पर्यटकांनी पाहिला मोर या पक्षाच्या नाच


पर्यटकांनी पाहिला मोर या पक्षाच्या नाच


पाणलोट विकासाचा ‘लामकानी’ पॅटर्न

धुळे तालुक्यातील बुराई नदीच्या पाणलोट क्षेत्रातील जवळपास आठ ते दहा हजार लोकवस्तीचे लामकानी हे गाव. गावाला लागून असलेला डोंगर वृक्षतोड आणि चराई यामुळे उद्ध्वस्त झालेला. कुठेतरी तग धरून असलेली खुरटी हिवराची व बाभळाची झाडं आणि ७००-८०० फुटांपर्यंत गेलेली भूजल पातळी अशा परिस्थितीत डॉ. धनंजय नेवाडकर यांनी भगीरथ प्रयत्न करून पाणलोट विकास कार्यक्रम राबवला. त्यांच्या या उपक्रमाविषयी... 

अवघ्या चार तालुक्यांचा धुळे जिल्हा. त्यात शिरपूर वगळता धुळे, साक्री, शिंदखेडा हे तीन तालुके कायम अवर्षणप्रवण. या तीन तालुक्यांत धुळे तालुका अग्रभागी. धुळे तालुक्यातील ज्या परिसरास दुष्काळ पाचवीला पुजलेला असतो त्या बुराई नदीच्या पाणलोट क्षेत्रातील लामकानी हे गाव. धुळ्याच्या पश्चिमेस ३५ किमी अंतरावर. आठ ते दहा हजार लोकवस्तीच्या लामकानीची बाजारपेठेचे गाव अशीही ओळख आहे. गावाला लागून असलेला डोंगर वृक्षतोड आणि चराई यामुळे संपूर्ण उद्ध्वस्त झालेला. मुरूम, दगड आणि खडकांशिवाय मातीचा लवलेश नसलेला. कुठेतरी तग धरून असलेली खुरटी हिवराची व बाभळाची झाडं ! पावसाळ्याच्या सुरुवातीला काही दिवस दिसणाऱ्या लोधडी व कुसळ गवतांच्या काड्या, ज्या नंतर शेळ्या-मेंढ्यांच्या भक्ष्यस्थानी पडायच्या. डोंगरमाथ्याची स्थिती अशी. भूगर्भाची यापेक्षाही वाईट अवस्था. ९० च्या दशकात भूगर्भातील पातळी खालावत गेली व ९७-९८ या दोन वर्षांत कूपनलिकांद्वारे अमर्याद उपसा झाला. ग्रामस्थांनी ७००-८०० फूट खोलीपर्यंत जाऊन उपसा सुरू केला. गावात अशा सुमारे २०० कूपनलिका झाल्या आहेत. त्यापैकी ५० टक्के कूपनलिका पुढील वर्षी कोरड्या पडल्या. दुष्काळ- कर्ज- दुष्काळ असे आवर्तन सुरू झाले.

यावर एका निष्णात पॅथॉलॉजिस्टच्या भूमिकेतून मानवी आरोग्याचे मर्म अचूक जाणणाऱ्या डॉ.धनंजय नेवाडकर यांनी सुमारे १५ वर्षांपूर्वी एक निदान केले होते. अर्थात, हे निदान एरवी लॅबमध्ये चेहऱ्यावर असंख्य ताणतणावांचं जाळं घेऊन येणाऱ्या पेशंटसंदर्भात नव्हते. तर, अवर्षणप्रवणतेच्या विळख्यातून 'लामकानी' या आपल्या जन्मभूमीस मुक्त करण्यासंदर्भातचे ते अतिशय मूलगामी स्वरूपाचे निदान होते. डॉ. नेवाडकर केवळ निदान करून थांबले नाहीत. पिढ्यानपिढ्या परिसरास जडलेली अवर्षणप्रवणतेची दुर्धर व्याधी मुळासकट दूर करण्याचा दृढ संकल्पच त्यांनी केला. 'इच्छा तिथे मार्ग' या उक्तीचे प्रत्यंतरही आले. राळेगणसिद्धी आणि हिवरे बाजाराच्या धर्तीवर पाणलोट विकास कार्यक्रम राबविण्याचा सल्ला प्रत्यक्ष जलतज्ज्ञ डॉ.माधवराव चितळे यांच्याकडून मिळाला. त्यानंतर डॉ. नेवाडकर यांचे 'ऑपरेशन लामकानी' सुरू झाले. 

डॉ. नेवाडकर यांनी बारा वर्षे नियोजनबद्धरीतीने केलेल्या अथक परिश्रमाचे परिणाम समोर आले आहेत. अमर्याद वृक्षतोड आणि अनियंत्रित चराई यामुळे काही वर्षांपूर्वी उघडे बोडके दिसणारे माळरान आता हिरवाई लेऊन वसलेले दिसते. ७००-८०० फुटांपर्यंत गेलेली भूजल पातळी आश्चर्यकारकरित्या वर आली आहे. त्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांची संख्या वाढली. टंचाईच्या काळात हमखास चारा मिळण्याचे ठिकाण असा लौकिकही 'लामकानी' ने मिळविला. खरेतर याला प्रभावी पाणलोट विकास कार्यक्रमाचे बायप्रॉडक्ट म्हणता येईल. लामकानीच्या या यशोगाथेचे प्रमुख यश आहे, ते त्याची दुष्काळग्रस्त भाग ही ओळख पुसण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येणं, सहमतीने निर्णय घेणं आणि निर्णयांची अमलबजावणी एक दिलानं करणं. गट-तट, जाती उपजातींच्या अस्मिता दिवसेंदिवस प्रबळ होत असताना दुबळ्या होत चालेल्या ग्रामीण माणसास लामकानीची कहाणी प्रेरणादायी ठरू शकते. 

डॉ. धनंजय विष्णू नेवाडकर धुळ्यातील नामांकित पॅथॉलॉजिस्ट. मूळचे लामकानीचे रहिवासी. सप्टेंबर २००० मध्ये झालेल्या एका भीषण अपघातातून सुदैवाने बचावले. त्याकाळात तीन महिने सक्तीची विश्रांती डॉ.नेवाडकरांना घ्यावी लागली. त्यावेळी प्रेमापोटी भेटायला येणाऱ्या लामकानीवासींच्या गप्पा दुष्काळ, आटलेल्या विहिरी, मान टाकलेल्या कूपनलिका या मुद्यांभोवती गुंफलेल्या असत. परमेश्वराने अपघातातून बालंबाल वाचविले. एक संधी दिली आहे, गावाच्या समस्येवर काही ठोस उपाययोजना करता येईल का? उर्वरित आयुष्यात गावासाठी चिरंतन असे काम करायचेच, असा निर्धार डॉ.नेवाडकरांनी केला. त्याच काळात पोपटराव पवारांच्या हिवरे बाजाराची यशोगाथा वाचनात आली. जवळपास समस्या सारखीच. फरक होता तो लोकसंख्येचा. लाकमानीची लोकसंख्या आठ ते दहा हजार. शिवाराचे क्षेत्र मोठे. शिवाय राजकीय गटतट, जातीपातीचं राजकारण आणि अन्य राजकीय संवेदशीलता हा मसाला ठासून भरलेला. 

मार्गदर्शनासाठी पहिलेच पत्र प्रसिद्ध जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळेंना पाठविले. गावाची भौगोलिक परिस्थिती बघता, पाणलोट विकास कार्यक्रम राळेगणसिद्धी व हिवरे बाजारच्या धर्तीवर करा, हा सल्ला मिळाला. जानेवारी २००१ मध्ये काठी टेकतच डॉ.नेवाडकरांनी पोपटराव पवारांच्या हिवरे बाजाराला भेट दिली. फेब्रुवारी २००१ पासून दर रविवारी लामकानी भेटीचा धडाका सुरू झाला. प्रथम स्थानिक डॉक्टर मित्र, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, शिक्षक यांच्याशी प्राथमिक चर्चा केली. हिवरे बाजारची व्हीडिओ कॅसेट दाखविली. हा कार्यक्रम पुढे गावाच्या चौकाचौकात सभा घेऊन सुरू झाला. सुरुवातीला प्रतिसाद यथा-तथाच. श्रमदान, चराईबंदी, कुऱ्हाडबंदी हे नियम पाळावे लागतील हे सांगितल्यावर, डॉक्टर रिकामटेकडे उद्योग करून आमचा व तुमचा अमूल्य वेळ कशाला वाया घालविता? गावात तंटे कशाला लावता? असे सल्ले ऐकण्यातच पहिले वर्ष संपले. 

कामांचा प्रत्यक्ष अनुभव तसेच कुठलेही पद वा संस्था नसताना हे प्रत्यक्षात करायचे कसे, हा प्रश्न होताच. पुढे माथा ते पायथा तत्त्वानुसार काम करायचे ठरले. गावाचा डोंगर उतार पूर्व-पश्चिम जवळ-जवळ तीन किलोमीटर पसरलेला. हे सुमारे ४०० हेक्टर क्षेत्र वनविभागाच्या ताब्यात आहे. वन विभागात चकरा सुरू झाल्या. 'प्रथम काही क्षेत्रात चराईबंदी व श्रमदानाने फुटलेला बांध दुरुस्त करून दाखवा ', हे आव्हान तत्कालीन फॉरेस्ट अधिकारी व्ही.जे. पाटील यांनी दिले. तोपर्यंत ग्रामस्थांची बऱ्यापैकी मानसिक तयारी झाली होती. २००२ च्या एप्रिल-मे महिन्यात श्रमदान सुरू झाले. दिवसा उन्हाचा तडाखा असल्यामुळे रात्री बत्त्या, कंदील, इमर्जन्सी लॅम्प लावून गावातील तरुण, बुजूर्ग मंडळी कामाला लागली. प्रारंभी ५० हेक्टर क्षेत्रात चराईबंदी, कुऱ्हाडबंदी पालनाचे ग्रामसभेत ठरले. त्यासाठी वनसंरक्षण व वनव्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली. वन विभागाने आश्वासन दिल्याप्रमाणे सन २००२ च्या पावसाळ्यानंतर सलग समतल चरांचे (सीसीटी) काम प्रत्यक्ष सुरू केले. सन २००७ पर्यंत रोहयो आणि श्रमदान या माध्यमातून एकूण ३०० हेक्टर डोंगर उतारावरील जल/ मृदा संधारण काम पूर्ण करण्यात आले. त्याच भागात चराई/ कुऱ्हाडबंदीचे पालन होत गेले. चराईबंदीचा निर्णय सुखासुखी अमलात आला नाही. त्यातून अनेक तंटे उद्भवले. डॉक्टर नेवाडकर आणि लामकानीवासींयाना पोलिस ठाण्यापर्यंत चकरा माराव्या लागल्या. नियम मोडणाऱ्यांकडून दंडापोटी एक लाख रुपये वसूलही करण्यात आले. चराईसाठी विशिष्ट भाग मोकळा ठेवण्यात आला आहे. जसे काम होत गेले व त्याचे दृश्य परिणाम दिसत गेले. तसा लोकांचा सहभाग वाढत गेला. सहसा रोहयोच्या कामाच्या दर्जाबद्दल चांगले बोलले जात नाही. मात्र लामकानीच्या डोंगरउतारावर झालेली कामे यास अपवाद ठरावीत. या चळवळीस वेळोवेळी वैचारिक अधिष्ठान देण्याचं महत्त्वपूर्ण काम वर्तमान जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ, वृक्षमित्र वसंतराव ठाकरे, डॉ.माधवराव चितळे, वॉटर संस्थेचे फदार बाकर, अरुण निकम, वन अधिकारी सुरेश थोरात, वसंतराव टाकळकर, सर्वेश्वकुमार निगम, तत्कालीन जिल्हाधिकारी भास्कर मुंडे या मंडळींनी केलं. 

या प्रयोगांमुळे एकेकाळच्या खडकाळ डोंगरांवर अतिशय दाट स्वरूपाचे पवन्या गवत डोलताना दिसते. परिसरातील २०-२५ गावचे दुग्ध व्यावसायिक हे गवत कापून नेतात. पूर्वी वर्षानुवर्षे खुरटलेल्या अवस्थेत असलेल्या हिवर, बाभळाच्या झाडाझुडपांनी आता चांगलीच वाढ धरली आहे. दरवर्षी केलेल्या बी रोपणाने हजारो नवीन रोपटी तयार झाली आहेत. याशिवाय या परिसरात नवनवीन पक्ष्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. पाखरांची वाढलेली संख्या कीटकनाशकांचा कमी वापर करण्यास कारणीभूत ठरली आहे. बंद पडलेल्या कूपनलिका सुरू झाल्या. अस्तंगत झालेली बागायती शेती ही संकल्पना पुन्हा मूळ धरू लागली आहे. जलसंधारणाच्या कामातून एवढ्या मोठ्या लोकसंख्येस दुष्काळचक्रातून बाहेर काढण्याचा लामकानीचा प्रयोग आणि नि:स्वार्थ भावनेतून या प्रयोगाची अंमलबजावणी करणारे डॉ.धनंजय नेवाडकर कौतुकापेक्षा अनुकरणास पात्र आहेत. 

-रणजित राजपूत
जिल्हा माहिती अधिकारी, धुळे

पर्यटन : चला रत्नागिरीला

महाराष्ट्र हे देशातल्या विविधतेने नटलेल्या सर्वांगसुंदर राज्यांपैकी एक आहे. येथे पर्यटनासाठी विलोभनीय स्थळांचा मोठा खजिना आहे. यापैकी काही महत्त्वाच्या पर्यटन स्थळांची माहिती आम्ही आजपासून आपल्यापर्यंत पोहोचवित आहोत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रत्नागिरी येथे पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. त्या निमित्ताने सुरूवात करू या रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांपासूनच....

रत्नागिरी तालुका धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. लोकमान्य टिळकांची जन्मभूमी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची कर्मभूमी असलेल्या या परिसरात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी किमान दोन दिवस तरी हवेतच. दोन किलोमीटरच्या अंतरात पांढऱ्या आणि काळ्या समुद्राच्या रुपाने सृष्टीचा सुंदर अविष्कार इथे पहायला मिळतो. रत्नागिरीच्या मुक्कामात अत्यंत रुचकर कोकणी भोजनाची चव चाखता येते. मुंबई-रत्नागिरी हा कोकण रेल्वेचा प्रवासही तेवढाच आनंद देणारा आहे. रेल्वेमार्गाने येताना सह्याद्रीच्या कुशीतील सृष्टीसौंदर्य पाहता येते. रत्नागिरी रेल्वेस्थानक मुख्य शहरापासून 6 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबईहून वाहनाने यायचे झाल्यास मुंबई-गोवा महामार्ग हा एकमेव मार्ग आहे. मुंबई-रत्नागिरी अंतर 340 किलोमीटर आहे. तर पुणे-रत्नागिरी अंतर 320 किलोमीटर आहे. पुण्याहून कुंभार्ली घाटातून किंवा कराड-मलकापूरमार्गे रत्नागिरीला पोहचता येते.

रत्नदूर्ग किल्ला :
पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरलेला समुद्रकिनाऱ्यावरील रत्नदूर्ग किल्ला हा 'भगवती किल्ला' या नावानेही ओळखला जातो. किल्ला बाराव्या शतकात बांधला गेल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. रत्नागिरी शहराच्या पश्चिम बाजूस एक किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला बालेकिल्ला आणि पेठ किल्ला अशा दोन भागात आहे. बालेकिल्ल्यात भगवतीदेवीचे सुंदर मंदिर आहे. किल्ल्याच्या दक्षिणेकडे दीपस्तंभ आहे. बालेकिल्ल्याभोवती नऊ बुरूज असून संपूर्ण किल्ल्यास 29 बुरूज आहेत. किल्ल्याचा आकार घोड्याच्या खुरासारख दिसतो. किल्ला सुमारे 1211 मीटर लांब आणि 917 मीटर रुंद असून संपूर्ण परिसर 120 एकराचा आहे. तीनही बाजूला समुद्र व किल्ल्याच्या एका बाजूला असलेले दिपगृह यामुळे पर्यटक येथे आकर्षित होतात. बालेकिल्ल्यावरून अथांग समुद्राचे दर्शन घडते. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5 या वेळेत पर्यटकांसाठी बालेकिल्ल्याचा दरवाजा उघडला जातो.

श्री भागेश्वर मंदिर : 
रत्नदूर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी दानशूर कै.भागोजीशेठ कीर यांनी बांधलेले श्री भागेश्वर मंदिर असून मंदिरातील कलाकुसर प्रेक्षणीय आहे. गाभाऱ्यात शंकराची पिंड असून मंदिराचा सभामंडप भव्य आहे. या मंदिराच्या खांबांवर सुंदर निसर्गचित्रे कोरलेली असून मंदिराच्या छतावर ध्यानस्थ साधूंचे पुतळे बसविले आहेत. मंदिराचे बांधकाम स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमूनाच आहे. परिसरातील रम्य वातावरणामुळे मंदिराचे सौंदर्य खुलुन दिसते. मंदिर परिसरात भक्तनिवासाची सुविधा आहे. (संपर्क-02352-233224)

रत्नागिरी येथील मत्स्यालय : 
रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव येथे डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या अधिपत्याखालील मत्स्य महाविद्यालयाचे सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र रत्नदूर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पेठकिल्ला भागात आहे. घोडामासा, कोंबडा मासा, ट्रिगर मासा, समुद्री कासव, समुद्री काकडी, तारामासा, शेवंड, सामुद्रीसाप, ऑक्टोपस अशा असंख्य जीवंत माशांच्या जातींसोबतच सुमारे 1300 समुद्री जीवांचे नमुने असलेले संग्रहालय पर्यटकांचे आकर्षण स्थळ ठरले आहे. अडीचशेपेक्षा जास्त शिंपल्यांचे अप्रतिम प्रकार येथे ठेवण्यात आले आहेत. चकीत करणारा 55 फूट लांबीचा सुमारे 5 हजार किलोग्रॅम वजनाचा देवमाशाचा भीमकाय सांगाडा येथे पहावयास मिळतो.

