ठाणे/ पालघर जिल्हा

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जिल्ह्यांत विविध स्वरूपाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांची जिल्हावार माहिती महाभ्रमंती या सदरामधून आपल्याला मिळते. यापूर्वी आपण मुंबई जिल्ह्याची माहिती घेतली आहेच. आज पाहू या ठाणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती...

अंबरनाथ
ठाणे जिल्ह्यात मुंबई उपनगरीय मध्य रेल्वे मार्गावर वसलेले अंबरनाथ हे शहर ११ व्या शतकातील सोमनाथ मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. भगवान शंकराचे अतिभव्य असे हेमाडपंथी बांधणीने उभारलेले हे मंदिर पर्यटकांचे लक्ष वेधून घेते.

वसई किल्ला
पोर्तूगीज राजवटीचे केंद्र असलेला वसईचा हा किल्ला नंतर मराठ्यांनी आपल्या ताब्यात घेतला. हा किल्ला मुंबईच्या पश्चिम उपनगरीय रेल्वेमार्गावरील वसई स्थानकापासून जवळ आहे. 

डहाणू
मुंबईपासून अंदाजे १४० किमी अंतरावर असलेले डहाणू हे ठिकाण चिकूच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. येथील महालक्ष्मी मातेचे मंदिर भक्तांमध्ये प्रसिद्ध आहे. तसेच येथील रूपेरी सागर किनारे पर्यटकांना भुरळ घालतात. 

घोडबंदर
ठाण्यातील घोडबंदर मार्गावर असलेले हे ठिकाण खाडीच्या किनारी असलेल्या घोडबंदर किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे. टेकडीवरील या किल्ल्यावरून आसपासचा रम्य परिसर न्याहाळता येतो. 

तानसा तलाव
२१६.७५ चौ.कि.मी. परिसरात पसरलेल्या या प्रचंड जलाशयाद्वारे मुंबई व आसपासच्या परिसराला पाणीपुरवठा होतो. या तलावाच्या परिसरातच अभयारण्य आहे. 

वज्रेश्वरी-अकलोली-गणेशपुरी
वज्रेश्वरी देवीचे स्थान असलेले हे सुप्रसिद्ध ठिकाण मुंबई-अहमदाबाद मार्गाहून ११ कि.मी. अंतरावर आहे. अकलोली येथे गरम पाण्याचे नैसर्गिक झरे आहेत. हे झरे औषधी आहेत असे मानले जाते. तसेच गणेशपुरी येथे श्री नित्यानंद स्वामी महाराजांचा आश्रम आहे. या आश्रमास देश विदेशातून भाविक भेट देतात. 

बोर्डी
रूपेरी वाळूच्या सागर किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेले बोर्डी हे ठिकाण महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला लागून आहे. येथून जवळच असलेले उदवाडा हे ठिकाण पारशी समाजाचे पवित्र स्थान असून येथील अग्यारीत एक हजार वर्षांपासून प्रज्वलित अग्नी जतन करून ठेवण्यात आला आहे.

टिटवाळा
मुंबई उपनगरीय मध्य रेल्वे मार्गावर वसलेले टिटवाळा हे महागणपतीचे सुप्रसिद्ध स्थान आहे. येथून जवळच्या शहाडला विठ्ठलाचेही प्रसिद्ध मंदिर आहे. तसेच ११ व्या शतकातील हेमाडपंथी बांधणीचे शिवमंदिर आहे. 

जव्हार
महाराष्ट्रातील वनवासी समाजाच्या संस्थानांपैकी हे एक आहे. जव्हार वारली चित्रांकरिता जगप्रसिद्ध आहे. मुकणे घराण्याचा राजवाडा जय विलास पॅलेस तसेच भूपतगड आणि दादरा कोपरा धबधबा ही येथील काही प्रेक्षणीय स्थळे आहेत. 

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India