सापुतारा : थंड हवेचे ठिकाण

“ निखरे यौवन सा यह ज्वारा
नाम है इसका सापुतारा ।
अपनी डगमगसे इतराता
‘भु’ को यु दिठीनी दिखलाता
मानो नि:शेष रमणीयतासे
प्रकृतिने इसका रुप संवारा ॥ ”
अरे... हो... आश्चर्य वाटले ना ! पण ही कोणा प्रेयसीवर लिहिलेली कविता नाही. ही कविता आहे एका नयनरम्य थंड हवेचे ठिकाण म्हणजे सापुतारावर खुश होऊन लिहिलेली एका निसर्गप्रेमी कवीची कविता आहे. गुजरात व महाराष्ट्राच्या सीमेवर पर्वतांमध्ये वसलेल्या सापुताराला गुजरातचे रत्नजडित मुकूट किंवा ‘क्राऊनिंग ग्लोरी’ ची उपमा दिली तरी त्यात अतिशयोक्ती नाही.

दोन्ही बाजूंनी दाट जंगलांमधून चाललेल्या बसमधून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घेत आपण सापुतारा येथे पोहोचतो. सापुतारा या शब्दाचा अर्थ सापासारखा वळणावळणाचा रस्ता असा आहे. साप - उतार, म्हणजेच सापाचे निवासस्थान. वृद्धलोक येथील इतिहास सांगताना म्हणतात की, प्राचीन काळात येथे सर्पगंगानदी वाहत होती. ज्याला बांध घालून तळे बांधण्यात आले. उत्सवाच्या दिवशी अद्यापही आदिवासी लोक या तळ्यावर येऊन सापाची पूजा करतात.

डांगी लोकनृत्याने येथील लोक सणांची रंगत वाढवतात व त्यांची नृत्यकला जिवंत ठेवतात. पर्यटकांची शहरी संस्कृतीने उबलेली मनं आणि शरिराचा थकवा दूर करण्याचे पूर्ण सामर्थ्य सापुताऱ्यामध्ये आहे. नाशिकपासून 80 कि.मी. अंतरावर व मुंबईपासून 250 कि.मी.वर महाराष्ट्र-गुजरात राज्याच्या सीमेवर सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण असून समुद्रसपाटीपासून त्याची उंची सुमारे 3600 फूट आहे.
सापुताऱ्यात काय पहाल ?
सापुतारा या थंड हवेच्या ठिकाणी सनराईज व सनसेट पॉईंट ही दोन मुख्य आकर्षणं आहेत. सूर्योदय बघण्यासाठी सनराईज पॉईंटवर पहाटे उठून जावे लागते. येथून उगवत्या सूर्याचे दर्शन अत्यंत विलोभनीय दिसते. तसेच संध्याकाळी सनसेटपॉईंटवर असंख्य पर्यटक गर्दी करतात. काही मिनिटांतच सूर्य क्षितिजाला टेकतो आणि पर्यटकांचे कॅमेरे धडाधड चालू होतात. काजव्याप्रमाणे चमकणाऱ्या फ्लॅशच्या लाईटमध्ये सूर्यास्त केव्हा होतो हे समजत नाही. सनसेटपॉईंटपासून समोरच्या डोंगरावर वैती हॉटेल असून या हॉटेलची दिमाखदार वास्तू चटकन नजरेत भरते. या दोन्ही डोंगरांना जोडणारा रोप-वे या हॉटेलने बसविलेला आहे. हा रोप-वे म्हणजे दोन्ही टोकांना जोडणारी एक जाड लोखंडी दोरी असून या दोरीवर चार माणसं बसतील अशा छोट्या-छोट्या केबीन आहेत. या केबीनमध्ये बसून तरंगताना अनोखा अनुभव येतो. केवळ चित्रपटांत पहावयास मिळणाऱ्या या रोप-वेमध्ये बसण्याचा अनुभव पर्यटकांना वैती हॉटेलने उपलब्ध करुन दिला आहे. हा रोप-वे सापुताऱ्याचे मुख्य आकर्षण आहे. गुजरात टुरिझमने येथे बोट क्लब चालू केला असून सापुताऱ्याच्या प्रवेशद्वाराशी असलेल्या भव्य जलाशयात नौकाविहाराचा आनंद आपल्याला लुटता येतो. संथ पाण्यावर नौकेत बसून सफर करत आजूबाजूस सृष्टीसौंदर्य न्याहाळण्याचे सुख काही औरच असते.

याशिवाय स्टेपगार्डन, बॉटनिकल गार्डन, गुलाब उद्यान इत्याची बगीचे आहेत. सणावारास व सिझनमध्ये येथील आदिवासींचे नृत्य व संगीताचे कार्यक्रम होतात. त्यासाठी खुले नाट्यगृह आहे. सापुताऱ्याच्या मध्यभागी म्युझियम असून अनेक दुर्मिळ वस्तू पहावयास मिळतात. सापाच्या काही जाती, अजगर वगैरे जिवंत प्राणी येथे असून त्यांची विविध प्रात्यक्षिके दाखविली जातात. मधमाश्या पाळण्याचे केंद्र येथे असून शुद्ध मध व मधाची चिक्की येथे विकत मिळते.

