इतर बाबींच्या विकासाकरिता केंद्र तसेच राज्य शासनाकडून पुरेशा निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पूरक योजनांच्या अंमलबजावणीकरीता व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. एकूणच जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी महाराष्ट्र शासन वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी चालू हंगामात पर्यटन व्यवसायाला मिळालेले हे समाधानकारक ओपनिंग म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विकासाच्या दिशेने पडलेले पाऊल म्हणावे लागेल.
-अर्चना जगन्नाथ माने
माहिती सहाय्यक, सिंधुदुर्ग.
0 comments:
Post a Comment