झाडे लावा प्रगती साधा

आज पर्यावरणाची हानी होत असल्याने दुष्काळासारखी संकटे उभी राहात असल्याचे चित्र दिसत आहे. वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. केवळ वृक्षलागवड न करता वृक्षांचे संगोपनही तितकेच महत्वाचे आहे. हातनूरमध्ये ग्रामस्थांच्या सहभागातून हे शक्य झाले आहे. हातनूरने राज्यात स्वत:चा असा एक पॅटर्न तयार केला आहे. ग्रामस्वच्छता, निर्मलग्राम यासह दोन वेळा वनश्री पुरस्कारही मिळविला आहे. मात्र, कोणतेही अभियान केवळ पुरस्कारापुरते न राबविता त्यामध्ये सातत्य राखण्याचा प्रयत्न या गावाने केला आहे.

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुका भीषण दुष्काळात होरपळतो आहे. गावोगावी पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु आहेत. वाड्या-वस्त्यांवर लोक पाणी पाणी करत असताना याच तालुक्यातील हातनूर (ता. तासगाव) गावाने दुष्काळा विरुध्दची लढाई नेटाने लढली आहे. गावातील सांडपाणी गोळा करुन त्यावर तब्बल 12 ते 15 हजार झाडे जगविण्याचा प्रयत्न केला आहे.

गेल्या तीन चार वर्षात हातनूर येथे अत्यंत नियोजनबध्द रीतीने 30 हजारांवर झाडे लावली आहेत. गावात आणि परिसरातील होनाई देवीच्या मंदिर परिसरातही मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले आहे. मात्र, सलग दोन वर्षे हातनूर आणि परिसर दुष्काळाला तोंड देत असल्याने जेथे माणसाला पाणी प्यायला मिळत नाही, तेथे झाडे कशी जगवायची ?असा प्रश्न निर्माण झाला. माणसांच्या पाण्याच्या प्रश्न सुटला आणि माणसाने झाडांच्या पाण्याचाही प्रश्न सोडविला. गेली दोन वर्षे उन्हाळ्यामध्ये हातनूर ग्रामपंचायत छोट्या टँकरने प्रत्येक झाडाला पाणी घालून जगविण्याचा प्रयत्न करते आहे. हा प्रयत्न कमालीचा यशस्वी झाल्याचे चित्र आज ऐन उन्हाळ्यात हातनूरमध्ये पाहावयास मिळत आहे.

ग्रामपंचायतीने सांडपाण्याचा पुनर्वापर करुन झाडे जगविण्याचा प्रयोग केला आहे. गावातील दोन मोठ्या गटारातील पाणी एका ठिकाणी एकत्र केले आहे, त्यातून त्या पाण्याचे तीन वेगवेगळ्या टाक्यांमध्ये शुध्दीकरण करुन दहा हजार लिटरच्या एका टाकीत एकत्र केले आहे तेथून मोटारीने पाणी उपसून छोट्या टेंपोतील पाच हजार लिटरच्या टाकीमध्ये हे पाणी टाकून ते पाणी पाईपव्दारे आवश्यक त्या झाडांना दिले जाते. दिवसभरात 15 ते 20 हजार लिटर पाणी झाडांना घातले जाते. छोट्या टेंपोचा देखभाल आणि डिझेल खर्च ग्रामपंचायतीच्या खर्चातून केला जातो आहे. काही ठिकाणी हेच पाणी उंचावर एका टाकीतून ठिबकव्दारे झाडांना दिले जाते. गावापासून जवळच असलेल्या होनाईच्या डोंगरावरही मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली आहे. उंचावर नेवून एका टाकीतून पाईपलाइनव्दारे तेथील झाडांना पाणी दिले जात आहे.गेल्या तीन वर्षात गावात रस्त्याकडेला, होनाई देवी मंदिर परिसर, गावातील रस्त्यांकडेला, दलितवस्तीमध्ये अशी तब्बल 30 हजार झाडे लावण्यात आली आहेत. त्यापैकी 12 ते 15 हजार झाडे मोठी झाल्याने पाणी द्यावे लागत नाही. मात्र छोट्या झाडांना पाणी देण्याचे काम केले जाते. या सर्व झाडांचे कागदोपत्री रेकॉर्डही ठेवण्यात आले आहे. परिणामी आज ऐन दुष्काळात बहरलेली झाडे पाहून मन मोहरुन जाते.

दिलीप घाटगे, माहिती अधिकारी,सांगली

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India