‘लॉगहट’ हे संपूर्ण लाकडात बांधलेले गेस्ट हाऊस उंच डोंगरावर असून वनविभागाच्या अखत्यारित आहे. तेथून संपूर्ण सापुताऱ्याचे विलोभनीय दर्शन घडते. याशिवाय नागेश्वर मंदिर, स्वामी नारायण मंदिर, इको पॉईंट, स्टेपगार्डन, मत्स्यालय, डांगव्हॅली, ऋतुंबरा विश्वविद्यालय, वनस्पती उद्यान इ. पर्यटनस्थळे सापुतारा येथे आहेत. स्थळ दर्शनासाठी येथे खाजगी वाहने (कार,जीप इ.) भाड्याने उपलब्ध आहेत. सापुताऱ्याचं आणखी एक मुख्य आकर्षण म्हणजे टेबल लॅण्ड पॉईंट. हा पॉईंट वैती रोप वे रिसॉर्टच्या वरती असून हे प्रचंड मोठे मैदान सापुताऱ्यात सर्वात उंच ठिकाणावर आहे. येथून सनसेट अतिशय सुरेख दिसतो. त्यामुळे दुपारनंतर या पॉईंटवर पर्यटकांची खूप गर्दी होते. येथे घोडेस्वारी, उंटसवारी, एटीव्ही कार्स, घोडागाडी इ. सुविधा पर्यटकांना आकर्षित करतात. विविध स्टॉल्स असल्याने एकप्रकारचा पिकनीक स्पॉट म्हणून हे स्थळ लोकप्रिय आहे.

सापुताऱ्याच्याजवळ ‘उन्हाई’ हे गरम पाण्याचे झरे असून याबाबत एक दंतकथा प्रसिद्ध आहे. ‘उन्हाई’ या गुजराथी शब्दाचा अर्थ मी स्नान केले असा असून राम, लक्ष्मण व सीतामाई वनवासाच्या काळात या जंगलात आले असता, येथील ऋषी व साधूंना कोडासारख्या त्वचारोगाची लागण झालेली त्यांना दिसली. हा रोग नाहीसा करावा असे सीतामाईने रामास सांगितले. तेव्हा रामाने लक्ष्मणास एक बाण मारण्यास सांगितले. त्याने जेथे बाण मारला तेथे एक झरा उत्पन्न झाला. हा झरा गरम पाण्याचा होता. ह्या झऱ्यात ह्या तिघांनी स्नान केले नंतर त्या साधू व ऋषींना आंघोळ करण्यास सांगितले. तेथे स्नान केल्यावर सर्वांचा त्वचारोग नाहीसा झाला. अशी आख्यायिका आहे. या परिसरात कोणालाही त्वचेचा रोग होत नाही असे सांगतात. ह्या झऱ्यातून बाराही महिने गरम पाणी येते व त्याचे तापमान 100 सें.ग्रे. इतके असते. सापुताऱ्यापासून जवळच 6 कि.मी. अंतरावर शिवाजी महाराजांनी बांधलेला हातगड किल्ला आहे. नाशिक मार्गे सापुताऱ्याला जाताना पन्नास कि.मी. अलीकडे महाराष्ट्राची कुलस्वामिनी व साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तश्रृंगी देवीचे स्थान लागते. या गडावर जाण्यासाठी पक्का रस्ता असल्याने गडावर जाण्यासाठी पक्का रस्ता असल्याने गडावर जाऊन देवीचे दर्शन घेता येते.
कोठे रहाल ?
सापुतारा येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी बजेट हॉटेल्सपासून थ्रीस्टार हॉटेलपर्यंत विविध पर्याय उपलब्ध आहेत. विविध सुखसुविधांनीयुक्त हॉटेल्स व धर्मशाळा येथे पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. गुजरात टुरीझमद्वारा सापुतारा येथे तोरण व सह्याद्री ही हॉटेल उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे वैती रिसॉर्ट, चित्रकुट, पतंग, लॉर्डस्, लेक व्ह्यू, शिल्पी, स्टार हॉलिेडे होम यासारखी अनेक खाजगी हॉटेल्स वाजवी दरात उपलब्ध आहेत.
जाणार कसे ?
या पर्यटन केंद्रास जाण्यासाठी मुंबई, पुणे, शिर्डी, नाशिक, बलसाड, बिल्लीमोरा, सुरत येथून थेट बसेस आहेत. रेल्वेने येण्यासाठी नाशिकरोड (82 कि.मी.) व बिल्लीमोरा (112 कि.मी.) ही जवळची रेल्वे स्टेशन्स आहेत.
सापुताऱ्यास कधी जाल ?
सापुतारा हे जरी थंड हवेचे ठिकाण असले तरी येथील वातावरण संपूर्ण वर्षभर आल्हाददायक असते. म्हणून वर्षभरात केव्हाही येथे जाता येते. एप्रिल ते जुलै या दरम्यान पर्यटकांची गर्दी सर्वात जास्त असते. होळी, रंगपंचमी, दिवाळी, नाताळ, संक्रांत इ. सणांना येथे खास उत्सव साजरे केले जातात.

पावसाळ्याचा सिझन तर सापुताऱ्यातील सर्वात नयनरम्य सिझन असतो. ढग, पाऊस व धुक्याचा अनोखा व अदभूत अनुभव तेथे पर्यटकांना अनुभवयास मिळतो. काश्मिरसारखा अदभूत अनुभव घेण्यासाठी पावसाळ्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. याशिवाय ट्रेकिंगसाठी अनेक गड व किल्ले आहेत. म्हणून साहसी पर्यटनालाही येथे मोठा वाव आहे.

त्याच-त्याच पर्यटन स्थळांना भेटी देवून कंटाळलेल्या पर्यटकांना सापुतारा निश्चितच नवा अनुभव देईल.

सौ. सुषमा पगारे, 
नाशिक, मो. 8380016473

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India