सांस्कृतिक भारत : मेघालय

मेघालय हे भारतातील उत्तर- पूर्व राज्य असून शिलाँग ही या राज्याची राजधानी आहे. राज्याची स्थापना 2 जानेवारी 1972 रोजी झाली आहे. मेघालयचा संस्कृत अर्थ मेघाच्‍छादित प्रदेश असा होतो. शिलाँगला पूर्वेतले स्कॉटलंड म्हटले जाते. मेघालय हा पूर्वी आसामचा भाग होता. पण 21 जानेवारी 1972 ला खासी, गारो आणि जैंटिया टेकड्या मिळून या तीन जिल्ह्यांना स्वतंत्र राज्य घोषित करण्यात आले. आता राज्यात सात जिल्हे आहेत. मेघालयाची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेप्रमाणे 3,211,000 इतकी असून राज्याचे क्षेत्रफळ 22,429 चौरस किमी इतके आहे. राज्याची साक्षरता 75.78 इतकी आहे.

मेघालयाच्या उत्तर आणि पूर्व ‍सीमेला आसाम आणि दक्षिण व पश्चिम सीमेला बांगला देश आहे. मेघालयात मेघांचे निवासस्थान (मेघ अधिक आलय) म्हणून मेघालय नाव. पहाडी प्रदेश. येथे प्रामुख्याने खासी, जैंटिया आणि गारो जमातीची वसाहत आहे. मेघालयाच्या मध्य आणि पूर्व भागात खासी आणि जैंटियाच्या टेकड्या. भव्य पठार, उतरते गवताळ प्रदेश, टेकड्या, नद्या व दऱ्यांनी हा प्रदेश समृद्ध आहे. पठाराच्या दक्षिणेकडील भागाला खोल दऱ्या, खिंडी आणि सरळ उभ्या दरडी आहेत. पायथ्याशी अरूंद सपाट मैदानाचा पट्टा थेट बांगला देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमेला भिडला आहे.

मेघालय हे कृषीप्रधान राज्य आहे. यातील 80 टक्के लोकसंख्या आपल्या उदरनिर्वाहासाठी कृषीवर अवलंबून आहे. शेतीला पोषक हवामानामुळे हे राज्य प्रगतीपथावर आहे. उष्ण कटीबंधीय व समशितोष्ण वातावरणात फळे व भाज्यांच्या उत्पादनाला येथे जास्त वाव असतो. तांदूळ या प्रमुख पिकाखेरीज संत्रे, अननस, केळी, फणस, उष्ण प्रदेशातील फळे, आलूबुखार, पियर, पिसेस इत्यादी फळांचे उत्पादन होते. बटाटे, हळद, आले (अद्रक), काळे मिरे, पोफळी (सुपारी), आखूड धाग्याचा कापूस, ताग, मेष्टा व मोहरी इत्यादी रोख उत्पन्न देणारी पिकेही घेतली जातात. भुईमुग, सोयाबिन, सूर्यफूल यांचे उत्पादनही राज्यात होते.
शिलाँगपासून अकरा किमी अंतरावरील मीठ या खेडेगावात पाच दिवस चालणारा धार्मिक उत्सव साजरा केला जातो. खासी का पामब्लॅग असे त्याचे नाव. वार्षिक नोगक्रेम हा प्रसिद्ध सण. यालाच नोकक्रिमचे नृत्य असेही संबोधले जाते. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात खासी लोकांचा शदसुकम्यानीसम नावाचा धार्मिक उत्सव शिलाँगला साजरा करतात. जुलैमध्ये जायटियाम इथे जोवाई लोक देहदिएनख्लम नावाचा चैतन्यमय उत्सव साजरा करतात. ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये बांगला नावाचा एक उत्सव सलजॉगला (सूर्यदेव) प्रसन्न करण्यासाठी गारो जमातीतील लोक हा सण साजरा करतात.

निसर्गदत्त सृष्टीसौंदर्य मेघालयात पहायला मिळते. मेघालय हे सृष्टीसौंदर्याने नटलेले राज्य आहे. शिलाँग हे राजधानीचे शहर. अनेक निसर्गरम्य स्थळे आहेत. येथे वर्डस लेक, लेडी हँड्री पार्क, पोलो ग्रांऊड, छोटे प्राणी संग्रहालय, एलिफंटा धबधबा, शिलाँग पीक, गोल्फ कोर्स, गरम पाण्याचे झरे, चेरापुंजी, जोवई, तुरा, नरतियांग या सारखी अनेक रमनीय स्थळे पहायला मिळतात.
इंग्रजी ही मेघालयची राज्य भाषा असली तरी काही स्थानिक भाषा इथे बोलल्या जातात त्यापैकी खासी, पनार आणि गारो या आहेत. मेघालयातील भाषा आणि ती भाषा बोलणारे लोक खालील प्रमाणे :

भाषा आणि ती कोण बोलतं ते पुढीलप्रमाणे – असमिया – मान; बाईटे - मिझो–बाईटे; बोडो – बोडो कचारी, राभा कचारी; गुटोब – गडाबा; खासी – जैंटिया खासी; खासी-भोई; खासी-खिनरियान; खासी-लिगम; कोच – कोच.

बोरो कचारीस, चकमा, दिमासा, कचारी, गारो, हजोंग, हमार, जैनतीया, सेंतेंग, पनार, वार, भोई, लेंगंगम, कोच, कुकी, चांगसन, चों‍गलोइ, डोऊंगेल, गमालहो, गांगटे, गुइटे, हन्नें‍ग, हाऊकीप, हाऊपीट, हाऊलाइ, हेंगना, होन्सुग, खावाथलांग, खोथालंग, खेलमा, खोलहोन, कीपगेन, लहोजेम, लुफेंग, मांगजेल, मिसाओ, रियांग, सायरहेम, सेलनाम, सिंगसन, सीतलहो, सुकटे, थाडो, थांगेजन, उइबुह, वाइफेइ आदी आदिवासी मेघालयात वास्तव्य करतात.

मेघालय हे ख्रिश्चन धर्मिय राज्य समजले जाते. भारतात ख्रिश्चन मिशनरी आल्यानंतर इथल्या आदिवासींचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर झाले. खासी, गारो आणि जैंटिया ह्या आदिवासींची श्रीमंत सांस्कृतिक परंपरा मेघालयाला लाभली आहे. लाकूड, बांबू आणि ऊसांपासून ते वेगवेगळ्या कलाकुसरी करीत असतात. त्यांचे पारंपरिक वाद्य सुद्धा याच वस्तुंपासून बनवलेले असतात. कार्पेट आणि सिल्क काम सुद्धा इथे परंपरेने चालत आलेले आहे. हस्तकला व्यवसाय आणि बाहुल्यांच्या कलाकृती इथे पहायला मिळतात.

मेघालयातली नृत्य हे उघड्या आकाशाखाली केले जातात. जन्मोत्सव, उत्सव, सण, लग्न विधी, प्रेम आदीत अनेक प्रकारचे ड्रम आणि वाद्य बडवले जातात. सरोवर, टेकड्या, धबधबे आदी ठिकाणी ही नृत्य व गाणी सादर केली जातात. या वेळी विविध प्रकारची वाद्य वाजवली जातात. ढोल, दुतारा, गिटार, बासरी, पिंगाणी, कामट्या या प्रकारची वाद्य इथे प्रचलित आहेत.

मेघालयाचे प्रसिद्ध पारंपरिक नृत्य म्हणजे नॉनगक्रेम हे नृत्य. हे नृत्य धार्मिक नृत्य असून देवाला धन्यवाद देण्यासाठी केले जाते. साधारणत: ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये हे नृत्य सादर केले जाते.

शाद सुक मायसियम नावाचे नृत्य रंगीबेरंगी कपडे घालून सादर केले जाते. हिवाळ्यात खासी टेकड्यांच्या भागात हे नृत्य प्रचलित आहे. कुवारपणातले हे पारंपरिक नृत्य असते. परंपरेने चालत आलेली वेषभूषा या नृत्याच्या वेळी केली जाते. या वेळी पार्श्वसंगीतासाठी ड्रम्स, पाईप वाजवले जातात. या वाद्याला तंगमुरी असे म्हणतात आणि हे वाद्य इतर वाद्यांची राणी समजली जाते.

बेहदिनखलम नावाचा अजून एक नृत्य प्रकार असून तो वर्षातून एकदा पावसाळ्यात जुलै महिन्याच्या आसपास केला जातो. जैंटिया या जमातीतील हे प्रसिद्ध प्रवासी नृत्य आहे. चांगल्या गोष्टींच्या उन्नतीसाठी हे नृत्य केले जाते. वांगला उत्सव (गारो), डोरसेगटा नृत्य, लाहो नृत्य असेही अजून काही नृत्य मेघालयात प्रचलित आहे.

सोहरा (चेरापुंजी) हे शहर खासी टेकड्यांवर असून जगातील सर्वात जास्त पाऊस इथे होतो. हा पाऊस केवळ पावसाळ्यातच नसतो तर इथे रोज पाऊस असतो. ब्रम्हपुत्रा, कोपीली, मायनटडू, पियाइन, सोमेश्वरी या नद्या मेघालयातून वाहतात तर खासी, गारो, जयतियारांगा हे पर्वत पहायला मिळतात.

(या व्यतिरिक्‍त अजून काही महत्त्वपूर्ण नोंदी अनावधानाने राहून गेल्या असतील तर अभ्यासकांनी लक्षात आणून द्याव्यात ही विनंती.)

- डॉ.सुधीर राजाराम देवरे 
मोबाइल: 75886 18857
Email: drsudhirdeore29@gmail.com,
sudhirdeore29@rediffmail.com

वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन ठिकाण कुडा लेणी

मुरुड-जंजिऱ्यापासून जवळच असणाऱ्या कुडा येथील लेणी आसपासच्या निसर्गसौंदर्यामुळे पर्यटकांना आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यशैलीमुळे प्राचीन इतिहासाच्या अभ्यासकांना आकर्षित करत असतात. मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईपासून १३० कि.मी. अंतरावर आणि माणगावच्या आग्नेयला २१ कि.मी. अंतरावर असणारे कुडा हे रायगड जिल्ह्यातील एक शांत खेडेगाव आहे. येथे समुद्रकिनाऱ्याजवळ असणाऱ्या एका टेकडीमध्ये २६ कोरीव गुंफांचा समूह आहे आणि येथून अरबी समुद्राचे होणारे नितांतरम्य दर्शन लेण्यांची शोभा अधिकच वाढविते.

इ.स. तिसऱ्या शतकात निर्माण केलेल्या काही निवडक बौद्ध लेण्यांमध्ये कुड्याचा समावेश केला जातो. या लेण्यांची पहिली नोंद १८४८ सालची सापडते. परंतु त्यानंतरदेखील अनेक वर्षे ही लेणी फारशी प्रसिद्ध नव्हती. याचे कारण म्हणजे तेथे जाण्याकरिता राजापुरी येथील खाडी ओलांडून जावे लागते. आता दळणवळणाची साधने उपलब्ध झाली असून मुंबई ते कुडा बस चालू झाल्याने या ठिकाणाला भेट देणे अधिक सोयीचे झाले आहे. ही लेणी मांदाडपासून अगदी जवळ आहेत. मांदाड म्हणजे रोमन लेखकांनी उल्लेखिलेले मॅंडागोरा बंदर होय. या ठिकाणी झालेल्या उत्खननात सुमारे २००० वर्षांपूर्वीची खापरे आणि विटा सापडल्या आहेत. सातवाहन साम्राज्यातील महाभोजांच्या मांदव घराण्याचे हे प्रमुख केंद्र असावे असे मानले जाते. कुडा येथील लेणी दोन टप्प्यात कोरली असून क्रमांक १ ते १५ ही लेणी खालच्या स्तरात तर क्रमांक १६ ते २६ ही लेणी वरच्या स्तरात आहेत. ही सर्व लेणी बौद्धांच्या हीनयान पंथाशी संबंधित आहेत, ज्यामध्ये स्तूपपूजा प्रचलित होती. बुद्धप्रतिमा इ.स. सहाव्या शतकामध्ये स्थापिल्या गेल्या.

कुड्याच्या २६ गुहांपैकी ४ चैत्यगृहे आहेत. यांचे निरीक्षण केले असता क्रमशः होत गेलेला विकास दिसून येतो. येथील भिंतींवर आणि खांबांवर असणारे शिलालेख दात्यांची (दान देणाऱ्यांची) माहिती देतात. येथील क्रमांक १ चा चैत्य पुढील विकास दाखवितो, ज्यामध्ये आपल्याला मंडप, अंतराळ आणि स्तूप असलेले गर्भगृह या भागांनी युक्त मंदिर पहावयास मिळते. स्तूपयुक्त गर्भगृहाला लागून कोरलेले अंतराळ हे येथे आढळणाऱ्या स्थापत्यशैलीतील नवे वैशिष्ट्य आहे. अंतराळामध्ये भिंतींलगत बसण्याकरिता ओटे केलेले दिसून येतात. व्हरांड्याच्या आतील बाजूस कोरलेल्या लेखात सुलसदत आणि उतरदत यांचा मुलगा शिवभूती याने हे दान दिल्याची नोंद सापडते. सदर लेण्याचा दाता शिवभूती आणि त्याची पत्नी नंदा हे दोघेही सदगेरी विजय याचा पुत्र महाभोज मांदव खंदपालित याच्याकडे लेखक म्हणून कामाला होते. विशेष म्हणजे स्वतः दात्यानेच हा लेख कोरला आहे. त्यामुळेच की काय, लेखातील अक्षरे प्रयत्नपूर्वक आकर्षक आणि सुबक वळणाची काढली असावीत. चैत्य क्र. ६ हा येथील सर्वात शेवटी कोरला गेलेला, सर्वात मोठा आणि सर्वात चांगला चैत्य असून तो योग्य प्रकारे, काम अर्धवट न सोडता पूर्णत्वाला नेला आहे. कुडा येथील शिल्पांच्या ठेवणीवरून ती सातवाहनकालीन असावीत असे अनुमान करता येते. ही शिल्पे कार्ले येथील शिल्पांपेक्षा किंचित ओबडधोबड, मात्र कान्हेरीच्या (चैत्य क्र. ३) तुलनेत उजवी आहेत.

चार चैत्यांव्यतिरिक्त कुडा येथे एक मंडप आणि एकवीस विहार आहेत. मध्यभागी चौरसाकृती सभागृह अथवा मोकळी जागा आणि चारही बाजूंना खोल्या अशा प्रकारच्या प्राचीन विहारांपेक्षा कुडा येथील विहार पूर्णपणे भिन्न आहेत. यामागचे कारणही स्पष्ट आहे. पाश्चात्य जगतासोबत असणाऱ्या व्यापारात झालेली घट, त्यामुळे आलेले राजकीय अस्थैर्य आणि अर्थव्यवस्थेत झालेली घसरण या सर्वांचा परिणाम म्हणून अशा प्रकारच्या गुहा कोरण्याकरिता आवश्यक आश्रयदाते उपलब्ध होणे दुरापास्त झाले. यामुळे पुढील बाजूस व्हरांडा असणाऱ्या एक किंवा दोनच खोल्या आणि मागील भिंतीत ध्यानाकरिता एक खोली असणारे छोटे विहार बनविले जाऊ लागले. अशा विहारांमध्ये कोणतीही सजावट नसे. सातवाहन काळातील मिणमिणत्या वैभवाचे जणू मूक साक्षीदार म्हणजे कुडा लेणी आहेत, असे निश्चित म्हणता येते. अरबी समुद्राचे विहंगम दर्शन घडविणाऱ्या कुडा येथील लेण्यांना पर्यटकांनी जरुर भेट द्यावी.

