कान्हा : भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प...

ज्यांच्या मनात एक भटक्या जिप्सी दडलेला आहे, ज्यांना निसर्गाची साद आणि समुद्राची गाज सदैव आमंत्रित करत असते; अशांसाठी मध्य प्रदेशातले कान्हा हे अभयारण्य म्हणजे एक पर्वणीच आहे. वनसंपदा आणि वन्यजीवसंपदा यांचा सुंदर व मुबलक मिलाफ जगाच्या पाठीवर अन्यत्र क्वचितच झाला असेल.

कान्हाला जाण्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे गोंदिया मार्गाने. त्यासाठी कोल्हापूर-गोंदिया व्हाया पुणे दौंड मनमाडमार्गे जाणारी महाराष्ट्र एक्सप्रेस ही थेट गाडी आहे. तर दुसरा मार्ग आहे तो म्हणजे नागपूर-सिंवनी मंडलामार्गे कान्हा गाठणे. या दोन मार्गांपैकी नागपूर-छिंदवाडा, सिवनी मंडलामार्गे जाणे उत्तम. कारण या मार्गावर भरपूर ट्रेन्स, बसेस, खाजगी बसेस उपलब्ध आहेत. नागपूरहून मंडला सिवनी येथे मध्य प्रदेश परिवहनच्या बसेस जातात. त्याद्वारे किंवा नागपूर ते सिवनी ते मंडला अशी कटजर्नी करुनही आपण कान्हाच्या जवळ जाऊ शकतो. सिवनी-मंडला मार्गावर एक छोटेखानी गाव आहे. त्याचे नाव चरई डोंगरी, तिथे आपण उतरायचे. कान्हाला जाणारी बस पकडून कान्हाच्या प्रवेशद्वारी असणाऱ्या गावठाणात पोहोचायचे. हा मार्ग सोयीचा, पण वेळखाऊ आहे. कारण नागूपर ते चरई डोंगरी हे अंतर आठ तासांचे असले तरी कटजर्नीत ते १२ तासांचे होते. तिसरा मार्ग म्हणजे थेट जबलपूरला रेल्वेने जाणे व तेथून पहाटे कान्हा येथे येणारी बस पकडून येणे. हा मार्ग तसा सुलभ वाटला तरी नागपूर ते जबलपूर हा प्रवास व पुन्हा जबलपूर ते कान्हा हा प्रवास याचा वेळ लक्षात घेता नागपूरमार्गेच कान्हाला जाणे योग्य ठरते. आपण जर स्वतंत्र वाहनाने गेलात तर फारच उत्तम. मग नागपूर ते कान्हा हे अंतर सात-आठ तासांत आपण सहज पार करु शकतो.

कान्हाच्या जवळ एक छोटेसे गाव आहे. त्यात रिसॉर्टस् आहेत. सर्व सुखसोयींनी युक्त अशा रुम्स येथे उपलब्ध आहेत. सुग्रास जेवणही स्वस्तात मिळते. चहा-नाश्ता तर असतोच. स्वीट डिशची आवड असेल तर नजीकच्या ब्राम्हणी गावचा पेढा, कलाकंद बर्फी, बासुंदी, रबडी यापैकी हवे ते उपलब्ध होते किंवा करवून दिले जाते.

मावळत्या सूर्याच्या साक्षीने जंगल ट्रेक करायचा, पण तो छोटासाच. कारण जंगल घनदाट आहे. अंधार लवकर पडतो. आपले रिसॉर्ट जंगलात असते. रात्री लवकर जेवण आटोपून, बाहेर खूर्ची टाकून, चांदण्या रात्री जंगल निवासाचा आनंद मनमुराद लुटायची संधी साधावी. प्राण्याचे वेगवेगळे आवाज, कधी कानी येणारी वाघाची डरकाळी, रिसॉर्टमधील कोंबड्या, मांजरे वा तत्सम प्राण्यांच्या वासाने व पार रिसॉर्टच्या कुंपणालगत किंवा आपल्या दारा खिडक्यांपर्यंत येणाऱ्या बिबळ्या, कोल्ह्यांची कोल्हेकुई असा अरण्यमाहौल आपण एन्जॉय करु शकतो.