पांढऱ्या व काळ्या वाळूचे समुद्र किनारे : रत्नदूर्गाच्या पायथ्याशी दक्षिणेच्या बाजूला जुने मांडवी बंदर म्हणजेच 'गेटवे ऑफ रत्नागिरी'आहे. येथील समुद्र काळ्या रंगाच्या वाळूचा असल्यामुळे त्याला 'काळा समुद्र' म्हणतात. तर उत्तरेकडे मिरकरवाडा बंदराचा किनारा पांढऱ्या वाळूचा असल्याने समुद्राचा हा भाग 'पांढरा समुद्र' नावाने ओळखला जातो. हे दोन्ही किनारे रमणीय असून तेथे सांयकाळी भटकंती करण्यासाठी अबालवृद्धांची गर्दी असते. रत्नदुर्ग किल्ल्याकडे जाताना उजवीकडील पायवाटेने पेठकिल्ल्यावरील शेवटच्या बुरुजाकडे गेल्यास हे विलोभनीय सौंदर्य पाहता येते.

दीपस्तंभ:
पेठकिल्ल्यावर जाणाऱ्या डावीकडील वाटेने गेल्यास दिपस्तंभापर्यंत पोहोचता येते. या भागात शेवटच्या स्थानापर्यंत वाहन नेण्याची सुविधा आहे. या दिपस्तंभाची उभारणी 1867 मध्ये करण्यात आली. त्याचे नुतनीकरण 1961 मध्ये करण्यात आले आहे. सायंकाळी 4 ते 5 या वेळेत दिपस्तंभवरून मांडवी जेट्टी आणि भाट्येचा विस्तारलेल्या समुद्राचे सौंदर्य न्याहाळता येते.

भगवती आणि मिरकरवाडा बंदर: 
रत्नागिरी येथे रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी भगवती बंदर प्रकल्प उभारण्यात आला आहे. याच बंदराच्या बाजूला मिरकरवाडा येथे मच्छिमार बंदर प्रकल्प उभारण्यात आला आहे. बंदरातून मासळीची चढउतार केली जाते. याच परिसरात जहाज बांधणी कारखाना आहे. भगवती बंदराजवळ उभे राहून किल्ल्याचे सौंदर्य न्याहाळता येते.

श्री कालभैरव मंदिर:
किल्ल्यावरून परत येताना खालच्या आळीत श्री कालभैरवाचे मंदिर आहे. कान्होजी आंग्रे यांचे पुत्र सेखोजी आंग्रे यांच्या काळात हे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. मंदिराचा परिसर अत्यंत रम्य आहे. किल्ल्यावरून उतरल्यावर निवांतपणे काही क्षणे येथे घालविता येतात.

लोकमान्य टिळक जन्मस्थान : 'स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळविणारच' अशी गर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जन्मभूमि रत्नागिरी. शहरातील टिळक आळीतील इंदिराबाई गोरे यांच्या वाड्यात लोकमान्य टिळकांचा 23 जुलै 1856 रोजी जन्म झाला व ते 10 वर्ष म्हणजे 1866 पर्यंत तेथे राहीले. ही वास्तू पुरातत्व खात्याने जतन केली असून तिला संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. दरवर्षी याठिकाणी टिळक जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. सोमवार वगळता अन्य दिवशी हे स्मारक पाहण्यासाठी खुले असते.

श्री विठ्ठल मंदिर:
राजस्थानमधून आलेल्या गुजर कुटुंबियांनी बांधलेले हे मंदिर शहर परिसरातच आहे. मुख्य मंदिराभोवती इतर देवदेवतांची मंदिरे आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पतितपावन मंदिर उभारण्यापूर्वी जनसामान्यांना या मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून लढा दिला होता. या संघर्षामुळे बहुजन समाजाच्या नागरिकांना सभामंडपापर्यंत प्रवेश देण्यात आला होता.

पतितपावन मंदिर : 
लोकमान्य टिळक जन्मस्थानापासून जवळच असलेल्या स्वातंत्र्यलक्ष्मी चौकाजवळ स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांनी दानशूर भागोजीशेठ किर यांच्या सहकार्याने बांधलेले श्री पतितपावन मंदिर आहे. विठ्ठल मंदिरातील सत्याग्रहाचा अनुभव लक्षात घेऊन सामाजिक समतेचा उद्घोष करण्यासाठी स्वतंत्र मंदिर बांधण्याचा निश्चय स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केला. दानशूर कीर यांच्या मदतीने 3 लाख रुपये खर्चुन हे मंदिर त्यांनी बांधले. बहुजन समाजासाठी हे मंदिर खुले करण्यात आले आणि त्यांना पुजा-प्रार्थनेचा समान अधिकार देण्यात आला.

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक:
पतितपावन मंदिर परिसरात स्वा.सावरकर यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. या वास्तूच्या पहिल्या मजल्यावर क्रांतिकारकांच्या देशकार्याची माहिती देणाऱ्या छायाचित्रांचे 'गाथा बलिदानाची' हे प्रदर्शन आहे. स्वा. सावरकारांची काठी, त्यांचा चष्मा, त्यांनी लंडनहून पाठविलेली पिस्तुले, त्यांच्या जवळ असणारा जांबिया, व्यायामाचे मुद्गल आदी वस्तू या दालनात प्रदर्शित केल्या आहेत. मार्सेलीस बंदरावर ज्या बोटीतून समुद्रात ऐतिहासिक उडी घेतली त्या बोटीची प्रतिकृती इथे ठेवण्यात आली आहे. तळमजल्यावरील सभागृहात पर्यटक आणि विद्यार्थ्यांसाठी रत्नागिरीतील थोर नररत्ने आणि पर्यटन स्थळांची माहिती देणारा माहितीपट दाखविला जातो. स्मारकाला सकाळी 10 ते 12 आणि सायंकाळी 4 ते 6 या वेळेत भेट देता येते.

स्वातंत्रवीर सारवरकर यांची कोठडी : स्वातंत्रवीर वि.दा.सावरकर यांना ब्रिटीशानी रत्नागिरी येथील विशेष कारागृहात 16 मे 1921 ते 3 सप्टेंबर 1923 कालावधीत बंदिवासात ठेवले होते. कारागृहातील ज्या खोलीत सावरकरांना ठेवण्यात आले होते ती कोठडी स्वातंत्रविरांचे स्मारक म्हणून जतन करुन ठेवण्यात आली आहे. या कोठडीत स्वातंत्रवीरांची स्मृति म्हणून भव्य तैलचित्र आणि त्यांच्या गळ्यात अडकविण्यात आलेले साखळदंड, बेड्या, लोहगोळे इत्यादी वस्तू संग्रहीत करुन ठेवण्यात आल्या आहेत. सेनापती बापट यांनाही याच कारागृहात 24 नोव्हेंबर 1931 ते 31 डिसेंबर 1935 या कालावधीत स्थानबद्ध करण्यात आले होते. शहरातील जयस्तंभ चौकापासून जवळच असलेल्या विशेष कारागृहात ही कोठडी आहे. कारागृह व्यवस्थापनाच्या पूर्वपरवानगीने या कोठडीस दुपारनंतर भेट देता येते.

ऐतिहासीक थिबा पॅलेस:
रत्नागिरी शहरातील 'थिबा राजवाडा' ही भव्य ऐतिहासीक वास्तू पर्यटकांसाठी मोठे आकर्षण आहे. इंग्रजानी ब्रह्मदेशाच्या थिबा राजाला 1885 साली स्थानबद्ध करुन रत्नागिरीत आणले. त्याच्यासाठी सन 1910 साली हा तीन मजली पॅलेस इंग्रज सरकारने बांधला. या पॅलेसमध्ये थिबा राजा सन 1911 मध्ये राहण्यासाठी गेला. राजवाड्याच्या गच्चीवरून समुद्रकिनाऱ्याचा निसर्गरम्य परिसर दिसतो. मागच्या बाजूस राजाने ब्रह्मदेशातून आणलेली बुद्धाची मुर्ती आहे. याच भागात पुरातन वस्तुसंग्रहालय आहे. तळमजल्यावर प्राचीन मुर्त्या आणि वरच्या मजल्यावरील चित्रप्रदर्शन कलाप्रेमींसाठी विशेष आकर्षण आहे. सोमवार सोडून इतर दिवस हा पॅलेस पर्यटकांसाठी सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुला असतो.

थिबा पॉईंट:
थिबा पॅलेस परिसरात आकाशवाणी केंद्राला लागून असलेलेले स्थान 'थिबा पॉईंट' नावाने ओळखले जाते. या स्थानाजवळच जिजामाता उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. या उद्यानातील टॉवरवरून भाट्ये खाडी आणि राजीवडा बंदराचे नयनरम्य दृष्य दिसते. अथांग सागराच्या पार्श्वभूमीवर दिसणारे सुर्यास्ताचे विहंगम दृष्य नजरेत साठविण्यासाठी सायंकाळी या उद्यानात पर्यटकांची गर्दी होते. उद्यानात लहानमुलांच्या मनोरंजनाची अनेक साधने आहेत.

राजिवडा बंदर: रत्नागिरी शहराला लागूनच असलेल्या भाट्ये खाडीवर राजिवडा बंदर आहे. राजिवडा खाडीत होडीत बसून नौकानयनाची हौस भागविण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. खाडीत रांगेने उभ्या असलेल्या बोटींचे सौंदर्य कॅमेऱ्यात टिपण्यासारखे असते.

भाट्ये समुद्र किनारा:
रत्नागिरी शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर भाट्ये येथे दाट सुरुबनाची किनार असलेला सुंदर समुद्र किनारा आहे. किनाऱ्यावर समुद्रस्नान करणाऱ्या पर्यटकांसाठी खाजगी सुविधादेखील आहे. समुद्राच्या सान्निध्यात दिवस घालविण्यासाठी या भागात रिसॉर्ट्स आहेत. परिसराच्या सौदर्यामुळे येथे चित्रपटांचे चित्रीकरणही होते. विस्तारलेल्या समुद्र किनाऱ्यावरील सायंकाळची भटकंती आणि सुर्यास्ताचे मनोहारी दृष्य तेवढेच आनंददायी असते.

गेट वे टु रत्नागिरी:
शहरापासून 1.5 किलोमीटर अंतरावर मांडवी समुद्र किनारा आहे. येथे जेट्टी बांधण्यात आली असून पूर्वी वाहतूकीसाठी या जेट्टीचा वापर होत असे. जेट्टीची उभारणी लॅन्डींग व हार्फेज फी फंडातून 1934 मध्ये करण्यात आली आहे. जेट्टीच्या सुरुवातीस मोठी कमान उभारण्यात आली आहे. 'रत्नागिरीचे प्रवेशद्वार' म्हणून ही कमान ओळखली जाते. समुद्र किनाऱ्यावरील चौपाटीवर सायंकाळी पर्यटकांची गर्दी असते. जेट्टी जवळील खडकाळ भागात जाण्याचा मोह मात्र पर्यटकांनी टाळावा.

प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र:
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठांतर्गत भाट्ये येथे प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र आहे. 55 वर्षातील यशस्वी कामगिरीच्या बळावर या केंद्राला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला आहे. केंद्रात नारळाच्या 40 जाती पाहायला मिळतात. क्वचितच आढळणारे पिवळे, नारंगी रंगाचे नारळ या केंद्राच्या परिसरात मोठ्या संख्येने आहेत. अधिक उत्पन्न देणारी 'लाखी बाग' हे या केंद्रातील प्रमुख आकर्षण आहे. मसाल्याच्या पदार्थंच्या विविध जाती इथे पाहायला मिळतात. पूर्व परवानगीने परिसराची भटकंती करता येते.

मारुती मंदिर:
रत्नागिरी शहराची मुख्य खूण असणाऱ्या या मंदिराची स्थापना रामदास स्वामींनी केल्याचे सांगितले जाते. मंदिरात वर्षभरात विविध उत्सव साजरे केले जातात. मुंबई-पुण्याकडे जाणाऱ्या खाजगी बसेस याच परिसरात रात्री थांबतात. रत्नागिरीतील प्रवेश करताना किंवा बाहेबर पडताना मुख्य खूण म्हणून हा चौक लक्षात राहतो.

रत्नागिरी रेल्वे स्थानक:
शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या यास रेल्वे स्थानकाला आयएसओ 9000 प्रमाणपत्र मिळालेले आहे. रेल्वेस्थानकाचा परिसरही अत्यंत सुंदर आहे. अशियातील सर्वात लांब असणारा करबुडे बोगदा रत्नागिरीजवळ आहे. या बोगद्याची लांबी 6.5 किलोमीटर आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील निवळी फाट्यापासून गणपतीपुळेकडे जाताना सात किलोमीटर अंतरावर उजवीकडे लाजूळ गावाकडे जाणारा रस्ता आहे. लाजूळ गावाच्या अलिकडे उजवीकडे असलेल्या कच्च्या वाटेने बोगद्यापर्यंत जाता येते. या ठिकाणी गेल्यावर हे भव्य आणि अचंभित करणारे कार्य करण्यासाठी परिश्रम घेतलेल्यांची निश्चितपणे आठवण होते. म्हणूनच कोकण रेल्वेमार्ग तयार करण्याचे आव्हान पेलताना दुर्घटनेत आपला प्राण गमविणाऱ्या कामगारांच्या स्मृती जपण्यासाठी रेल्वे स्थानकासमोरच 'श्रमशक्ती स्मारक' उभारण्यात आले आहे. पावसाळ्यात कोकण रेल्वेने प्रवास करताना उक्शी स्थानकाजवळ नयनरम्य धबधब्याचे दर्शन घडते.

पानवलचा रेल्वे पूल:
हा अशियातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे. पुलाची उंची 65 मीटर असून ही भव्य निर्मिती करणाऱ्या हातांविषयी मनात अभिमानाची आणि कृतज्ञतेची भावना निर्माण होते. पूलाच्या सभोवतालचा परिसरही खूप सुंदर असून जंगलातील भटकंतीचा आनंदही या भागात घेता येतो.रत्नागिरी शहरापासून 9 किलोमीटर अंतरावर पानवल गावाकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर कच्च्या रस्त्याने पुढे गेल्यास 3 किलोमीटर अंतरावर डाव्याबाजूस पानवलचा रेल्वे पूल आहे. चिंचखरी दत्तमंदिराकडे जाताना खाडी जवळील रस्त्याने पोमेंडीमार्गेदेखील पानवल येथे जाता येते. हे अंतर रत्नागिरीपासून 18 किलोमाीटर आहे. हा संपूर्ण डांबरी रस्ता आहे.

दत्त मंदिर चिंचखरी:
रत्नागिरी शहरातून नाचणेमार्गे दहा किलोमीटर अंतरावर चिंचखरी येथे निसर्गरम्य परिसरात उभारलेले दत्त मंदिर आहे. गजानान महाराज बोरकर यांचे चिंचखरी हे जन्मगाव. या ठिकाणी तपोवनाची निर्मिती करून त्यांनी दत्त मंदिर उभारले आहे. मंदिराच्या बाजूला असलेला निर्मळ पाण्याचा प्रवाह आणि परिसरातील दाट वनराई यामुळे मंदिरात प्रवेश करताक्षणी प्रसन्न वाटते. श्री गुरु दत्ताची संगमरवरी मुर्ती तेवढीच देखणी आहे. राजीवाडा बंदरापासून बोटीनेदेखील चिंचखरी येथे जाण्याची सोय आहे.

सोमेश्वर मंदिर:
चिंचखरीच्या अलिकडे डाव्या बाजूस दाट वनराईतून सोमेश्वरकडे जाणारा रस्ता आहे. हे गाव 12 शतकातील असल्याचे सांगितले जाते. गावाच्या मध्यभागी सोमेश्वराचे पुरातन मंदिर आहे. चार भागात विभागलेल्या मंदिराची वास्तू स्थापत्यकलेचा सुंदर नमुना आहे. दगडी तटबंदीच्या मधोमध सुंदर कौलारू मंदिर उभारले आहे.

बाबरशेख बाबाचा दर्गा, हातीस-
रत्नागिरीपासून 18 किलोमीटर अंतरावर काजळीनदीच्या तीरावर हातीस गाव वसलेले आहे. गावात बाबरशेख बाबांनी गावातील लोकांना भक्तीमार्ग दाखविला. त्यांच्या महानिर्वाणानंतर गावातील जनता हिंदू असल्याने ग्रामस्थांनी इब्राहिमपट्टण येथील मुस्लिम बांधवांच्या मदतीने दफन विधी पार पाडला. तेव्हापासून दोन्ही गावातील मंडळी माघ पौर्णिमेला बाबांचा ऊर्स साजरा करतात. हा सोहळा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. उर्समधील शस्त्रास्त्रांचे खेळ आणि गावातील ढोल पथकाचे खेळ डोळ्याचे पारणे फेडतात.

निवळीचा धबधबा:
मुंबई-गोवा महामार्गाने रत्नागिरीकडे जाताना संगमेश्वरपासून 20 किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला उभे राहून निवळीच्या धबधब्याचे दर्शन घडते. उंच डोंगरावरील दाट झाडीतून खाली कोसळणाऱ्या धबधब्याचे सौंदर्य पाहणे हा आनंददायी अनुभव असतो. थोडे पुढे गेल्यावर खाली जाणाऱ्या पायऱ्या आहेत. या मार्गाने खाली जावून धबधब्यात चिंब होण्याची मज्जा लुटता येते. पावसाळ्यात मात्र दूरूनच सौंदर्य न्याहाळलेले अधिक चांगले. रत्नागिरी-निवळी अंतर 18 किलोमीटर आहे.