कसे जावे : सर्वात जवळचा विमानतळ मुंबई येथे असून कोकण रेल्वेच्या रोहा स्टेशनपासून २४ कि.मी. अंतरावर कुडा हे गाव आहे. एखादे भाड्याचे प्रवासी वाहन अथवा स्वतःचे वाहन घेऊन कुडा येथील लेण्यांना भेट देणे सर्वात सोयीचे ठरते. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या गाड्या मुरुडपर्यंत दररोज जातात, जे कुड्यापासून सुमारे २४ कि.मी. अंतरावर आहे.

- भूषण दुनबळे,
(८३०८२६८७२६)
bhushandunbale111@gmail.com

आकर्षक अजिंठा-वेरूळ लेणी

अजिंठा-वेरूळची लेणी या जग प्रसिद्ध लेणी असून ही लेणी पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येथे भेट देत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष आणि बौद्ध धम्म दीक्षा समारंभास ६० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टीवल फॉर सोशल ॲण्ड कल्चरल रिलेशनशिप 2016 या कार्यक्रमाचे आयोजन औरंगाबादमध्ये अजिंठा-वेरुळ येथे करण्यात आले होते. 

धम्मयान एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्टमार्फत शहरात प्रथमच या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. जगभरातील बौद्ध राष्ट्रांबरोबर भारतीय बौद्धांचे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संबंध मैत्रीपूर्ण करून सहकार्याची भावना निर्माण व्हावी, होतकरुंना रोजगार, व्यवसायाच्या संधी निर्माण व्हाव्यात. बौद्ध राष्ट्रांतील उद्योजकांनी औरंगाबादेत गुंतवणूक करावी तसेच या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळावी हा उद्देश ठेऊन या फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले होते.

आपल्या राज्याला बौद्धधर्माची वैभवशाली वारसा स्थळे अंजिठा-वेरुळच्या रुपात लाभलेली असून या पार्श्वभूमी वर देशविदेशातील बौद्धधर्माचे अभ्यासक, उपासक यांच्यासाठी अद्ययावत असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘बुद्धीस्ट सेंटर’ महाराष्ट्रात उभारण्यात येणार आहे. इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टीवलच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये खाद्य संस्कृती, विविध कला चित्रपट निर्मिती संस्कृती दर्शन दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन या गोष्टींचे सादरीकरण करण्यात आले होते. या कार्यक्रमाला लोकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
अजिंठा-वेरूळ लेण्यांविषयी

अजिंठा लेणी 
अजिंठा-वेरूळची लेणी ही त्यांच्यातील स्थापत्यकला, शिल्पकला व चित्रकलेसाठी जगप्रसिद्ध आहेत. अजिंठा येथे एकूण २९ लेणी आहेत. ही सर्व लेणी वाघुर नदीच्या आसपास विखुरलेली आहेत. प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी क्वचित मंदिरेसुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गांवर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत. त्यांचा उद्देश वाटसरुंना सुरक्षित आश्रय स्थान मिळावे हा होता अजिंठा गावाजवळची लेण्यांची निर्मितीही याच उद्देशातून झाली. कालांतराने तिचे रुपांतर एका नितांत सुंदर अशा चित्रकला व शिल्पकला दालनात झाले. या लेण्यांतून बुद्धाचे सर्वसामान्य लोकांस परिचित असे रुप दिसून येते. महायान लेणी वाकाटक राजाच्या राजवटीत निर्माण केली गेली, त्यामुळे त्यास बऱ्याचदा वाकाटक लेणी असेही संबोधले जाते.

वेरूळ लेणी
महाराष्ट्रातल्या मराठवाडा भागात औरंगाबाद शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर वेरूळ हे एक छोटे खेडेगांव आहे. येथे प्राचीन काळात कोरलेली १२ बौद्ध, १७ हिंदू आणि ५ जैन अशी एकूण ३४ लेणी आहेत. शिवाजी महाराजांचे भोसले घराण्याचे मूळ गाव वेरुळ आहे. वेरुळची लेणी साधारणत: इ.स.च्या पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरण्यात आली असून वेरुळच्या लेण्यांची हिंदू लेणी, बौद्ध लेणी व जैन लेणी अशी विभागणी केली जाते. हैदराबादच्या निजाम राजवटीकडे या लेण्यांची मालकी जाईपर्यंत इंदूरच्या होळकरांनी या लेण्यांची काळजी घेतली होती.

बौद्ध लेणी 
वेरुळची बौद्ध लेणी ही येथील सगळ्यात जुनी लेणी आहेत. ही लेणी मुख्यत्वे विहार रूपाची आहेत. काही विहारांतून पूजेसाठी मूर्तीही आहेत. यांपैकी प्रसिद्ध लेणे म्हणजे विश्वकर्मा लेणे. अनेक मजली प्रवेशद्वारातून आत गेल्यावर आपण स्तूपापाशी पोचतो. या स्तूपाच्या वरच्या भागातील दगड जणू लाकडी वासेच वाटावे असे कोरलेले आहेत. या स्तुपात बुद्धाची धर्मचक्र प्रवर्तन मुद्रेतील मूर्ती आहे. बौद्ध भिक्षूंना राहण्यासाठी या लेण्यात एकूण आठ खोल्या खोदलेल्या आहेत. खांबाशिवाय खोदलेली ही गुंफा वेरूळ येथील सर्वात जुनी गुंफा आहे. या लेणीत गाभारा नाही तसेच कुठल्याही प्रकारची मूर्ती अथवा प्रतिमा नाही. वेरुळची ही पहिल्याच क्रमांकाची लेणी अगदी प्राथमिक स्वरुपातील आहे.

विश्वकर्मा लेणी
हे लेणे म्हणजे एक चैत्यगृह आहे. या चैत्यगृहाला वरचा मजला असून सज्जा कोरलेला आहे. सज्जाच्या कठड्यावर अनेक लहान शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. सज्जाच्या आतील भिंतीवर भरतनाट्यम नृत्यप्रकार करणाऱ्या एका नर्तकीचे शिल्प कोरलेले आहे. चैत्यगृहाच्या मुख्य कमानीवर तीन अर्धवलये कोरलेली आहेत. ओळींमध्ये लिहिलेला ब्राम्ही लिपीतील शिलालेख आहे. स्तूपाच्या पुढील बाजूस प्रलंबपादासनात सिंहासनावर बसलेली बुद्धाची प्रतिमा आहे.

राजविहार लेणी

तीन ताल किंवा राजविहार या नावाने प्रसिद्ध असलेली ही लेणी तीन मजली आहे. लेण्याच्या प्रवेशद्वाराजवळ दोन बाजूला दोन सिंह प्रतिमा आहेत. वऱ्हांड्यातील स्तंभांची रचना चौकोनी आहे. या लेण्याचा पहिला मजला अनेक स्तंभांनी आधारलेला आहे. या मजल्यावर असलेल्या खोल्यांमध्ये दगडी चौथरे व त्यावर डोके टेकण्यासाठी दगडी उशा खोदलेल्या आहेत. या लेण्यात मागच्या बाजूला गर्भगृह आहे. या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला बोधिसत्व कोरलेला आहे. त्याच्या डाव्या हातातील कमलपुष्पावर पुस्तक ठेवलेले आहे. गर्भगृहात आत सिंहासनावर धम्मचक्र परिवर्तन मुद्रेतील बुद्धप्रतिमा आहे.

कैलास मंदिर
वेरूळमधल्या १६ व्या लेण्यातले शिवमंदिर जगातले सर्वात मोठे कोरीव शिल्प आहे. ह्या बहुमजली मंदिराची रचना कैलास पर्वताच्या धर्तीवर आहे. आज कैलास लेण्यातील शिवलिंगाची पूजा होत नाही ही पूजा कधीपासून बंद पडली हे सांगता येत नाही परंतु इ.स. १८१० च्या सुमारास कैलास लेण्यातील मंदिरात पूजाअर्चा होत होती व गाभाऱ्यासमोरील मंडपामध्ये साधुसंत राहत असत.

जैन लेणी
वेरुळची जैन लेणी तुलनेने लहान आहेत व जैन धर्माची वैराग्यभावना दर्शवितात. याबरोबरच बारीक कोरीव काम व चित्रे ही या लेण्यांची वैशिष्ट्ये आहेत.

घृष्णेश्वर मंदिर
वेरुळ लेण्यांपासून जवळच हे मंदिर आहे. भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी हे एक आहे.

कसे जावे - 
रस्ता मार्गे – औरंगाबाद शहर मुंबई, नागपूर, पुणे वगैरे अनेक शहरांशी राज्य महामार्गाने जोडलेले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामार्फत औरंगाबाद ते मुंबई दरम्यान आरामगाड्या (luxury buses) चालविल्या जातात. (अंतर सुमारे ३९२ कि.मी.). अजिंठा लेणी जळगांव शहराच्या जवळ आहेत, तर वेरुळची औरंगाबाद जवळ.
लोहमार्गे (रेल्वे) - औरंगाबादकडून मुंबई, आग्रा, दिल्ली, भोपाळ, हैदराबाद ह्या शहरांकडे थेट लोहमार्ग आहेत. हिवाळ्यात डेक्कन ओडिसी ही खास रेल्वे अभ्यागतांना औरंगाबाद (अजिंठा-वेरूळ) ची सफर घडवते.

लेणी पाहण्याची वेळ -
सोमवार आणि राष्ट्रीय सुट्टयांचे दिवस सोडून इतर दिवशी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अभ्यागतांसाठी पाहण्याकरता लेणी उघडी असतात.

- भूषण दुनबळे,
(८३०८२६८७२६)
bhushandunbale111@gmail.com

सांस्कृतिक भारत : मिझोराम

मिझोराम हे उत्तरपूर्व राज्य म्हणून ओळखले जाते. राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 21087 चौरस किमी असून राजधानीचे शहर ऐझवाल हे आहे. राज्याची प्रमुख भाषा मिझो व इंग्रजी असून 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 1,091,014 इतकी आहे. राज्याची साक्षरता 91.58 टक्के इतकी आहे. राज्यात आठ जिल्हे आहेत. 

मिझोराम भारतीय संघ राज्याचे 23 वे राज्य 20 फेब्रुवारी 1987 मध्ये स्थापन झाले. 1972 पर्यंत ते आसामचा एक जिल्हा होते. नंतर ते केंद्र शासित प्रदेश म्हणून घोषित झाले. 1891 साली ब्रिटिशांनी ते संघराज्यात जोडले. काही वर्ष ते उत्तरेला लुशाई हिल्स आसाम लगत होते तर अर्धे राज्य बंगालच्या अखत्यारीत. 1898 मध्ये ते लुगाई हिल्स डिस्ट्रिक्ट असे मुख्य संयुक्त आसाम म्हणून घोषित झाले. 1972 नॉर्थ इस्टर्न रिऑर्गनायझेशन अॅक्ट अंतर्गत मिझोराम केंद्र शासित प्रदेश म्हणून घोषित झाले.

60 टक्के मिझो नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. 4.4 लाख हेक्टर जमीन बागायतीसाठी तर 25000 हेक्टर जमीन लागवडीखाली असून प्रमुख बागायती उत्पन्न म्हणजे संत्रा, लिंबू, ताजी फळे, हटकोरा, जमीर, अननस आणि पर्यायी इतर पिके. तसचे ऊस, टॅपिओका व कापूस.

संपूर्ण मिझोराम मागासक्षेत्र म्हणून अधिसुचित असून हे राज्य उद्योगविहिन जिल्हा म्हणून सुद्धा नोंदविले गेले. हातमाग व हस्तकला, इलेक्ट्रॉनिक्स जीवनावश्यक वस्तू उद्योग, रेशीम उद्योग असे काही उद्योग आता सुरू झाले आहेत.

मिझो राज्य शेतीप्रधान आहे. त्यांचे सण, समारंभ सुद्धा शेतीशीच संबंधीत असतात. म्हणूनच कूट हा शब्द सणासाठी वापरला जातो. छापचार कूट, मिमकूट व पॉलकूट हे मिझोराम मधील प्रमुख सण समजले जातात.

ऐझवाल हे शहर समुद्र सपाटीपासून 4000 फूट उंचीवर आहे. ते धार्मिक व सांस्कृतिक मिझोरामचे केंद्र आहे. चंफाई हे आकर्षक पर्यटक केंद्र म्यानमार सीमेवर वसलेले आहे. तामलदिल तलाव ऐझवाल पासून 85 किमी आणि सैतूलच्या मनोरंजन केंद्रापासून सात किमी दूर आहे. वन्ताँग धबधबा हा सर्वात उंच व सुंदर धबधबा म्हणून प्रसिद्ध आहे. मिझोरामच्या पर्यटन विभागाने ऐझवाल, लुंगलेईव, चाम्पैई या रेशीम उद्योगाच्या शहरात पर्यटक विश्राम गृह स्थापन केले आहेत. थिंगडवाल, न्हाहथियाल येथे मॉटेल्स आमि बेरॉ लाँग येथे मनोरंजन केंद्र उघडले आहे. उम्पा वन्य प्राणी अभयारण्य, तावी वन्य प्राणी अभयारण्य, सैहा डोंगर रांगा ही दृश्यही पाहण्यासारखी आहेत.

राज्याच्या प्रमुख भाषा मिझो व इंग्रजी असल्या तरी अजून काही घटक बोली राज्यात बोलल्या जातात. त्यापैकी काही भाषा व ती कोण बोलतं ते पुढीलप्रमाणे -

बॉम - मिझो-बॉम, बाइटे - मिझो-बाइटे, चाकेसंग - चाक्मा, दुहलियान-त्वांग - हमार, मिझो हुआँल्गो - मिझो हुआँल्गो, खासी - प्नार/सीटेंग, लाई - मिझो-पवाई, लाखेर-मारा - मिझो-मारा/लाखेर, पाँग - मिझो-पाँग, राल्टे - मिझो-राल्टे, रियांग – रियांग, थाडो – थाडो.

दुहलीयन वा लुसेइ ही मिझोरामची पहिली भाषा होती जी आता मिझो नावाने ओळखली जाते. ह्या भाषेचा मिझोराम मधील इतर भाषांवरही प्रभाव दिसून येतो. हमार, मारा, लाइ, थाडो, पाइटे, गांगटे आदी भाषा राज्यात बोलल्या जातात. चकमा, दिमासा (कचारी), गारो, हजोंग, हमार, खासी आदी आदिवासी तर अनेक कुकी जमाती मिझोराममध्ये वास्तव्य करतात.

