बापू सेवाग्रामला मुक्कामी जाण्याची आठवी दशकपूर्ती

  • मगनवाडी (सध्याच्या एमगिरी) परिसरातून पायदळ गेले होते सेवाग्रामला 
जमनालालजी बजाज यांच्या आग्रहाने बापू वर्ध्यात राहायला आले. वर्ध्यात राहण्याऐवजी त्यांनी खेड्यात राहण्याचा मनोदय व्यक्त केला व त्यानुसारच बापूंनी त्यावेळी मगनवाडी (सध्याच्या एमगिरी) परिसरात असलेल्या जमनालालजी बजाज यांच्या बागेतील बंगल्यातून पायदळ सेवाग्रामला जात सेवाग्रामच्या झोपडीत आपला मुक्काम हलविला. तो दिवस होता 30 एप्रिल 1936. त्यामुळे शनिवारी (ता.30) बापू सेवाग्राम येण्याला 80 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल बापूंची पदचिन्हे उमटलेल्या रस्त्याने पदयात्रेने गांधी विचारक एमगिरी परिसरातील बापूंच्या निवासस्थानापासून सेवाग्राम आश्रमापर्यंत पदयात्रेने जाणार आहेत.

1920 मध्ये सेठ जमनालालजी बजाज बापूंचे शिष्यच नव्हे तर पाचवे पुत्र बनले. बापूंच्या कामापासून सेवाव्रताची प्रेरणा घेत सेठ जमनालालजी बजाज यांनी 1924 मध्ये महिला आश्रम स्थापन केला होता. त्यावेळी त्याचे पहिले नाव हिंदू महिला मंडळ असे होते. पुढे त्याचे 1933 मध्ये महिला आश्रम असे नामकरण करण्यात आले. साबरमती येथील आश्रमाचा निरोप घेऊन बापू 12 मार्च 1930 रोजी दांडीयात्रेला निघाले त्याचवेळी त्यांनी स्वराज्य मिळाल्याशिवाय साबरमती आश्रमात परतणार नाही, असा निर्धार व्यक्त केला. इतकेच नव्हे तर 31 जुलै 1933 रोजी त्यांनी साबरमती आश्रमच इंग्रजांच्या स्वाधीन करुन दिला. 26 ते 28 ऑक्टोबर 1936 रोजी काँग्रेसचे मुंबईच्या वरळी येथे अधिवेशन झाले.

या अधिवेशनाच्या वेळी बापूंनी कायम वास्तव्याकरीता वर्ध्यात यावे, अशी सेठ जमनालाल बजाज यांनी बापूंना विनंती केली. त्यापूर्वी 1933 मध्ये बापू एकदा वर्ध्यात आले होते. सेठ जमनालाल बजाज यांनी केलेली विनंती मान्य करुन बापू मुंबईच्या काँग्रेस अधिवेशनातून थेट 29 ऑक्टोबर 1934 रोजी रेल्वेने वर्ध्यात आले. त्यांचा मुक्काम सध्याच्या सेवाग्राम मार्गावरील महिला आश्रम परिसरातील बजाज यांच्या बंगल्यात होता. 20 फेब्रुवारी 1935 रोजी बापू या निवासस्थानातून मगनवाडी परिसरातील जमनालालजी बजाज यांचया बागेतील बंगल्यात निवासास गेले. दरम्यान 1936 मध्ये लखनौ येथे काँग्रेसचे अधिवेशन झाले होते. त्यावेळी बापूंनी मला खेड्यात राहायचे आहे, असा निश्चय व्यक्त केला व 17 एप्रिल 1936 रोजी हरिजन बहूलवस्तीच्या सेगाव (सध्याचे सेवाग्राम) येथे स्थायिक होण्याचा निश्चय व्यक्त केला.

त्यानंतर मगनवाडीतील बजाज यांच्या बंगल्यातून बापू 30 एप्रिल 1936 रोजी चालत सेगाव येथे गेले. सेगाव हे बजाज यांचे मालगुजारीतील गाव होते. बापू सेगाव (सेवाग्राम) ला पोहोचल्यानंतर त्यांचा तीन दिवस मुक्काम या परिसरातील अमृतफळाच्या झाडाखाली होता. त्यानंतर ते आदीनिवास या चट्याच्या झोपडीत राहायला गेले. जुलै महिन्यात कस्तुरबा, सरहद्द गांधी खान अब्दुल गफ्फारखान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आदी निवासात राहायला आले. त्यानंतर सेवाग्राम आश्रम स्वातंत्र्याच्या लढ्याची राजधानी झाली. येथेच स्वातंत्र्य लढ्याचे नियोजन व्हायचे. डॉ. राजेंद्रप्रसाद, पं. जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, चक्रवर्ती राजगोपालाचारी, यांच्यासह विविध राष्ट्रीय नेते याच आश्रमात येत व स्वातंत्र्य लढ्याचे नियोजन केले जायचे. 5 मार्च 1940 रोजी बापूंनीच सेगावचे नामकरण सेवाग्राम असे केले होते.

30 एप्रिल 1936 रोजी सेवाग्रामच्या आश्रमात बापूंची पहिली पावले उमटली. त्यानिमित्तचा जागर शनिवारी (ता.30) केला जाणार असून गांधीजींची नात उषा गोकाणी यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.
महात्माजींविषयी आदर असणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी या ऐतिहासिक स्थळास भेट दिली पाहिजे असे आर्वजून नमूद करावेसे वाटते.

- प्रकाश कथले 
9922447981 

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India