श्री क्षेत्र पावस : 
रत्नागिरी शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर स्वामी स्वरुपानंद यांचे जन्मगाव पावस आहे. ब्रिटीश सत्तेविरुद्ध असहकार आंदोलनात भाग घेताना स्वामीजी पुण्यातील येरवाडा तुरुंगात होते. तेथेच त्यांनी साधना केली. कारागृहाती सहकाऱ्यांनी त्यांना 'स्वामी' असे संबोधण्यास सुरुवात केली. स्वामींजी 15 ऑगस्ट 1974 रोजी समाधिस्त झाले. त्याच जागी भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. मंदिरातील शांतता, पावित्र्य आणि रम्य परिसर पर्यटकांना आकर्षित करतो. मंदिर परिसरात भक्तनिवास व प्रसादाची सोय आहे. पावसचा पूल ओलांडून गेल्यावर देसाई बंधूंच्या निवासस्थानातील ज्या खोलीत स्वामीजींचे वास्तव्य होते ती खोली पाहायला मिळते. त्यांच्या नित्य वापरातील वस्तू याठिकाणी जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. स्वामीजींची ग्रंथसंपदा मंदिर परिसरात अल्पदरात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

श्री गणेशगुळे : पावसपासून पाच किलोमीटर अंतरावर गणेशगुळे आहे. या गावात गणपतीचे प्रसिद्ध देवालय आहे. 'गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला' अशी म्हण या भागात प्रचलित आहे. गणेश मंदिर 400 वर्ष जुने असून समोरच्या भागात खोल दरीतील हिरवेगार सौंदर्य नजरेत भरते. हा गणपती 'गलबतवाल्यांचा गणपती' म्हणूनही प्रसिद्ध आहे. मंदिराच्या मागच्या बाजूस रस्त्याच्या कडेला पारंपरिक कोकणी पद्धतीची विहीर आहे. आयाताकृती अरुंद विहीरीला खालेपर्यंत पायऱ्या करण्यात आल्या आहेत. गणेशगुळेचा समुद्र किनारा गर्द झाडींनी व्यापलेला आहे. उन्हाळ्यात फणसाच्या सुगंधात किनाऱ्याकडे जाताना आल्हाददायक अनुभव येतो.

पुर्णगड किल्ला:
पावसपासून 7 किलोमीटर अंतरावर पुर्णगड किल्ला आहे. मुचकुंदी नदीच्या मुखाशी समुद्राच्या 22 एकर क्षेत्रावर हा किल्ला उभारलेला आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर गणेशाचे शिल्प कोरलेले आहे. किल्ल्याची तटबंदी जांभ्या दगडाची असून मजबूत अवस्थेत आहे. अठराव्या शतकात किल्ल्याची उभारणी पेशव्यांच्या इच्छेनुसार करण्यात आली. व्यापारी दृष्टीकोन लक्षात घेऊन किल्ल्याची उभारणी केल्याच्या खुणा परिसरात आढळतात. पुर्णगडपासून राजापूर तालुक्यातील कशेळीचा कनकादित्य, आडिवरेची महालक्ष्मी आणि देवीहसोळच्या आर्यदुर्गेला भेट देता येते.

गावखडी समुद्र किनारा:
रत्नागिरीहून पावसमार्गे पुर्णगडच्या खाडीपूलावरून पुढे गेल्यावर उजव्या बाजूस एका रेषेत दाट सुरुबन दृष्टीपथास पडते. सुरुंची झाडे एका रेषेत असल्याने झाडांमधून समुद्राचे अप्रतिम दृष्य दिसते. या सुरुबनातील भटकंती प्रवासातील थकवा घालविणारी असते. एक किलोमीटर लांबीच्या या किनाऱ्यावर कुटुंबासह भटकंती करतांना सुरुबनात दुपारचे भोजन घेऊन निसर्ग सहलीचा आांद लुटता येतो. पावस गावखडी अंतर 9 किलोमीटर आहे.

गणपतीपुळे परिसर

श्री क्षेत्र गणपतीपुळे : श्री क्षेत्र गणपतीपुळे रत्नागिरी जिल्ह्यातील महत्वाचे पर्यटन केंद्र म्हणून नावारुपास आले आहे. सागरकिनाऱ्यावरील रम्य परिसरात असलेले श्री गजाननाचे मंदिर आणि समोर दिसणारा अथांग समुद्र पर्यटकांसाठी विशेष आकर्षण आहे. अंगारकी संकष्टी आणि माघ महिन्यातील गणेशचतुर्थीला येथे मोठी यात्रा भरते. परिसरातील उद्यान आणि मंदिर परिसराच्या सुशोभिकरणामुळे हे देवस्थान भाविक आणि पर्यटकांचे आकर्षण स्थळ बनले आहे. मंदिराभोवती एक किलोमीटरचा प्रदक्षिणा मार्ग आहे. मंदिर परिसरात अनेक चांगली हॉटेल्स, निवास-न्याहरी योजने अंतर्गत असलेली घरगुती निवास व्यवस्था मुबलक प्रमाणात आहे. देवस्थानाच्यावतीनेदेखील या ठिकाणी निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. (संपर्क-02357-235223, 235224) मुंबई-गोवा महामार्गावर निवळी फाट्यापासून हे स्थान 35 किलोमीटर अंतरावर आहे. रत्नागिरी-गणपतीपुळे अंतर 25 किलोमीटर आहे.

गणपतीपुळे पर्यटन केंद्र : श्रीक्षेत्र गणपतीपुळे देवस्थानमुळे नावारुपाला आलेले महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे गणपतीपुळे पर्यटन केंद्र आता आंतरराष्ट्रीय स्तराचे पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. या केंद्रात पर्यटकांसाठी 73 कक्ष, 35 तंबू निवास व 12 कोकणी हट्स बांधण्यात आलेल्या आहेत. परदेशी पर्यटकांना कोकणी हट्स आकर्षून घेतात. या ठिकाणच्या जलक्रीडा केंद्रात पर्यटकांसाठी नौका विहाराची सुविधा उपलब्ध आहे. नारळाच्या दाट झाडीतील समुद्र किनारचे वास्तव्य पर्यटकांना सुखद अनुभव देणारे असते. (संपर्क-02357-235248/235061/235062, फॅक्स-235328)

गणपतीपुळे समुद्र किनारा:
श्री गणेश मंदिराच्या समोरच्या बाजूस विस्तारलेला पांढऱ्या वाळूचा समुद्र किनारा आहे. स्वच्छ किनाऱ्यावर समुद्रस्नानाचा मनमुराद आनंद लुटता येतो. मात्र समुद्रात जाण्यापूर्वी स्थानिकांकडून माहिती अवश्य घ्यावी. किनाऱ्यावर गार वाऱ्याची झुळुक अंगावर घेत आनंद लुटण्यासाठी विविध प्रकारचे क्रीडा साहित्य भाड्याने मिळण्याची सुविधा आहे. सरबताची वेगवेगळी चव येथे चाखायला मिळते. किनाऱ्यावर पॅरासिलींगचा रोमांचीत करणारा अनुभव पावसाळा संपल्यावर घेता येतो. अथांग समुद्राच्या पार्श्वभूमीवर सुर्यास्ताचे मनोहारी दृष्य कोकणची सफर स्मरणीय करणारे असते.

आरे-वारे समुद्र किनारा:
गणपतीपुळ्याला जाताना रत्नागिरीपासून 13 किलोमीटर अंतरावर आरे आणि वारे गावाच्या सीमेवर डोंगरावरून समुद्राचे मोहक दृष्य पाहता येते. येणारे पर्यटक समुद्राचे सौंदर्य कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासाठी येथे आवर्जुन थांबतात. सुरुच्या वनाने नटलेला सुंदर किनारा पर्यटकांना विश्रांतीसाठी आकर्षित करणारा असाच आहे. या भागात मात्र समुद्रात उतरताना फार काळजी घ्यावी लागते. या ठिकाणाहून थोडे पुढे गेल्यावर उंचावरून अथांग पसरलेले निळेशार पाणी दिसते. म्हणून सागराचा हा भाग 'निळा समुद्र' नावाने ओळखला जातो.

प्राचीन कोकण दालन:
गणपतीपुळे गावात मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेले 'प्राचीन कोकण' आवर्जुन भेट द्यावी असेच आहे. कोकणातील पाचशे वर्षापूर्वीची संस्कृती या दालनाच्या माध्यमातून डोंगरावरील भागात प्रदर्शित केली आहे. प्रदर्शनाची माहिती देण्यासाठी सोबत 'गाईड'ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. नक्षत्र उद्यानातील विविध वनस्पतींची माहिती घेत या दालनाची सफर घडते. शिल्पकलेच्या माध्यमातून कोकणी संस्कृतीचे हे अप्रतिम रुप पाहतांना पर्यटक थक्क होतात. शिवाय पर्यटकांना कोकणातील वैशिष्ट्य आठवणीच्या रुपात घरी नेता यावे यासाठी वरच्या भागात खास विक्रीचे दालन आहे. डोंगराच्या अगदी वरच्या भागातील मचाणावरून दिसणारे गणपतीपुळेचे सौंदर्य विलोभनीय असते. तासाभराच्या या सफरीत विविधरंगी पक्ष्यांचे दर्शनही घडते. तेथून परततांना उकडीचे मोदक, भाजणीचे थालीपीठ, अळूवडी, झुणका भाकर, कोकम सरबत अशी विविध प्रकारची चव चाखण्याची सोय या ठिकाणी केलेली असते. या दालनात कोकणातील जलदुर्गांच्या प्रतिकृतीची भर पडल्याने हे दालन अधिक समृद्ध झाले आहे.

केशवसुत स्मारक : गणपतीपूळ्यापासून अवघ्या 2 कि.मी. अंतरावर मालगुंड या गावी आधुनिक मराठी कवितेचे जनक कवी केशवसुत यांचे स्मारक कोकण मराठी साहित्य परिषदेच्यावतीने उभारण्यात आले आहे. एखाद्या कवीचे अशा तऱ्हेचे उभारलेले हे सध्यातरी एकमेव स्मारक आहे. या वास्तूत ग्रंथालय, अभ्यासिका, वाचनालय असे विविध कक्ष असून स्वतंत्र कक्षात अनेक गाजलेल्या कविता वाचायला मिळतात. त्यातील काही हस्तलिखित स्वरुपात आहेत. मराठीतील अनेक प्रतिभावंतांची छायाचित्रासह माहिती या ठिकाणीवाचायला मिळते. शेजारीच कवी केशवसुतांचे मूळ घर स्मारक म्हणून जतन करण्यात आलेले असून तेथे संग्रह म्हणून कोकणातील पुरातन वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.

जयगड बंदर:
गणपतीपुळे येथून दहा किलोमीटर अंतरावर जयगड बंदर आहे. व्यापाराच्यादृष्टीने पूर्वीपासूनच या बंदराचा उपयोग केला जात आहे. बंदरावरून बोट भाड्याने घेऊन जयगडच्या परिसराचे सौंदर्य न्याहाळता येते. बंदरावर मच्छिमार बोटींची ये-जा सुरु असते. जयगडच्या खाडीतून तवसाळला जाण्यासाठी फेरीबोटची माफक दरात व्यवस्था आहे. फेरीबोटने जाताना नव्याने बांधणी करण्यात येणारे जयगड बंदर आणि जिंदाल समुहाचा औष्णीक ऊर्जा प्रकल्प समोर दिसतो. समुद्र सफरीचा आनंद घेताना मात्र किनाऱ्यावरील खडकांवर आदळणाऱ्या लाटांचे रौद्र रुप लक्षात घेता या भागात समुद्र किनाऱ्यावरील पायी भटकंतीचा मोह टाळणेच योग्य आहे.

जयगड किल्ला:
शास्त्री नदीच्या खाडीत उभारण्यात आलेला हा किल्ला विजापूरकरांनी बांधला. या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व सांगणारे 16 व्या शतकातील संदर्भ उपलब्ध आहेत. गावाच्या उत्तरेस असलेला हा किल्ला जलदुर्ग प्रकारातील आहे. 12 एकर परिसरात पसरलेला किल्ला अजूनही मजबूत अवस्थेत आहे. बालेकिल्ला आणि परकोट या दोन भागात किल्ल्याची रचना केली आहे. किल्ल्याच्या तीन बाजूने पाणी असून बालेकिल्ल्यास महाद्वार आहे. किल्ल्याला जांभा पाषाणापासून बनविलेली मजबूत तटबंदी आहे. तटबंदीच्या बाजूला खंदक कोरलेले आहेत. किल्ल्याला एकूण 28 बुरूज असून या बुरूजावरून समुद्राचे सौंदर्य न्याहाळता येते. किल्ल्याच्या दरवाजापर्यंत वाहन पोहचते. गणपतीपुळे- जयगड अंतर 16 किलोमीटर आहे.

कऱ्हाटेश्वर मंदिर:
जयगड येथील जेएसडब्ल्यु प्रकल्पाच्या प्रवेशद्वारापासून डावीकडे जाणाऱ्या रस्त्याकडून पाच किलोमीटर अंतरावर कऱ्हाटेश्वर मंदिर आहे. वाहन थेट मंदिरापर्यंत जाते. समुद्र किनाऱ्यावरील एक मोठ्या खडकावर हे मंदिर उभारण्यात आले आहे. समुद्राच्या बाजूचा उंच कडा पाहतांना थरारक अनुभव येतो. मंदिराच्या खालच्या बाजूस गोमुखातून अखंड वाहणारा झरा आहे. भरतीच्यावेळी निवांतपणे उंचावरून खडकावर आदळणाऱ्या लाटांचा खेळ पाहण्यासाठी या प्राचीन मंदिराला अवश्य भेट द्यावी.

दीपस्तंभ-जयगड:
कऱ्हाटेश्वर मंदिरापासून परततांना उजवीकडे दीपस्तंभ दिसतो. शास्त्री नदीच्या मुखाशी असलेल्या या दिपस्तंभावरून समुद्र किनारचा रम्य परिसर न्याहाळता येतो. दुपारी 3 ते 5.15 या वेळेत तिकीट काढून उंचा मनोऱ्यावर जाता येते. उंचीवरून समुद्र न्याहाळण्याचा रोमांचीत करणारा अनुभव येथे पर्यटकांना मिळतो.

श्री लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे:
जयगडहून चाफे फाट्याकडे येतांना डाव्या बाजूस कोळीसरे गावाकडे जाणारा रस्ता आहे. येथून तीन किलोमीटर अंतरावर श्री लक्ष्मीकेशवाचे मंदिर आहे. गर्द झाडीने वेढलेल्या मंदिराच्या बाजूस बारमाही वाहणारा झरा आहे. निसर्गाच्या सान्निध्यात शांततेचे क्षण घालविण्यासाठी हे स्थान अत्यंत योग्य आहे. मंदिरातील पाच फुट उंचीची श्रीलक्ष्मी केशवाची मुर्ती नेपाळमधील गंडकी नदीपात्रातील काळ्या तांबूस रंगाच्या शालीग्राम शिळेतून घडविलेली आहे. मंदिर परिसरात खाजगी भक्तनिवासाची सुविधा आहे. निवळीमार्गे जयगड रस्त्याला असणाऱ्या कोळीसरे फाट्याचे अंतर 27 किलोमीटर आहे.
-संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी

कोकणातील मिनी महाबळेश्वर : दापोली

हिरव्यागार डोंगररांगांवर ठिपक्यासारखी दिसणारी घरे, मोकळी हवा आणि शहरातून फेरफटका करतांना दिसणारे विविध रंगी पुष्पसौंदर्य हे दापोली शहराचे वैशिष्ट्य आहे. शहराच्या गजबजाटापासून दूर निसर्गाचे वरदान लाभलेल्या या शहराचे सौंदर्य पर्यटकांसाठी आकर्षण आहे. थंडगार हवेमुळे हे शहर 'मिनी महाबळेश्वर' म्हणून ओळखले जाते. पावसाळ्यात दापोली परिसराची भटकंती करताना बहावा, पेव, दयाळू, अग्निशिखा, मधूनच डोकविणारी विविधरंगी जास्वंद अशा अनेक फुलांचे सौंदर्य डोळ्याचे पारणे फेडते. समुद्र सपाटीपासून साधारण आठशे फूट उंचीवर असलेले हे शहर इंग्रजांच्या काळात 'दापोली कॅम्प' म्हणून परिचित होते. सुंदर समुद्र किनारे, किनाऱ्यावर हिवाळ्यात येणारे 'सी गल' पक्षी, याच दरम्यान मधूनच घडणारे डॉल्फीनचे दर्शन, समुद्र किनारचा मासोळी बाजार, ऐतिहासिक गड-किल्ले आणि इमारतींसाठी दापोली तालुका प्रसिद्ध आहे. अनेक थोर व्यक्तिमत्वांची खाण म्हणून हा परिसर ओळखला जातो.

दापोलीला जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरून म्हाप्रळ-मंडणगड-पालगडमार्गे रस्ता आहे. मंडणगड-दापोली हे अंतर 30 किलोमीटर आहे. मंडणगडहून कोकण भ्रमंती सुरू केल्यास वेळास-केळशी-आंजर्ले-मुरुडमार्गेदेखील दापोलीला येणे शक्य आहे. वेळास-दापोली हा दोन तासांचा प्रवास आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील खेड शहरातून दापोली 35 किलोमीटर अंतरावर आहे.

दापोली तालुक्यातील महत्त्वाची पर्यटन स्थळे :

पालगड:
मंडणगडपासून साधारण बारा किलोमीटर अंतरावर दापोली तालुक्यातील पालगड येथे पूज्य साने गुरुजींचे जन्मगाव आहे. या ठिकाणी पारंपरिक कोकणी पद्धतीच्या स्मारकात गुरुजींच्या जिवनातील अनेक प्रसंग छायाचित्रांच्या रुपात प्रदर्शित करण्यात आले आहेत. गावातील प्राथमिक शाळेत गुरुजींचे प्राथमिक शिक्षण झाले होते. ट्रेकींगची आवड असल्यास गावालगतच असलेल्या पालगड किल्ल्यावर जाऊन प्राचीन अवशेष पाहता येतात. मात्र किल्ल्याची भटकंती करतांना स्थानिकांची मदत अवश्य घ्यावी.

केळशी समुद्र किनारा:
मंडणगडची सफर पुर्ण करून दापोलीकडे जाताना वाटेवर केळशीचा समुद्र किनारा लागतो. नारळाच्या दाट झाडीतून समुद्राकडे गेल्यावर किनाऱ्यावर दाट सुरुबन लागते. समुद्र किनारा विस्तीर्ण असून उटंबर डोंगराजवळील कातळाच्या भागात विविध आकाराचे शंख-शिंपले सापडतात. शांत-निवांत वाटणाऱ्या या परिसरात वाहनांची वर्दळही कमी असल्याने पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटता येतो.

