विश्वविख्यात छायाचित्रकार व चित्रकार कैकुश्री माणेकजी उर्फ केकी मूस यांचा जन्म मुंबईच्या मलबार हिल या उच्चभ्रू वस्तीत 2 ऑक्टोबर 1912 रोजी जन्म झाला. त्यांचे मामा हे सुप्रसिद्ध आर.सी. कन्स्ट्रक्शनचे मालक होते. ज्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस या रेल्वे स्टेशनची निर्मिती केली आहे.
लहानपणापासून कलेच्या प्रचंड आवडीमुळे केकी मूस यांनी ऐश्वर्याचे जीवन सोडून त्यांनी कलेचा मार्ग स्विकारला. मुंबईच्या विल्सन कॉलेजमधून कलेची पदवी आणि पुढे लंडनमधून उच्च शिक्षण घेतले. देशोदेशीच्या कला पाहिल्या. कलाकारांना भेटले. कलेलाच त्यांनी आपले जीवन समर्पित केले. मुंबई येथून ते चाळीसगाव, जि.जळगाव येथे आईच्या आग्रहाखातर 1938 मध्ये परतले. चाळीसगावात आल्यावर प्रथम त्यांनी चित्रे रंगवायला घेतली. केकी मूस यांनी उभे केलेले शेक्सपियर कॉटेज, जहाँगीर, नूरजहाँ, उमर खैय्याम, वादळवारा असे एकाहून एक सरस देखावे आजही पाहताना गुंतवून टाकतात. त्यांची टेबल टॉप फोटोग्राफी जगप्रसिद्ध आहे. स्थिरचित्रण फोटोग्राफी, व्यंगचित्र फोटोग्राफी आणि फेक्ड फोटोग्राफी अशा विविध प्रकारात केकी मूस यांनी कामे केली. त्यांच्या टेबल टॉप फोटोग्राफीच्या प्रकारातील छायाचित्रांना तीनशेहून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवर कीर्तिध्वज फडकवणारे छायाचित्रकार केकी मूस अर्थात बाबुजी हेमहान कलायोगी मुंबईहून चाळीसगावी परतल्यानंतर तब्बल 48 वर्षे एखादा अपवाद वगळता आपल्या घरातून बाहेरही पडले नाहीत. कलेसाठी संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्या या कलायोगीने आपल्या कलेच्या माध्यमातून कलासृष्टीची निमिर्ती आपल्या चाळीसगावच्या राहत्या घरातच केली. केकी मूस यांनी आयुष्यभर कला निमिर्तीशिवाय दुसरे काहीही केले नाही. मूस यांच्यात विश्वात जी कला आहे त्या साऱ्या शिकण्याची जिद्द होती. रंगकाम, चित्रकाम, रेखाचित्र, छायाचित्र, मूर्तीकला, कातरकाम, काष्ठशिल्प, ओरिगामी, सतारवादन अशा अनेक कलांमध्ये ते पारंगत होते.
आपल्या पाच दशकाच्या वास्तवात त्यांनी अनेक कलाकृतींची निमिर्ती केली. केवळ मीठ, भुसा, कापूस, वाळलेल्या काड्या यातून त्यांनी गोठवणारा हिवाळा उभा केला. त्या दृश्यावर धुरकट प्रकाश टाकला आणि छायाचित्र घेतले. हे छायाचित्र पाहिल्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू म्हणाले... ‘धिस इज माय नेटिव्ह प्लेस. मिस्टर मूस टेल मी व्हेन यू हॅव व्हिजिटेड काश्मीर’. पंडित नेहरू मूस यांच्या कलाकृती बघण्यासाठी ओढीने त्यांच्या कला दालनाला धावती भेट देण्यासाठी आले अन् कलाकृती पाहताना सर्व कार्यक्रम रद्द करीत दिवसभर रमले.
मूस यांनी त्यांच्या कला दालनाला भेट देणाऱ्या जवळपास प्रत्येक मान्यवरांचे त्यांनी एक आगळे छायाचित्र काढलेले आहे. त्यांच्या कला दालनाला ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे, समाजवादी नेते जयप्रकाश नारायण, शंकरराव देव, साने गुरुजी, पंडीत महादेव शास्त्री, महर्षी कर्वे, आचार्य अत्रे, ना.सी. फडके या दिग्गजांनी भेटी दिल्यात. मूस हे उत्कृष्ट सितारवादकही होते. त्यांना संगीताची व वाचनाची प्रचंड आवड होती. त्यांच्या कला दालनात जवळपास पाच हजार संगीताच्या ग्रामफोन्स तर चार हजार पर्यंत पुस्तकांचा संच आजही संग्रही ठेवण्यात आला आहे. विश्वविख्यात कलामहर्षी केकी मूस हेमान, सन्मान, पुरस्कार, प्रसिद्धी, पैसा या साऱ्यांपासून कायम दूर राहिले. त्यांनी प्रचंड मेहनतीने तयार केलेल्या शेकडो कलाकृती जतन करण्याचे काम कलामहर्षी केकी मूस प्रतिष्ठान, चाळीसगाव करीत आहे. परंतु अपुरा निधी आणि संग्रहालयाच्या वास्तू जतनासाठी संस्थेला मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे. या कलाकृतींना उर्जितावस्था देण्यासाठी सर्व स्तरातून मदतीची अपेक्षा आहे.
कलामहर्षी केकी मूस प्रतिष्ठान चाळीसगाव ही संस्था जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहराच्या रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूलगतच आहे. कलेची आवड असणाऱ्यांनी या कला दालनाला एकवेळ तरी नक्कीच भेट दिली पाहिजे.
-निलेश परदेशी,
चाळीसगाव, जि.जळगाव. (मोबाईल 7588646750)
0 comments:
Post a Comment