मिझो पारंपरिक संगीत साधे सोपे आहे. स्थानिक लोक रात्रभर गाणे गात नाचतात. गिटार हे मिझोरामचे लोकप्रिय वाद्य आहे. चर्चच्या प्रार्थनेवेळी जे वाद्य वाजवले जाते त्याला खुआंग नावाने ओळखतात. ते ढोल सारखेच असते. खुआंग हे वाद्य लाकडापासून आणि प्राण्यांच्या कातडीपासून बनवतात. मिझो लोक हे कोणत्याही वाद्याशिवाय आपले नृत्य करतात. यावेळी गाताना आपल्या तोंडातून ते काही हुंकार काढतात, हाताने टाळ्या वाजवतात. अशा अनौपचारिक संगीताला ते छपचेर म्हणतात.

चेराव नावाचे लोकनृत्य खूप प्रचलित असून या नृत्यावेळी पुरूष जमिनीवर बांबू धरून ठेवतात. दोन्ही हातांनी ते बांबू जवळ घेतात आणि दूर करतात. त्या उघडझाप करणाऱ्या बांबूमध्ये महिला पायांचे ठेके धरून नाचतात. यावेळी महिलांनी आपला पारंपरिक रंगीबेरंगी वेश परिधान केलेला असतो.

स्त्री-पुरूष मिळून एक नाच केला जातो याला खुआल्लाम असे म्हणतात. छेइहलाम व छाइ या नावाचेही मिझो लोकनृत्य आहेत.

धोलेश्वर, बराक, चिमतुइपुइ, दे, कलादन, कर्णफुली, काउ, खावथलांगतुइपुइ, लंगकाइह, लुंगलेंग, मेंगपुइ, फइरंग, सेरलूइ, सोनई, सुरमा-मेघना, तेइरइ, थेगा, तलावंग, तुइचावंग, तुइरीयल, तुइरीनी, तुइवाव्ल, तुट आदी नद्या मिझोराममधून वाहतात तर मिझो सैहा निळ्याशार डोंगररांगाचे दृश्य.

2011 च्या सर्वेनुसार मिझोराम हे राज्य 90.68 टक्के जंगलाने व्यापलेले आहे. मिझोराम राज्यात 1,594,000 हेक्टर जमीन जंगलाखाली आहे.

(या व्यतिरिक्‍त अजून काही महत्त्वपूर्ण नोंदी अनावधानाने राहून गेल्या असतील तर अभ्यासकांनी लक्षात आणून द्याव्यात ही विनंती.)

- डॉ. सुधीर राजाराम देवरे
मोबाइल: 75886 18857
Email: drsudhirdeore29@gmail.com,
sudhirdeore29@rediffmail.com

सांस्कृतिक भारत : पुद्दूचेरी (पाँडेचेरी)

पुद्दूचेरीचे भौगोलिक क्षेत्रफळ 492 चौरस आहे. राज्याच्या प्रमुख भाषा तमिळ, तेलगु, मल्याळम, इंग्रजी व फ्रेंच या आहेत. 1956 पर्यंत फ्रेंच हीच स्थानिक कायदेशीर भाषा होती. 2011 च्या जनगणनेनुसार पुद्दूचेरीची लोकसंख्या 654,392 इतकी आहे.

पुद्दूचेरीत पूर्वाश्रमीची फ्रेंच वसाहत होती. दक्षिण भारतातील केंद्र शासित प्रदेश. पुद्दूचेरी, करईकल, माहे आणि यानम या फ्रेंच वसाहती विखुरलेल्या आहेत. पुद्दूचेरी ही फ्रेंचांची भारतातील राजधानी व मुख्यालय समजले जात होते. जवळपास 138 वर्षे येथे फेंचांचे राज्य होते. पुद्दूचेरी 1 नोव्हेंबर 1954 रोजी भारतात विलीन झाले. पूर्वेला बंगालची खाडी व उर्वरीत तिन्ही बाजूंना तमिळनाडू राज्य. पूर्व किनाऱ्यावर करईकल तर माहे पश्चिम घाटावर मलबार किनाऱ्यावर कालिकत विमानतळ आहे. माहे पासून 70 किमी यानम आंध्रप्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्याला जोडून आहे. यानम विशाखापट्टनम विमानतळापासून 200 किमी अंतरावर आहे.

केंद्र शासित प्रदेश पुद्दूचेरीच्या एकूण लोकसंख्येपैकी 45 टक्के लोकसंख्या शेती व शेतीसंबंधी उद्योगांवर आधारीत आहे. 90 टक्के शेती सिंचनाखाली येते. धान व डाळी ही पिके प्रमुख आहेत. माहे प्रांतात नारळ, मसाले, सुपारीची पिके तर यानम मध्ये डाळी, शेंगदाणे व मिरचीची पिके घेतली जातात. तसेच अन्य पावसाळी पिकेही येतात.

वस्त्र, संगणक, संगणकाचे सुटे भाग, इलेक्ट्रानिक उत्पादने, औषधी, चामड्याच्या वस्तू, साखर, धागे, स्पिरिट, बियर, पोटॅशियम क्लोरेट, वापरा व फेका प्रकारच्या सिरिंज, छताचे पत्रे, वॉशिंग मशीन, पो‍लादी नळ्या, स्वयपाकाचा गॅस आदी उद्योग पुद्दूचेरीत चालतात.

पुद्दूचेरीला फ्रेंच संस्कृती हा सांस्कृतिक वारसा आहे. येथील सुनियोजित शहरांच्या रचनेमध्ये फ्रेंच लोकांचा वारसा झळकत राहतो. वॉर मेमोरियल, फ्रेंच बौलेवर्ड टाऊन, श्री अरविंदो आश्रम, आयुरोव्हिले म्युझियम, चुननावर रिसॉर्ट, बोटॅनिकल गार्डन, डान्सिंग म्युझिकल फाऊंटन, ओसूडू लेक ही पर्यटन स्थळे महत्त्वाची आहेत. पुद्दूचेरीला लिखित साहित्याचाही इतिहास असून तमिळ कवी भारतीदासन हे पुद्दूचेरीचे कवी म्हणून ओळखले जातात.

पुद्दूचेरीचे लोकप्रिय नृत्य म्हणजे रामायणातील मिथकावर आ‍धारीत असे वानर नृत्य आहे. हे नृत्य पाच ते आठ तास सलग पद्धतीने साजरे केले जाते. दोन मोठे ड्रम या नृत्यासाठी वाजवले जातात. या ड्रम्सना रामढोल म्हणतात. या नृत्याला वानर नृत्यही म्हणतात. नृत्याच्या वेळी पुरूष लोखंडी रींगा वापरतात. या रींगांची संख्या दहा पर्यंत असते. या रींगा पायात घालून विशिष्ट पदन्यासाने नाच केला जातो. नृत्य करताना या रींगांचा संगीतबद्ध नाद ऐकू येत असतो. या लोखंडी रींगांना अंजली असे म्हणतात.

दक्षिण भारतातला पोंगल हा सणही पुद्दूचेरीत साजरा करत असले तरी मासीमागम नावाचा उत्सव खास पुद्दूचेरीचा आहे, मासि नावाच्या तमिळ महिन्यात (फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान) पौर्णिमेच्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. यावेळी अनेक भक्‍त आपले पापक्षालन करण्यासाठी खोल समुद्रात स्नान करतात. यामागे मिथक असे आहे की, सोवरी राजाने कोळी महिलेशी विवाह केला म्हणून कोळी वस्तीत राजाला प्रवेश मिळाला. या सणाकडे माणुसकीचा सण म्हणूनही पाहिले जाते.

विल्लीयनूर मंदिर उत्सव, बेस्टील दिवस (फ्रांस डे) हे उत्सव पुद्दूचेरीत उत्साहाने साजरे केले जातात. मंदिर उत्सव हा पारंपरिक भारतीय सण आहे तर बेस्टील दिवस हा फ्रांसचा सण आहे. फ्रेंच पद्धतीने बनवलेले (पदार्थ) अन्न उत्सवही फेब्रुवारी महिन्यात पाळला जातो. पारंपरिक ख्रिसमससह अरविंद घोष यांची जयंतीही दिमाखात साजरी केली जाते.

दक्षिण भारतातील पुद्दूचेरी हे उत्तम पर्यटन स्थळ मानले जाते. पुद्दूचेरी हे फ्रेंच रचनेचे शहर असून विशिष्ट पद्धतीच्या इमारती, चर्चेस, मंदिरे आणि पुतळे हे अगदी योजनाबद्धरित्या उभारले आहेत. अरविंद घोष यांचा आश्रम आणि चार समुद्र किनारे हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरतात. त्यातील रॉकी बीच जास्त लोकप्रिय आहे. अॅरोव्हीले नावाचे प्रायोगिक शहर पुद्दूचेरी पासून आठ किमी वर आहे, तेही पर्यटकांसाठी आकर्षण ठरते.

गिनगी, गुदुवयार, मलतार, पमबाइयार, पेनियार, करिकल, अरसालर, नांदलर, नत्तर, नुलर, प्रवादयनार, वंजीर, माहे, पोनियार, गौतमी या नद्या पुद्दूचेरीतून वाहतात.

पुद्दूचेरीत इतर आदिवासी आढळत नाहीत म्हणून आदिवासी संस्कृती वा त्यांच्या घटक बोलीही नाहीत.

(या व्यतिरिक्‍त अजून काही महत्वपूर्ण नोंदी अनावधानाने राहून गेल्या असतील तर अभ्यासकांनी लक्षात आणून द्याव्यात ही विनंती.)

- डॉ. सुधीर राजाराम देवरे
मोबाइल: 75886 18857
Email: drsudhirdeore29@gmail.com,
sudhirdeore29@rediffmail.com

एक सफर चौलची

अलिबाग पासून सुमारे १८ कि.मी. अंतरावर दडलेलं एक गाव चौल ! इथल्या रेवदंडा-नागाव याप्रमाणेच चौल-रेवदंडा अशी जोडगोळी ! चौल हे एक आतिशय प्राचीन बंदर आहे. या बंदराला अनेक नावे आहेत. चेमुल, तिमुल, सिमुल, सेमुल, सेमुल्ल, सिबोर, चिमोली, सैमुर, जयमूर, चेमुली, चिवील, शिऊल, चिवल, खौल, चावोल, चौले आणि चौल अशा अन्य नावांनीही या स्थळाचा उल्लेख आलेला आहे. दोन हजार वर्षा पूर्वीचे हे एक बंदर ! त्याकाळी इजिप्त, ग्रीस, आखातातील काही देश, चीन देखील आंतरराष्ट्रीय व्यापार सुरु होता.

एका गावाला एवढी नावे कशी असा प्रश्न पडला ना ? त्याचे उत्तर चौलच्या बंदरात दडलेले आहे. इतिहासाचा प्रदिर्घ कालखंड, त्यातच बंदरात असल्याने संपर्कात आलेल्या अनेक देशी-परदेशी सत्ता, व्यापारी, प्रवासी या स्थळांचा आपापल्या भाषा-संस्कृती लिपी उच्चारानुसार उल्लेख केला आणि त्यातून ही नावे जन्माला आली. रामेश्वर हे चौलचे ग्रामदैवत आहे. या रामेश्वराचे भव्य मंदिर येथे आहे. उतरता कौलारु छत, पुढे नदी मंडप, दिपमाळ आणि सुंदर पुष्टीकरण ! रामेश्वर मंदिराचा गाभारा सुमारे ४.४२ मीटर असून मध्यभागी १५ मी. लांब रुंद व जमिनीपासून थोडी उंच पितळी पत्राने मढलेली शाळूंका आहे. गाभाऱ्‍याची संपूर्ण ईमारत स्वतंत्र असून ती बाहेरील उंच शिखर असलेल्या घडीव दगडी मंदिरात समाविष्ट आहे. गाभाऱ्‍याच्या समोर सभामंडप असून त्यात तीन कुंड आहेत. पर्जन्य, वायु आणि अग्नी अशी त्यांची नावे आहेत. दुष्काळ पडला, पाऊस आटला की पर्जन्य कुंड, वादळी वारा असला की वायू कुंड आणि थंडी वाढली की अग्नी कुंड उघडायचे. अशा प्रकारे गावातील त्या त्या गेाष्टीची उणीव ही कुंड भागवत असतात.

या मंदिराशिवाय चौलमध्ये राजकोट, हमामखाना आणि कलावतीचा वाडा या तीन ऐतिहासिक वस्तू आहेत. यातील राजकोट हा विजयपूरच्या आदिलशाहाने बांधला. पुढे तो चौलच्या राजवटी बरोबर सत्ताबद्दल होऊन मराठ्याकडे गेला. पण पुढे-पुढे या किल्ल्याच्या आश्रयानेच मराठ्याच्या साम्राज्यालाच उपद्रव होऊ लागल्याने पेशव्याच्या आरमारचे सुभेदार बाजीराव बेलोसे यांनी सुरुंग लावून हा राजकोट पाडला. दुसरी वास्तू हमामखाना ही ! हमामखाना म्हणजे शाही स्नानगृह ! कमानीची रचना, तेथील खोल्यांवरील चुन्यातील नक्षीकामाने या वास्तुला सुंदरता आली. येथील कारंजी, हौद तर येथील शाही श्रीमंतीच ! कलावतीचा वाडा ही अशीच आणखी एक सुंदर वास्तू ! या इमारतीच्या कमानी, सज्जे, घुमटाकार छत यामुळे ही वास्तू आणखी सुंदर वाटते. त्या महालाच्या चौक-मंडपातून नृत्य-गायन ऐकू आल्याचा भास होतो. इतिहासाने वर्तमानाला आणलेली ही गुंगीच आहे असे वाटते. तसेच चौल मधील रामेश्वर मंदिरात पोळा, नागपंचमी, गणेशचतुर्थी हे सण येथे साजरे केले जातात. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी येथे दर्शनासाठी भाविकांची रांग लागते. महाशिवरात्रीचा मोठा सण येथे साजरा केला जातो. चौल येथील दत्त मंदिर हे ही एक प्रेक्षणीय स्थळ आहे. तेथे डिंसेबरला दत्त यात्रा असते. ही स्थळे अशी आहेत की कोणत्याही ऋतुमध्ये गेल्यास येथे फिरण्याचा आनंद आगळाच आहे.

चौलचा अगदी प्राचीन उल्लेख "पेरिप्लस ऑफ एरिथ्राईन सी" या आणि टॉलेमीच्या दोन हजार वर्षापूर्वीच्या प्रवास वर्णनात येतो. चौलजवळील वाघजाईच्या डोंगरातील सातवाहन काळातील लेणीही त्‍या काळातील चौलशी असलेले नातेसंबध दर्शविते, पण चौलच्या प्राचीन बंदराबद्दल कुठलेही पुरावे नाहीत. तेव्हा त्याच्या शोधात २००१ ते २००७ अशी सलग सात वर्षे पुण्यातील डेक्कन कॉलेजने चौलमध्ये वेगवेगळ्या भागात उत्खनन केले. या प्राचीन बंदराचे अवशेष, "जेटी"ची भिंत, सातवाहन कालीन नाणी, मातीची भांडी, खापरे, तत्कालीन रोमन संस्कृतीत वापरले जाणारे महाकुंभ आणि असे बरंच काही !
कसे जावे ?