महालक्ष्मी मंदिर, केळशी:
केळशी गावाच्या दक्षिण टोकाला उटंबर डोंगराच्या पायथ्याशी पेशवाई काळातील महालक्ष्मी मंदिर आहे. मंदिर परिसरात तळे असून उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था आहे. मंदिराचा परिसर सुंदर आहे. संध्यासमयी सनईचे सूर कानावर येत असतांना पाय मंदिराच्या परिसरातच रेंगाळतात. मंदिराचे बांधकाम पेशवाई काळातील आहे. उटंबर डोंगरावरील वनराईच्या पार्श्वभूमीवर मंदिराचे सौंदर्य खुलुन दिसते.

याकूबबाबा दर्गा, केळशी:
महालक्ष्मी मंदिराच्या उजव्या बाजूने 'हजरत याकूबबाबा सरवरी रहमतुल्ला दर्ग्या'कडे जाण्यासाठी अरुंद रस्ता आहे. पाचच मिनीटात दर्ग्यापाशी पोहचता येते. याकूबबाबा सिंध प्रांतातून बाणकोटमार्गे केळशीला पोहोचल्याचे सांगितले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांची दाभोळ स्वारीची तयारी सुरू असतांना त्यांची व याकूबबाबांची भेट झाली. याकूबबाबांनी त्यांना स्वारीसाठी मार्गदर्शन केल्याचे वर्णनही या भागात ऐकायला मिळते. याठिकाणी डिसेंबर महिन्यात मोठा 'उरुस' होतो. या सोहळ्यात अनेक हिंदू व मुसलमान भावीक सहभागी होतात.

कड्यावरचा गणपती, आंजर्ले:
केळशीहून दापोलीकडे जाताना साधारण वीस किलोमीटर अंतरावर आंजर्ले गाव आहे. गावात प्रवेश करण्यापूर्वी उजवीकडे श्रीगणेशाचे जागृत दैवत आहे. या स्थानाला 'कड्यावरचा गणपती' म्हणून ओळखले जाते. या मंदिराकडे जाणारा रस्ता दाट झाडीतून जातो. मंदिराचा परिसर निसर्गरम्य आहे. देऊळ 11 व्या शतकातील असून त्याचा 1780 मध्ये जिर्णोद्धार करण्यात आला आहे. मंदिराच्या रचनेत प्राचीन भारतीय, मध्ययुगीन रोमन आणि अर्वाचीन पाश्चात्य वैशिष्ट्यांचा संगम झालेला दिसतो. मंदिराच्या समोरच्या बाजूस तळे आहे. मंदिराशेजारी असणाऱ्या शंकराच्या मंदिराची रचनादेखील तेवढीच रेखीव आहे. मंदिर परिसरात असलेल्या भक्तिधामात भाविकांसाठी निवास व भोजन व्यवस्था होते. (दूरध्वनी-02358-234300)

समुद्र किनारा, आंजर्ले:
श्रीगणेशाचे दर्शन घेऊन खाली उतरल्यावर आंजर्ले गाव आहे. गावातून अरुंद रस्ता समुद्राकडे जातो. आंजर्लेचा शुभ्र वाळूचा पट्टा असलेला समुद्र किनारा पर्यटकांना आकर्षित करतो. समुद्र किनाऱ्याची मजा लुटल्यावर दाट झाडीतून दापोलीकडे जाताना खाडीवर बांधलेल्या पुलावरून सुंदर दृष्य दिसते. अनेक बोटी या खाडीत विसावलेलया असतात. बोटींवरचे विविध रंगी झेंडे आणि बोटींचे रंग, शीड हे सर्व कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासारखे असते. दापोलीला हर्णे मार्गे न जाता वरच्या डोंगराच्या बाजूने गेल्यास आंजर्ले समुद्रतटाचे नयनरम्य दृष्य प्रत्येक वळणावर समोर दिसते. समुद्रात दिमाखाने उभा असलेला सुवर्णदुर्गदेखील दूरूनच नजरेस पडतो. रस्त्याच्या दोन्ही कडेला असलेल्या सुरुच्या झाडांमुळे हा प्रवासही सुखद वाटतो.

मुरुड:
आंजर्लेच्या खाडीला लागून असलेल्या डोंगररांगामधून प्रवास करून खालच्या बाजूस आल्यावर समोरच मुरुडचा समुद्र किनारा दिसतो. समुद्र शांत असला तर या ठिकाणी लहान तराफ्यातून जावून डॉल्फीनची जलक्रीडा पाहता येते. सकाळच्या वेळी या भागात 'सी गल' पक्षांचे थवे कॅमेऱ्यात कैद करता येतात. सकाळच्या स्वच्छ सुर्यप्रकाशात समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटांच्या पार्श्वभूमीवर किनाऱ्यावरून उंच झेपावणाऱ्या पक्षांचे मनोहारी दृष्य पाहायला मिळते.

मुरुड गावाकडे जाणारा रस्ता दाट झाडीतूनच जातो. खाडी ओलांडून जातांना विविधरंगी पक्ष्यांचे दर्शन घडते. हे थोर समाजसुधारक धोंडो केशव कर्वे यांचे गाव. गावात शिरताच डाव्या बाजूस त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे दर्शन घडते. थोडे पुढे जाऊन वळल्यावर समुद्राकडे जाणारा रस्ता आहे. दोन्ही बाजूला असणाऱ्या उंचच उंच नारळ-पोफळीच्या झाडीतून किनाऱ्याकडे जाताना मजा वाटते. रस्त्याला लागूनच दुर्गादेवीचे पुरातन मंदिर आहे. विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यावर क्रीकेट किंवा फुटबॉल खेळायला पर्यटकांना आवडते. किनाऱ्यावरील स्टॉलवर क्रीडा साहित्य भाड्याने देण्याची व्यवस्था आहे. या परिसरात आने 'बीच रिसॉर्ट' पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज आहेत. सोबतच निवास-न्याहरी योजने अंतर्गत घरगुती राहण्याची व्यवस्थाही बऱ्याच ठिकाणी आहे.

हर्णे बंदर:
मुरुडपासून हर्णे बंदर 7 किलोमीटर अंतरावर आहे. गावत जाण्यासाठी दाट नारळाच्या झाडीतून गेलेला अरुंद रस्ता आहे. गाव ओलांडून गेल्यावर कोळ्यांची वस्ती लागते. या वस्तीला लागूनच हर्णे बंदर आहे. मासेमारीसाठी या बंदराचा उपयोग होतो. बंदराला लागून असलेले दिपगृह कोकण किनारपट्टीवरील सर्वात जुने दिपगृह आहे. धक्क्याला लागून असलेल्या कनकदुर्गच्या पायऱ्या चढून वरच्या बाजूस गेल्यास हे दिपगृह दिसते. सकाळी लवकर हर्णे बंदरावर गेल्यास इथला मासेबाजार पाहता येतो. सकाळी किनाऱ्याला लागलेल्या नौकामधून ताजे मासे उतरविले जातात. विविध रंग आणि आकाराचे मासे पाहणे ही खास पर्वणी असते. पारंपरिक वेशातल्या कोळ्यांचे जीवनही इथे जवळून पाहता येते. रस्त्याने जाताना कोळ्यांची जाळी कशी विणली जातात तेदेखील पाहायला मिळते.

सुवर्णदुर्ग, हर्णे:
कोकणातील हा महत्वाचा जलदुर्ग आहे. समुद्र किनाऱ्यापासून अडीचशे मीटर अंतरावर 8 एकर क्षेत्रात हा किल्ला विस्तारलेला आहे. जिल्ह्यातील सर्वात उंच परकोट किल्ला म्हणूनही हा किल्ला ओळखला जातो. अखंड तटबंदी असलेल्या या किल्ल्याला केवळ दोनच दरवाजे आहेत. किल्ल्यात निकामी झालेल्या अनेक तोफा बघायला मिळतात. किल्ला बघायला लहान बोटीतून जावे लागते. हा किल्ला कान्होजी आणि तुळाजी आंग्रेंच्या पराक्रमाचा साक्षीदार आहे.

कनकदुर्ग, फतेहगड, गोवा किल्ला:
हर्णे समुद्र किनाऱ्याला लागून सुवर्णदुर्ग किल्ल्याचे उपकिल्ले म्हणून कनकदुर्ग, फतेहगड आणि गोवा किल्ला हे तीन किल्ले ओळखले जातात. सुवर्णदुर्गकडे जाताना प्रथम गोवा किल्ल्याचे दर्शन घडते. किल्ल्याचा मुख्य दरवाजा उत्तरेस असून तटाजवळ मारुतीची मुर्ती आहे. किल्ल्याची तटबंदी चांगल्या अवस्थेत आहे. गोवा किल्ल्याच्या डाव्या बाजूस फतेहगड आहे. या गडाच्या सर्व खुणा लुप्त झाल्या असून या ठिकाणी कोळ्यांची वस्ती झालेली आहे. कनकदुर्गच्या बाजूने केवळ तटबंदीचा काहीसा भाग दृष्टीपथास पडतो. हर्णे धक्क्याला लागून कनकदुर्ग आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या असून तटबंदीचा भाग पडलेला आहे. दोन एकर परिसरातील या किल्ल्याच्या तीन बाजूंनी समुद्र आहे.

व्याघ्रेश्वर मंदिर, आसूद:
पर्यटनादरम्यान प्रवासाचा थकवा घालविण्यासाठी मुरुडपासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या आसूदगावाला आवर्जुन भेट द्यावी. गावातील जोशी बागेजवळ व्याघ्रेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. सुमारे 800 वर्षापूर्वीचे हे शंकराचे जागृत स्थान अनेकांचे कुलदैवत आहे. गर्भागृहाला लागून असलेल्या सभामंडपात पाषाणनंदीची भव्य मूर्ती आहे. मंदिराच्या शेजारून वाहणाऱ्या भातखंडी नदीचा नयनरम्य परिसर भाविकांचा थकवा दूर करतो. मंदिराच्या समारेच्या बाजूस कोरीवकामाचा अप्रतिम अविष्कार पाहायला मिळतो. प्रवेशभागाजवळ दिपमाळ आहे. मंदिराशेजारीच ग्रामदैवत झोलाईदेवीचे मंदिर आहे.

केशवराज मंदिर, आसूद:
व्याघ्रेश्वर मंदिरापासून पाचच मिनिटात आपण आसूदबागजवळ पोहचतो. दापोलीपासून आसूदबाग 6 किलोमीटर अंतरावर आहे. नारळ-पोफळीच्या दाट बागा, वाळत खातलेल्या सुपाऱ्या, आणि पांरंपरिक पद्धतीची कोकणी टूमदार घरांचे सौंदर्य इथे पाहायला मिळते. आसूदबागला दाबकेवाड्यापासून खालच्या बाजूस पायवाट जाते. गाडी येथेच पार्क करून खालच्या बाजूस श्री केशवराज मंदिराकडे पायवाट जाते. काही सेंकंद पायी चालल्यावर स्वर्गातील सौंदर्याची जाणीव होईल, असा हिरवागार निसर्ग आपल्या सभोवती असतो. झुळझुळ वाहणारे पाणी, पोफळीची सरळ उभी असलेली झाडे, रस्त्यावर पडलेला गुलागीशार जामच्या फुलांचा सडा, हवेतला गारवा...अशा रम्य वातावरणातील भटकंती स्मरणीय अशीच असते. कोटजई नदीचे पात्र ओलांडून डोंगररावरील मंदिराकडे जावे लागते. मंदिर पेशवेकालीन असून श्री विष्णूची सुंदर मुर्ती गाभाऱ्यात आहे. हे दैवत श्री लक्ष्मी केशवराज म्हणूनही परिचीत आहे. मंदिराच्या परिसरात असणाऱ्या गोमुखातून थंड आणि शुद्ध पाणी चोवीस तास वाहत असते. दगडाच्या चिंचोळ्या नालीतून हे पाणी खाली आणले गेले आहे. केशवराजाचे दर्शन घेतल्यानंतरही परिसरातून बाहेर पडावेसे वाटत नाही. निसर्गाचा हा अद्भूत अविष्कार एकदातरी अनुभवायला हवा.

दापोली शहर: 
आसूद गावापासून दापोली केवळ 6 किलोमीटर अंतरावर आहे. दापोली थंड हवचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. दापोलीला आल्यावर कोकण कृषी विद्यापीठाला आवर्जुन भेट द्यावी. 1972 मध्ये स्थापन झालेल्या या विद्यापीठात कृषी क्षेत्राशी निगडीत अनेक नवे प्रयोग अचंभीत करणारे तेवढेच शेतीत रुची असणाऱ्यांसाठी उपयुक्त आहेत. विद्यापीठातील विविध उद्यानांची रचनादेखील तेवढीच सुंदर आहे. विद्यापीठाच्या माहिती केंद्रात कृषी प्रदर्शन पाहता येते.

दापोली परिसरातील फळबागांचा उपयोग करून अनेक ठिकाणी कृषी पर्यटन केंद्रे विकसीत करण्यात आली आहेत. या पर्यटन केंद्रांमधून झाडावरून नारळ काढणे, जलक्रीडा, बैलगाडीची सफर, कलम करणे, नारळ सोलणे, चूलीवर स्वयंपाक करणे, रात्री जाखडी खेळणे, कोकणी भोजन प्रकार आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. कृषी पर्यटन केंद्रात दिवस घालविल्यास 'कोकणी लाईफस्टाईल'ची मजा लुटता येते.

पन्हाळकाजी लेणी:
दापोली दाभोळ रस्त्यावर 15 किलोमीटर अंतरावर नानटे गाव आहे. गावाच्या अलिकडे डाव्या बाजूला सुप्रसिद्ध पन्हाळेकाजी लेण्यांकडे जाण्यासाठी रस्ता आहे. साधारण 20 किलोमीटर अंतर डोंगरराळ भागातून प्रवास केल्यावर कोटजाई आणि धाकटी नद्यांच्या संगमावर या लेण्यांच्या रुपात शिल्पकलेचा अद्भूत नमुना पाहायला मिळतो. बाराव्या शतकातील ताम्रपट येथे सापडला आहे. गाणपत्य आणि नाथ संप्रदायातील लेणी आणि शिल्प असलेल्या 29 गुंफा येथे आहेत. गणपतीची सुंदर मुर्ती पर्यटकांचे लक्ष आकर्षुन घेते. लेण्यात असलेल्या स्तंभावरील कोरीव कामही कलाकुसरीचा उत्तम नमुना आहे. नाथपंथीय साधकांची शिल्पेदेखील या ठिकाणी पाहायला मिळतात. परतीच्या प्रवासात केळील-मळे मार्गे दापोली-दाभोळ मार्गावर परतता येते.

चिखलगाव:
मळेपासून दापोलीकडे जाताना चार किलोमीटर अंतरावर चिखलगाव हे लोकमान्य टिळांचे मुळ गाव आहे. दापोलीपासून हे अंतर साधारण 18 किलोमीटर आहे. चिखलगावला टिळकांच्या वाड्याचेच नुतनीकरण करून त्याठिकाणी लोकमान्य टिळकांचे मंदिर उभारण्यात आले आहे. लागूनच असलेल्या जागेत त्यांच्याच स्मृतीत प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली आहे. चिखलगावचा परिचय आणखी एका कारणाने करून दिला जातो. राजा आणि रेणु दांडेकर या दाम्पत्याने ग्रामीण भागातील गरजूंसाठी मोठाशैक्षणिक प्रकल्प येथे उभा केला आहे. या प्रकल्पाला अभ्यासू पर्यटक आवर्जुन भेट देतात.

श्री चंडिकादेवी मंदिर, दाभोळ:
दापोलीपासून 30 किलोमीटर अंतरावर श्री चंडिकादेवीचे जागृत देवस्थान आहे. दाभोळच्या खाडीपासून 5 किलोमीटरवर हे मंदिर आहे. हिरव्यागार परिसरात डोंगरातील एकसंध पाषाणात कोरीव काम करून देवीची मुर्ती आणि गाभारा उभारण्यात आला आहे. मंदिराच्या दारातच भव्य प्रवेशद्वार आणि दिपमाळ आहे. नंदादीपाच्या प्रकाशात गुहेत जाऊन देवीचे दर्शन घ्यावे लागते. मंद प्रकाशात दिसणारी देवीची मुर्ती नजरेत साठवून घ्यावीशी वाटते. नंदादीपांनी प्रकाशीत गुहेतील वाटही तेवढीच सुंदर दिसते. गुहेत प्रदक्षिणा मार्ग तयार करण्यात आला आहे. गाभाऱ्यात विजेचा वापर केला जात नाही. मंदिराशेजारी असलेल्या आणखी एका गुहेतून पाण्याचा मोठा प्रवाह बाहेर आलेला दिसतो. भाविक या ठिकाणी स्नानदेखील करतात. हा प्रवाहकुंड पांडवकालीन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिराला भेट दिल्याचे येथे सांगितले जाते.

माँसाहेब मशिद, दाभोळ:
दाभोळच्या धक्क्यावर येताच मशिदीची भव्य आणि कलात्मक वास्तू पर्यटकांचे लक्ष आकर्षुन घेते. अप्रतिम कोरीव काम आणि कलाकुसरीचा नमुना या मशिदीच्या प्रत्येक भागात पाहायला मिळतो. विजापूरच्या शाही जामा मशिदीची प्रतिकृती असलेल्या या भव्य वास्तूत स्थापत्य कलावैभवाची झलक पहायला मिळते. विजापूरची राजकन्या मॉसाहेब आयेशाबिबी हीने 1659 मध्ये खराब हवामानामुळे मक्का प्रवास न करता आल्याने धार्मिक कार्य करण्याच्या हेतून चार वर्षात या मशिदीचे काम करून घेतले. त्याकाळात ही वास्तू उभारण्यासाठी 15 लाख रुपये खर्च आल्याचे सांगितले जाते. ही मशिद 'अंडा मशिद' नावाने ओळखली जाते.

