नळाला बसवा वॉटर मिटर अर्ध्यावर आणा पाणी वापर

गावात झाडं कुणी लावायची ?
लावली तर ती कुणी जगवायची ?
घर- गावपरिसर कुणी स्वच्छ ठेवायचा?
पाण्याचा वापर काटकसरीनं कसा करायचा?
सांडपाणी शुद्ध करून पुन्हा वापरायचं की फेकून द्यायचं?
गावातल्या पर्यावरणाचे रक्षण कुणी करायचं ?

या आणि या सारख्या अनेक प्रश्नांना चोख उत्तर दिलेय
ते सांगली जिल्ह्याच्या वाळवा/ इस्लामपूर तालुक्यातील कोरेगावनं

ते ही पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेच्या परिणामकारक अंमलबजावणीतून.

वारणा नदीच्या काठावर 20 एकरावर वसलेल्या या गावाला महापूराचा तडाखा बसला आणि 80 टक्के गाव पाण्याखाली जाऊन गावाचे खुप नुकसान झाले. मग स्व. राजारामबापू पाटील, स्व. वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वातून गावाचा आखीव रेखीव मास्टर प्लॅन तयार झाला आणि गाव मुळ गावापासून 2.5 कि.मी अंतरावर नव्याने सुनियोजितपणे वसलं. 840 कुटुंब आणि एकूण 5026 लोकसंख्या असलेल्या गावातील मुख्य रस्ते 33 फुट तर गावांतर्गत रस्ते 12 फुट रुंदीचे आहेत. गावची भौगोलिक आणि आर्थिक परिस्थिती चांगली असून बहुतांश बागायती क्षेत्र ऊसाचे आहे. गावात निनाईदेवीच्या प्राचीन मंदिराबरोबरच हनुमान आणि विठ्ठल- रुक्मिणीचे प्रशस्त देवालय आहे. लोकनेते राजारामबापू पाटील याच्या नावे एक सुंदर उद्यान उभारण्यात आले असून 1984 पासून गावात दारूबंदी आहे.

गावात पूर्वी पिण्यासाठी दररोज 6 लाख लिटर पाणी लागायचं. पण ग्रामपंचायतीने पाण्याचे सुयोग्य नियोजन करीत प्रत्येक घरातील नळावर वॉटर मिटर बसवलं आणि आता केवळ 3 लाख लिटरमध्ये संपूर्ण गावाची तहान भागते. म्हणजेच गावाचा पाणी वापर अर्ध्यावर आला आणि गावात पाण्याची मोठी बचत झाली. पाण्याची बचत झाली तस गावकऱ्यांची पाणीपट्टीही कमी झाली. गावात 815 नळजोडण्या आहेत. यश महिला बचतगटाद्वारे गावात तिमाही पद्धतीने पाणीपट्टी वसुल केली जात असल्याने कर वसुलीचे प्रमाण 100 टक्के आहे.

गावाने 2004-05 मध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात तर 2005-06 मध्ये निर्मलग्राम अभियानात यश मिळवून स्वच्छ आणि सुंदर गावाचा बहुमान मिळवला. पुढे पुरस्कारांची ही मालिका चालूच राहिली आणि विकास कामे करतांना गावाने पुन्हा कधीच मागे वळून पाहिले नाही. गाव 2006-07 मध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात राज्यात पहिलं आलं. घरात नळ आणि दारात शौचालय याप्रमाणे काम करून गावाने विकासासाठी आम्ही नेहमी परिवर्तनशील आणि आग्रही आहोत हे दाखवून दिलं.

ग्रामसभे ने घातलेल्या निर्बंधानुसार गावात प्लॉस्टिक वापर नाही. गावातील सगळा कचरा घंटागाडीतून एका ठिकाणी जमा केला जातो. त्याद्वारे कंपोस्ट खताची निर्मिती करून त्याचा वापर शेतीसाठी आणि लावलेल्या झाडांसाठी केला जातो.

प्रत्येक घरातील सांडपाणी एका नाल्याद्वारे संकलित केलं जातं. दररोज साधारणत: 2 हजार लिटर संकलित होणाऱ्या या पाण्याचे शुद्धीकरण करून ते पाणी शेतीसाठी विकले जाते. यातून काही प्रमाणात का होईना ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळतं.

सर्व पथदिवे सी.एफ.एल बल्बचे आहेत. मुख्य ठिकाणी 20 सौरदिवे लावण्यात आले आहेत तर गावात 467 बायोगॅस आहेत. गावात एक हायस्कुल, दोन प्राथमिक शाळा आणि पाच अंगणवाड्या आहेत. यातील 153 क्रमांच्या अंगणवाडीला "जिल्हास्तरीय आदर्श अंगणवाडी" पुरस्कार मिळाला आहे.

जलस्वराज्य प्रकल्प वेळेत पूर्ण केल्याबद्दल गावाला प्रोत्साहनात्मक अनुदान मिळाले असून त्यातूनही गाव विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. गावाचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे गावतील उद्यमशील महिला. गावातील बचतगटांची संख्या 25. यातील भाग्य लक्ष्मी महिला बचतगटाने ग्रामपंचायत, युनिसेफ आणि महाराष्ट्र राज्य उद्योजकता विकास महामंडळ यांच्या सहकार्याने "निर्मल सॅनटरी पॅड" उत्पादनाचा उद्योग सुरु केला. त्याचा फायदा गावातील महिलांबरोबरच इतर स्त्रियांनाही झाला. केमिकलमुक्त आणि महिलांच्या आरोग्याची सर्वांगीण काळजी घेऊन हे उत्पादन तयार करण्यात आल्याने प्रकल्प कौतूकाचा विषय ठरला असून जिल्हा, राज्य आणि इतर देशातूनही प्रकल्पाला भेट देणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत गावाने पेरुची आणि इतर 5030 झाडं लावली. प्रत्येक झाडाला टॅगींग करण्यात आलं, झाडाचा क्रमांक, त्याचे शास्त्रीय नाव, उपयोगातील नाव, त्याचे स्वरूप या सर्व गोष्टींची माहिती त्यावर दिल्याने झाडांच्या नावाबरोबर त्याची वैशिष्टयही लोकांना कळत आहेत.सर्व झाडांना ट्रीगार्ड आणि काटेरी कुंपणाने संरक्षण देण्यात आलं आहे. ग्रामपंचायतीला पेरुच्या झाडापासून वार्षिक 80 हजार तर रोजगार हमी योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या 20 हजार रोपांच्या रोपवाटिकेपासून 2 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न अपेक्षित आहे.

पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत पूर्ण करावयाचे तीनही वर्षांचे निकष पहिल्याच वर्षी पूर्ण केल्याने तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याहस्ते गावाला "पर्यावरण विकासरत्न पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले आहे. माजी सरपंच व्यंकटराव पाटील आणि तत्कालीन ग्रामसेवक ए.एस. अत्तार यांनी गाव विकासाची समृद्ध पायाभरणी केली तर विद्यमान सरपंच श्रीमती सुरैय्या अमीन मुलानी आणि गटविकास अधिकारी एस.व्ही माळी यांनी ही धुरा समर्थपणे पुढे नेतांना गाव विकासाचे भविष्यकालीन नियोजन आणि दिशाही निश्चित केली आहे.

डॉ. सुरेखा मुळे

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India