मुंबई-अलिबाग एस.टी.ने अलिबागला जाता येते. तेथून टम-टमच्या सहाय्याने चौलला जाऊ शकतो. दुसरा सुंदर समुद्र मार्ग म्हणजे गेट ऑफ इंडिया. गेट ऑफ इंडियावरून बोटीने मांडवा पर्यंत जाता येते. तेथून त्यांच्या बस अलिबाग पर्यंत उपलब्ध आहे. अलिबागला पोहोचल्यावर टम-टम, एस.टीने चौलला जाता येते. परंतु, पावसाळ्यात मात्र ही बोट सेवा बंद असते.

- श्वेता दांडेकर
dandekarshweta12@gmail.com
9757282750

फिरंगाणातील अर्थात मुंबई परिसरातील किल्ले : दुर्गाडीचा किल्ला

दुर्गाडीचा किल्ला, ठाणे जिल्ह्यात असून कल्याण रेल्वे स्थानकाकडून भिवंडीच्या रस्त्यावर कल्याण शहराच्या सीमेवरील खाडीच्या तीरावर हा किल्ला आहे. हा लेख दुर्गाडीच्या किल्ल्याबाबत असला तरी कल्याण व दुर्गाडी तसे फारसे दूर नाहीत. आजही दुर्गाडी ही कल्याणची शीव आहे. म्हणूनच कल्याणचा इतिहास वगळून केवळ दुर्गाडीची माहिती देणे अनुचित ठरेल. बहुतांशी प्रमाणात कल्याणचा जो इतिहास तोच दुर्गाडीचाही इतिहास आहे.

कल्याण हे खाडीीकिनारी असलेले गाव अगदी प्राचीन काळापासून व्यापारी पेठ म्हणून प्रसिद्ध होते. सातवाहनांच्या काळापासून या बंदरातून व्यापार चालू होता. यादवांच्या पाडावानंतर हा मुलुख मुसलमानांच्या ताब्यात गेला. बहामनी राज्याच्या स्थापनेनंतर कल्याण शहर प्रथम बहामनी राज्यात होते. पहिल्या अहमदशहाने उत्तर कोकणावर स्वारी करुन इतर मुलुखाबरोबर कल्याणही जिंकले व पुढे आपल्या स्वतंत्र शाहीची (निजामशाहीची) घोषणा केली. याप्रमाणे कल्याण निजामशाहीत आले.पुढे विजापूरचा आदिलशहा व दिल्लीचे मोगल यांनी संयुक्त चढाई करुन निजामशाही संपवली व परिणामत: कल्याण आदिलशाही साम्राज्याचा भाग बनला.

इ.स.1657 मध्ये शिवाजी महाराजांनी कोकणावर मोहिम काढली. त्यावेळी महाराजांनी दादाजी बापूजी रांझेकरांना कल्याण काबीज करण्यास फर्मावले व त्यानुसार रांझेकरांनी दिनांक 24 ऑक्टोबर 1657 रोजी कल्याण काबीज केले. कल्याण काबीज होताच शिवाजी महाराज स्वत: कोकणाच्या स्वारीवर निघाले. फौजेसह ते नुकत्याच जिंकलेल्या कल्याणमध्ये आले. यावेळी कल्याणमध्ये स्वराज्याच्या आरमाराची स्थापना झाली. यावेळी त्यांनी ताब्यात घेतलेली गलबते व होड्या हे स्वराज्याचे पहिले आरमार होय. हे स्वराज्याचे पहिले आरमार प्रथम कल्याणच्या खाडीत तरंगले हे येथे आवर्जून नमूद केले पाहिजे. त्याचवेळी कल्याण येथेच शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पहिला सरखेल किंवा नौदलप्रमुख म्हणून दर्यासारंगाची नेमणूक केली. त्याचप्रमाणे इब्राहिमखान, दौलतखान व मायनाक भंडारी हे अत्यंत शूर, धाडसी व निष्ठावंत अधिकारी आरमारात सामील केले.

खाडीच्या किनाऱ्यावर एका टेकाडावर दुर्गाडी किल्ला आहे. किल्ल्याच्या चारही बाजू उपदिशांना म्हणजेच आग्नेय, नैऋत्य, वायव्य व ईशान्य या दिशांना अभिमुख आहेत.  चार कोपऱ्यात चार बुरुज व पूर्व कोपऱ्यातील बुरुजालगत असलेला आणखी एक बुरुज, या दोन बुरुजांमध्ये असलेले महाद्वार व काहीसा आयताकार तलविन्यास असलेला बाह्यकोट असे या किल्ल्याचे स्वरुप आहे.

आतील भागात चौकोनी तलविन्यासाचे एक पीठ असून त्यावर देवीचे मंदिर आहे. हे देवीचे मंदिर आग्नेयाभिमुख आहे. (आजच्या अत्याधुनिक चुंबकीय सुईने जरी आग्नेय दिशा सूचित केली असली तरी किल्ला व मंदिर बांधले गेले त्यावेळी दिशासाधन सूर्याच्या दिशेवरुन केले जात असे. त्यामुळेच उत्तरायण व दक्षिणायनाच्या काळात सूर्योदयाची दिशा सतत बदलती असल्यामुळे चुंबकीय सुईने दाखवलेली आग्नेय दिशा किल्ला व मंदिर बांधले गेले त्या काळात पूर्व मानली गेली असण्याची दाट शक्यता आहे.) या मंदिराच्यामागे मंदिराच्या पीठाच्या साधारणपणे निम्म्या उंचीचे आणखी एक लंबआयताकार पीठ असून त्यावर इदगाह आहे.

किल्ल्याची तटबंदी बऱ्यापैकी जाड असून बांधकाम मजबूत होते असे दिसते. तथापि बुरुजावरील व तटांवरील मूळ कठडे आज शिल्लक नाहीत. त्यामुळे तोफांच्या खाचा व गोळीबार गवाक्षे होती की नव्हती, अथवा असल्यास कोणत्या ठिकाणी होती ते कळण्यास मार्ग नाही. किल्ल्याच्या अंतर्भागातील जमिनीची पातळी तटाइतकीच उंच आहे. किल्ल्याच्या अंतर्भागाच्या जमिनीची पातळी वायव्येकडून आग्नेयेकडे कललेली, म्हणजेच उताराची आहे.

किल्ल्याचे बुरुज सर्वसाधारणपणे वर्तुळाकृती तलविन्यासाचे आहेत. यातील एका बुरुजाचे काही प्रमाणात नुतनीकरण झाले असून त्यावर रंगरंगोटी व कमळाच्या पाकळ्यांच्या आकाराचे कठडे उभारण्यात आले आहेत. एका बाजूचा बुरुज मधूनच ढासळला आहे. बाकीचे दोन बुरुज कठडे नसलेल्या स्थितीत पण बऱ्यापैकी टिकून आहेत.

किल्ल्याच्या आग्नेय तटबंदीत दोन बुरुजांच्यामधील भागात महाद्वार आहे. या प्रवेशमार्गातून सध्या दोन बाजूंनी वर जाण्यासाठी जिने आहेत. मूळ किल्ल्यातही अशाच पायऱ्या होत्या की ही आधुनिक काळातील सुधारणा आहे ते कळण्यास मार्ग नाही. याच तटबंदीत दोन बुरुजांच्यामधील भागात महाद्वार आहे. या प्रवेशमार्गातून सध्या दोन बाजूंनी वर जाण्यासाठी जिने आहेत. मूळ किल्ल्यातही अशाच पायऱ्या होत्या की ही आधुनिक काळातील सुधारणा आहे ते कळण्यास मार्ग नाही.

किल्ल्याच्या अंतर्भागात मंदिराचे एक व इदगाहाचे एक अशी दोन पीठे असली तरी या पीठांनी बालेकिल्ला बनला नव्हता; म्हणजेच निराळ्या शब्दात या किल्ल्याला आत बालेकिल्ला नव्हता हे निश्चित. किल्ल्यामध्ये एक इदगाह व एक देवीचे मंदिर एवढ्या दोनच जुन्या वास्तू आहेत. मंदिराचे अलिकडेच नुतनीकरण झाले आहे. हे नुतनीकरण मूळ मंदिरानुसारच करण्यात आले (म्हणजे निदान त्याचा तलविन्यास तरी मूळ मंदिरानुसारच ठेवण्यात आला) असे सांगण्यात येते. या मंदिरात आजही पूजाअर्चा होते. दर नवरात्रीत येथे मोठा उत्सव होतो व देवीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात.

दुर्गाडी किल्ला जलदुर्ग असला तरी वसईच्या किल्ल्याप्रमाणे खाडीतून थेट किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी मार्ग नाही. निराळ्या शब्दात नौदलाच्या सहाय्याने या किल्ल्याची कुमक करता येईल अशी परिस्थिती नव्हती. हा किल्ला मराठ्यांनी बांधला असल्यामुळे आणि किल्ल्याच्या निर्मितीच्यावेळी लगतचा प्रांत मराठ्यांच्याच ताब्यात असल्यामुळे तशी सोय असण्याची फारशी गरजही नव्हती.

छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचे नौदल स्थापन करायचे होते. आपले नौदल कसे असावे याबाबतचे शिवछत्रपतीचे विचार अगदी स्पष्ट होते. स्वराज्याचे शेजारी म्हणून पोर्तुगीज, इंग्रज यांच्यासारखे दर्यावर्दी लोक होते. त्यांचा दर्यावर्दी अनुभव व तंत्रज्ञान खूपच प्रगत आहे याची महाराजांना कल्पना होती. म्हणून आपले आरमार त्यांच्या बरोबरीचे किंवा तोडीचे नसले तरी अधिक वेगवान असावे, शत्रूचे मोठे आरमार चालून आले तर त्यांची जहाजे आत शिरु शकणार नाहीत अशा खाड्यांमध्ये आपल्या जहाजांना लपता आले पाहिजे अशी त्यांची धारणा होती. त्या दृष्टीकोनातून दुर्गाडीचा किल्ला लष्करीदृष्ट्या मोक्याच्या ठिकाणी होता असेच म्हणावे लागेल.

किल्ल्याची नैऋत्यकडील तटबंदी पडून गेली असून तिचा पायाच फक्त शिल्लक आहे. तटबंदीचे व बुरुजांचे कठडे आणि महाद्वार पडून गेले आहे. तथापि सर्वसाधारणपणे किल्ल्याची कल्पना येईल इतपत अवशेष आजही टिकून आहेत. हा किल्ला तसा छोटेखानी असला तरी स्वराज्याचा पहिला आरमारी तळ म्हणून या किल्ल्याचे महत्व अपरंपार आहे.

संकलन - विलास सागवेकर,
उपसंपादक

ऐतिहासिक स्थळे : पावित्र्य जपण्याची गरज


आपल्या महाराष्ट्रातील गड किल्ले, ऐतिहासिक स्थळे इतिहासातल्या त्या पराक्रमी, शौर्यगाथेची ओळख करून देतात. शाळेत असताना सुद्धा शिवकालीन किल्ल्याची माहिती व्हावी म्हणून शाळेची सहल अशाच ऐतिहासिक स्थळावर जात असे. या ऐतिहासिक स्थळांचे पावित्र्य जपायला मात्र अनेक जण विसरतात. ते जपणे निश्चितच गरजेचे आहे, त्याचसाठी केलेला हा प्रयत्न...

आपल्यापैकी किती जण या ऐतिहासिक स्थळावर जाऊन त्या भव्य अशा किल्ल्याची व वास्तुची व्यवस्थित पाहणी करतात. आपल्या संस्कृतीचे दर्शन यातून मिळत असते. वेगवेगळ्या कला, चित्र, राजा महाराजांच्या प्रतिकृती, प्राण्यांचे चित्र, जुन्या काळातील अवशेषांचे दर्शन या ऐतिहासिक वास्तूमधून आपल्याला घडत असते. मात्र आपल्यापैकी अनेक जण ह्याच भव्य वास्तूंचे दर्शन घेण्यासाठी जातात आणि तिकडे आपल्याच नावाची प्रदर्शने मांडून येतात. काहींना ही सवय अगदी लहानपणापासून असते. शाळेत असताना बाकावर कोरीवकाम बरेच जण करत असतात. शाळेतल्या बाकावर प्रेमाची निशाणी म्हणून कोरलेला तो 'दिल' त्यावर लिहिलेली नावे, या सगळ्या गोष्टी बाकापासून ते भव्य वास्तूच्या किल्ल्यापर्यंत लिहिणारे अनेक जण आहे. चित्रपटातल्या संवादापासून ते लैला-मजनू हिर-रांझा पर्यंत सर्वांना आदर्श मानून स्वत:च्या प्रेमाची निशाणी देणारे हे अनेक लोक आहेत. जे आपल्या संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या ऐतिहासिक स्थळावर जाऊन त्या स्थळांचे गांभीर्य विसरताना दिसतात.

काही महिन्यांपूर्वी माझा जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर जाण्याचा योग आला होता. लहानपणी तिथे सहलही गेली होती. या किल्ल्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य. महाराष्ट्रातील किल्ले आणि शिवराय यांचे अतूट नाते आहे. अशा अनेक गोष्टींमुळे शिवनेरीचा दर्जा महत्त्वपूर्ण आहे. ऐतिहासिक काळात बचाव आणि चढाईसाठी अत्यंत उपयुक्त असलेली ही बलवंत स्थाने आज मात्र दुर्दशेच्या गर्तेत सापडली आहेत. मी शिवनेरीला गेले असताना तिकडे पिकनिकला आलेल्या एका ग्रुपच्या मुलाने त्याचे नाव आणि मोबाईल नंबर मोठ्या दगडावर लिहिला. या सार्वजनिक ठिकाणी खाण्याच्या वस्तूचे पॅकेट, रिकाम्या बाटल्या टाकण्याची सवय तर आपल्याला आहेच. आशिक, बाबू, बेबी, बाबा, लिहिण्याची गरज काय? अशाने तुमचे प्रेम अमर होईल किवा जगजाहीर होईल अशी तर कल्पना नसेल ना या लोकांची?

केवळ शिवनेरीच नाही, तर औरंगाबादच्या अजिंठा-वेरूळ लेण्या, बीबी का मकबरा, आग्र्याचा ताजमहाल अशा पाहिलेल्या अनेक ठिकाणी हाच प्रकार घडतो. जर कोणी लहान मुले असे करत असतील तर आपण ओरडू तरी शकतो पण तरुण-तरुणी, मोठीमोठी माणसेच अशी वागू लागली तर येणाऱ्‍या पिढीला आपण या‌‍ शौर्यवीराच्या कथा सांगणार की त्यावर केलेली रंगरंगोटी दाखविणार? सहज सुट्टीच्या वेळी लोक बाहेर फिरण्यासाठी जेव्हा गड-किल्‍ल्यांवर जातात, आणि कोणी विचारलं की काय बघितलं तिकडे तर अनेक लोक काही नाही, सगळं पडलं आहे. बघण्यासारखं काहीही नाही अशी निराशाजनक उत्तरे देतात. तेव्हा त्यांना सांगावेसे वाटते की, भले ही आज आमचे किल्ले थोडे ढासळले असतील पण महाराष्ट्राची शान म्हणून ताठ मानेने उभ्या असणारा तोरणा, सिंधूदुर्ग, रायगड, सिंहगड, शिवनेरी अशा अनेक किल्यांचा आपल्याला अभिमान हवाच. शेकडो किल्यांचा हा खजिना आपला आहे, त्याला जपण्याची जबाबदारीदेखील आपलीच आहे.