दापोलीची भटकंती संपवून गुहागरला जाताना वाहनाने प्रवास करण्याऐवजी फेरीबोटने जाणे सोईचे आहे. दाभोळच्या खाडीतून बोटीने वाहनासह माफक शुल्क भरून जाता येते. त्यामुळे तीन तासाचा प्रवास कमी होतो. शिवाय संध्याकाळी खाडीतील सौंदर्य अनुभवता येते.
संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी

परशुरामची भूमी : गुहागर

गुहागर हे रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाचे तालुक्याचे शहर आहे. गुहागरला मुख्य रस्त्याच्या बाजूला व्याडेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. (वाड्यांचा देव तो व्याडेश्वर) या गावातील बहुसंख्येने असलेल्या वाड्यांचा देव म्हणून हे दैवत प्रसिद्ध होते. परशुरामची भूमी म्हणून गुहागरची ओळख आहे. जाणून घेऊया गुहागर तालुक्यातील प्रेक्षणीय स्थळे...

दापोलीहून दाभोळखाडीमार्गे गुहागरला जाता येते. मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणच्या अलिकडे परशुराम घाट उतरल्यावर गुहागरकडे जाणारा मार्ग आहे. महामार्गापासून गुहागर 45 किलोमीटर अंतरावर आहे. हा परिसर नारळ-पोफळीच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. गुहागरला यायचं ते दोन दिवस हाती राखूनच. त्याशिवाय इथल्या भटकंतीचा आनंद लुटता येत नाही. या परिसरात वड-पिंपळाचे विशाल वृक्ष पाहायला मिळतात. गुहागर शहरात निवास-न्याहारी योजनेअंतर्गत अनेक ठिकाणी घरगुती निवास व्यवस्था उपलब्ध आहे. समुद्र किनारी अनेक रिसॉर्टदेखील आहेत. गुहागर तालुक्याच्या भटकंती करताना धार्मिक पर्यटनाचा आनंदही मिळतो. निसर्गरम्य परिसरात उभी असलेली अनेक देवस्थाने तालुक्यात आहेत. खाडीच्या भागात मासोळी बाजारालाही भेट देता येते. मुंबई ते गुहागर 270 किलोमीटर अंतर आहे. तर पुणे-गुहागर 244 किलोमीटर अंतर आहे.

गुहागर तालुक्यातील महत्वाची प्रेक्षणीय स्थळे...
गोपाळगड:
गुहागरपासून 18 किलोमीटर अंतरावर गोपाळगड आहे. रत्नागिरी ऊर्जा प्रकल्पापासून अंजनवेल सहा किलोमीटर अंतरावर आहे. गावापासून गड दोन किलोमीटर अंतरावर आहे. अजूनही या गडाची तटबंदी मजबूत आहे. सात एकर परिसरात किल्ला पसरला आहे. वेलदूर येथून बोटीने जाऊनही किल्ला बघता येतो. किल्ल्यापासून एक किलोमीटर अंतरावर अंजनवेलचे दिपगृहदेखील आहे. 

दुर्गादेवी मंदिर:वेलदूरच्या बाजूने गुहागरमध्ये प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस दुर्गादेवीचे प्राचीन मंदिर आहे. चिपळूणमार्गे आल्यास मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूस यावे लागते. मंदिर तेराव्या शतकातील असल्याची माहिती उपलब्ध आहे. मुळ हेमाडपंथी रचना असलेल्या या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याने त्याच्या सौंदर्यात भर पडली आहे. मंदिरात येण्यापूर्वी बाजूला असलेल्या तळ्यातील विविधरंगी कमळाचे सौंदर्य कॅमेऱ्यात टिपण्याचा आनंद घेता येतो. मंदिराच्या गाभाऱ्यातील आदिमातेचे रुप नजरेत भरण्यासारखे आहे. गाभाऱ्यासमोरील भव्य सभामंडपातील शांतता आणि परिसरातील निसर्ग यामुळे काही क्षण इथे बसून थकवा घालविता येतो. बाजूलाच असलेल्या प्रसादालयात भाविकांसाठी चहा-नास्ता आणि जेवणाची सोय माफक दरात केली जाते. मंदिर परिसरात भक्तनिवासाची सोय आहे. (भक्तनिवासासाठी संपर्क-02359-240665)
उफरटा गणपती:दुर्गादेवीचे दर्शन घेतल्यानंतर समुद्र किनाऱ्याकडे जाताना रस्त्याच्या डावीकडील गणेशाचे सुंदर मंदिर आपले लक्ष वेधून घेते. मंदिरातील श्रीगणेशाची मुर्तीही तेवढीच सुंदर आहे. 300 वर्षांपूर्वी समुद्राचे पाणी वाढल्यावर गुहागर बुडुन जाईल, अशी भीती गावकऱ्यांना वाटल्याने त्यांनी पूर्वेकडील गणपतीचे तोंड पश्चिमेकडे फिरविले. तेव्हापासून यास 'उफरटा गणपती' म्हणून ओळखले जाऊ लागले. पांढऱ्याशुभ्र मुर्तीच्या हातातील परशु व त्रिशुळ शोभून दिसतो. निवांतपणे काही क्षण घालविण्याजोगा मंदिराचा परिसर आहे.

गुहागरचा समुद्र किनारा:सूर्य थोडा डोक्यावर आल्यावर समुद्र स्नानाची मजा लुटता येते. मात्र समुद्रात जाताना गावकऱ्यांकडून माहिती घेऊन गेलेले केव्हाही बरे. शुभ्र-रुपेरी वाळूचा तेवढाच स्वच्छ समुद्र किनारा पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. 5 किलोमीटरचा लांबीचा किनारा नारळी-पोफळी आणि सुरुच्या दाट झाडांनी सुशोभित आहे. वाळूवर फिरणारे सागरी जिवांचे निरीक्षण करताना मजा वाटते. किनाऱ्यावर उभे राहून समोर सह्याद्रीच्या रांगावर पसरलेल्या हिरव्या शालूचे सौंदर्यदेखील न्याहाळता येते. समुद्र सफरीचा आनंद लुटल्यावर पोटातील भूक शमविण्यासाठी सोलकढी, उकडलेले मोदक, माशांचे विविध प्रकार, नारळाची आमटी, तांदळाची भाकरी अशा लज्जतदार कोकणी पदार्थांनी भरलेले ताट तयार असते. किनाऱ्याजवळच चांगली हॉटेल्स आणि घरगुती खानावळी आहेत.

श्री व्याडेश्वर:गुहागरला मुख्य रस्त्याच्या बाजूला व्याडेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. (वाड्यांचा देव तो व्याडेश्वर) या गावातील बहुसंख्येने असलेल्या वाड्यांचा देव म्हणून हे दैवत प्रसिद्ध होते. परशुरामची भूमी म्हणून गुहागरची ओळख आहे. त्यांचे शिष्य असलेल्या व्याडमुनींनी याठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली. या स्थानाला 'व्याडेश्वर' संबोधले जाते, अशीही त्यामागची कथा आहे. मुख्य गाभाऱ्यात शिवलिंग असून समोरील भव्य सभामंडपात तेवढेच भव्य आकाराचे नंदीचे शिल्प आहे. मंदिराच्या चार कोपऱ्यात गणपती, दुर्गादेवी, लक्ष्मीनारायण आणि सुर्यनारायणाची सुंदर मंदिरे आहेत. मंदिर परिसरात पर्यटकांसाठी भक्तनिवासाची सुविधा आहे.(संपर्क-9421140506)

आनंदीबाई पेशव्याचे गाव-मळण:गुहागर परिसरात वृक्षराजींची श्रीमंती पाहायला मिळते. वटवृक्षांच्या रचनेतील सौंदर्य अनेक कलाकारांचा आकर्षणाचा विषय असतो. परिसरात भटकंती करताना आनंदीबाई पेशव्यांचे मुळ गाव असलेल्या मळण गावातील त्यांच्या वाड्याचा चौथरा आणि त्याकाळचे तळे पाहता येते. मळणला जाण्यासाठी शृंगारतळीहून मार्ग आहे. गुहागर ते मळण 15 किलोमीटर अंतर आहे. 

वेळणेश्वर समुद्र किनारा:गुहागर येथून मोडका आगरमार्गे साधारण 20 किलोमीटर अंतरावर हा वेळणेश्वरचा निसर्गरम्य समुद्रकिनारा आहे. चंद्राच्या कोरीप्रमाणे असलेल्या या किनाऱ्यावर नारळाच्या वृक्षांचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. किनाऱ्यावर वेळणेश्वराचे सुंदर देऊळ आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे येथे निवास व्यवस्था करण्यात आली आहे. उंचावर असलेल्या या ठिकाणाहून समुद्राचे विलोभनीय दृष्य पाहायला मिळते. (एमटीडीसी वेळणेश्वर-02359-243282, कोकणी हट्स 10 नॉन एसी 5 एसी)

हेदवी:पेशवे काळातील हेदवी येथील गणपती मंदिर वेळणेश्वरापासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. श्रीगणेश मंदिराच्या निसर्गरम्य परिसरात गेल्यावर आल्हाददायक अनुभव येतो. मंदिर परिसरात सुंदर उद्यान निर्माण करण्यात आल्याने परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे. मंदिरातील मुर्ती 'श्री दशभुजा लक्ष्मीगणेश' नावाने ओळखली जाते. या ठिकाणी भक्त निवासाची सुविधादेखील करण्यात आली आहे. 

बामणघळ:हेदवी येथील गणपती मंदिराच्या अलिकडे तीन किलोमीटर अंतरावर उजव्या बाजूस जाणारा उतार लागतो. या रस्त्याने गेल्यास बामणघळला निसर्गाचा सुंदर अविष्कार पाहता येतो. याठिकाणी समुद्र किनारा काळ्या कातळांनी व्यापलेला आहे. या काळ्या खडकांशी चाललेला फेसाळणाऱ्या लाटांचा खेळ पाहण्यासारखा असतो. थोडे अंतर चढून गेल्यावर एका ठिकाणी दहा ते पंधरा फुट उंचीची अरुंद नाळ आहे. या फटीतून भरतीच्या लाटेचे पाणी शिरून ते खडकावर आदळताना उंच जलस्तंभ तयार होतो. उडणाऱ्या तुषाराचे सुर्य प्रकाशातील सौंदर्य डोळ्यात साठविण्यासारखे असते. किनाऱ्यावर उमा महेश्वराचे मंदिर आहे. डोंगरावरून येणारी गोड्या पाण्याची धार मंदिरात असलेल्या कुंडात पडते. याच परिसरात उमराठ आणि नरवण येथील निसर्गरम्य परिसरात असलेल्या मंदिरांनाही भेट देता येते.

रोहिला:हेदवीपासनू सात किलोमीटर अंतरावर रोहिल्याच्या खाडीचा पूल लागतो. या पुलावरून डावीकडे सुंदर वाळूची पुळण आणि त्यापलिकडे सुरुबन आहे. उजवीकडे नारळाची झाडे दाटीवाटीने उभी आहेत. समोर विस्तारलेल्या खाडीपलिकडे डोंगरावर उभा असलेला जेएसडब्ल्यु प्रकल्प दिसतो. कॅमेऱ्यात साठविण्यासारखा परिसर असल्याने काही क्षण येथे घालविण्याचा मोह आवरत नाही.

तवसाळ:हेदवीपासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या तवसाळ गावात विजयगडची प्राचीन गढी आहे. या गढीचे अवशेष खाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला पाहता येतात. गावाला लागून जयगडची खाडी आहे. या खाडीतून सुर्यास्ताचे सौंदर्य अनुभवता येते. खाडीतून जयगड बंदरही दृष्टीपथास पडते. फेरीबोटीतून वाहनासह जयगडला जाता येते. जयगडहून गणपतीपुळेमार्गे रत्नागिरीला जाण्यासाठी मार्ग आहे.

ट्रेकींगची हौस भागविणारा खेड तालुका; सह्याद्रीतील थंड हवेचे ठिकाण लांजा तालुक्यातील माचाळ

खेड तालुका ऐतिहासिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. विशेषत: ट्रेकींगची हौस असणाऱ्या तरुणाईसाठी या तालुक्यातील भटकंती आनंद देणारी असते. मुंबई-गोवा महमार्गावर भरणे नाक्यापासून उजव्या बाजूस तालुका मुख्यालय आहे. खेड तालुक्यातील किल्ले सह्याद्रीच्या रागांमध्ये असून किल्ल्याला भेट देण्यासाठी बरेच अंतर दुर्गम वाटवरून पायी चालावे लागते. गिर्यारोहणाची आवड असणाऱ्यांसाठी ही भेट स्मरणीय ठरते. इतर पर्यटकांसाठी सह्याद्रीच्या कुशीतील निसर्गसहल आनंददायी असते. हिरव्यागार निसर्गातील ग्रामीण लोकजीवनाचा आनंद देण्यासाठी आंबवली येथे हिवाळ्यात पर्यटक आवर्जुन येतात.

रसाळगड:
खेडपासून 20 किलोमीटर पूर्वेस रसाळगड किल्ला आहे. खेडपासून सुकवली-तळेमार्गे घेरारसाळगडपर्यंत वाहन नेता येते. मात्र गावापासून 3 किलोमीटर पर्वतरांगा चढून वर जावे लागते. किल्ल्याचा विस्तार फारसा नसून क्षेत्रफळ 5 एकर आहे. मात्र किल्ल्यावर कोठार, बालेकिल्ला, तट, बुरुज आदी किल्ल्यात आवश्यक असणाऱ्या सर्व रचनांचे अवशेष पाहायला मिळतात. किल्ल्याच्या मध्यभागी पेशवेकालीन मंदिर आहे. येथे दोन वर्षातून एकदा यात्रा भरते.

महिपतगड:
खेड तालुक्याच्या ठिकाणापासून 30 किलोमीटर पूर्वेस हा किल्ला आहे. रसाळगडहून वडगावमार्गे आणि खेडहून दहिवली, जैतापूर आणि वडगावमार्गे जावे लागते. किल्ल्याच्या पायथ्याशी 'बेलदारवाडी' गाव आहे. किल्ल्याची उभारणी विजापूरकरांच्या काळात झाली. 1661 मध्ये शिवाजी महाराजांनी किल्ला स्वराज्यात सामावून घेतला. दाट झाडीने वेढलेल्या किल्ल्याचा परिसर पर्यटकांना निसर्ग सहलीचा आनंद देणारा आहे. किल्ल्यावर जाताना स्थानिकांची मदत अवश्य घ्यावी. याच परिसरात सुमारगडचे दर्शन घडते. चारही बाजूंनी नैसर्गिक तटबंदी असल्याने या गडावर पोहचणे कठीण असते.

खेडची लेणी:
खेड बसस्थानकापासून जवळच ही लेणी आहेत. त्यामध्ये दोन स्तंभ, एक अर्धस्तंभ आणि एक चैत्य आहे. चैत्यगृहाच्या दोन्ही बाजूस खिडकी आहे. लेण्यांमध्ये तीन कक्ष आहेत. लेण्यांचे काम अर्धवट करण्यात आले असून बौद्धकालीन शिल्पाशी या लेण्यांचे साम्य आहे.
लांजा तालुका

लांजा तालुक्यात फारशी पर्यटनस्थळे नसली तरी मुंबई-गोवा महामार्गावरील आंबा आणि काजूच्या बागांमुळे हा प्रवास सुखद वाटतो. या मार्गावर अनेक ठिकाणाी काजू प्रक्रीया उद्योग सुरू झाले आहेत. काजूच्या बागामधील कृषी पर्यटन केंद्रे पर्यटकांना आकर्षित करतात. रत्नागिरी-लांजा 35 किलोमीटर अंतर आहे.

थंड हवेचे ठिकाण माचाळ :
सह्याद्रीच्या रांगेतील थंड हवेचे ठिकाण म्हणून हे पर्यटनस्थळ विकसीत होत आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या स्थळाचा 'ब' वर्ग पर्यटन स्थळात समावेश केला आहे. 4 हजार फूट उंचीच्या या पठारावर मुचकुंदी ऋषींच्या पवित्र गुहेला भेट देण्यासाठी दरवर्षी भाविक गर्दी करतात. हिरव्यागार वनराईने वेढलेल्या या स्थानाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या सातत्याने वाढते आहे. लांजा-माचाळ हे अंतर 32 किलोमीटर तर तळवडे रेल्वेस्टेशनपासून 15 किलोमीटर अंतरावर आहे.

साटवली किल्ला : 
साटवली गावावरूनच या किल्ल्यास 'साटवलीचा किल्ला' असे संबोधले जाते. किल्ला आकाराने अगदी लहान असून मुचकुंदी नदीच्या किनाऱ्यावर उभारला आहे. तो किल्ले प्रकारातील 'गढी किल्ला' आहे. लांजापासून 23 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. किल्ल्याचा परिसर 5 एकराचा आहे. किल्ल्याला पाच बुरूज आहेत. किल्ल्याला भेट देऊन इतिहासाच्या पाऊलखुणा न्याहाळता येतात.

अंजनारी मठ:
रत्नागिरीहून लांजा येथे जाताना हातखंबापासून 19 किलोमीटर अंतरावर अंजनारी नदीच्या तटावर निसर्गरम्य परिसरात श्री अवधूत दत्त मठाची स्थापना करण्यात आली आहे. या ठिकाणी गुरुदत्ताचे सुंदर मंदिर उभारण्यात आले असून परिसरात उद्यान विकसीत करण्यात आले आहेत. नदीपात्राच्या दोन्ही बाजूस दाट झाडी असल्याने परिसराचे सौंदर्य खुलून दिसते. मंदिराच्या मागच्या बाजूस गरम पाण्याचा झरा आहे. शेजारी असलेल्या नदीपात्रातील गार पाणी आणि झऱ्यातील गरम पाणी असा निसर्गाचा चमत्कार येथे पाहता येतो.
संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार मंडणगड ते चिपळूणमधील वीर चा धबधबा

मंडणगड तालुका

मुंबईहून येताना मंडणगड तालुक्यापासून रत्नागिरी जिल्ह्यात निसर्गाच्या सान्निध्यातील भटकंतीची सुरुवात करता येते. मुंबई-गोवा महामार्गावर म्हाप्रळ पासून 18 किलोमीटर अंतरावर मंडणगड आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र हरिहरेश्वरला भेट देऊन रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करायचा असल्यास केवळ 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या बागमंडला गावाला लागून असलेल्या बाणकोटच्या खाडीत फेरीबोटची सुविधा आहे. आपल्या वाहनासह या बोटीतून प्रवास करतांना केवळ पाच मिनिटात मंडणगड तालुक्यातील वेसवी गावात प्रवेश करता येतो. वेसवी मंडणगड अंतर साधारण 30 किलोमीटर आहे.

