तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे जगभरात दरवर्षी सुमारे साठ लाख लोक मृत्युमुखी पडतात. आपल्या देशांत ही संख्या दहा लाखांच्या आसपास आहे. विकासाच्या प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्या तंबाखूच्या व्यसनांपासून दूर राहावे, त्याचे दुष्परिणाम समाजाला समजावेत यासाठी दरवर्षी 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन पाळला जातो. त्यानिमित्त...
तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या विविध आजारामुळे जगभरात दरवर्षी सुमारे साठ लाखांच्या आसपास लोक मृत्युमुखी पडतात. त्यापैकी आपल्या देशांत सुमारे दहा लाख लोकांना जीवाला मुकावे लागते. दरवर्षी 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणामांबाबात जनजागृती करण्याचा उद्देश आहे.
दर्यावर्दी कोलंबसबरोबरच्या खलाशांनी अमेरिकेतून तंबाखूचे कलम स्पनेमध्ये आणले. तेथून ते जगभर पसरले. सुरवातीच्या काळात तंबाखू औषधी समजली जात असे. पण सोळाव्या शतकापासून तंबाखूच्या अनिष्ट परिणामांची शंका येऊ लागली. असा तंबाखूचा काहीसा मजेशीर इतिहास आहे. पण तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे अनेक विपरित परिणाम होतात हे माहिती असूनही अशा प्रकारची व्यसन करण्याचे लोकांचे समाजातील प्रमाण वाढतच आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार जगात दरवर्षी साठ लाख लोक तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे जीवाला मुकतात. त्यापैकी पन्नास लाख थेट व्यसन करीत असतात. उर्वरित दहा लाखांपैकी सहा लाख लोक पॅसिव्ह स्मोकर असतात.
तंबाखूचे व्यसन असणाऱ्या लोकांपैकी ऐंशी टक्के लोक अल्प-कमी उत्पन्न असणाऱ्या विकसनशील देशांत आहेत. साहजिकच या देशांतील रूग्णांची संख्याही जास्त आहे. याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या त्या देशांच्या विकास प्रक्रियेवरही परिणाम होतो. तंबाखूमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यां व्यक्तिमुळे त्या देशांना मनुष्यबळाला मुकावे लागते. अनेक कुटुंबे उघड्यावर पडतात. त्यांच्या पुनर्वसनाचाही प्रश्न उपस्थित होतो. तंबाखूचे व्यसन विकासातील अडथळा आहे.
तंबाखूच्या व्यसनाच्या विविध पद्धती आहेत. चुन्याबरोबर मळून खाल्ली जाते. पानात सुपारी, कात यांच्यासह मिश्रण करून तंबाखूचाही समावेश करतात. गुटखा खाणे, धूम्रपान करणे, तपकिरीच्या रूपाने तंबाखू श्वसनमार्गे ओढतात. तंबाखू जाळून त्याची मिशरी करून दातांना आणि हिरड्यांना लावली जाते. यापैकी धूम्रपान, तंबाखू खाणे आणि गुटखा खाणे यातून तंबाखूचे सेवन आधिक प्रमाणात केले जाते. गुटखा खाणे ही तर सध्या तरूणांतील व्यसन आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने अलिकडेच गुटखाबंदीचा निर्णय घेऊन अतिशय चांगले आणि सकारात्मक पाऊल उचलले आहे. पण त्याची प्रभावी अंमलबजावणी अपेक्षित आहेच. त्याचबरोबर इतर राज्यांनीही असा निर्णय घेणे अपेक्षित आहे.
तंबाखूचे थेट व्यसन न करणाऱ्या लोकांनाही आता तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांना सामोरे जाव लागत आहे. तंबाखूचे व्यसन करणाऱ्या लोकांच्या संपर्कात किंवा व्यसनी लोक जेथे बहुसंख्येने असतात, अशा ठिकाणी सततच्या वावरामुळेही या आजारांना सामोरे जावे लागते. अशा रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तंबाखूच्या धुरात सुमारे चार हजार प्रकारचे रसायने असतात. त्यापैकी 250 रसायने मानवी शरीराला हानीकारक आहेत तर पन्नास रसायनांमुळे हमखास कर्करोग होतो. सिगरेट किंवा विडीच्या धुरात कार्बन मोनोऑख्साईड, टोल्युन, अमोनिया, आर्सेनिक, कॅडमिअम, हायड्रोजन सायनाईड अशी घातक रसायने असतात.
भूक न लागणे, आतड्याची कार्यक्षमता मंदावणे, श्वसन नलिका आणि पोटात व्रण होणे, फुफ्फुस आणि श्वसन संस्थेचे वारंवार आजार होणे, रक्तदाब वाढणे, ह्रद्य आणि इतर महत्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा कमी होणे. प्रदीर्घ धूम्रपानामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो. महिलांच्या बाबतीत गर्भात विकृ्ती निर्माण होणे, कमी वजनाचे बालक जन्माला येणे, गर्भपात होणे, मृत बालकाचा जन्म होणे आदी बाबी घडू शकतात. तंबाखूबरोबर चुना मिसळून खाल्ला जात असल्याने तोंडातील नाजूक त्वचेला व्रण पडून कर्करोग होऊ शकतो. गुटख्यातील तंबाखू किंवा तंबाखूच्या अर्कामुळे तोंडातील त्वचेवर दुष्परिणाम होतात. गुटख्याचे अतिसेवन करणाऱ्यांना काही दिवसांनी तोंड उघडणेही अशक्य होते.
तंबाखूचे व्यसन लागू नये यासाठी आणि लागले असल्यास सोडविण्यासाठी व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे. तंबाखूचं व्यसन सोडण्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची आवश्यकता असते. तंबाखूमधील निकोटीनमुळे धूम्रपान करण्याचे सोडणाऱ्या व्यक्तिंना अस्वस्थ वाटू लागते. पण हे व्यसन सोडणे शक्य आहे. धूम्रपान सोडणाऱ्या व्यक्तिंनी अस्वस्थ वाटू लागल्यास पाणी पिणे, पेपरमिंटची गोळी खाणे, शतपावली करणे असे करावे. जेणेकरून धूम्रपानाची आस नष्ट होते. नवी जीवनशैली आत्मसात करणे, वैद्यकीय उपचारांचा उपयोग करणे, व्यसनासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी जवळ, घरी, कार्यालयात न ठेवणे असे विविध उपाय करून व्यसनापासून दूर राहता येते. तंबाखूच्या किंवा कोणत्याही व्यसनापासून समाज मुक्त होण्यासाठी प्रभावी लोकचळवळ उभी राहण्याची आवश्यकता आहे.
महत्वाचे मुद्दे
• तंबाखूच्या व्यसनामुळे दरवर्षी जगभारात सुमारे साठ लाख लोक मृत्युमुखी
• भारतात दरवर्षी सुमारे दहा लाख लोक जीवाला मुकतात
• तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन करण्यात तरूणांची वाढती संख्या चिंताजनक
• तंबाखूच्या धुरात कार्बन मोनोऑख्साईड, टोल्युन, अमोनिया, आर्सेनिक, कॅडमिअम, हायड्रोजन सायनाईड अशी घातक रसायने
• थेट व्यसन न करताही ( पॅसिव्ह स्मोकर) तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारांना बळी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ
• तंबाखूचे व्यसन करणाऱ्या लोकांची संख्या विकसनशील देशांत जास्त. त्याचा विकासावर परिणाम.
डॉ. कांचन चांदेकर, पुणे
0 comments:
Post a Comment