आपण फक्त किल्ल्यावर मंदिरावर मोठमोठ्या वास्तूवर लावलेल्या त्या नोटिसा वाचण्याचा कंटाळा येऊन त्यांचे फोटो काढतो. मात्र आपणच आपल्या ऐतिहासिक स्थळावर जाऊन त्याचा अपमान करतो आणि स्वत:च्या देशाची प्रतिमा मलीन करतो. त्याचा कधी विचार केला आहे ? आपण या स्थळावर भेट देण्यासाठी जातो. इतिहासातील या वास्तू उत्तम शिल्पकाराची, चित्रकाराची ओळख करून देतात. वर्षानुवर्षे ऊन-पाऊस सोसणाऱ्या या किल्ल्यांना काही होत नसून उत्कृष्ट बांधकामाची पोच पावती आपल्याला या वास्तू देतात. पण या ठिकाणी जाऊन लोक त्यांच्या प्रेमाची आठवण प्रियकर प्रेयसीची नावे मोबाईल क्रमांक देऊन काय साध्य करण्याच्या विचारात असतात हे मला काही समजत नाही?

सध्या सगळीकडे स्वच्छता अभियानाचे वारे सुरु आहेत. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत लहान मोठे कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी स्वच्छता अभियान राबवून आपआपला परिसर स्वच्छ करण्याच्या मागे आहेत. माझ्या या लेखातून मला हेच पोहचवायचे आहे की, आपण वेगवेगळ्या जयंती पुण्यतिथी साजऱ्या करतो. मराठ्यांच्या पराक्रमाची शौर्याची गाथा ऐकताच मराठी माणूस मान उंचावतो. मग ऐतिहासिक वास्तूचा खजिना आपल्याजवळ असताना यावर फालतू विनोद, मजकूर लिहून का आपण आपली शोभा करून घेतो? यानंतर तरी असे काही होणार नाही याची शपथ घेऊन येणाऱ्या पिढीला आपल्या खऱ्या संस्कृतीची ओळख करून देण्याची जबाबदारी आपणच घेऊ या.

आपला सांस्कृतिक वारसा आपणच जपायला हवा आणि या करता तरुणांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. शहाजहान ने मुमताजसाठी ताजमहाल सारखी भव्य वास्तू बांधून त्यांचे प्रेम व्यक्त केले. आपण याचे कौतुक करू, हवा तर फोटोही काढू मात्र इतिहासातील खरेखुरे साक्षीदार बनून त्यावर स्वत:च्या प्रेमाची कबुली देण्याची गरज अजिबात नाही. या कोरीव कामाने आपण स्वत:ला बदनाम करून घेतोय याचा विचार जरूर करा. आपले किल्ले ऐतिहासिक वास्तू ही आपली शान आहे. विदेशी पर्यटक या वास्तुचे कौतुक करतात. स्थापत्य कलांचे उत्तम उदाहरण देणाऱ्या या वास्तुची देखभाल आपल्यालाच करायला हवी ना ! आपणच आपल्या अभिमानास्पद ऐतिहासिक स्थळांचे पावित्र्य जपायला हवे ना ! तर चला. आपली ऐतिहासिक पर्यटनस्थळे स्वच्छ, सुंदर आणि पवित्र राहतील, अशी शपथ घेऊया.

-अमृता आनप
(७२०८७३९७०५)
(लेखिका या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात आंतरवासिता करीत आहेत.)

आपला हक्काचा नारा...... जाणुन घेऊ सात/बारा........


आपला हक्काचा नारा...... जाणुन घेऊ सात/बारा........



आपला हक्काचा नारा...... जाणुन घेऊ सात/बारा.......

आपला हक्काचा नारा...... जाणुन घेऊ सात/बारा........

प्रचार प्रसार प्रसिद्धी व माहिती संस्थान महा. राज्य संचालित वतन बचाओ आंदोलनच्या वतीने ७/१२ परीषद घेण्यासाठी सातबारा यात्रेचे लवकरच आयोजन करण्यात येणार आहे. आम्ही आपल्या प्रत्यक्ष भेटीसाठी येणार आहोत. आपल्या समस्यां आपले प्रश्न जाणून घेणार आहोत.आणि ते सोडविण्यासाठी आम्ही सामाजिक पटलावर ते मांडणार आहोत. सदरच्या उपक्रमात आपला सहभाग दर्शवावा.
धन्यवाद
वतन बचाओ आंदोलन


आपला हक्काचा नारा...... जाणुन घेऊ सात/बारा........

                         आपला हक्काचा नारा...... जाणुन घेऊ सात/बारा........

     प्रचार प्रसार प्रसिद्धी व माहिती संस्थान महा. राज्य संचालित वतन बचाओ आंदोलनच्या वतीने ७/१२ परीषद घेण्यासाठी सातबारा यात्रेचे लवकरच आयोजन करण्यात येणार आहे. आम्ही आपल्या प्रत्यक्ष भेटीसाठी येणार आहोत. आपल्या समस्यां आपले प्रश्न जाणून घेणार आहोत.आणि ते सोडविण्यासाठी आम्ही सामाजिक पटलावर ते मांडणार आहोत. सदरच्या उपक्रमात आपला सहभाग दर्शवावा.
                                                              धन्यवाद
                                                      वतन बचाओ आंदोलन


साद देती सागर किनारे…


महाराष्ट्राला लाभलेल्या 750 किमीच्या समुद्राने, मोहिनी घालणारे अनेक सागरकिनारे दिले आहेत. कोणत्याही मोसमात ज्यांचे समुद्राशी नाते जुळते त्या दर्यावर्दी पर्यटकांना महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी कायम खुणावत असते. राकट देशा असे वर्णन असणाऱ्या महाराष्ट्राला लाभलेली ही नाजूक सौंदर्याची किनार पर्यटकांना आपल्या नैसर्गिक सौंदर्याने आकर्षित करीत असते. त्यामुळेच देशविदेशातील पर्यटकांसह महाराष्ट्राची ही सागरी किनारपट्टी कायम गजबजलेली असते.

सिंधुदुर्ग हे निसर्गाला पडलेले सुंदर स्वप्न, 121 कि.मी. लांबीचा लाभलेला स्वच्छ सुंदर समुद्र, रमणीय खाड्या, सिंधुदुर्ग व विजयदुर्गसारखे गडकिल्ले, मनोहरी दऱ्याखोऱ्या आणि घाटरस्ते, सागरी जैवविविधता, मंदिरे, देवस्थाने, रानमेवा, प्रसिद्ध देवालये, सावंतवाडीची लाकडी खेळणी, दशावतार व चित्रकथीसारख्या प्राचीन लोककला, जोडीला चविष्ट खाद्यसंस्कृती, वन्यप्राणी अशा अनेक गोष्टींनी सिंधुदुर्ग जिल्हा समृद्ध आहे.

सिंधुदुर्ग किल्ला

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारेलल्या ज्या किल्ल्याचे नाव अभिमाने घेतले जाते तो अभेद्य सिंधुदुर्ग किल्ला अर्थातच मालवण तालुक्यात आहे. 48 एकर क्षेत्रात पसरलेल्या या किल्ल्याच्या भोवताली पाणी व 52 बुरुज आहेत.

विजयदुर्ग किल्ला

एकेकाळी देवगड हे अत्यंत महत्त्वाचे व सुरक्षित बंदर म्हणून प्रसिद्ध होते. बंदराला लागून 120 एकरात पसरलेला देवगडचा किल्ला हा आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. किल्ल्याचे आवार म्हणजे एक विस्तीर्ण पठार आहे. किल्ल्यावरुन बंदर, अथांग समुद्र, मच्छिमारी बोटी असे नयनरम्य दृश्य पाहायला मिळते.

कुणकेश्र्वर व श्री भराडी देवी

श्री क्षेत्र कुणकेश्र्वर हे देवगड तालुक्यातील यादवकालीन मंदिर समुद्रकिनारी असल्याने याचा परिसर नितांत सुंदर आहे. याशिवाय अनेक ऐतिहासिक धार्मिक स्थळे व मठ या परिसरात आहे.

रुपेरी वाळुचे समुद्रकिनारे

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्यानंतर आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे विस्तीर्ण समुद्रकिनारे होय. मालवण तालुक्यातील तारकर्ली, देवबाग, चिवला बीच, तोंडवली वेंगुर्ला तालुक्यातील भोगवे, निवती, खवणे, वायंगणी, सागरेश्र्वर, नवाबाग, मोचेंमांड, सागरतीर्थ, रेडी, शिरोडा तर देवगड तालुक्यातील गिर्ये, पडवणे, देवगड, मीठबुंबरी, तांबळडेग, मिठबांव या सर्व सागर किनाऱ्यांवर सकाळ व संध्याकाळ निरनिराळा अनुभव येतो.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्यानंतर काय पाहाल ?

मालवण तालुका : मालवण तालुक्यात सिंधुदुर्ग किल्ला, भराडीदेवी, धामापूर तलाव, देवबाग बॅकवॉटर, स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्र, तोंडवली व तळाशील बीच, तारकर्ली, चिवला बीच, वायंगणी खाडी, रामेश्वर मंदिर.

देवगड तालुका : विजयदुर्ग किल्ला, कुणकेश्वर मंदिर, विमलेश्वर मंदिर-वाडा, रामेश्वर मंदिर गिर्ये, पडवणे, देवगड, मीठबुंबरी, तांबळडेग, मिठबांव समुद्रकिनारे व वाडातर.

वेंगुर्ला तालुका : वेंगुर्ल्याची डच वखार, सागर बंगला दीपगृह, रेडीचा गणपती, सागरतीर्थ, मोर्चेमांड, वायंगणी, निवती भोगवे, निवती, खवणे, वायंगणी, सागरेश्वर, नवाबाग, मोर्चेमांड, रेडी, शिरोडा.

सावंतवाडी तालुका : राजवाडा, लाकडी खेळणी, मोती तलाव, अंबोली, शिल्पग्राम, सावंतवाडी बाजारपेठ.

कुडाळ तालुका : संत राऊळ महाराज मठ, ठाकर आदिवासी कला आंगण, दत्तमंदिर माणगांव, वालावल खाडी.

दोडामार्ग तालुका : तिलारी प्रकल्प, पावसाळ्यात मांगेली धबधबा.

कणकवली तालुका : गोपुरी आश्रम, भालचंद्र महाराज मठ, सावडाव धबधबा, म्हाडकादेवी मंदिर, कासार्डे.

वैभववाडी तालुका : करुळ घाट, नापणे धबधबा, गगनगड.

कसे पोहोचाल ?

जवळचे विमानतळ : मुंबई
मुंबईपासून 540 किमी अंतरावर जवळचे रेल्वे स्टेशन : सिंधुदुर्ग
याशिवाय कणकवली आणि कुडाळदेखील महत्वपूर्ण रेल्वे स्टेशन आहेत.
बससेवा : मुंबई-सिंधुदुर्ग बससेवा उपलब्ध
राहण्याची सोय : पंचतारांकितपासून स्थानिक रहिवाशांच्या घरी अल्प खर्चात व्यवस्था तसेच एमटीडीसी हॉलिडे रिसॉर्ट उपलब्ध.
स्कूबा डायव्हिंग प्रशिक्षण संस्था

मालवणमधील देवबाग येथे जागतिक दर्जाचे अद्ययावत साधनसामुग्रीने सज्ज असे स्कूबा डायविंग प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. कोणत्याही वयाची व्यक्ती हे सहज करु शकते. मात्र सोबतच्या प्रशिक्षकाच्या सूचना तंतोतंत पाळणे आवश्यक आहे.
सावंतवाडीचा राजवाडा व लाकडी खेळणी

सावंतवाडी हे ऐतिहासिकालीन शहर आहे. सावंतवाडीतील राजवाडा, मोती तलाव, गंजिफा आर्ट, वुडवर्क पेंटींग, लॉकरवेअर या कला येथे पाहावयास मिळतात. राजवाड्याच्या दरबार हॉलमध्ये गंजिफा तयार करण्याचे (रंगवण्याचे) प्रात्यक्षिक, तयार लाकडी खेळणी, ऐतिहासिक पुरातन मूर्ती आहे. तसेच सावंतवाडीची लाकडी खेळणी ही या शहराची सार्वत्रिक ओळख आहे.

अधिक माहितीकरिता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, सिंधुदुर्गनगरी (02363-228785) येथे व आपत्कालीन कामासाठी जिल्हा प्रशासन 02362-228847 या क्रमांकावर पर्यटक संपर्क साधू शकतात.

- संध्या गरवारे,
माहिती सहाय्यक, जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग
संपर्क : 09422961649


नागपूर जिल्हा


महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जिल्ह्यांत विविध स्वरूपाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांची जिल्हावार माहिती महाभ्रमंती या सदरामधून आपल्याला मिळत असते. आज या सदरात परंपरा व आधुनिकता यांचा उत्तम संगम असलेल्या नागपूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती घेणार आहोत. नागपूर येथील संत्र्यांमुळे नारंगी शहर ओळखले जाते. ताडोबा, नागझिरा, नवेगाव आणि पेंच या अभयारण्यामध्ये जाण्यास हे मध्यवर्ती ठिकाण आहे.

खिंडसी तलाव
हिरव्यागार वनश्रीने नटलेल्या निसर्गरम्य परिसरात खिंडसी तलावाचा परिसर एखाद्या रत्नासारखा चमकून उठतो. स्थानिक लोकांसाठी तर हे एक अत्यंत आकर्षणाचे केंद्र बनले आहे. रामटेक तालुक्यात असलेल्या खिंडसी तलावाच्या सभोवताली घनदाट जंगल आहे. नागपूरपासून 53 किलोमीटर आणि रामटेकपासून 3.5 किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे. वैदर्भिय जनतेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून हे स्थळ आकर्षक आणि आवडीचे पर्यटन स्थळ बनले आहे. येथे येणारे पर्यटक मोटरबोट्स, पेडल बोट्स, रोवींग बोट्स, वॉटर स्कूटर्स आदींच्या माध्यमातून जलतरणाचा आनंद घेऊ शकतात. लहान मुलांसाठी येथे साहसी पार्कही आहे. तर साहसी उपक्रम करणाऱ्या मोठ्यांसाठी जंगलात ट्रेकिंगचीही सुविधा आहे.

रामटेक

या शहराचे सौंदर्य पाहून प्रत्यक्ष भगवान श्रीरामही येथे काळी काळ थांबले. त्यांच्या या वास्तव्यानेच या शहराचे नाव रामटेक असे पडले. येथील टेकडीवर श्रीराम व लक्ष्मणाची मंदिर आहेत. महाकवी कालिदासाचे स्मारकही येथे आहे. येथेच त्यांनी मेघदूत हे सुप्रसिद्ध संस्कृत महाकाव्य लिहिले असे मानले जाते.

तोतलाडोह धरण
नागपूर जिल्ह्यात नागपूरपासून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या रामटेकजवळील पेंच नदीवर असलेले तोतलाडोह नावाचे धरण आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर हा परिसर आहे. हे धरण पेंच नदीच्या जलविद्युत प्रकल्पाचा एक भाग आहे. येथील परिसर अतिशय मनमोहक आहे.

