वाघोबाच्या गावात.... बोर व्याघ्र प्रकल्प

महाराष्ट्रात एकूण सहा व्याघ्र आहेत. त्यातील पाच विदर्भात आहेत. हे पाच आणि इतर राज्यातील आठ व्याघ्र प्रकल्प मिळून एकूण १३ व्याघ्र प्रकल्प विदर्भाच्या ३०० चौ.कि.मी च्या परिक्षेत्रात आहेत. त्यामुळेच विदर्भाला देशाची व्याघ्र राजधानी म्हटले जाते. स्टेटस ऑफ टायगर्स इन इंडिया च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील वाघांची संख्या सन २०१० च्या १६९ वाघांहून वाढून ती १९० इतकी झाली आहे.

महाराष्ट्रात जे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत त्यामध्ये बोर व्याघ्र प्रकल्प, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प यांचा समावेश आहे.

पहिल्या भागात आज जाणून घेऊ या बोर व्याघ्र प्रकल्पाविषयी ची माहिती.

बोर अभयारण्याला ऑगस्ट २०१४ मध्ये व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला. भारतातील एक नवीन आणि सर्वात लहान असा हा व्याघ्र प्रकल्प आहे. आकाराने लहान असला तरी जैवविविधतेने संपन्न आणि वन्यप्राण्यांचा उत्तम अधिवास असलेले हे ठिकाण त्यामुळेच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. २७ नोव्हेंबर १९७० रोजी बोरला अभयारण्य म्हणून घोषीत करण्यात आले. बोर व्याघ्र प्रकल्प हा नागपूर जिल्ह्याच्या दक्षिण सीमेस आणि वर्धा जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर आहे. याशिवाय ६१.१० चौ.कि.मी जलाशयाचा यात समावेश करण्यात आला आहे. बोर हे सातपुडा-मैकल येथील संपन्न जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करते. हे सातपुडा पूर्व-पश्चिम महाराष्ट्राच्या उत्तर सीमेपसून सुरु होऊन कान्हा येथील मैकल टेकडीला मिळते. वन्यप्राण्यांची शिकार होऊ नये आणि जैवविविधता टिकून राहावी तसेच ती संवर्धित व्हावी म्हणून १९७० मध्ये या क्षेत्राला वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. कान्हा आणि पेंच अभयारण्याप्रमाणेच येथे तृणभक्षी व मांसभक्षी प्राण्यांची संख्या मोठ्याप्रमाणात आहेत. २०१४ च्या व्याघ्र गणनेनुसार येथे ४ ते ५ प्रौढ वाघांसह त्यांच्या बछड्यांचा आढळ आहे. जुन्या बोर अभयारण्याचे क्षेत्र ६१.१०० चौ.किमी आहे. नवीन बोर वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्र ६०.६९ चौ.कि.मी आहे तर नवीन बोर विस्तारित वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्र १६.३१ चौ.कि.मी आहे. जंगलाची सलगता हे या अभयारण्याचे वैशिष्ट्य असून ही सलगताच वन्यप्राण्यांच्या विशेषत: वाघांच्या संवर्धनात महत्वाची ठरत आहे.

कसे पोहोचाल: 
विमान: डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथून ८० कि.मी
रेल्वे: वर्धा रेल्वेस्टेशनहून ३५ कि.मी
रस्ता- हिंगणी गावापासून ५. कि.मी

-डॉ. सुरेखा म मुळे 
वरिष्ठ सहाय्यक संचालक (माहिती)
संदर्भ: वन विभाग

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India