कोकणातील पर्यटन जगभर पोहोचविणारा 'रत्नागिरी पर्यटन महोत्सव'

कोकण म्हटले की निसर्गाचे वरदान ठरलेला प्रदेश. समुद्र, नद्यानाले, निसर्ग सौंदर्य आणि येथील कोकणी राहणीमान, संस्कृती, झाकडी, नमन, दशावतार यासारखी पुन्हा-पुन्हा पहावी अशी लोककला. साताससमुद्र पार केलेला रत्नागिरी हापूस आंबा आणि विविध प्रकारच्या मच्छिंचा अंतर्भात असणारी कोकणी मेजवाणी. त्यातच येथील निसर्गाच्या सानिध्यात वसलेली अनेक पर्यटनस्थळे पर्यटकांना भुरळ घालतात. अशा या कोकणातील पर्यटन जगभर पोहोचविणारा नेत्रदीपक सोहळा 'रत्नागिरी पर्यटन महोत्सव 2016' चिपळूण नगरीत 7 ते 9 मे 2016 या कालावधीत भरणार आहे.

निसर्गाची भटकंती मध्ये पर्यटकांना आमराई सफर, क्रोकोडाईल सफारी, कोकणी मेजवानीचा घेता येणार आस्वाद आणि पर्यटकांना स्कुबा डायव्हिंग, व्हॅली क्रॉसिंग या साहसी खेळांचा थरार अनुभवता येणार रत्नागिरी पर्यटन महोत्सवात. पवन तलाव मैदान, चिपळूण, जि.रत्नागिरी येथे 7 ते 9 मे 2016 या कालावधीत भरणार रत्नागिरी पर्यटन महोत्सव 2016.

तीन दिवस चालणाऱ्या या पर्यटन महोत्सवात रोज सकाळी सकाळी 8.00 वाजता धामणवणे येथील रेडीज फार्मवर पर्यटन सहल, पक्षी निरीक्षण, आमराई सफर. गांधारेश्वर मंदिर चिपळूण येथे सकाळी 9.30 वाजता वॉटर स्पोर्टस्, रिव्हर क्रॉसिंग, कयाकिंग, जेटस्की, बंपर राईड, बनाना राई, स्कुबा डायव्हिंग, रॉक क्लायंबिंग बर्माब्रिज, आर्चरी, वॉर जॉरबिंग. सकाळी 10.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत गोवळकोट बॅकवॉटर गोवळकोट धक्का, चिपळूण येथे क्राकोडाईल सफारीचे आयोजन. रविवार 8 मे 2016 रोजी सकाळी 7.00 वाजता विशेष आकर्षण भोगाळ मैदान चिपळूण येथे एरो मॉडलिंग, रिमोटद्वारे विमानांचे हवाई प्रात्यक्षिक.

याशिवाय कृषि प्रदर्शन, कोकणातील पर्यटनाचे बदलते स्वरुप व संधी या विषयावर केसरी टूर्सचे केसरी पाटील याचे चर्चासत्र, चंद्रशेखर भडसावळे व संजीव अणेराव यांचा सहभाग असलेला कृषि पर्यटन परिसंवाद, रांगोळी स्पर्धा, सुरक्षित सागरी पर्यटन या विषयावर व्याख्यान, नितीन बानुगडे पाटील याचे शिवचरित्र व्याख्यान, तायक्वांदो प्रात्यक्षिक, पुष्परचना फळ भाज्यांवरील कोरीव काम स्पर्धा, प्रसिद्ध शेफद्वारे पाककला मार्गदर्शन, हॉस्पिटॅलिटी (आदरातिथ्य) व्यवस्था मार्गदर्शन आणि दररोज सकाळी 9.00 वाजता आरोग्य शिबीर आणि सायंकाळी 6.00 वाजता स्थानिक लोककलांचे सादरीकरण.

महोत्सवाच्या पूर्व संध्येला 6 मे 2016 रोजी सायंकाळी 4.00 वाजता निघणार भव्य शोभायात्रा. सायंकाळी 6.00 वाजता ‘जुनून’ सूफी संगीताची मैफिल.

पर्यटन महोत्सवात दररोजचा शेवट होणार मनोरंजन कार्यक्रमाने
शनिवार 7 मे रोजी सायंकाळी 7.00 वाजता कॉमेडीचा कल्ला “चला हवा येऊ द्या”. रविवार 8 मे रोजी सायंकाळी 7.00 वाजता मुंबई विद्यापीठ आयोजित नामवंत कलाकारांचे सादरीकरण “महाराष्ट महोत्सव”. सोमवार 9 मे रोजी सायंकाळी 7.30 वाजता सुप्रसिध्द सिनेगायक सुदेश भोसले यांची सुरेल -मैफिल “अमिताथ और मै”.

मान्यवरांचे उपस्थितीत होणार उद्घाटन

शनिवार 7 मे 2016 रोजी सायंकाळी 6.00 वाजता केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गिते, राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर आणि रत्नागिरी जिल्हा परिषदचे अध्यक्ष तुकाराम गोलामडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी पर्यटन महोत्सव 2016 चे उद्घाटन होणार आहे. जिल्ह्यातील राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद, विधानसभा सदस्य, चिपळूण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष व पंचायत समितीचे सभापती यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तसेच महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, कोकण विभागाचे आयुक्त तानाजी सत्रे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन-नानौटिया यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

रत्नागिरी जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ग्लोबल चिपळूण टुरिझम सह आयोजक असलेल्या जिल्ह्यातील सर्वस्तरातील लोकसहभागातून पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा होणाऱ्या रत्नागिरी पर्यटन महोत्सव 2016 चे अध्यक्ष तथा चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाधिकारी प्रभाकर प्रदीप, पोलीस अधीक्षक डॉ.संजय शिंदे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण यांनी जिल्ह्यातील, जिल्ह्याबाहेरील, राज्याबाहेरील पर्यटकांनी मोठ्या संख्येने या पर्यटन महोत्वाचा आनंद लुटावा, असेआवाहन केले आहे.
-सदाशिव किलजे
जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India