नवेगाव बांध
नागपूरपासून 56 किलोमीटर अंतरावर पारशिवनी तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर नवेगाव बांध आहे. पारशिवनीच्या वनक्षेत्रात हे धरण अर्थातच बांध आहे. या धरणाच्या सभोवताली अतिशय समृद्ध असे पर्वत आहेत. हिरवळीची चादर ओढली गेल्यामुळे हा परिसर अतिशय शांत असून या क्षेत्रात असलेले विविध पक्षी पाहण्यासारखे आहेत.

गोरेवाडा तलाव

नागपूरच्या वायव्येकडे असलेला गोरेवाडा तलाव हा 2350 फूट खोल आहे. या तलावातील पाण्याचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी होतो. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने 1911 मध्ये या तलावाची निर्मिती केली होती. या तलावाच्या चहूबाजूला घनदाट जंगल असून या जंगलात वन्यप्राणीही आहेत.

सेमिनरी हिल

नागपुरातील सेमिनरी हिल ही लहान आकाराची टेकडी आहे. सेंट चार्ल्स यांच्या नावावर या टेकडीचे नाव ठेवण्यात आले आहे. या टेकडीवरून शहराचे विहंगम दृश्य पाहता येऊ शकते. सेमिनरी हिलचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे अगदी लागूनच असलेले जपानी गार्डन होय. सेंट चार्ल्स सेमिनरी आणि एस. एफ. एस. कॉलेज या टेकडीच्या वर आहे. येथील चालण्याचे मार्ग लाकडाने तयार करण्यात आल्याने सकाळी ताज्या हवेत चालणाऱ्यांना सुखद अनुभव मिळत असतो. सेमिनरी हिलच्या सर्वात वरून नागपूर शहराचे विहंगम दृश्य अनुभवता येऊ शकते.

फुटाळा तलाव

नागपुरातील अतिशय प्रसिद्ध स्थळ म्हणजे फुटाळा तलाव ! सर्वच वयोगटातील लोकांसाठी हे ठिकाण अतिशय योग्य आहे. नागपूरचे पूर्वीचे राजा भोसले यांनी हा तलाव बांधला आहे. रंगीत फवारे आणि आल्हाददायक वातावरण येथील वैशिष्ट्य आहे. सायंकाळी हॅलोजन दिव्यांमुळे येथील वातावरण अधिकच आकर्षक होत असते. तीन बाजूंनी वेढलेला तलाव, हिरव्यागार जंगलाचे कवच आणि एका बाजूला अतिशय सुंदर अशी व्यापक चौपाटी हेदेखील येथील मुख्य आकर्षण आहे. तलावाच्या किना-यावर आणि टेकडीवरून सूर्यास्ताचा मोहक अनुभव घेता येऊ शकतो. हा परिसर निसर्गाचा एक अद्भूत चमत्कारच आहे. सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, अनेक स्थलांतरित पक्षी या तलावाकडे आकर्षित होत असतात. त्यामुळे पक्षीप्रेमींसाठीही हा परिसर उपयुक्त असाच आहे. या विविध वैशिष्ट्यांमुळे गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबीयांकरिता हे अतिशय लोकप्रिय पिकनिक स्थळ ठरले आहे.

अंबाझरी तलाव

नागपूरच्या पश्चिमेकडे 6 किलोमीटर अंतरावर अंबाझरी तलाव आहे. शहरातील हा सर्वात मोठा आणि अतिशय मनमोहक तलाव आहे. या तलावाच्या देखभालीची आणि व्यवस्थापनाची जबाबदारी नागपूर महानगर पालिकेची आहे. तलावाला लागूनच अतिशय सुंदर असा अंबाझरी बगिचा आहे. 1958 मध्ये निर्माण करण्यात आलेल्या या बगिच्याचे क्षेत्रफळ 20 एकर इतके आहे. लहान मुलांसाठी येथे करमणुकीची वेगवेगळी साधने आहेत.

कस्तूरचंद पार्क 

कस्तूरचंद पार्क हे नागपुरातील सर्वात मोठे बैठकीचे ठिकाण आहे. मध्यवर्ती रेल्वे स्थानकापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे. हजारावर लोक बसू शकतील, एवढी त्याची क्षमता आहे. शहरात जेव्हा मोठ्या मिरवणुका काढण्यात येतात तेव्हा हे स्थळ अतिशय लोकप्रिय ठरत असते.

नगरधन किल्ला 

रामटेक तालुक्यात असलेल्या नगरधन या गावात हा किल्ला नागपूरच्या ईशान्येकडे 38 किलोमीटर आणि रामटेकच्या दक्षिणेकडे 9 किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. नगरधन या जुन्या शहराची स्थापना सूर्यवंशी राजांनी केली आहे. नगरधन किल्ला हा या गावाचे वैशिष्ट्य असून, भोसले राजघराण्याचे राजा रघुजी भोसले यांनी हा किल्ला बांधला असल्याचे समजले जाते . या किल्ल्याच्या आतील भागात चौकोनी आकाराचा राजमहाल आहे. काही इमारतीही आहेत. या किल्ल्याच्या वायव्येकडील मुख्य द्वार अजूनही सुस्थितीत आहे.

सीताबर्डी किल्ला 

नागपुरातील सीताबर्डी किल्ला हा सीताबर्डी येथील 1817 च्या युद्धाचे प्रतीक आहे. नागपूरच्या मध्यभागी एका लहान टेकडीवर हा किल्ला वसलेला आहे. नागपूरचे राज्यकर्ते आप्पासाहेब उर्फ मुधोजी द्वितीय यांनी तिसऱ्या अँग्लो—मराठा युद्धाच्या काळात ब्रिटीशांच्या ईस्ट इंडिया कंपनीविरोधात लढा सुरू करण्यापूर्वी हा किल्ला बांधला होता. हा परिसर टेकड्यांनी वेढलेला असून, तो आता सीताबर्डी या नावाने ओळखला जातो. हा परिसर नागपूरचे अतिशय महत्त्वाचे असे व्यावसायिक केंद्र आहे. या किल्ल्यात ब्रिटीश सैनिकांचे थडगे आणि महात्मा गांधींना ज्या तुरुंगात ठेवण्यात आले होते, तो सेल आहे. सध्या प्रांतीय लष्कराचे कार्यालय या किल्ल्यात आहे. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या दोन दिवशीच हा किल्ला सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात येतो.

झिरो माईल 

झिरो माईलचे चिन्हांकन नागपुरात असल्यामुळे, हे शहर भारताचे केंद्रिंबदू आहे. हे चिन्हांकन भारताच्या मध्यवर्ती बिंदूचे चिन्ह आहे. अंतर मोजण्यासाठी ब्रिटीश राज्यकर्त्यांनी येथे झिरो माईल स्टोन उभारला होता. या झिरो माईल स्टोनचे स्वरूप चार घोडे आणि एक स्तंभ असे आहे. ते वाळूच्या दगडांनी बनलेले आहे. विधानभवनाच्या नैऋत्येकडे ते आहे. नागपूर हे भारताचे मध्यवर्ती शहर आहे, असे समजून ब्रिटीश राज्यकर्त्यांनी हे ठिकाण निश्चित केले आणि तिथे झिरो माईल स्टोन उभारला. हे शहर देशाचे मध्यवर्ती शहर असल्याने नागपूरला दुसरे राजधानीचे शहर करण्याचीही त्यांची योजना होती.

जपानीज रोझ गार्डन 
नागपूरच्या सिव्हील लाईन भागात हे जपानी रोझ गार्डन आहे. हे गार्डन म्हणजे निसर्ग प्रेमींसाठी मोठी पर्वणीच आहे. नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेण्याची इच्छा मनात बाळगणाऱ्‍यांसाठी हे ठिकाण अतिशय आकर्षक आहे. पक्ष्यांच्या सान्निध्यात राहण्याचा आनंदही येथे घेता येतो. पावसाळ्यात या गार्डनचे सौंदर्य अधिकच फुलत असते. उंच झाडे, हिरवे गवत आणि मनमोहक निसर्गाने ओतप्रोत असलेले हे गार्डन सकाळी आणि सायंकाळी ‘वॉकींग’ करणार्यांसाठीही अतिशय उपयुक्त आहे. या रोझ गार्डनमध्ये लाल आणि पिवळे गुलाब मुख्य आकर्षण आहे. या गार्डनच्या सभोवताल असलेले आणि अतिशय काळजीपूर्वक सुशोभित करण्यात आलेले काही लोखंडी शिल्प पाहिले की, हे खरोखरच जपानी गार्डन असल्याचे संकेत मिळतात.

व्हीसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान

नागपूरच्या जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाला व्हीसीए ग्राऊंड या नावानेही ओखले जाते. 2008 मध्ये ह गाऊंड उभारण्यात आले. त्याचवर्षी त्याचे उद्घाटन झाले. शहरातील जुन्या व्हीसीए मैदानाची जागा त्याने घेतली. हे मैदान रणजी ट्रॉफी आणि दुलिप करंडक स्पर्धेकरिता विदर्भ आणि सेंट्रल झानच्या संघांकरिता होम ग्राऊंड आहे. नागपूरपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या जामठा येेथे आहे

महाराजबाग आणि झू
शहराच्या मध्यभागी असलेले महाराजबाग आणि झू हे नागपूरचे मध्यवर्ती प्राणीसंग्रहालय आहे. शहरातील भोसले आणि मराठा राज्यकर्त्यांनी ते बांधले आहे. येथे काही दुर्मिळ जातीचे पक्षी आणि प्राणी आहेत. शहरातील अतिशय मनमोहन स्थळ अशी त्याची ओळख आहे. महाराज बागेत अतिशय दुर्मिळ प्राणी असल्याने योग्य उद्देशासाठी त्याचे बॉटनिकल गार्डनमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. या महाराजबागेतच प्राणीसंग्रहालयही आहे. शहरातील असे हे एकमेव स्थान असल्याने नागपूरकरांना त्याचा अभिमान आहे.

रमण सायन्स सेंटर

नागपूर शहरात असलेल्या या रमण सायन्स सेंटरला नोबेल पुरस्कार विजेते भारतीय भौतिकतज्ञ चंद्रशेखर व्यंकट रमण यांचे नाव देण्यात आले आहे. अतिशय उपयुक्त असे हे सायन्स सेंटर असून ते मुंबईच्या नेहरू सायन्स सेंटरशी संलग्न आहे. वैज्ञानिक कामकाजांना प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच उद्योग आणि मानव कल्याणाकरिता वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा विकास करण्यासाठी या सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. विविध स्वरूपाच्या विज्ञान प्रदर्शनीही येथे भरविण्यात येतात.

मध्यवर्ती संग्रहालय (अजब बंगला)

नागपूर शहरातील मध्यवर्ती संग्रहालयाला अजब बंगला या नावानेही ओळखले जाते. शहराच्या पश्चिमेकडे दीड किलोमीटर अंतरावर सिव्हील लाईन्स भागात ते आहे. 1863 मध्ये स्थापन झालेले हे संग्रहालय शहरातील सर्वात जुने आहे. प्राचिन काळात उपयोगात येणाऱ्या अनेक पुरातत्व वस्तू, शिल्पाकृती येथे संग्रहित आहेत. आर्ट, आर्चिओलॉजी, अॅन्थ्रोपोलॉजी, जिऑलॉजी, उद्योग आणि नैसर्गिक इतिहास अशा सहा गॅल-यामध्ये या सर्व वस्तू संग्रहित करण्यात आलेल्या आहेत.

नॅरो गेज रेल संग्रहालय
नागपूरच्या कामठी रोडवरील कडबी चौकात असलेले हे नॅरो गेज रेल संग्रहालय भारतातील असे एकमेव संग्रहालय आहे. 4.5 एकर जागेत असलेल्या या संग्रहालयात भारतीय रेल्वेच्या अनेक जुन्या आणि वारसा वस्तूंचे एकप्रकारे प्रदर्शनच भरविण्यात आले आहे. यात प्रामुख्याने लोकोमोटीव्ह आणि कॅरिएजचे मॉडल्स, हॅण्ड लॅम्प, जुने टेलिफोन संच आदींचा समावेश आहे.

पेंच सिलारी

हा परिसर प्रामुख्याने पेंच राष्ट्रीय उद्यान व व्याघ्र संरक्षित क्षेत्र म्हणून ओळखला जातो. सातपुडा टेकड्यांच्या दक्षिणेकडील पायथ्यापर्यंत सुमारे २५७ चो.की.मी. पर्यंत याचे क्षेत्र पसरले आहे. १९७५ मध्ये याला केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. तर १९९९ मध्ये या परिसरास व्याघ्र संरक्षित क्षेत्राचा दर्जा मिळाला.

बोर वन्यजीव अभयारण्य

बोर धरणामुळे निर्माण झालेल्या या घनदाट अरण्यासामध्ये विविध दुर्मिळ प्रजातींचे जीव आढळतात. बोर धरणसुद्धा पर्यटकांचे प्रमुख आकर्षण केंद्र बनले आहे.

सेवाग्राम

शेगाव गावातील आपल्या वास्तव्यादरम्यान महात्मा गांधींनी या आश्रमाची स्थापणा केली. या आश्रमाच्या संकुलामध्ये महत्मा गांधींचे निवासस्थान असलेल्या ‘बा कुटी’ व ‘आदी निवास’ आहेत.

लेक गार्डन 
अद्भूत निसर्गाचा आनंद लुटायची जर कुणाची इच्छा असेल, तर त्याने नागपुरच्या सक्करदरा भागातील लेक गार्डनला अवश्य भेट द्यायला हवी. निसर्गाच्या आनंदासोबतच तुम्हाला मनासारखी विश्रांतीही येथे घेता येईल. यासाठी सक्कर दऱ्यातील लेक गार्डन सारखे दुसरे स्थळ नाही. आठवड्याची सुटी घालविण्यासाठी आणि मनासारखा आनंद लुटण्यासाठी हे सर्वोत्तम स्थळ आहे. या लेक गार्डन मध्ये खेळण्यासाठी पाच विस्तारित मैदान आहेत.

गांधीसागर तलाव 

नागपुरच्या महाल भागात असलेला गांधीसागर तलाव हा शुक्रवारी तलाव आणि जुम्मा तलाव या नावानेही ओळखला जातो. रमण सायन्स सेंटरच्या अगदी समोर हा तलाव आहे. सुमारे 275 वर्षांपूर्वी नागपूरचे तत्कालीन राज्यकर्ते चांद सुल्तान यांच्या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून हा तलाव अस्तित्त्वात आला असल्याचे बोलले जाते. नाग नदीला सोडण्यात येणाऱ्‍या पाण्यातून या तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. जलसाठ्याशी संबंधित या तलावाचे नाव जुम्मा तलाव असेही ठेवण्यात आले आहे.

1742 मध्ये पहिले रघुजी यांनी आपल्या राज्याची राजधानी म्हणून नागपूरला घोषित केले आणि भोसले व ब्रिटीशांच्या राज्यकाळात या तलावाचे नाव शुक्रवारी तलाव असेही ठेवण्यात आले. या तलावाच्या मधोमध एक छोटेसे बेट आहे. या बेटावर आकर्षक शिवमंदिर आणि बगिचाही आहे. पिवळ्या रंगांच्या मर्क्युरी दिव्यांमुळे रात्रीच्या वेळी या तलावाचे सौंदर्य अधिकच मोहक असते. येथे येणाऱ्यांसाठी नौकाविहाराचीही सोय आहे.

