राज्यातील 451 ग्रामपंचायतींसाठी 23 जूनला मतदान

जुलै ते सप्टेंबर 2013 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 451 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी व काही रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 23 जून रोजी मतदान होणार असून, सार्वत्रिक निवडणुकांसाठी संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात व पोटनिवडणुकांसाठी संबंधित प्रभागांत आज मध्यरात्री पासून आचारसंहिता लागू होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.

या निवडणुकीसाठी 15 एप्रिल 2013 ची मतदार यादी ग्राह्य धरली जाईल. नामनिर्देशनपत्रे 4 ते 8 जून 2013 या कालावधीत दिली व स्वीकारली जातील. 10 जून 2013 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे  12 जून 2013 पर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी चिन्हांचे वाटप होईल व अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. 23 जून 2013 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होईल. दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 जून 2013 रोजी मतमोजणी होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.

आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तींकडे जातपडताळणी समितीने दिलेले जातवैधता प्रमाणपत्र नसल्यास नामनिर्देशनपत्रासोबत या समितीकडे जातवैधता प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाचा पुरावा जोडणे आवश्यक राहील. त्याचबरोबर निवडून आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे विहित नमुन्यातील हमीपत्रही उमेदवाराने देणे बंधनकारक असेल.

सर्व ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे (EVM) मतदान घेण्यात येईल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक खर्चाचा दैनंदिन हिशोब सादर करणे आवश्यक राहील. तसेच निवडणुकीनंतर 30 दिवसांच्या आत एकूण खर्चाची माहिती सादर करावी लागेल. ती मुदतीत सादर न करणाऱ्या उमेदवारांना अनर्ह ठरविण्यात येते, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

जिल्हानिहाय सार्वत्रिक निवडणूका होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या अशी : ठाणे-9, रायगड-156, सिंधुदुर्ग-2, नाशिक-15, धुळे-6, जळगाव-7, अहमदनगर-72, पुणे-53, सोलापूर-2, सातारा-12, सांगली-30, कोल्हापूर-52, औरंगाबाद-2, नांदेड-7, परभणी-1, उस्मानाबाद-3, लातूर-5, अकोला-3, यवतमाळ-5, वर्धा-5, चंद्रपूर-1, गडचिरोली-3, एकूण-451.

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India