निसर्गरम्य चिखलदरा भुगोलाच्या पुस्तकात विदर्भातील एकमात्र थंड हवेचे ठिकाण अशी ओळख असलेल्या “चिखलदरा”चे सौंदर्य चांगलेच बहरले आहे. उन्हाळ्यातही गारवा, नजर टाकावी तेथे विहंगम दृश्य, विविध प्रजातींची फुले-झाडे, हिरवा-गालिचा अन डोंगर दऱ्यातून जाणाऱ्या ढगांची मालिका पाहून कुणालाही वारंवार यावेसे वाटणाऱ्या चिखलदऱ्याच्या सौंदर्याची किमया ही न्यारीच आहे. विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळख असलेले थंड हवेचे ठिकाण चिखलदऱ्याला आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नंदनवन म्हटल्यास वावगे ठरु नये. कारण महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख पर्यटन स्थळांना लाजवेल एवढी मनसोक्त निसर्ग सौंदर्याची उधळण चिखलदऱ्यात केली आहे. विदर्भाच्या नंदनवनात पर्यटकांची मांदियाळी
“चिखलदरा” चे सौंदर्य बहरले
ब्रिटीशांच्या राजवटीत उदयास आलेले चिखलदरा हे विदर्भातील एकमात्र थंड हवेचे ठिकाण आहे. हैद्राबाद फलठणीचा कॅप्टन रॉबिन्सन याने 1823 साली चिखलदरा या थंड हवेच्या ठिकाणाचा शोध लावला. खरंतर इंग्रजांनीच या स्थळाचा विकास घडवून आणला आणि आज चिखलदरा “पर्यटनस्थळ” म्हणून नावारुपास आले आहे. ब्रिटीशांबरोबर काम करणारे ख्रिश्चन मिशनरी आजही येथे कार्यरत आहेत. 1850 च्या सुमारास ब्रिटीशांनी येथील कारभार पाहण्यासाठी प्लॅटो फंड कमिटीची स्थापना केली आहे. मध्यप्रांत व बेरार राज्य असताना 1 ऑगस्ट 1948 साली चिखलदरा येथे गिरीस्थान नगरपरिषदेची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून खऱ्या अर्थाने विदर्भाचे नंदनवन चिखलदरा या नावाने सर्वदूर चिखलदऱ्याची ओळख झाली. समुद्र वनस्पतींनी नटलेल्या निसर्गसौंदर्याने बहरलेले चिखलदरा सातपुडा पर्वतरांगाच्या कुशीत वसले असले तरी पर्यटकांना भुरळ घालण्यात कुठलीही कसर सोडत नाही हे विशेष.
सातपुडाच्या शिखरावर चिखलदऱ्याचे पठार असून मोथा ते वैराटपर्यंत 25 ते 30 कि.मी. हा परिसर पसरलेला दिसतो. मात्र त्याची रुंदी 1 ते 5 किमी एवढीच आढळते. चिखलदरा शहराचे क्षेत्रफळ 394 हेक्टरच्या वर आहे. हे शहर दोन पातळ्यांमध्ये विभागले गेले आहे. समुद्रसपाटीपासून लोअर प्लॅटोची उंची 3 हजार 600 फूट तर अप्पर प्लॅटोची उंची 3 हजार 650 फूट इतकी आहे. चिखलदऱ्यातील हवामान थंड आणि आरोग्यदायी आहे.
चिखलदरा पर्यटननगरीत साधारणपणे 10-12 प्रेक्षणीय स्थळे आहेत. यातील सर्वात महत्त्चाचा पॉईंट म्हणजे सनसेट आहे. पण तो केवळ उन्हाळ्यात पहायला मिळतो. सद्य:स्थितीत भिमकुंड पर्यटकांना खुणावतो आहे. पंचबोल पॉईंटवर पाच वेळा आवाज ऐकू येत असल्याने पर्यटक या पॉईंटकडे धाव घेत आहेत. येथेच इतिहासाची साक्ष देणारा ऐतिहासिक गावीलगढ मोठ्या डौलाने उभा आहे. याशिवाय देवी पॉईंट, शक्कर तलावातील बोटींग, शासकीय वनउद्यान, आमझरी रोपवाटीका, जगाडोह येथील धबधबा, सेमाडोहची जंगल सफारी या शिवाय अनेक पॉईंट पाहण्या लायक आहेत. पावसात व्हॅली क्रासींग, रॉक क्लॉइंम्बिंग, वॉटर फॉल, रॅपलिंगची सोय वन विभागाने केल्यामुळे पर्यटकांचा उत्साह आणखी द्विगुणीत होऊ लागला आहे.
विदर्भातील पहिला व एकमेव पवनऊर्जा प्रकल्प मोथा येथे 13 मार्च 2003 रोजी कार्यान्वित झाला आहे. 2 मेगावॅट पवनऊर्जा निर्मितीची क्षमता असलेले दोन मोठे पंख पर्यटन नगरीत येण्यापूर्वीच पर्यटकांना आकर्षित करतात.
कसे पोहोचाल
चिखलदरा येथे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक सर्वाधिक जुना परतवाडावरुन घटांग - सलोना मार्गे (48 किमी) पर्यटकांचे एसटीबस आणि खाजगी गाड्या परतवाडा येथे उपलब्ध आहेत. तर दुसरा मार्ग म्हणजे परतवाड्यावरुन धामणगाव गढी - मोथा मार्गे (32 किमी) चिखलदऱ्यास जाता येते. शिवाय धारणीवरुन जायचे असल्यास सेमाडोह वरुनही येता येते.
राहण्याची व्यवस्था
या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग, विजवितरण कंपनी, जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा सहकारी बँक, वनविभाग यांचे स्वतंत्र विश्रामगृह आहेत. शिवाय खाजगी होटेल, लॉज देखील मोठ्या संख्येने आहेत. जंगलात मुक्काम करायचे असेल तर आमझरी येथे वनविभागाने वन कुटीची निर्मिती केली आहे.
जवळचे रेल्वे स्थानक
जवळचे रेल्वे स्थानक बडनेरा असून चिखलदऱ्यापासून हे 130 किमी अंतरावर आहे. तर नागपूर हे दुसरे रेल्वे स्थानक असून त्यांचे अंतर 250 किमी एवढे आहे.
- सुरेश काचावार,
जिल्हा माहिती अधिकारी, अमरावती
0 comments:
Post a Comment