सातपुडा बॉटनिकल गार्डन

नागपूरच्या फुटाळा तलावाजवळील सेमिनरी हिल्स भागात असलेले सातपुडा बॉटनिकल गार्डन हे अतिशय अद्भुत गार्डन असून, हजारो लोकांसाठी ते आकर्षणाचे केंद्रिंबदू ठरले आहे. सिटी सेंटरच्या ईशान्येकडे असलेल्या या सातपुडा बॉटनिकल गार्डनमध्ये अनेक दुर्मिळ वनस्पती आहेत. जीवशास्त्र, प्राणीशास्त्र आणि पर्यावरण विज्ञानाचा अभ्यास करणार्यांसाठी हे गार्डन अतिशय उपयुक्त ठिकाण आहे. कारण, येथे विविध वनस्पतींची महत्त्वूपर्ण माहिती उपलब्ध आहे.

खेकरा नाला तलाव

नागपूरपासून 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या खाप्रा येथील खेकरा नाला हे सौंदर्याने ओतप्रोत असलेले धरणाचे ठिकाण आहे. खापाजवळील छिंदवाडा मार्गावर ते आहे. साहसी कृत्य करणाऱ्‍यांसाठी विशेषत: पर्वतरोहकांसाठी हे ठिकाण अतिशय आदर्श असेच आहे. येथील मुख्य आकर्षण म्हणजे, खेकरा नाला धरणाच्या सभोवताली असलेला अतिशय शांत आणि निश्चल असा तलाव, सभोवताल असलेले घनदाट जंगल, हिरवागार निसर्ग, आरोग्यासाठी पोषक वातावरण हे होय.

संकलन – 
विलास सागवेकर,
उपसंपादक 

औरंगाबाद जिल्हा


महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जिल्ह्यांत विविध स्वरूपाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांची जिल्हावार माहिती महाभ्रमंती या सदरामधून आपल्याला मिळत असते. आज या सदरात औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती घेणार आहोत. 

अजिंठा व एलोराच्या जगप्रसिद्ध लेण्या तसेच आसपासच्या परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणांमुळे औरंगाबाद हे एक मध्यवर्ती पर्यटन स्थान झाले आहे. युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केलेली अजिंठा आणि वेरूळ लेणी आणि प्रसिद्ध मुघल वास्तू बीबी का मकबरा अगदी जवळ असल्यामुळे नुकतेच ‘महाराष्ट्राची पर्यटन राजधानी’ म्हणून जाहीर झालेले औरंगाबाद राज्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे. हे महाराष्ट्रातील अतिशय झपाट्याने वाढणारे शहर असून आता ते महत्त्वाचे व्यापारी शहर बनले आहे. मुंबईशी विमान, रेल्वे व रस्त्याने तर राज्यातील इतर सर्वच शहरांशी रस्त्याने चांगल्या प्रकारे जोडलेले आहे. अजिंठा आणि वेरूळ लेण्यांबरोबरच पितळखोरे, दौलताबाद, पैठण आणि शिर्डी या ठिकाणांना देखील औरंगाबादहून जाता येते.

अजिंठा

जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित झालेली ही बौद्धकालीन लेणी बुद्ध व बोधसत्त्वाचे विहंगम दर्शन घडवतात. सन १८७९ मध्ये एका ब्रिटीश अधिकाऱ्याने काळाच्या ओघात हरवलेली ही लेणी पुन्हा शोधून काढली. हे ठिकाण औरंगाबादपासून १०७ कि.मी. आणि जळगांवपासून ६० कि.मी. अंतरावर आहे. अजिंठा नामक मध्ययुगात वसलेल्या गावापासून अगदी जवळच भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याच्या ताब्यात संरक्षित असणारी ३२ लेणी आहेत. १९८३ मध्ये युनेस्कोने अजिंठा लेण्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. याठिकाणी असणाऱ्या कोरीव गुंफा दोन भागात विभागता येतात. पहिल्या विभागात इ.स.पू. दुसऱ्या शतकापासून इ.स. पहिल्या शतकापर्यंत कोरली गेलेली प्राचीन बौद्ध लेणी येतात तर दुसऱ्या विभागात इ.स. पाचव्या शतकातील महायान बौद्ध लेणी येतात. प्राचीन लेण्यांपैकी क्र. ९ आणि १० ही लेणी म्हणजे चैत्यगृहे आहेत, ज्यामध्ये भारतीय इतिहासातील सर्वात प्राचीन कलेचे उपलब्ध नमुने जतन झाले आहेत, तर ८, १२, १३ आणि १५ ही लेणी म्हणजे विहार आहेत. तसेच १९, २६, आणि २९ क्रमांकाच्या गुहा म्हणजे महायान काळातील चैत्यगृहे असून उर्वरित सर्व या काळातील विहार आहेत.

एलोरा (वेरुळ)

हिंदू, जैन व बौद्ध धर्माचा प्रभाव असलेली ही लेणी स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे. तेराव्या शतकातील या लेण्यांमधील कैलास मंदिर हे एक महत्त्वाचे व जगातील सर्वात मोठे अखंड शिल्प आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक. अजिंठ्यापासून सुमारे १०० कि.मी. अंतरावर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पुरातत्त्वीय स्थळ वसलेले आहे, ते म्हणजे वेरूळ. सुमारे १५०० वर्षांचा इतिहास असणारे हे स्थळ तेथील प्राचीन भारतीय कोरीव स्थापत्याच्या सर्वोत्कृष्ट नमुन्यासाठी जगप्रसिद्ध आहे. चरणाद्रीच्या उभ्या डोंगरावर कोरून काढलेल्या ३४ गुहा आपल्याला एकाच ठिकाणी बौद्ध, हिंदू आणि जैन धार्मिक लेण्यांचे एकत्रित दर्शन घडवितात.

म्हैसमाळ

सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये सुमारे ९१३ मीटर उंचीवर वसलेले हे ठिकाण गिरीजाभवानी मंदिरासाठी सुप्रसिद्ध आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी येथे मोठा उत्सव भरतो.

पैठण

गोदावरी नदीच्या काठी वसलेले पैठण हे शहर जरीकाम केलेल्या पैठणी साड्यांकरिता प्रसिद्ध आहे. तसेच पैठण हे शहर संत एकनाथांचे जन्मगाव म्हणून प्रसिद्ध आहे.

पितळखोरा लेणी

ही भारतातील सर्वात जुन्या लेण्यांपैकी असून ती अंदाजे २३०० वर्षांपूर्वी कोरण्यात आली आहेत. पितळखोऱ्याची लेणी अजिंठा लेण्यांपेक्षाही जवळपास १०० वर्षे आधी कोरली आहेत.

दौलताबादचा किल्ला

दगडामध्ये खोदलेल्या गुहा आणि दालने, एक सुंदर असे मंदिर, मोठा खंदक, संरक्षक तटबंदी, प्रशस्त राजवाडे, उत्तम अशी स्नानगृहे, निवासी संकुले, बाजार, पायऱ्या असलेली विहीर अशा सगळ्या स्थापत्यगुणांनी समृद्ध असलेला हा किल्हा आहे. याचे ऐतिहासिक महत्त्व एवढे आहे की तुघलकाच्या राजवटीमध्ये त्यांनी आपली राजधानी दिल्लीहून देवगिरीला म्हणजेच आजच्या दौलताबादला हलवली.

संकलन - विलास सागवेकर,
उपसंपादक

कोल्हापूर जिल्हा

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जिल्ह्यांत विविध स्वरूपाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांची जिल्हावार माहिती महाभ्रमंती या सदरामधून आपल्याला मिळत असते. आज या सदरात दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरची माहिती घेणार आहोत. येथील महालक्ष्मी मंदिर प्रसिद्ध असून देशभरातून भक्त तिच्या दर्शनाला येतात. कोल्हापूर ही मराठ्यांची राजधानी म्हणूनही ओळखली जाते. शिक्षण व उद्योगाचे हे एक महत्त्वाचे केंद्र आहे.

पन्हाळा
इतिहासकालीन लढ्यांमध्ये पन्हाळा किल्ल्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. उंचीवर असल्यामुळे हे गिरीस्थान म्हणूनही प्रसिद्ध आहे. कोल्हापूरच्या सभोवताली पन्हाळा, विशाळगड, महिपळगड आणि कलंदिगड ह्या गडांच्या जोड्या आहेत. येथे तुम्ही तीन मोठ्या ईमारती पाहू शकता त्याला ‘अंबरखाना’ म्हणतात. पन्हाळा हे ठिकाण कोल्हापूर पासुन 20 कि.मी. अंतरावर आहे.समुद्रसपाटी पासुन 977.2 मी. ऊंचीवर असलेले, पन्हाळा हे मोहक प्रेक्षनिय स्थळ आहे जेथे आपण आपली सुट्टी घालवण्यासाठी जाऊ शकतो. पन्हाळा किल्ल्यामुळे व ईतर डोंगरामुळे करड्या किंवा पांढर्‍या रंगाचा वारसा येथे जपला आहे.हा किल्ला राजा भोज यांनी 1178-1209 मध्ये बांधला आहे आणि डेक्कन किल्ल्यांमध्ये सर्वात मोठा किल्ला आहे.

महालक्ष्मी
महालक्ष्मीची आख्यायिका सर्व पुराणात आढळते. मोठ्या किमंतीच्या दगडापासून, 40 कि.ग्रॅ. वजनाची देवीची मुर्ती बनवली आहे.ह्याच्यामध्ये हिरक नावाचा धातु मिसळला आहे. ज्याच्यापासून मुर्तीवर प्राचीन काळापासून प्रकाश फेकला जातो.ह्याची रचना बाहेरच्या बाजुला असलेल्या ‘शिव-लिंग’ सारखी आहे.हे मंदीर चौकोनी दगडांच्या तुकड्यावर ऊभारले आहे ज्याच्यामध्ये हिरक आणि वाळु मिसळली आहे.वाघाची मुर्ती बाहेरच्या बाजुला ऊभा आहे.

बाहुबली

जैन धर्मियांच्या दोन विविध पंथांची येथे मंदिरे आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांच्यासाठी हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.


राधानगरी
घनदाट जंगलाने वेढलेला हा परिसर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे. येथील भगवती नदीवर वीज निर्मितीचे महत्त्वाचे केंद्र आहे.

विशाळगड
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक सुटकेमुळे विशाळगड इतिहासात प्रसिद्ध पावला आहे. आजूबाजूच्या निसर्गरम्य परिसरामुळे चित्रपट निर्मात्यांमध्ये हा परिसर लोकप्रिय आहे. जवळपास ऊत्तरेला पन्हाळ्यापासुन 60 कि.मी. आणि कोल्हापूर पासुन 18 कि.मी. दक्षिणेला हा किल्ला आहे. घनदात जंगलातुन हा रस्ता जातो. खोल दरीमुळे मार्गापासुन हा किल्ला वेगळा केलेला आहे. हा दिसायला खूप मोठा आहे म्हणुन ह्याला ‘विशाल’ असे नाव देण्यात आले. दरीमुळे ह्या गडा आत जाण्याचा मार्ग देखील कठीण आहे.

दाजीपूर अभयारण्य
कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील हे रम्य गाव. दाजीपूर एक छोटसं गाव मात्र या दाजीपुरात रम्य, घनदाट झाडी, वृक्ष, शेकडो नमुन्याचे प्राणी आणि पक्षी आढळतात, या अरण्यात निसर्गाच्या कुशीत गेल्याचा अनुभव मिळतो हे या गावाचे वैशिष्ट्य आहे. या अरण्यात गवा, हरिण, सांबर, चितळ यांचे कळप दिसतात. तसेच लाल मातीत बिबळया वाघाच्या पायाचे ठसे दिसून येतात. हे अभयारण्य कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर, राधानगरी तालुक्यामध्ये वसले आहे.हे एक आकर्षित सहलीचे ठिकाण आहे ज्याच्यामध्ये प्राणी, पक्षी आणि निसर्गाचे सौंदर्य आहे. ‘गवा’ रेड्यासाठी हे जंगल प्रसिद्ध आहे. येथे मोठ्या प्रमाणात सांबर, हरण, अस्वल आणि साप आढळतात. जंगल रिसॉर्ट हे एक सुंदर ठिकाण राधानगरी धरणाच्या मागील बाजूस आहे.

न्यु पॅलेस
भवानी मंडप – कसबा बावडा मार्गावर ही एक प्राचीन ईमारत आहे. 1877 – 1884 ह्या कालावधीत ही ईमारत बांधली गेली. काळ्या, सपाट केलेल्या दगडांचा एक ऊत्कृष्ट नमुना बांधला आहे जे सर्व प्रवाशांच मन वेधुन घेते. ह्याला लागुनच एक बाग आहे, त्याला दगडांच्या भींतीचे व तारांचे कुंपन आहे.संपुर्ण ईमारत आठ कोनी आहे आणि त्याच्या मध्ये बुरूज आहे.1877 मध्ये येथे घड्याळ बसवले. थोड्या – थोड्या अंतरावर येथे बुरूज आहेत.प्रत्त्येक काचेवर शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी लिहीले आहे. येथे प्राणी संग्रहालय व मैदानाची जमीन आहे. आजचे, श्रीमंत शाहु महाराजांचे निवास्थान आहे.
भुदरगड
कोल्हापूरच्या दक्षिणेस भुदरगड हा प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला सह्याद्रीच्या मध्यावर उभा आहे. या किल्ल्यावर श्री केदारलिंग, भैरवनाथ, जखूबाई अशी देवस्थाने आहेत.


संकलन - विलास सागवेकर,
उपसंपादक

सांगली जिल्हा

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जिल्ह्यांत विविध स्वरूपाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांची जिल्हावार माहिती महाभ्रमंती या सदरामधून आपल्याला मिळत असते. आज या सदरात सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती घेणार आहोत.

औदुंबर

औदुंबर हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून श्री दत्तात्रयाचे स्थान म्हणून ओळखले जाते. हे ठिकाण कृष्णा नदीच्या काठावर वसले आहे.

बत्तीस शिराळे

नागपंचमीला भरणाऱ्या उत्सवामुळे बत्तीस शिराळे गाव जगप्रसिद्ध आहे. या दिवशी शेकडो नाग व सापांना पकडून त्यांची पूजा केली जाते. नंतर त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ ठिकाणी साडले जाते.

नरसोबाची वाडी

कृष्णा व पंचगंगेच्या संगमावर वसलेले हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून येथे श्रीदत्तगुरुंच्या पवित्र पादुका आहेत.

चांदोली नॅशनल पार्क

सांगली जिल्ह्यातील चांदोली नॅशनल पार्क हे एकमेव राष्ट्रीय अभयारण्य आहे. सदर स्थळाला पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने चांदोली राष्ट्रीय पार्क व कोयना वन्यजीवन अभयारण्य मिळून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पास व्याघ्र राखीव प्रकल्प म्हणून २१ मे २००७ मध्ये घोषित केलेले आहे. सद्यस्थितीत चांदोली नॅशनल पार्क येथे ९ वाघ व ६६ बिबटे आहेत.