मंडणगड किल्ला :
मंडणगड एसटी स्टँडपासून 5 किलोमीटर अंतरावर किल्ला आहे. वाहन किल्ल्याच्या वरच्या भागापर्यंत जाते. रत्नागिरीतील सर्वात प्राचीन किल्ला म्हणून ह्या किल्ल्याचा उल्लेख केला जातो. किल्ल्याची उभारणी बाराव्या शतकात पन्हाळ्याचा राजा भोज याच्या कारकिर्दीत झाली. किल्ल्याची पडझड झालेली असली तरी जुने अवशेष याठिकाणी पाहायला मिळतात. 'गिरीदुर्ग' प्रकारात मोडणाऱ्या किल्ल्याची तटबंदी 8 एकर क्षेत्रात पसरली आहे. किल्ल्यावर कातळात बांधलेल्या तळ्यात बारमाही पाणी असते. या किल्ल्यावरून दिसणारे परिसराचे दृष्य अत्यंत मनोहारी असते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक:
किल्ल्यावरून खाली उतरल्यावर स्टँडच्या बाजूला असलेल्या रस्त्याने आंबडवे गावाकडे जाण्यासाठी रस्ता आहे. मंडणगडपासून 18 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या गावात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे हे मूळ गाव. त्यांच्या घराचेच स्मारकात रुपांतर करण्यात आले आहे. स्मारक परिसराचे सुशोभिकरण करण्यात येत असून परिसरही अत्यंत सुंदर आहे. आंबडवे गावाला जाण्यासाठी पाचरळ फाट्याहून रस्ता आहे.

फेरीबोटची सफर:
आंबडवेहून बाणकोट किल्ल्याकडे जाताना पाचरळ फाट्याला परत येऊन वेसवीमार्गे पुढे जावे लागते. वेसवीच्या अलिकडे रस्त्याच्या कडेलाच मोठी तळी दिसतात. या ठिकाणी पूर्व परवानगीने कोळंबी पालनाची प्रक्रीया जवळून पाहता येते. वेसवीला पर्यटकांसाठी फेरीबोटची व्यवस्था करण्यात आली आहे. या बोटीत गाडीसह बसण्याची मजा अनुभवता येते. अत्यंत अल्पदरातील या प्रवासात पाच मिनिटातच बागमंडला येथे बोट पोहचते. बागमंडला ते श्रीक्षेत्र हरिहरेश्वर अंतर केवळ चार किलोमीटर आहे. श्री हरिहरेश्वराचे दर्शन घेऊन तास-दोन तासात परतता येते.

बाणकोट किल्ला:
वेसवीपासून बाणकोटचा किल्ला 3 किलोमीटर अंतररावर आहे. वाट अरुंद असली तरी वाहन अगदी वरपर्यंत जाते. किल्ला अजूनही चांगल्या स्थितीत आहे. किल्ल्यापासून काही अंतरावर सावित्री नदी वाहते. हीच नदी बाणकोटची खाडी म्हणूनही परिचीत आहे. खाडीतील विहंगम दृष्य नजरेत भरणारे आहे. लिनी या ग्रीक तज्ज्ञाने पहिल्या शतकात या किल्ल्याचा उल्लेख 'मंदगीर' म्हणून केला होता. पोर्तुगीजांकडून मराठ्यांकडे आल्यावर या किल्ल्याला 'हिंमतगड' नाव देण्यात आले. इंग्रजांनी किल्ला आंग्र्यांकडून ताब्यात घेतल्यावर त्यास 'व्हिक्टोरीया' असे नाव दिले. किल्ल्याची तटबंदी अजूनही चांगल्या स्थितीत असून समुद्राच्या बाजूने असलेले भव्य प्रवेशद्वार नजरेत भरते. प्रवेशद्वाराजवळ उभे राहिल्यास समोर खाडीच्या पलिकडे हरिहरेश्वराचा डोंगर दिसतो. किल्ल्यावरून अथांग समुद्राचे दर्शन घडते. खालच्या बाजूस बांधलेले 'ऑर्थर सीट' किल्ल्यावरून स्पष्ट दिसते. हे स्मारक 1791 मध्ये पुण्याचा रेसिडेंट असलेल्या चार्ल्स मॅलेट याच्या पत्निची दफनभूमी आहे.

वेळास:
बाणकोट किल्ल्यापासून तीन किलोमीटर अंतरावर नाना फडणवीसांचे वेळास हे गाव आहे. गावात शिरण्यापूर्वी रस्त्याच्या बाजूला काळ्या कातळावर तयार झालेल्या विविध आकारांचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. तर दुसऱ्या बाजूला खाडीत तयार झालेला सुंदर वाळूचा पट्टा आणि त्याबाजूचे सुरुबनाचे सौंदर्यही पर्यटकांना आकर्षित करते. नाना फडणवीसांनी या गावात तटबंदी आणि दोन देवालये उभारली आहेत. गावात प्रवेश केल्यावर टेकडीलगतच महादेव आणि कालभैरवाची ही दोन मंदिरे दिसतात. गावात नाना फडणवीसांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला आहे.

वेळास समुद्र किनारा:
वेळास गावाबाहेरील पुलाजवळ खाली उतरण्यासाठी पायऱ्या केल्या आहेत. या वाटेने दाट झाडीतून पाच मिनिटे चालत गेल्यास वेळासच्या सुंदर समुद्र किनाऱ्याचे दर्शन घडते. वेळासच्या समुद्र किनाऱ्यावर थंडीच्या दिवसात 'ऑलिव्ह रिडले टर्टल' जातीची कासवे अंडी घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात येतात. कासवाच्या अंड्यांना काही इजा होऊ नये यासाठी पर्यटकांनी काळजी घेतल्यास निसर्गाच्या या अद्भूत ठेव्याचा निखळ आनंद आपल्याला नेहमी घेता येईल. समुद्र किनाऱ्यावरील सुरुबनाचे सौंदर्यही निराळेच आहे.
चिपळूण तालुका

मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईपासून 250 किलोमीटर अंतरावर चिपळूण शहर आहे. पुण्यापासून कुंभार्ली घाटमार्गे चिपळूणसाठी मार्ग आहे. 'परशुरामाची भुमी' म्हणून या परिसराची ओळख आहे. घाटमार्गाने वेढलेल्या या तालुक्यातील निसर्गसौंदर्य पर्यटकांनास भुरळ पाडते. वशिष्ठी नदीपात्राभोवतीचे सौंदर्यही अप्रतिम दिसते. उंच डोंगरमाथ्यावरून कोसळणाऱ्या धबधब्याची शोभा चिपळूणच्या भेटीत पाहता येते. रत्नागिरी-चिपळूण अंतर 91 किलोमीटर आहे.

डेरवणची शिवसृष्टी :
कोकण-गोवा महामार्गावरील सावर्डे या गावापासून 2 कि.मी. अंतरावर डेरवण हे गाव असून या ठिकाणी सितारामबुवा वालावलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य शिवसृष्टी उभारण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध ऐतिहासिक प्रसंगांची शिल्पे या शिवसमर्थ गडावर उभारण्यात आली आहे. ही शिल्पाच्या माध्यमातून साकारलेले ऐतिहासिक प्रसंग प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. शिवराज्याभिषेक सोहळ्याचे शिल्प अत्यंत अप्रतिम असेच आहे. येथे भारतीय वेशातच प्रवेश देण्यात येतो. सकाळी 8 ते सायंकाळी 6 या वेळेत शिवसृष्टी पर्यटकांना पाहण्यासाठी खुली असते. सितारामबुवा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे डेरवण येथे भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर रुग्णालय उभारण्यात आले असून या ठिकाणी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधानी सुसज्य असे भव्य रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयात गोरगरिबांना वाजवी शुल्कात आरोग्य सेवा दिली जाते.
(वालावलकर ट्रस्ट, डेरवण-02355-264159, 264137)

विंध्यावासिनी:
चिपळूणच्या रावतळे परिसरात विंध्यावासिनीचे पुरातन मंदिर आहे. शाक्तपंथीयांना भावणारी यादवकालीन मुर्ति विध्यावासिनी म्हणून ओळखली जाते. ती अष्टभुजा आहे. नवरात्रात येथे मोठा उत्सव होतो.

गोवळकोट किल्ला:
गोविंदगड किंवा गोवळकोट या नावाने ओळखला जाणारा हा किल्ला 'डोंगरी किल्ले' प्रकारातील आहे. चिपळूण शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर कोवळकोट गावाच्या पूर्वेस हा किल्ला आहे. किल्ल्याला उत्तरेकडून वशिष्टी नदीने आणि पश्चिम व दक्षिण दिशेस वाटोळी नदीने विळखा घातलेला आहे. किल्ल्यात तळी, तोफा आणि काही अवशेष पाहायला मिळतात. किल्ल्यास एकूण सात बुरुज आहेत. 1670 मध्ये किल्ल्याची डागडुजी शिवाजी महाराजांनी केल्याचा उल्लेख पाहायला मिळतो. किल्ल्याच्या पायथ्याशी श्रीदेवी करंजेश्वरीचे मंदिर आहे.

श्री क्षेत्र परशुराम:
विष्णूचा सहावा अवतार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परशुरामाचे प्राचीन मंदिर चिपळूणपासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणच्या अलिकडे डाव्या बाजूला डोंगरावर जाणारा रस्ता आहे. हा रस्ता थेट मंदिराजवळ जातो. मंदिराभोवती जांभ्या दगडाची तटबंदी आहे. मधल्या भागात प्राचीन मंदिरे आणि जलकुंड आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात ब्रह्मा, विष्णू आणि महेशाच्या मुर्त्या आहेत. मंदिराच्या दुसऱ्या गाभाऱ्यात श्री परशुरामाचा पलंग असून त्यावर श्रींच्या पादुका ठेवण्यात आल्या आहेत. मंदिराच्या मागच्या बाजूस श्री रेणुकेचे मंदिर आहे. या मंदिराच्या खांबावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. या मंदिराच्या बाजूलाच परशुरामाने बाण मारून निर्माण केलेला 'बाणगंगा तलाव' आहे. दरवर्षी वैशाख शुद्ध प्रतिपदेला तीन दिवसाचा परशुराम जन्मोत्सव असतो. परशुराम मंदिराच्या खालच्या बाजूस महामार्गाच्या कडेला उभे राहून वशिष्ठी नदीच्या पात्राचे विहंगम दृष्य दिसते. मंदिर परिसरात भक्तनिवासाची सोय करण्यात येत आहे.
(संपर्क-02355-258381, 205454)

सवतसडा धबधबा:
चिपळूणपासून 5 किलोमीटर अंतरावर सवतसडा धबधबा आहे. मुंबईहून येताना महामार्गाच्या कडेला डाव्या बाजूस उंचावरून हा धबधबा कोसळताना दिसतो. जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत या धबधब्याला भरपूर पाणी असते. धबधब्याच्या पात्रात चिंब होण्यासाठी शनिवार आणि रविवारी येथे गर्दी होते. पर्यटकांसाठी येथे शेड आणि धबधब्यापर्यंत पाऊलवाटेची व्यवस्था करण्यात आली आहे. पावसाळ्यात पाण्याचा ओघ अधिक असल्याने जरा जपूनच पाण्यात उतरलेले चांगले.

श्रीरामवरदायिनी मंदिर, दादर:
वास्तूशिल्प शास्त्राचा अप्रतिम अविष्कार या मंदिरात पाहायला मिळतो. जयपूरहून आणलेल्या श्रीरामवरदायिनी, श्री वाघजाई देवी आणि श्रीमहिषासूरमर्दिनी देवी यांच्या मुर्त्या हे मंदिराचे खास वैशिष्ट्य आहे. मंदिर परिसर आणि उद्यान पर्यटनाचा आनंद देणारे आहे.चिपळूणपासून 20 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे.

भैरवगड:
भैरवगड किल्ला 'गिरीदुर्ग' किल्ले प्रकारातील आहे. चिपळूणपासून 45 किलोमीटर दक्षिणेस आणि रत्नागिरीपासून 90 किलोमीटर पूर्वेस हा किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी दुर्गवाडी, गोवल, मंजुत्री आणि पाते ही गावे आहेत. किल्ला चढण्यास आणि उतरण्यासाठी कठीण असून गिर्यारोहकांसाठी आव्हानात्मक आहे. दुर्गवाडीवरून जाणारी पायवाट अधिक सोईची आहे. किल्ल्यास सरळ कड्यामुळे नैसर्गिक तटबंदी आहे. किल्ल्यात केवळ इमारतीचे चौथरे शिल्लक आहेत.

शारदादेवी मंदिर, तुरंबव-
मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डे गावापासून 12 किलोमीटर अंतरावर तुरंबव हे तीर्थक्षेत्र शारदादेवीचे देवस्थान म्हणून परिचीत आहे. या तीर्थक्षेत्राला 'क' वर्ग पर्यटनाचा दर्जा आहे. निसर्गसुंदर परिसर लाभलेल्या या देवस्थानाच्या परिसरात नवरात्रातील तिसऱ्या माळेनंतर शारदोत्सवाची सुरुवात होते. त्यानिमित्ताने दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जिल्ह्याच्या अनेक भागातून भाविक आणि पर्यटक या उत्सवात सहभागी होतात. श्री शारदादेवी मंदिराची सुंदर रचना केली आहे. मंदिराच्या समोरच्या बाजूस प्रवेशद्वार असनूा इतर तिही बाजूस दाट झाडी असल्याने हा परिसर सुंदर दिसतो. एरवी इथे असणारी शांततादेखील भाविकांना भावते.

वीरचा धबधबा-
वीर येथे देवपाटचा बारमाही धबधबा आहे. काळ्या कातळातून डोहात कोसळणाऱ्या धबधब्याचे सौंदर्य काही वेगळेच आहे. डोहात जलक्रीडेचा आनंद घेता येतो. धबधब्यापर्यंत जाणारा रस्ता दाट झाडीतून जातो. वीर गावापासून दोन किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे.
संकलन : जिल्हा‍ माहिती कार्यालय, रत्नागिरी

राजापूर आणि संगमेश्वर तालुक्यात थंड व गरम पाण्याचे झरे

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर आणि संगमेश्वर तालुक्यात पर्यटकांना गरम आणि थंड पाण्याचे झरे, कुंडे आकर्षित करतात. चला तर मग जाणून घेऊया... राजापूर आणि संगमेश्वर तालुक्यातील पर्यटनाविषयी.

राजापूर तालुका
राजापूर तालुका धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. तालुक्याच्या विविध भागात प्राचीन आणि सुंदर मंदिरांना भेट देता येते. काजू प्रक्रिया उद्योगांना भेट देऊन ताजे काजूगर परतीच्या प्रवासात खरेदी करता येते. राजापूर तालुक्यात समुद्र किनारची सफरही तेवढीच आनंददायी असते. गड-किल्ल्यावरील भटकंतीचा आनंदही या सफरीत घेता येतो.

कनकादित्य मंदिर, कशेळी:
पावसपासून 18 किलोमीटर अंतरावर कशेळी गावात कनकादित्याचे प्राचीन मंदिर आहे. इथली सूर्यनारायणाची मुर्ती 900 वर्षांपूर्वीची आहे. मंदिर प्राचीन असल्याचा पुरावा मंदिरातील ताम्रपटावरून मिळतो. ताम्रपटावर शिलाहार राजांची वंशावळ दिलेली आहे. मंदिराचा परिसर शांत आणि रम्य आहे. जांभ्या दगडात सजलेला परिसर आणि परिसरातील इतर देवदेवतांची मंदिरे तेवढीच सुंदर आहेत. मंदिरात प्रशस्त सभामंडप आहे. या मंदिरातील मुर्ती सौराष्ट्रमधून समुद्रमार्गे आल्याचे सांगितले जाते. मंदिरात रथसप्तमीला मोठा उत्सव असतो. पावसपासून 13 किलोमीटर अंतरावर उजव्या बाजूस मंदिराकडे जाणारा रस्ता आहे.

महाकाली मंदिर, आडीवरे:कशेळीच्या कनकादित्य मंदिरापासून तीन किलोमीटर आणि पावसपासून 21 किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या डावीकडे आडीवरे गावी महाकालीचे जागृत दैवत आहे. येथे महाकालीसोबत महालक्ष्मी आणि महासरस्वतीची मंदिरेदेखील आहेत. हे पवित्र स्थान आद्य शंकराचार्यांनी 1324 मध्ये स्थापन केले अशी स्थानिकांची श्रद्धा आहे. नवरात्रात येथे मोठा उत्सव असतो.

वेत्ते समुद्रकिनारा:आडीवरे गावाच्या अलिकडे उजवीकडून जाणाऱ्या रस्त्याने गेल्यास चार किलोमीटर अंतरावर दाट झाडींमध्ये असलेला समुद्र किनारा दिसतो. किनाऱ्यावरून सुर्यास्त न्याहाळता येतो. जिल्ह्यातील इतर किनाऱ्यांप्रमाणे हा किनारा वाळूचा नसून खडकाळ आहे. त्यामुळे समुद्रीजीव अभ्यासकांसाठी येथील भटकंती विशेष असते. तसेच खडकाळ किनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर लाटांचे सौंदर्य खुलून दिसते.