कान्हामध्ये पहाटे पाच ते दुपारी साडेबारा, दुपारी अडीच ते सायंकाळी साडेसहा अशा दोन राईडस् उपलब्ध असतात. त्यासाठी प्रशिक्षित वाहनचालक व गाईड उपलब्ध करुन दिलेले असतात. ओपन जिप्सी स्वरुपाच्या गाड्या त्यासाठी वापरल्या जातात. त्यांना हॉर्न, सायरन, इंडिकेटर, रिव्हर्स टोन असे काहीही नसते. कारण वाहनांच्या आवाजाने प्राण्यांना त्रास होऊ नये, म्हणून ही दक्षता. असे वाहन आपल्याला आदल्या दिवशीच सांगून ठेवावे लागते.

एवढ्या पहाटे अरण्यात जाणे या कल्पनेनेच आपण खूप एक्साईट झालेलो असतो. पण आपली ही एक्साईटमेंट कान्हाच्या गेटवर थोडी कमी होते. कारण परवाने घेणे, अर्ज भरणे यामध्ये किमान पाऊणतास जातो. त्यामुळे अरण्यात प्रत्यक्ष प्रवेशद्वारापर्यंत सहा सव्वासहा होतात. तोपर्यंत चांगले उजाडलेले असते. अंतिम प्रवेशद्वारी सर्व कागदपत्रांची तपासणी झाली की आपण कान्हात प्रवेश करतो. काय काय पहायला मिळेल, अशा विचारात असतानाच आपण घनदाट अरण्यात शिरतो. पक्ष्यांची किलबिल, माकडांचे तर्रकट कानी येत असते. एवढ्यात अरण्यातला एक मोर डौलात चालताना दिसतो. थोडे पुढे जावे तो आणखी काही मोर दिसतात. एखादा पिसारा फुलवून नाचत असतो. काही झाडावर बसलेले असतात, काही मस्ती करीत असतात. एकाचवेळी एवढे मोर मक्त अवस्थेत पाहून आपण पार वेडावून जातो. तिथून आपला पाय निघता निघत नाही. एवढ्यात हरणांचा एखादा मोठा कळप आपल्या जीप जवळून चौखूर उधळून जातो. एवढी हरणे आपल्या आसपास पाहिली की, आपण खऱ्या अर्थाने अरण्यात असल्याची जाणीव आपल्याला होते. थोडे पुढे गेले की, मग गव्यांचा कळप, कोल्ह्याची झुंड, चौशिंगे बारशिंगे, काळवीट यांचे कळप आपल्या अवती भोवती असतात. मध्येच एखादे अस्वलही दर्शन देऊन जाते. सुंदर पक्षी आपले लक्ष वेधून घेतात. एखादा गजराज आपल्याला खिळवून ठेवतो. पण आपल्याला ओढ असते ती वाघाला पाहण्याची. त्याच दिशेने आपले वाहन चालत असते. वाघ पाणी पिण्यास येण्याच्या, विसावण्याच्या अशा अनेक जागा या अभयारण्यात आहेत. पहाटे पर्यटकांच्या ज्या गाड्या सुटतात. त्या या वेगवेगळ्या जागांच्या दिशेने नेल्या जातात. जिथे वाघ दिसेल; तेथे गेलेले चालक खुणांनी अन्य चालकांना तेथे बोलावून घेतात. म्हणजे जास्तीत जास्त पर्यटकांना मुक्त वाघांचे दर्शन घडते. टीव्हीच्या पडद्यावर, पुस्तकातील छायाचित्रात पाहणाऱ्या व्याघ्रराजाला मुक्त - स्वच्छंद पाहून आपल्या कान्हाभेटीचे सार्थक होते. मात्र तुम्ही नशीबवान असात तर वाघोबा किंवा त्याचे कुटुंब तुम्हाला रस्त्यातही दर्शन देऊन जाते. तुम्हाला आडवे जाते. ते तुम्हाला कोणताही त्रास देत नाहीत. हे कोण बुवा आले ! अशी एक आश्चर्यमिश्रित नजर तुमच्याकडे टाकून वाघोबा शांतपणे निघून जातो. पुढे एकमेकांना टकरा देत, धूळ उडवणारे बारशिंगे, चौशिंगे, निलगाई अरण्यात दिसतात. ही अडीच तासाची मंदगतीची सफर असून, आपण उपहारगृहापाशी येतो.

