रायगड जिल्हा

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जिल्ह्यांत विविध स्वरूपाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांची जिल्हावार माहिती महाभ्रमंती या सदरामधून आपल्याला मिळते. आज पाहू या रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती...

रायगड किल्ला, अलिबाग
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची राजधानी म्हणून रायगड इतिहास प्रसिद्ध आहे. येथून जवळच असलेला कुलाबा तसेच अलिबाग किल्ला पाहता येईल. 

चौल
पोर्तुगीज, मोगल व मराठ्यांच्या काळातील विविध ऐतिहासिक स्थानं चौल परिसरात वसलेली आहेत. म्हणूनच याला पश्चिम भारताच्या इतिहासाचे संग्रहालय म्हणून संबांधले जाते.

कर्नाळा पक्षी अभयारण्य
मुंबई-गोवा महामार्गावर पनवेल येथे असलेले कर्नाळा पक्षी अभयारण्य निसर्गप्रेमींसाठी जणू स्वर्गच आहे. विविध प्रजातींचे तसेच स्थलांतरित पक्षी हे या अभयारण्याचे वैशिष्ट्य आहे. 

किहीम
निळाशार पसरलेला अथांग समुद्र आणि लांबच लांब रूपेरी वाळूचा सागर किनारा किहीममध्ये येणाऱ्या पर्यटकांना मोहवून टाकतो. 

महाड
सावित्री नदीच्या काठी वसलेल्या या शहराला मराठ्यांच्या इतिहासात प्रमुख स्थान आहे. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लढ्याने इतिहास प्रसिद्ध झालेले चवदार तळेही याच शहरात आहे. 

महड
महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक असलेले हे गणपतीचे प्रमुख स्थान आहे. येथील गणपतीस श्री वरदविनायक म्हणून ओळखले जाते. 

माथेरान 
डोंगरमाथ्यावर वसलेले हे थंड हवेचे ठिकाण पर्यटकांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. मुंबई पासून जवळच असलेले हे निसर्गरम्य ठिकाण येथील छोट्याशा रेल्वेगाडीसाठीही प्रसिद्ध आहे. मुंबई-कर्जत रेल्वेमार्गावरील नेरळ स्थानकावर उतरून माथेरानसाठी जाता येते. 

मुरूड-जंजिरा
ऐतिहासिक जलदुर्गासाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण येथील सागर किनाऱ्यांसाठीही पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. 

पाली (बल्लाळेश्वर)
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गणपतीच्या आठ स्थानांपैकी पाली येथील श्री बल्लाळेश्वर हे भक्तांमध्ये लोकप्रिय आहे. अष्टविनायकाचे हे स्वयंभू स्थान आहे.

हरीहरेश्वर
काळभैरव शिवमंदिर हे हरीहरेश्वरचे प्रमुख आकर्षण आहे. तसेच येथील निसर्गरम्य सागर किनारा पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो.

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India