आर्यदुर्गा मंदिर, देवीहसोळ:आडीवरे येथून दोन किलोमीटर अंतरावर धारतळे फाटा आहे. येथून सहा किलोमीटर अंतरावर आर्यादुर्गा मंदिर आहे. हे मंदिर पांडवकालीन आहे. कर्नाटकातील अंकोला येथील आर्यादुर्गा देवी देवीहसोळ गावातील देसाई यांच्या प्रार्थनेनुसार ज्या स्थानापर्यंत आली त्या स्थानावर हे मंदिर उभारण्यात आले, अशी आख्यायिका आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला जाकादेवीचे मंदिर आहे. राजापूरपासून उत्तरेला 11 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. पावसपासून हे अंतर 39 किलोमीटर आहे. मार्गशिर्ष महिन्यातील कृष्णाष्टमी आणि नवमीला दीड दिवसांची जत्रा या परिसरात भरते.

यशवंतगड:यशवंतगड किल्ला जैतापूर खाडीच्या काठी उभारलेला आहे. किल्ल्याच्या उत्तरेस अर्धा किलोमीटर अंतरावर नाटे गाव आहे. किल्ल्यास दोन दिशेने खाडीच्या पाण्याचा विळखा असतो. किल्ल्याचा परिसर सात एकरचा आहे. किल्ल्याची उभारणी 16 व्या शतकात विजापूर शासकांच्या कारकिर्दीत झाली आहे. किल्ल्याला भेट दिल्यावर रस्त्याच्या बाजूने असलेली किल्ल्याची मजबूत तटबंदी आणि काही अवशेष पाहता येतात. राजापूर-नाटे 35 किलोमीटर अंतर आहे. तर आडीवरेपासून पाच किलोमीटर अंतरावर नाटे फाटा आहे. येथून आठ किलोमीटर अंतरावर किल्ला आहे.

मुसाकाजी बंदर:यशवंतगडपासून तीन किलोमीटर अंतरावर आंबोळकडे जाणाऱ्या रस्त्यावर डावीकडे मुसाकाजी बंदर आहे. बंदर लहान असले तरी समुद्राचे नितळ पाणी मन प्रफुल्लित करते. बंदरावर बोटींसाठी जेट्टी बांधण्यात आली आहे. निवांतपणे समुद्र किनारची सफर करण्यासाठी हे योग्य स्थान आहे.

आंबोळगड:यशवंतगडहून पुढे गेल्यावर पाच किलोमीटर अंतरावर आंबोळगड आहे. गावात प्रवेश करताना डावीकडे समुद्र किनारा दृष्टीपथास पडतो. गावात शिरल्यावर एस.टी.स्टँडजवळ हा किल्ला आहे. किल्ल्याच्या तटबंदीच्या अवशेषावरून या किल्ल्याची ओळख होते. किल्ला पाच हजार 600 चौ.मीटर क्षेत्रात उभारला आहे. तटबंदीच्या काळ्या बेसाल्ट खडकावरून हा किल्ला शिलाहार काळात अकराव्या शतकात बांधला गेला असावा, अशी माहिती मिळते. किल्ल्यावरील विस्तारलेला वटवृक्ष पर्यटकांसाठी आकर्षण आहे.

श्री गगनगिरी महाराज आश्रम, आंबोळगड:आंबोळगड गावातल्या रस्त्याने पुढे गेल्यावर श्री गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे. आश्रमात सुंदर दत्त मंदिर आहे. महाराजांनी तप केलेल्या जागेचा परिसर शांत जरी असला तरी या भागात समुद्राच्या लाटांचे रौद्ररुप अनुभवायला मिळते. गगनगिरी महाराज ज्या गुहेत तपश्चर्या करीत त्या गुहेला भेट देता येते. या आश्रमाला भेट दिल्यावर निसर्गाच्या सहवासाबरोबर तपोभूमीला भेट दिल्याचा आनंददेखील मिळतो.

अंजनेश्वर, मीठगवाणे:आंबोळगडहून जैतापूरमार्गे गेल्यास 15 किलोमीटर अंतरावर मीठगवाणे गाव आहे. राजापूरपासून हे अंतर साधारण 30 किलोमीटर आहे. गावाचा रस्ता श्री अंजनेश्वर मंदिरापर्यंत जातो. मंदिरातील विहिरीचे पाणी गोड आणि पाचक आहे. या पाण्याने त्वचारोग बरे होतात अशी भक्तांची भावना आहे. मंदिर सातशे वर्षांपूर्वीचे आहे. पूर्वी या परिसरात असलेल्या 'आंजणी' वृक्षाच्या रानात पिंड सापडल्याने त्यास अंजनेश्वर हे नाव देण्यात आले. मंदिर परिसरात भक्तांसाठी सुविधा आहे. (संपर्क-02353-224269)

गरम पाण्याचे झरे, उन्हाळे:मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताना राजापूरपासून दोन किलोमीटर अंतरावर (अंजनेश्वरहून 30 किलोमीटर अंतरावर) रेल्वेस्टेशनकडे जाणारा मार्ग आहे. येथून तीन किलोमीटर अंतरावर उन्हाळे गाव आहे. गावात शिरण्यापूर्वी शिवमंदिर असून या मंदिर परिसरातील भिंतीपलीकडून गंधकयुक्त गरम पाण्याचे झरे वाहतात. परिसरात असलेल्या गोमुखातून 24 तास धारा वाहते. जमिनीतून येणारे उकळते पाणी त्वचारोगनाशक असल्याची येथे येणाऱ्या भक्तांची भावना आहे.

राजापूरची गंगा :उन्हाळे गावातूनच गंगातीर्थकडे जाण्यासाठी रस्ता आहे. वाहनाने जायचे असल्यास दीड किलोमीटर पुढे जावे लागते. गावातील शाळेच्या पटांगणालगत असलेल्या मोकळ्या जागेत 14 कुंडे आहेत. ही कुंडे काळ्या पाषाणाने बनलेली आहेत. दर तीन वर्षांनी याठिकाणी गंगा प्रकट होते आणि ही कुंडे पाण्याने भरून वाहू लागतात. वटवृक्षाखाली असलेल्या कुंडातून प्रथम गंगा प्रकट होते. गंगा प्रकट झाल्यानंतर दोन महिने हा प्रवाह सुरू राहतो. या काळात या स्थानाला तीर्थयात्रेचे स्वरुप प्राप्त होते. गंगा प्रकट होणे ही नैसर्गिक घटना मानली जाते. अभ्यासकांसाठी ही घटना मोठे आकर्षण आहे.

श्री धुतपापेश्वर मंदिर:रत्नागिरीहून आडिवरेमार्गे राजापूरकडे जाताना अर्जुना नदीच्या पुलाखालून धूतपापेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता आहे. राजापूर जवळील धोपेश्वर गावी धुतपापेश्ववराचे पुरातन मंदिर आहे. मंदिराच्या जवळच असलेल्या धबधब्याचे दृश्य पावसाळ्यात अधिकच मनोहारी दिसते. हे शंकराचे मंदिर असून मंदिरात मोठी पिंड आहे. मंदिराचा परिसर अत्यंत रम्य आहे. मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव होतो. (पर्यटकांच्या सुविधेसाठी दूरध्वनी-02353-222950)
संगमेश्वर तालुका
संगमेश्वर तालुका ऐतिहासिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. शिवकालीन इतिहासाची साक्ष देणारे किल्ले, प्राचीन मंदिरे आणि गरम पाण्याचे झरे पर्यटकांना आकर्षित करतात. दाट झाडी आणि वळणाचे रस्ते कोकणातील भटकंतीचा मनमुराद आनंद देतात. मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताना संगमेश्वरी मोदकांची चव घ्यायलादेखील पर्यटक विसरत नाहीत. शास्त्री नदीतटाचा हिरवागार परिसर प्रवासाचा आनंद वाढविणारा आहे. संगमेश्वरला छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली नौका 'संगमेश्वरी' तयार केली, असे इथे सांगितले जाते. महामार्गालगतच नदीच्या तटावर मोठ्या झोपडीवजा जागेत नौका तयार करण्याचे काम सुरु असते. नौकाबांधणीचे काम पाहणे हा महानगरातील पर्यटकांसाठी नवा अनुभव असतो.

श्री क्षेत्र मार्लेश्वर:संगमेश्वर तालुक्यात देवरुखपासून 18 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या निसर्गरम्य दऱ्याखोऱ्यात वसलेले श्री क्षेत्र मार्लेश्वर हे श्री शंकराचे देवस्थान म्हणून ओळखले जाते. डोंगराला वळसा घालून उंच कड्यावर गेल्यावर एका गुहेत हे देवस्थान आहे. मकर संक्रांतीला येथे मोठी यात्रा भरते. या डोंगरावर एक मोठा धबधबा असून त्याखाली स्नान करण्यासाठी भाविकांची खूप गर्दी असते. पावसाळ्यात डोंगरावरून कोसळणाऱ्या धबधब्यांची शोभा अवर्णनीय असते. हिरवागार परिसर आणि विविध पक्ष्यांच्या सहवासात पायवाटेवरून चालताना थकवा जाणवत नाही. मकर संक्रांतीच्या दिवशी येथे मोठा उत्सव असतो. रत्नागिरी ते मार्लेश्वर 63 किलोमीटर अंतर आहे. संगमेश्वरहून देवरुखमार्गे देखील मार्लेश्वरला जाता येते.

मैमतगड:रत्नागिरीपासून 65 किलोमीटर अंतरावर आणि देवरुखपासून 20 किलोमीटर अंतरावर पूर्वेस हा किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी निगुडवाडी गाव आहे. किल्ल्यावर चढण्यासाठी कच्च्या वाटेने पायथ्यापर्यंत वाहन जाते. त्यानंतर दोन ते तीन किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागतो. किल्ला 12 एकर परिसरात पसरलेला आहे. सरळसोट पर्वतकड्यामुळे तीन बाजूंनी किल्ल्याला नैसर्गिक तटबंदी लाभली असून एका बाजूने बांधीव तटबंदी आहे. किल्ल्याला एकूण आठ बुरुज आहे. किल्ल्यात एकूण तीन तोफा आहेत.

टिकलेश्वर मंदिर, देवरुख:देवरुख हे संगमेश्वर तालुक्यातील मुख्यालयाचे ठिकाण आहे. या परिसरातील तळवडे गावाजवळील उंच डोंगरावर असलेले टिकलेश्वराचे मंदिर मुख्य रस्त्यावरूनही दिसते. मंदिर परिसरात कुंडे आहेत. कुंडांमधील गार पाणी प्रवासाचा थकवा दूर करते. परिसरातील भव्य विस्तार असलेले औंदुंबराचे झाड पर्यटकांसाठी विशेष आकर्षण आहे. बाजूला असलेल्या कुंडी घाटातील सौंदर्य पर्यटकांना भुरळ पाडणारे आहे. देवरुखपासून तळवडे गाव चार किलोमीटर अंतरावर आहे. गावापासून मंदिराचे अंतर दोन किलोमीटर आहे. गिर्यारोहणाचा आनंद घेण्यासाठी डोंगरावर जावे. अत्यंत अरुंद पाऊलवाटेने डोंगर चढावा लागतो.

प्रचितगड:या किल्ल्यास उचितगड किंवा श्रृंगारपूरचा किल्ला म्हणूनही ओळखले जाते. किल्ला पाच एकर जागेत उभारण्यात आला आहे. श्रृंगारपूर हे छत्रपती संभाजी महाराजांचे सासर होते. या गावापासून आठ किलोमीटर अंतरावर पूर्वेस सह्यद्रीच्या पर्वतरांगेत हा किल्ला आहे. किल्ल्यात बांधीव तळी, देवी भवानीचे मंदिर, किल्लेदाराचे निवासस्थान आणि कडेलोटाचे ठिकाण आहे. किल्ल्यावर चार तोफा आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी श्रृंगारपूर जिंकून प्रचितगडाची मजबूत बांधणी केली. किल्ला चढण्यासाठी अत्यंत अरुंद वाट असल्याने स्थानिकांच्या मदतीनेच गिर्यारोहणाची आवड असणाऱ्यांनीच किल्ल्यावर गेलेले बरे. इतर पर्यटकांसाठी परिसरातील सह्याद्रीचे सौंदर्य भुरळ पाडणारे आहे. संगमेश्वर-श्रृंगारपूर हे अंतर 12 किलोमीटर आहे.

धोदवणे धबधबा:प्रचितगड किल्ल्याच्या परिसरातील पाज नावाच्या भागात थंडगार पाण्याचे झरे आहेत. उन्हाळी हंगामातही येथे पाणी असल्याने जंगल सफरीचा आनंद घेता येतो. याच भागात 200 फुटावरून कोसळणारा धोदवणे हा धबधबा आहे. हे शास्त्री नदीचे उगमस्थान आहे. संगमेश्वरपासून 15 किलोमीटर अंतरावर नायरी तिवरे रस्त्यावर हा धबधबा आहे. याच परिसरात असलेल्या कुंडी घाटाजवळ गोठणे येथे सह्याद्रीच्या पर्वतराजीत असलेले दाट जंगल आहे. गवे, रानकोंबडी, हरणे आदी वन्य प्राण्यांचे दर्शन येथून घडते. याठिकाणी नैसर्गिक मध मिळतो. ट्रेकिंगची आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी हे भटकंतीचे उत्तम ठिकाण आहे.

कर्णेश्वर मंदिर:संगमेश्वर येथे अलखनंदा, वरूणा आणि शास्त्री या नद्यांचा संगम होतो. मुंबई-गोवा महामार्गावरून रत्नागिरीकडे येताना शास्त्री नदीचा पूल ओलांडल्यावर डावीकडून या संगमस्थळाकडे जाणारा रस्ता आहे. हा रस्ता कर्णेश्वर मंदिराजवळ पोहोचतो. हे मंदिर प्राचीन हेमाडपंथी प्रकारातील आहे. मंदिराचा परिसर अत्यंत शांत आणि रम्य आहे. पांडवांनी अज्ञातवासाच्या काळात आपला सहावा भाऊ कर्ण याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले, अशी कथा येथे प्रचलित आहे. मंदिर अप्रतिम शिल्पकलेचा नमुना आहे. महाद्वाराजवळ अष्टभैरव द्वारपाल, नंदीमंडप, त्रिपूरी खांब, मुख्य मंडप, विविध मुर्त्या, भिंतीवर कोरलेल्या शंकर, नृत्यांगना, किन्नर, यक्ष-यक्षिणी, देव, दानव आदी प्रतिमा प्राचीन शिल्पवैभव आपल्या समोर ठेवतात. मंदिराच्या पलिकडच्या पाऊलवाटेने संगमापर्यंत जाता येते. कसबा संगमेश्वर नावाने ओळखल्या जाणाऱ्या या परिसरातील विविध मंदिरांमध्ये हेमाडपंथी शिल्पांची अप्रतिम कलाकुसर पाहायला मिळते.

छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक:संगमेश्वरपासून जवळच कसबा या गावात सरदेसाई यांचा वाडा आहे. या वाड्यात छत्रपती संभाजीराजे असताना त्यांना औरंगजेबाने अटक केली. त्यांचा अतोनात छळ करून तुळापूर येथे त्यांचा क्रूर वध केला. संभाजी महाराजांची स्मृती जपण्यासाठी गावात त्यांचा अर्धपुतळा आणि स्तंभ स्मारकरुपाने उभारण्यात आला आहे.

गरम पाण्याची कुंडे:मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या आरवली, गोळवली टप्पा, राजवाडी या गावात गरम पाण्याची कुंडे आहेत. आरवली आणि राजवाडी गावातील कुंडात स्नान करण्याची सुविधा उपलब्ध आहे. महामार्गावरील प्रवासादरम्यान काही क्षण विश्रांती करताना या कुंडाना भेट देता येते. राजावाडी येथे हैद्राबादच्या इंडियन जिओलॉजीकल रिसर्च इन्स्टिट्यूटतर्फे संशोधन करण्यात येत आहे.

शिवमंदिर, बुरबांड:आरवली पासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या बुरबांड गावातील शिवमंदिरात अप्रतिम शिल्पकला पाहायला मिळते. या परिसरात प्राचीन काळात 'आमणा' वृक्ष मोठ्या संख्येने होते. त्यामुळे या मंदिराला 'आमनायेश्वर' या नावाने ओळखले जाते. मंदिर परिसरात पाच तीर्थ आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यातून सारंगीसारखा नाद ऐकू येतो.

भवानगड:रत्नागिरीपासून 56 किलोमीटर आणि संगमेश्वरपासून 15 किलोमीटर पूर्वेस भवानगड आहे. राजवाडी ग्रामपंचायतीत समाविष्ट असलेली शिर्केवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी गोळवली-राजवाडीमार्गे रस्ता आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील तुरळमार्गेदेखील दुसरा रस्ता आहे. हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. किल्ल्याची लांबी 158 मीटर आणिा रुंदी 32 मीटर आहे. किल्ल्याच्या तटबंदीचे भग्न अवशेष उरले असून किल्ल्यावर भवानीदेवीचे मंदिर आहे. हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याची डागडुजी करताना बांधले आहे. दरवर्षी पौष महिन्यात देवीचा उत्सव साजरा करण्यात येतो.

संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी

निसर्गरम्य समुद्र किनारा लाभलेला सिंधुदुर्ग जिल्हा...

महाराष्ट्र हे जसे शिवरायांच्या जन्म आणि कर्मभूमीचे स्थान आहे. तसेच प्राचीन इतिहास, शिल्प, मंदिरे, किल्ले, समुद्र किनारे आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला असा हा प्रदेश आहे.

महाराष्ट्रात अनेक महान व्यक्तींची जन्मभूमी आहे. समाजक्रांतीबरोबरच राजकारणाचे, स्वातंत्र्याचे प्रेरणास्थानही महाराष्ट्र आहे. आजही हा महाराष्ट्र इतिहासाची शानदार परंपरा घेवून ताठ मानेने उभा आहे. त्याचे सौंदर्य जाणून घेण्यासाठी पर्यटक नेहमीच उत्सुक असतात. अजिंठा-वेरुळ असो की कोकणचा 720 कि.मी.चा डोळ्यांचे पारणे फेडणारा विशाल समुद्र किनारा असो पर्यटन प्रेमींना महाराष्ट्र नेहमीच खुणावित आला आहे. बीबी का मकबरा, शिवरायांचा रायगड, अष्टविनायकांची तीर्थस्थळे, तुळजापूरच्या भवानीमातेचे मंदिर, कोल्हापूरची महालक्ष्मी, मुंबईचे गेटवे ऑफ इंडिया, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम अशी कितीतरी प्रेक्षणीय स्थळे, अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प, मुंबईचे नॅशनल पार्क, थंड हवेचे महाबळेश्वर सारखी ठिकाणे, अनेक मोठी धरणे, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक (बोरीबंदर) यासारख्या वास्तुसौंदर्याने नटलेल्या भव्य इमारती हे महाराष्ट्राचे वैभव आहे.

डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या सौंदर्याबरोबर इथली रांगडी मराठमोळी संस्कृती, पुरणपोळीसारखे खाद्यपदार्थ, लावणी व तमाशा सारखी लोक संस्कृती, गणेशोत्सव हेही महाराष्ट्राच्या शिरपेचात रोवलेली रत्ने आहेत. महाराष्ट्र खरे तर पर्यटनासाठी पर्वणीच आहे. पर्यटनामुळे माणूस विविध अंगानी समृद्ध होतो. त्याचा बघण्याचा दृष्टीकोन वृंदावतो, त्यांची समृद्धी वाढते आणि माणसाचे माणुसकीचे नाते अधिक घट होते. त्याचबरोबर पर्यटनामुळे पर्यटनस्थळ परिसरातील क्षेत्राच्या विकासाला आणि तेथील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम पर्यटनामुळे होते.

आपल्याला हे पर्यटन करणे सुलभ व्हावे यासाठी या विविधांगी सौंदर्यस्थळांना भेटी देण्यासाठी तिथे कसे पोहोचावे, तेथील राहण्याची व्यवस्था आदी माहिती लोकांना मिळावी व पर्यटनाला चालना मिळावी यासाठी आम्ही महाराष्ट्र पर्यटन लेख मालिका 'महाभ्रमंती' या नावानं सुरु केली आहे. आम्हाला खात्री आहे, महाराष्ट्राबाहेरील पर्यटकांना, देशी-विदेशी नागरिकांना तसेच महाराष्ट्रातील सामान्य माणसालाही आपल्या पर्यटनस्थळांची माहिती होईल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

पहिल्यांदाच राज्याचा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालेल्या सिंधुदुर्ग जिल्यार्तील पर्यटन स्थळांविषयी संक्षिप्त माहिती घेऊया.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गरम्य असा समुद्र किनारा लाभला आहे. या जिल्ह्यात सावंतवाडी हे हस्तकला, खेळणी आदी कलाकुसरीच्या वस्तुसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे. याठिकाणी आपण शिल्पग्राम गावाला भेट देऊ शकतो आणि अनेक कलाकृती खरेदी करुन आपण कलाकारांना उत्तम दाद देऊ शकतो.

मालवण शहर मालवण शहर एकेकाळी समुद्र व्यापारासाठी प्रसिद्ध होते. मिठागर पट्टयासाठी हे शहर प्रसिद्ध आहे. नारळ पोफळीच्या झाडांनी या शहराच्या सौंदर्यात भर टाकली आहे. याठिकाणी आपण उत्तम मालवणी खाद्य पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. रॉक गार्डन हे एक पर्यटकांना आकर्षित करणारे ठिकाण आहे.

तारकर्ली बीच
तारकली बीच म्हणजे शांत आणि निर्मळ वातावरण असलेला समुद्र किनारा आहे. येथे मनसोक्त फेरफटका मारला तरी मनाला वेगळा आनंद मिळतो. याठिकाणी आपण कर्ली नदी समुद्राला मिळते ते ठिकाण पाहू शकतो. बॅकवॉटरमध्ये बोटींग करु शकतो. पुढे बोटीने गेल्यास आपणास समुद्रात स्वच्छंदपणे समुद्राच्या पाण्यातून उडी मारणारे डॉल्फिन मासे पाहण्याचा एक अवर्णनीय क्षण अनुभवता येतो. हाऊस बोट हे येथील खास आकर्षण आहे. देवबाग बीच, निवती बीच, धमणपूर लेक या स्थळांना भेट देता येईल.

सिंधुदुर्ग किल्ला
सिंधुदुर्ग किल्ला हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाचा मानाचा बिंदू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 साली समुद्रात बांधलेला हा किल्ला म्हणजे वास्तुशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी समुद्र किनाऱ्यावरुन बोटीने जावे लागते. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे ठसे उमटविलेले आहेत. त्यांचे मंदिर असून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती आहे. अशी मुर्ती फक्त येथेच पाहायला मिळते. किल्ल्यावरुन या परिसरातील समुद्र किनाऱ्यावरील विलोभनीय दृश्य पाहून मन उल्हासित होते. येथे स्कूबा डायव्हिंग करण्याची सोय आहे.

रेडी गणेश मंदिर
विजयदुर्ग, भुवनेश्वर मंदिर तसेच आंगणेवाडी येथे भराडी देवी मंदिर आहे.

अंबोली
हे सावंतवाडीतील हिल स्टेशन आहे. याला कोकणातील महाबळेश्वर म्हटले जाते.

सिंधुदुर्ग या पर्यटन स्थळाला जाण्यासाठी रेल्वेने जाता येते. कुडाळ, सिंधुदुर्ग ही जवळची रेल्वे स्थानके आहेत. एस.टी. बसची सोय आहे. येथे एमटीडीसीचे तारकर्ली येथे रिसॉर्ट आहे. खाजगी हॉटेल तसेच घरगुती पद्धतीने राहण्याची व्यवस्था उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी एमटीडीसीच्या www.maharashtratourism.gov.in या वेबसाईटला भेट द्या किंवा मुंबईतील मुख्य ऑफिसला संपर्क करण्यासाठी दूरध्वनी क्र. 022-22044040, 022-22845678 टोल फ्री क्रमांक 1800229930.
संकलन- विष्णू काकडे

अलिबागचा ‘कुलाबा’ अन् ‘अजिंक्य जंजिरा’ रायगड दर्यासारंगाच्या कोंदणातील हिरा

रायगड जिल्ह्याची भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली भूमी. एकीकडे दऱ्या-खोऱ्यांचा... डोंगरांचा... वळणावळणाचा... घाटांचा भाग तर दुसरीकडे 240 कि.मी. लांबीचा अथांग अरबी समुद्र. अशी भौगोलिक रचना. ऐतिहासिक असे महत्व. मुंबई या राज्याच्या राजधानीला लगत असलेला जिल्हा. याखेरीज पर्यटकांचाही आवडता आणि मैदानी खेळ कबड्डीचा चाहता, अशी काहीशी या जिल्ह्याची ओळख. 

छत्रपती शिवरायांची राजधानी असलेला रायगड हा गगनाला गवसणी घालणारा गडदुर्ग तर अलिबाग आणि मुरूडच्या दर्यासारंगात आपले अधिराज्य गाजविणारा अलिबागचा कुलाबा आणि मुरूडचा अजिंक्य असलेला जंजिरा हे जलदुर्ग. त्यामुळे पर्यटनाला भरपूर वाव. 

चला तर मग पाहुयात अलिबाग मुरूडमधील हे दोन जलदुर्ग...

कुलाबा किल्लाखुद्द अलिबागच्या समुद्रातील खडकावर कुलाबा व सर्जेकोट ही दुर्गद्वयी उभी आहे. हे दोन्ही किल्ले मिश्रदुर्ग या प्रकारातील. भरतीच्यावेळी कुलाबा हा किल्ला चारही बाजूने पाण्याने वेढला जातो व जलदुर्ग बनतो; तर ओहोटीच्या वेळी चक्क किल्ल्यापर्यंतची जमीन उघडी पडते व किल्ला भुईकोट बनतो. असा हा निसर्गाचा आगळावेगळा चमत्कार पहावयास मिळतो. हा किल्ला समुद्रातील ज्या खडकावर उभा आहे, त्याची दक्षिणोत्तर लांबी 267 मीटर तर पूर्व पश्चिम रुंदी 109 मीटर अशी आहे.

छत्रपती शिवरायांनी समुद्राचे आणि आरमाराचे महत्व जाणून त्याठिकाणी मोक्याच्या बेटावर किल्ले बांधले, जुने किल्ले दुरूस्त केले. 19 मार्च 1680 रोजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे बांधकाम जून 1681 मध्ये पूर्ण केले. त्यानंतर हा किल्ला म्हणजे छत्रपतींच्या आरमारी डावपेचांचा केंद्रबिंदू. सरखेल कान्होजी आंग्रे यांची कारकीर्द येथेच गाजली. 4 जुलै 1729 रोजी कान्होजी आंग्रे ह्यांचे कुलाबा किल्ल्यावर निधन झाले. 1770 मध्ये पिंजरा बुरुजापाशी लागलेल्या भयंकर आगीत किल्ल्यावरील अनेक बांधकामे जळून नष्ट झाली. 1787 मध्ये लागलेल्या दुसऱ्या आगीत आंग्य्राचा वाडा नष्ट झाला. 29 नोव्हेंबर 1721 रोजी ब्रिटीश व पोर्तुगीजांच्या संयुक्त सैन्याने किल्ल्यावर सहा हजार सैनिक व सहा युद्धनौका घेऊन हल्ला केला, पण त्यांचा त्यात सपशेल पराभव झाला.

अनोखी रचनाया किल्ल्याचे प्रवेशद्वार किनाऱ्याच्या बाजूस पण ईशान्येकडे वळवलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्ग स्थापत्यात केलेल्या अनेक प्रयोगांपैकी असलेला एक प्रयोग याठिकाणी पहावयास मिळतो तो म्हणजे, हा दुर्ग बांधताना दगडाचे मोठ-मोठे चिरे एकमेकांवर नुसते रचले. मात्र दोन दगडांमधील फटीत चुना भरला नाही. त्यामुळे समुद्राची लाट किल्ल्याच्या तटभिंतींवर आदळल्यावर पाणी दगडांमधील फटीत घुसते व लाटेच्या तडाख्याचा जोर कमी होतो.

किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर मोर, हत्ती, हरण, कमळ, शरभ अशी शिल्पे कोरलेली आहेत. दुर्गाचा दुसरा दरवाजा अवशेष रुपात शिल्लक आहे. किल्ल्यावर चार टोकांना चार, पश्चिमेला पाच, पूर्वेला चार, उत्तरेला तीन व दक्षिणेला एक असे 17 बुरुज आहेत. या बुरुजांना पिंजरा, नगारखानी, गणेश, सूर्य, हनुमंत, तोफखानी, दारुखानी अशी नावे आहेत.

प्रवेशद्वारातून आत गेल्यावर डाव्या बाजूच्या मार्गाने पुढे जाताना भवानी मातेचे मंदीर लागते. त्यासमोरच पद्मावती देवीचे छोटे व गुलवती देवीचेही मोठे मंदिर आहे. तेथून पुढे गेल्यावर डाव्या बाजूस वाडे, पागा, कोठी यांचे अवशेष दिसतात. डावीकडची वाट हजरत हाजी कमाल उद्दिनशहा दरबार ह्यांच्या दर्ग्याकडे जाते. तसेच परतीच्या वाटेवर डावीकडे आंग्य्रांच्या वाड्याचे अवशेष दिसतात. या किल्ल्यावर अजूनही लोकांचा राबता असलेले सिद्धीविनायकाचे मंदीर आहे. गणेशमूर्ती संगमरवरी असून तिची उंची दीडफूट आहे. 1759 साली राघोजी आंग्रे ह्यांनी सिद्धीविनायकाचे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो. मंदिराच्या प्रांगणात उंचवट्यावर उत्तरेस मारुतीचे व दक्षिणेस शंकराचे मंदिर आहे.

मंदिरासमोर चिरेबंदी बांधणीची गोड्या पाण्याची पुष्कर्णी आहे. पुष्कर्णीच्या पुढे तटापलिकडच्या दरवाजातून बाहेर गेल्यावर स्वच्छ पाण्याची विहीर असून आत उतरण्यास पायऱ्या आहेत. दुर्गाच्या दक्षिण टोकाला असणाऱ्या दरवाजाला धाकटा दरवाजा, यशवंत दरवाजा, दर्या दरवाजा असेही म्हणतात. या दरवाजावर गणपती, गरुड, मारुती, मगर, कमळ, वेलबुट्टी यांची नक्षी कोरलेली आहेत. किल्ल्याच्या दरवाजालगत कान्होजींची घुमटी व द्वाररक्षक देवतेचा शेंदूर फासलेला दगड आहे.

किल्ल्याच्या तटात गोदीचे अवशेष आहेत. तेथे नवीन जहाजे बांधली जात व जुनी दुरुस्त केली जात असत. किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. किल्ल्याच्या उत्तरेला चाके असलेल्या दोन तोफा आहेत. तोफांच्या चाकांजवळ तोफा बनवणाऱ्या कंपनीचे नाव कोरलेले आहे, डाऊसन हार्डी फिल्ड, डाऊ मूट आर्यन वर्क्स, यॉर्कशायर, इंग्लंड. वर्ष 1849 असे आहे.

अजिंक्य जंजिराअलिबागपासून अंदाजे 60 कि.मी. अंतरावर मुरूड हे गाव असून त्याबाजूस जंजिरा याठिकाणी अजिंक्य असा जंजिरा मोठ्या दिमाखात उभा आहे. याच जंजिऱ्याच्या सिद्दीची राजधानी म्हणून मुरुडची ओळख. प्राचीन अशा या किल्ल्यासोबतच किनाऱ्यावरील नारळी-पोफळीची झाडे परिसराच्या सौंदर्यात भर घालतात. समुद्र लाटांचा सामना करीत मजबुतीने उभी असणारी 40 फूट उंचीची किल्ल्याची तटबंदी खास आकर्षण आहे. किल्ल्यातील गोड्या पाण्याचे तलाव, मजबूत बुरूज, तोफा पाहता येतात. हा मुरुड-जंजिरा किल्ला समुद्र किनारपट्टीवर एका ओव्हल आकारातील खडकावर वसलेला आहे.

जझिरे मेहरुब-जंजिरामुरूडजवळील या बेटाचं महत्व ओळखून कोकणातल्या कोळ्यांनी येथे एक मेढेकोट म्हणजे लष्करी ठाणे उभारले. याच्यावर लढून ताबा मिळविणे अवघड आहे हे ध्यानात घेऊन निजामशाही सरदार पिरमखान याने कोळ्यांच्या राजाशी मैत्रीचं नाटक केले आणि दगाबाजीने हे ठाण काबीज केले. इ.स.1567 ते 1571 या काळात येथे दणकट जलदुर्ग उभारला, त्याच अरबी नाव ठेवलं. जझिरे मेहरुब या नावावरुनच पुढे जंजिरा हे नाव प्रचलित झाले. इ.स.1617 पासून येथे सिद्धीची सत्ता सुरु झाली.

जंजिऱ्यावर ताबा मिळावा अशी छत्रपती शिवरायांची तीव्र इच्छा होती. पुढे छत्रपती संभाजी महाराजांनीही जंजिरा जिंकण्याची जिद्द बाळगली होती. त्यासाठी किनाऱ्यापासून या जलदुर्गापर्यंत दगडधोंडयांचा सेतू उभारावा आणि मग हल्ला करावा अशी विलक्षण योजना केली पण औरंगजेबाच्या स्वराज्यावरील आक्रमणामुळे हाही बेत अर्धवट सोडावा लागला. असा हा अजिंक्य जंजिरा भारत स्वतंत्र झाल्यावरच स्वतंत्र झाला.

एकोणीस बुरुजांची तटबंदीएकोणीस बुरुजांची अजस्त्र तटबंदी... मध्यभागी महाभयंकर अशा कलाल बांगडी चावरी आणि लांडा कासम या नावाच्या तीन तोफा... शिवाय शे-दिडशे लहान तोफाही येथे आहेत. गडामध्ये प्रचंड तलाव आहेत. गडाच्या दरवाजात दगडात कोरलेलं एक शिल्प आहे. ज्यामध्ये एका वाघाने आपल्या चार पंजात, शेपटीत व तोंडात असे सहा हत्ती पकडलेले दाखवले आहे. आपल्या दराऱ्याने पश्चिम सागरावर प्रभुत्व गाजवणारा जंजिरा म्हणजे एक देखण दुर्गशिल्प आहे यात शंकाच नाही. मुख्य म्हणजे किल्ला अजूनही सुस्थितीत 21 गोळाबेरीज बुरुज आहे. बुरुजावर मूळ आणि युरोपियन मेक रुस्टींगच्या अनेक तोफांचा आहे.

पर्यटकांनी या दोन्ही किल्ल्यास अवश्य भेट द्यावी आणि स्वराज्याच्या लढ्यातील या मूक साक्षीदारांना डोळे भरुन पहावे. 

कसे जाता येईल...साधारणत: दोन दिवसांचा दौरा सहजरित्या काढता येऊ शकतो. मुंबईहून-पनवेल-वडखळमार्गे अलिबागला यावे. अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावरुन ओहोटीच्या वेळेस किल्ल्यात चालत जावे. अलिबाग येथे वरसोली, किहीम, मांडवा, नागाव आदी बिचवरही पर्यटकांना यादरम्यान भेट देता येऊ शकते. शिवाय मुंबई गेट वे ऑफ इंडिया येथून बोटीनेही अलिबागला जाण्याची सोय आहे. गेट वे ऑफ इंडिया येथून फेरी बोटीने केवळ एका तासात अलिबागला पोहोचता येते. 

तसेच जंजिरा किल्ला पाहण्यास मुरुड किंवा राजापुरी येथून शिडाच्या होडीने किल्ल्यात जावे लागते. हा किल्ला पाहून झाल्यावर पर्यटक जवळच असलेल्या नांदगाव आणि काशीदच्या शांत आणि रम्य समुद्र किनाऱ्याचा आनंद घेऊ शकतात. तसेच त्यांना नंदगावातील श्रीगणेशाच्या प्रसिद्ध मंदिरासही भेट देता येऊ शकते.

संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग. 

संदर्भ :- ‘महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ले’- श्री. मोहन शेटे. 
 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India