वाघ जिथे असेल तिथून त्याला हत्तीवर बसलेल्या प्रशिक्षित वनरक्षकांकडून एका रिंगणात आणले जाते व त्याला खेळवले जाते. हा खेळ आपण आपल्या वाहनातूनच पाहायचा असतो. मात्र तुमचे नशीब जोरावर असेल तरच हा खेळ तुम्हाला पाहायला मिळतो. हरीण, वाघोबा दिसला तरच हा खेळ खेळता येतो. तो आज होणार की नाही याची सूचना सकाळी साडेनऊ-दहाला वायरलेसने दिली जाते. हा खेळ पाहणे हा एक अद्भूत आनंद आहे. तो संपेपर्यंत साडेअकरा होतात. परतीच्या वाटेवर आपल्याला झुळझुळणारे झरे, छोटासा धबधबा, चिमुकले तळे दिसते. ससे, खारी, माकडे आपल्याला सोबत करीत असतात. मध्येच ड्रायव्हर सांगतो, वो देखो घोस्ट ट्री. याने भूत का पेड !’ आपण क्षणभर हादरतो. सगळ्या फांद्या निष्पर्ण. त्यावरची साल पूर्णपणे झडून गेलेली. आतला पांढरा तुकतुकीत वर्ण उघडा पडलेला. जणू काही कुणी रंधा मारुन साफ करावा तसा.

चालक सांगतो, चांदनी रात हो, या काली रात हो, सफेद पेड बिल्कुल डरावना लगता है. इसलिये इसे घोस्ट ट्री कहते है. नागराज, ॲनाकोंडा वाटावा असे अजगर आपल्या वाटेत रास्तारोको करुन जातात. जवळपास 55 ते 79 किमीची जंगलातील सफर करुन आपण परततो, तेव्हा पोटात कावळे ओरडत असतात.

कान्हामधली दुपारची सैर त्यामानाने कमी उत्कंठावर्धक असते. म्हणून सकाळचा राऊंड घेणे हेच केव्हाही चांगले.

कान्हाला जाण्यासाठी हिवाळा हा ऋतू सर्वात उत्तम. ऑक्टोबर ते मार्च हा सिझन चांगला. कारण उन्हाळ्यात सुट्टया असल्या तरी प्राणी उन्हाच्या तडाख्याने फारसे बाहेर पडत नाहीत. तीच अवस्था पावसाळ्यात असते. हिवाळ्यात रानजंगल हिरवे असते. पाणी पिणे, शिकार, उन्हात बसणे अशा अनेक कारणांनी प्राणी बाहेर येत असतात. त्यामुळे त्यांचे दर्शन उत्तम घडते. कान्हापासून जवळच बेडाघाट आहे. संगमरवरी कडे सुळके व त्यातून रोरावत धावणारी, वाहणारी नर्मदा, तीमधून केलेली पौर्णिमेच्या रात्रीची सैर. अशी जोडून जर ट्रीप केली तर कान्हाच्या ट्रीपच्या आनंदावर चारचांद अगदी सहज लागून जातात.
महेंद्र देशपांडे, नाशिकमो. 9422772020-21

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India