महाराष्ट्रातील अनेक यात्रा प्रसिद्ध असून नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील यात्रा ही घोडेबाजारासाठी प्रसिद्ध आहे. ह्या यात्रेत निरनिराळ्या प्रकारचे घोडे दाखल होतात. सारंगखेडा येथे असलेल्या पुरातन दत्त स्वामी मंदिराच्या यात्रोत्सवात हा घोडे बाजार भरतो. शिरपूर तालुक्यातील भरवाडे येथील नंदा पाटील यांना स्वप्न पडले. त्यात त्यांना एकमुखी दत्ताचे मंदिर हे सारंगखेडा येथे उभे करावे असे सांगितले गेले. सुमारे तीनशे वर्षापूर्वी नंदा पाटील या ग्रामस्थाने एकमुखी दत्ताची स्थापना करुन छोटसे मंदिर बांधले हेाते. कालांतरांने ग्रामस्थांनी मंदिर ट्रस्ट उभारुन लोकवर्गणीतून मंदिराचा जिर्णोध्दार केला. नंदा पाटील हे वारकारी संप्रदायाचे आणि महानुभाव पंथाचे असल्याने आजही मंदिर ट्रस्टच्या कार्यकारिणीमध्ये सर्व सदस्य हे महानुभाव पंथाचे आहेत. अनेक भाविक नवस फेडण्यासाठी या यात्रेत सहभागी होतात.
ही यात्रा घोडे बाजारासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या समोरच्या परिसरात हा घोडाबाजार भरतो. जिल्हा परिषद उपाध्यक्ष रावल यांच्या 20 एकर जागेवर हा घोडे बाजार भरला जातो. कृषी बाजार समिती व ग्रामपंचायतीचे कर्मचारी यात्रोत्सवासाठी झटतात. घोड्यांच्या देखरेखीसाठी जिल्हा परिषदेच्या पशु संवर्धन विभागाचे कर्मचारी उपस्थित असतात. देशभरातून जवळपास 2000 ते 3000 घोडे विक्रीसाठी दरवर्षी यात्रेत विक्रीसाठी येतात. साधारणत: 40 हजारपासून घोडे खरेदीला बोली लावली जाते. अनेक अश्वप्रेमी ह्या घोडे बाजारासाठी बोली लावतात. आतापर्यंत 75 लाख रूपयांपर्यंत एका घोड्याची बोली लागली गेली आहे. यावरुन या यात्रेत होणारी उलाढाल व अश्वप्रेमीच्या आवडीची प्रचिती नक्कीच येते.
सारंगखेड यात्रेतील घोड्यांमध्ये देवमान, कंठळ, जयमंगल, शामकर्ण, काळा, पाच कल्याणी हे गुणवान घोडे सर्वात मोठ्या प्रमाणावर अश्वप्रेमी खरेदी करतात. तर घोड्याच्या नाकावर पांढरे चट्टे, दोन भवरी असलेले, पोटाखाली भवरा असलेले, गळ्यावर भोवरा असलेले घोडे अश्वप्रेमी नाकारतात. या ठिकाणी महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान या भागातून घोडे विक्रीसाठी येतात. पंधरा दिवसाच्या या यात्रोत्सवात करोडो रूपयांची उलाढाल होते.
यात्रोत्सवाच्या निमित्ताने भरलेल्या घोडे बाजारात घेाडे खरेदीसाठी व आनंद लुटण्यासाठी अनेक सिने कलावंतही सहभागी होतात. अनेक राजकीय पक्षांचे नेतेही हजेरी लावतात. संपूर्ण भारतात घोडे बाजारासाठी या यात्रेची ओळख निर्माण झाली आहे.
- निलेश परदेशी, चाळीसगाव
सारंगखेडा यात्रा अश्वप्रेमीसाठी एक पर्वणी
Posted by
rajeshkhadke
on Wednesday, 6 January 2016
Labels:
पर्यटन
0 comments:
Post a Comment