प्रचितगड
संगमेश्वर तालुक्याच्या शृंगारपूर या ऐतिहासिक गावाजवळ प्रचितगड आहे. या गडावर जाण्यासाठी सह्याद्री पर्वतामधून वाट काढत जावे लागते. प्रचितगडावर चार तोफा व पडिक वास्तू असून येथील कातळाच्या तळघरात असणारे थंडगार पाणी म्हणजे निसर्गाचा एक चमत्कारच आहे.

मिरज दर्गा

मिरज शहराच्या लौकिकात व सौंदर्यात भर टाकणार्‍या ज्या अनेक वास्तू आहेत. त्यामध्ये ख्वाजा शमशोद्दिन मिरासाहेबाचा दर्गा हे मिरजेचे खास आकर्षण आहे. हजारो हिंदू-मुस्लीम भक्तांचे हे श्रध्दास्थान आहे.

श्री गणपती मंदिर

सांगली शहरातील गणपती मंदिर हे सांगलीचे ऐतिहासिक आकर्षण आहे. सांगली संस्थानचे पहिले अधिपती कै.आप्पासाहेब पटवर्धन यांनी हे मंदिर इ.स. १८४३ साली बांधले. गणपती हे सांगली संस्थानचे आराध्य दैवत असून श्रध्दास्थान आहे.

संकलन - विलास सागवेकर, 
उपसंपादक (महान्यूज)

पुणे जिल्हा

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जिल्ह्यांत विविध स्वरूपाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांची जिल्हावार माहिती महाभ्रमंती या सदरामधून आपल्याला मिळत असते. मराठ्यांची राजधानी असलेले ऐतिहासिक शहर विद्येचे व संस्कृतीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. मोठ मोठे औद्योगिक कारखाने आणि तंत्रज्ञान संस्था यामुळे पुण्याचे नाव जगभरात पोहोचले आहे. अशा या पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती आपण येथे घेणार आहोत.

आळंदी
पुणे शहरापासून २५ कि. मी. अंतरावर आळंदी हे स्थान आहे. देवाची आळंदी या नावानेही हे प्रसिद्ध आहे. श्रीसंत ज्ञानेश्वरांनी वयाच्या २१ व्या वर्षी येथे संजीवन समाधी घेतली. वारकरी संप्रदायामध्ये हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून आळखले जाते. आळंदी हे शहर इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आहे. संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला नदीवर असलेला घाट खूप सुंदर आहे. वारकरी संप्रदायात पंढरपूर प्रमाणे आळंदी या तीर्थस्थानाचेही मोठे महत्त्व आहे.

देहू
इंद्रायणी नदीच्या काठावर असलेले देहू हे लहानसे गाव पुण्यापासून मुंबईकडे जाताना २५ कि.मी. अंतरावर आहे. श्रीसंत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान असलेले देहू गाव इंद्रायणी नदीच्या काठी वसले आहे. फाल्गुन वद्य पक्षात भरणारी वार्षिक जत्रा हे येथील महत्त्वाचे आकर्षण आहे.

जेजुरी
पुण्यापासून ३० किमी अंतरावर जेजुरीचा खंडोबा हे अतिशय महत्त्वाचे तीर्थस्थळ आहे. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात भरणाऱ्या जत्रेला असंख्य भाविक दूरवरच्या परिसरातून येतात.

कार्ले-भाजे-बेडसे लेणी
चैत्य लेणी प्रकारातील ही भारतातील सर्वात मोठी बौद्ध लेणी असून ती इ.स. पूर्व दुसऱ्या शतकात बांधली गेली आहेत. येथील चैत्य सभागृह प्रचंड मोठे असून आजही ते उत्तमरित्या जपले आहे.

खंडाळा
पश्चिम घाटातील मुंबई-पुणे महामार्गावर वसलेले हे एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. उंचीवर वसलेले असल्यामुळे साहजिकच ते निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण आहे.

लोणावळा
खंडाळ्यापासून जवळच असलेले लोणावळा हे एक छोटेसे शहर असून हे सुद्धा पर्यटकांमध्ये थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. कार्ले-भाजे-बेडसे लेण्यांपासून हे स्थान जवळच आहे.

मोरगाव
मोरगाव हे महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक गणपतीचे स्थान आहे. येथील गणपती श्री मोरेश्वर या नावाने ओळखला जातो. ही गणपतीची मूर्ती स्वयंभू असून भक्तांमध्ये खूपच लोकप्रिय आहे.

पुरंदर
मराठेशाहीतील महत्त्वाच्या किल्ल्यांपैकी पुरंदरचा किल्ला ओळखला जातो. पश्चिम घाटात वसलेला हा किल्ला समुद्र सपाटीपासून १३५० मी. उंचीवर आहे.

रांजणगाव
पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात स्वयंभू महागणपतीचे स्थान असलेले हे तीर्थस्थळ अष्टविनायकांपैकी एक म्हणून ओळखले जाते. या मंदिराची रचना अशी आहे की, उगवत्या सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात.

शिवनेरी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणून शिवनेरी किल्ला प्रसिद्ध आहे. या परिसरात अनेक टेकड्या व लेणी आहेत. शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला जुन्नर गावाजवळ पुण्यापासून अंदाजे १०५ किलोमीटरवर आहे.

सिंहगड
पूर्वी कोंढाणा या नावाने प्रसिद्ध असलेला किल्ला नरवीर तानाजी मालुसरे यांच्या ऐतिहासिक लढाईमुळे श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी याचे नाव सिंहगड असे ठेवले. पुण्यापासुन जवळपास २० ते २५ किलोमीटर अंतरावर भूलेश्वर या डोंगररांगानमध्ये हा वसलेला आहे. या किल्लावरून राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, पुरंदर तसेच खडकवासला धरण यांचे दर्शन घडते.

ओझर
ओझर येथील अष्टविनायकांपैकी विघ्नेश्वराचे मंदिर चारही बाजूंनी दगडांनी वेढले आहे. या दगडांवर उभे राहून लेण्याद्रीचा परिसर न्याहाळता येतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला आणि गिरीजात्‍मक गणपती येथून जवळच आहेत.

थेऊर

अष्टविनायकांपैकी स्वयंभू गणपतीचे स्थान म्हणून थेऊर प्रसिद्ध आहे. येथील गणपती श्री चिंतामणी या नावाने ओळखला जातो. या थेऊरला तिन्ही बाजूंनी मूळा-मुठा नदीचा वेढा आहे.

संकलन – विलास सागवेकर,
उपसंपादक, महान्यूज.

नाशिक जिल्हा

नाशिक

नाशिक हे भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. जवळपास २००० लहानमोठी मंदिरे येथे पहावयास मिळतात. गोदावरीच्या तीवरावर वसलेल्या या प्राचीन शहरामध्ये दर १२ वर्षांनी एकदा सिंहस्थ कुंभमेळा भरतो.

देवळाली
नाशिकचे उपनगर असलेले देवळाली हे ठिकाण लष्करी प्रशिक्षण शाळांसाठी प्रसिद्ध आहे.

गंगापूर धरण
देशातील सर्वात मोठ्या मातीच्या धरणांपैकी एक असलेल्या गंगापूर धरणाच्या परिसरात अतिशय सुंदर असे उद्यान आहे. तसेच हे एक पर्यटकांचे आवडते स्थान आहे.

पांडवलेणी
मुंबई-नाशिक महामार्गापासून केवळ ८ कि.मी. अंतरावरील ही लेणी १२० मीटर उंचीच्या टेकडीवर वसली आहेत.

त्र्यंबकेश्वर
देशातील १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर हे स्वाभाविकच महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव भरतो. तसेच दर १२ वर्षांनी येथे सिंहस्थ यात्राही भरते.

वणी सप्तश्रृंगी
साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेले वणी येथील सप्तश्रृंगी गडावरील देवीचे हे स्थान भाविकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.

काळाराम मंदिर
पंचवटी भागात स्थित असलेले काळाराम मंदिर मध्यवर्ती बस स्थानका पासून 3 कि.मि.अंतरावर आहे. मंदिरात जाण्यासाठी नाशिक शहरातून विविध ठिकाणाहून शहर बस सेवा व ऑटोरिक्षा उपलब्ध आहेत. काळाराम मंदीर सरदार रंगराव ओढेकर यांनी सन 1782 मध्ये जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर बांधले. मंदिराच्या बांधकामासाठी 2000 कारागीर 12 वर्ष राबत होते. 245 फूट लांब व 145 फूट रुंद मंदिर परिसराला 17 फुट उंच दगडाची भिंत आहे.

खंडोबा मंदीर
देवळाली छावणी परिसरात लहान टेकडीवर खंडोबा मंदिर वसलेले आहे. भगवान शंकराचे अवतार मानले जाणारे श्री खंडोबा महाराजांचे हे मंदिर 500 वर्ष जुने आहे. या टेकडीला ‘खंडोबाची टेकडी’ असे देखील म्हणतात.

कावनई-कपिलधारा तिर्थ
हे तिर्थक्षेत्र इगतपुरी तालुक्यात असून नाशिक शहरापासून 50 कि.मी. अंतरावर स्थित आहे. इगतपुरी पासून कावनाईचे अंतर 12 कि.मी. आहे. श्री संत गजानन महाराज यांनी या परिसरात तपश्चर्या केली असे मानले जाते. हे ठिकाण कावनाई किल्ल्याच्या पायथ्याशी असून सभोवतालचा परिसर नयनरम्य आहे. कपिलधारा तिर्थ येथे विविध मंदीरे असून जवळच माता कामाक्षी मंदीर देखील आहे. या ठिकाणी वर्षभर वाहणारा नैसर्गिक पाण्याचा झरा देखील आहे.

कुशावर्त तिर्थ
कुशावर्त तिर्थ हे त्र्यंबकेश्वर शहराच्या मध्यभागी श्री त्र्यंबकेवर ज्योतिर्लिंग मंदिरा पासुन अदमासे 300 मी.अंतरावर स्थित आहे. कुशावर्त तिर्थ हे 21 फुट खोलीचे नैसर्गिक पाण्याचे झरे असलेले कुंड सन 1750 मध्ये बांधण्यात आले. गोदावरी नदी ब्रम्हगिरी पर्वतावरुन लुप्त झाल्यांनतर हया ठिकाणी प्रकट होते अशी काही लोकांची श्रध्दा आहे.

मांगी तुगी मंदिर
मांगी तुगी मंदीर नाशिक पासुन 125 कि.मि. अंतरावर सटाणा तालुक्यात आहे. समुद्रसपाटीपासुन 4343 फुट उंचीवर मांगी शिखर तर समुद्र सपाटीपासून 4366 उंचीवर तुंगी शिखर आहे. मांगी तुंगी हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. मांगी मांगी शिखराची उंची जास्त नसली तरी येथे सराईत गिर्यारोहकच चढू शकतात. शिखराच्या पायथ्याशी भगवान महावीर, अदिनाथ, पार्श्वनाथ, हनुमान, वाली, सुग्रीव इ. यांच्या 356 कोरीव मुर्ती आहेत. गुफांमध्ये देखील काही कोरीव काम आढळते. या ठिकाणी ‘मांगीगिरी मंदीर’ आहे. तुंगी तुंगी शिखर मांगी शिखरापेक्षा उंच आहे. या शिखराला देखील तुंगी शिखरासारखीच प्रदक्षिणा करता येते. प्रदक्षिणा मार्गावर तीन गुंफा आहे. त्या पैकी एका गुंफेत ‘तुंगीगिरी मंदीर’ असून भगवान बुद्धांच्या 99 कोरीव मूर्ती येथे आहेत

चांभारलेणे
"चांभारलेणे" हा 11 व्या शतकातील जैन मंदीरांचा समुह आहे. नाशिक शहराच्या बाह्य भागात रामशेज किल्ल्याजवळ एका टेकडीवर ही मंदिरे स्थित आहे.

तपोवन
तपोवन म्हणजे ‘तपस्वी लोकांचे वन’ हे ठिकाण नाशिक येथे पंचवटी पासुन 1.5 कि.मी.अंतरावर खालच्या बाजुस गोदावरी नदी तिरी आहे. तपोवन हे एकेकाळी दंडकारण्याचा भाग होता.

कैलास मठ / भक्तीधाम
हा आश्रम नाशिक येथील पंचवटी भागात स्थित असून यास ‘भक्तीधाम’ असे देखील म्हटले जाते. या ठिकाणी विविध देवतांची मंदिरे आहेत. ‘कैलास मठ’ हा जुना आश्रम असून या ठिकाणी वेद शिकविले जातात. परमपुज्य स्वामी हृदयानंद महाराज यांनी सन 1920 मध्ये या आश्रमाची स्थापना केली. सद्यस्थितीत आचार्य महामंडलेश्वर स्वामी संविदानंदजी स्वरस्वती येथील प्रमुख आहेत. श्रावण महिन्यात तेथे विविध धार्मिक उत्सव साजरे केले जातात.

मुक्तिधाम
मुक्तीधाम हे नाशिक शहरात नाशिक रोड रेल्वे स्टेशनजवळ स्थित आहे. या मंदिराचे बांधकाम पांढऱ्या रंगाच्या मकराणा संगमरवरी दगडांत केले आहे. या मंदिराचा श्वेतरंग पवित्रता व शांतीचा संदेश देतो. येथे 12 ज्योर्तिलिंगाची प्रतिकृती स्थापित करण्यात आलेली आहे. मंदिराच्या भिंतीवर गितेचे 18 अध्याय कोरलेले आहेत.

पंचवटी

नाशिक शहरात पंचवटी परीसर हा गोदावरी नदीच्या डाव्या तीरावर आहे. काळाराम मंदिरा जवळ वटवृक्षांचा समुह असून हा समूह पाच वटवृक्षांपासून तयार झाला असल्याने या परिसरास ‘ पंचवटी ’ असे म्हटले जाते. ‘पंच’ म्हणजे पाच व ‘वटी’ म्हणजे वडाचे झाड असा अर्थ होतो.

सितागुंफा

नाशिक शहरात मध्यवर्ती बस स्थानकापासुन 3 कि.मी.अंतरावर पंचवटीत सितागुंफा स्थित आहे. वनवासा दरम्यान माता सिता येथे रहात होत्या असे म्हटले जाते.पहिल्या मुख्य गुंफेत राम, सिता व लक्ष्मण यांच्या मुर्ती असुन, दुसऱ्‍या लहान गुंफेत शिवलींग आहे.

रामकुंड
रामकुंड हे नाशिक येथे गोदावरी नदीपात्रात असून मध्यवर्ती बसस्थानकापासून दोन कि.मी. अंतरावर आहे. वनवासादरम्यान या ठिकाणी प्रभुराम स्नान करीत होते अशी मान्यता असल्याने यास पवित्र समजले जाते. भाविक आपल्या मृत नातेवाइकांच्या अस्थि, अस्थिविलयकुंडात विसर्जित करतात. महात्मा गांधी,पंडीत नेहरु, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांचेसह अनेक महान नेत्यांच्या अस्थि रामकुंड येथे विसर्जित करण्यात आल्या आहेत. 

रिंकु राजगुरू -: मी एक मराठी कलाकार













 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India