प्रयत्ने वाळूचे कण रगडीता...

हात फिरल्यावर दशा फिरते' असे म्हणतात ते काही खोटे नाही. प्रयत्न केल्यावर प्रत्येक कठीण वाटणारी गोष्ट सहज शक्य होते. रत्नागिरीतील रानवी गावात रस्त्याच्या कडेला असलेली काळ्या कातळाकडे पाहिल्यावर याठिकाणी फळबाग लागवड म्हटल्यावर 'शक्यच नाही' अशीच प्रतिक्रीया आली असती. मात्र या कातळावरही आंब्याला तीन वर्षातच मोहोर येतोय. ही किमया करून दाखवली आहे मर्चन्ट नेव्हीच्या अधिकाऱ्याने, कॅप्टन नितीन साडविलकर यांनी.

गुहागरपासून रत्नागिरी गॅस प्रकल्पाकडे जाताना रस्त्याच्या कडेला असलेलीकातळाची जमीन साडविलकर यांनी घेतली. सुरुवातीला चार हेक्टर क्षेत्रावर कृषि विभागाच्या सहकार्याने रोजगार हमी योजने अंतर्गत त्यांनी 4 हेक्टर क्षेत्रावर 400 आंब्याची कलमे लावली. सोबत स्वत: खाजगिरित्या 100 कलमे लावली. कृषि विभागामार्फत ठिबक सिंचनासाठी त्यांना अनुदान मिळाले. पाण्याच्या सोईसाठी त्यांनी विंधन विहीर घेतली. जमिनीवरील बांदबंदिस्ती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

वरकरणी सहज दिसणाऱ्या या कामांसाठी त्यांना खूप कष्ट घ्यावे लागले. आठ महिने परदेशात असताना देशात परतल्यावर दोन ते तीन महिने साडविलकर शेतात राबले. काहीतरी नवे आणि टिकणारे करायचे हा निश्चय त्यांनी केला. त्याच माळरानावर पारंपरिक पद्धतीचे घर उभारले. त्या घरातही बालपणीच्या आठवणीतील पलंग, खुर्च्या, छत, फुलबाग आदी व्यवस्था त्यांनी केली आहे. बांदबंदीस्तीसाठी लागणारा दगड त्याच ठिकाणाहून काढण्यात आला. काही ठिकाणी जमिन व्यवस्थीत करायला जेसीबी आणि ब्लास्टिंगचा उपयोग करावा लागला. परिसरातच केवळ दगड उपलब्ध व्हावा आणि पाण्याचा पर्यायी स्त्रोत मिळावा म्हणून शेततळे तयार केले. श्रम करताना त्यांनी माघार घेतली नाही.

त्यांनी शेतजमिनीला लागून असलेली जागा विकत घेतली. एकूण 50 एकर क्षेत्रात त्यांचे प्रयोग सुरू आहेत. आज त्यांच्या फळबागेत 750 आंबा कलमे तसेच रस्त्याच्या कडेला 100 नारळाची आणि 150 कोकमची रोपे लावण्यात आली आहेत. शेत बहरलेले दिसावे म्हणून कलमांच्या बाजूला नाचणीचे पीक घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तसेच शेतासाठी लागणारे सेंद्रीय खत तयार करण्यासाठी गायी आणि मेंढ्या पाळण्याचा मनोदयही त्यांनी बोलून दाखविला.

शेताच्या उतारावरून खालपर्यंत कच्चा रस्ता तयार करण्यात येत आहे. खालच्या बाजूस दोन टेकड्यांच्या मधोमध समुद्राचे मोहक दर्शन होते. याठिकाणी लहान बंधारा उभारून कृत्रीम धबधबा तयार करण्याचा त्यांचा मानस आहे. त्याला लागून टेकड्यांवर कृषि पर्यटनाची सुविधा करण्यात येणार आहे. त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर 'कातळ बघण्यासाठी पर्यटक येणार नाही. त्यासाठी परिसर हिरवा करायचा आहे' कृषि पर्यटनाच्या स्पष्ट कल्पना त्यांच्या मनात आहेत. म्हणूनच कोकणातील शेतकरी जमीन विकतात याचे त्यांना मनस्वी वाईट वाटते.

यावर्षी आंब्याला आलेला फुलोरा त्यांनी काढून टाकला. पुढील वर्षापासून चांगले उत्पन्न मिळेल, असा विश्वास त्यांच्या मनात आहे. पण केवळ फळबाग यशस्वी करण्यापुरते त्यांचे प्रयत्न नाहीत. त्यातून हा सुंदर परिसर पर्यटकांसाठी विकसीत करण्याचे त्यांचे ध्येय आहे. त्यांचे प्रयत्न पाहता यात त्यांना निश्चितपणे यश मिळेल असेच म्हणता येईल.

-डॉ.किरण मोघे

1 comments:

Raja Paranjape said...

आपण कोट केलेली कविता मात्र उपहासात्मक आहे त्याचा अर्थ जास्ती प्रयत्नांनी येते असा नाही. ती कविता पूर्ण वाचावी ही विनंती.
प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे |
तृषार्ताची तृष्णा मृगजळ पिऊनही वितळे ||
सशाला दिसे विपिन फिरता शृंगही जरी |
परंतु मूर्खाचे हृदय धरवेना क्षणभरी ||

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India