प्रचार प्रसार प्रसिद्धी व माहिती संस्थान आपला राजेश खडके www.pppms.org.in

बीड जिल्हा म्हणजे विराट संस्कृतीचं माहेरघरच आहे. या जिल्ह्याचा इतिहास वैदिक काळापासून ज्ञात आहे. वेद आणि पुराणात त्याचा उल्लेख 'अस्माक' असा केलेला असून पांडव काळात त्याला 'चंपावती' असं संबोधले जात असत. उज्जैनीच्या राजांची साडेसाती याच ठिकाणी संपली, त्यावेळी बीडला 'तामलिंगचूर' या नावानं ओळखलं जाई. असं शनी महात्म्यामध्ये वर्णन केले आहे. आंध्र, चालुक्य, राष्ट्रकुट आणि यादवांनी त्यावर राज्य केलं. फारशी भाषेत 'भीर' या शब्दाचा अर्थ पाणी असा होतो. त्याचा अपभ्रंश होऊन बीड हे नाव मोघल काळात रुढ झाले.

महाराष्ट्र राज्याच्या औरंगाबाद महसूल विभागामध्ये केंद्रस्थानी असलेला बीड जिल्हा हा उत्तर अक्षांश 18.3 ते 19.3 अक्षांशामध्ये आणि 74.5 ते 76.5 पूर्व रेखांशामध्ये वसलेला आहे. धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्र. 211 वर बीड शहर असून बीड जिल्ह्याच्या उत्तरेस औरंगाबाद आणि जालना हे जिल्हे, वायव्य, पश्चिम आणि नैऋत्य बाजूस अहमदनगर जिल्हा, दक्षिण बाजूस अहमदनगर आणि उस्मानाबाद आणि आग्नेय, पूर्व आणि ईशान्येस लातूर आणि परभणी हे जिल्हे आहेत. बीड शहराला रेल्वेने जोडलेले नाही मात्र जिल्ह्यातील परळी हे रेल्वे स्थानक 90 कि.मी. अंतरावर आहे. मुंबईपासून रस्तामार्गाने बीडचे अंतर हे 401 कि.मी.आहे. आता आपण जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनाविषयीची माहिती घेऊया...

परळीचे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग
भारतातील स्वयंभू बारा ज्योतिर्लिंगांपैकी वैद्यनाथ हे ज्योतिर्लिंग परळी शहरात आहे. हे मंदीर देवगिरीच्या यादवांच्या श्रीकरणाधिप हेमाद्री यानं बांधलं. त्या मंदिराच्या अवशेषापैकी फक्त नंदी सुस्थितीत राहिलेला होता. पुढं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. गुढी पाडव्याच्या दिवशी वैजनाथांच्या मंदिरात गुढी उभारण्याचा समारंभ असतो. श्रावण महिन्यात येथे रुद्राभिषेक चालतो. दसऱ्याच्या दिवशी देवाची पालखीतून मिरवणूक निघते. मंदिराच्या सभामंडपात एक पितळी व दोन पाषाणी अशा नंदीच्या तीन मूर्ती आहेत. येथे वीरभद्राची एक भव्य पितळी प्रतिमा आहे. मंडपाशिवाय मंदिरात दोन गाभारे असून त्यांचे दरवाजे कलात्मक नक्षीनं सजविलेले आहेत. मुख्य ज्योतिर्लिंगाच्या सभोवती बारा लिंग आहेत.

धारुरचा भुईकोट किल्ला
स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून धारुरच्या भुईकोट किल्ल्याचा उल्लेख करावा लागेल. सुमारे 30 ते 40 एकर क्षेत्रामध्ये तो बांधलेला आहे. शहाजीराजांनी बिदरशहाला या भागातच पराभूत केलं होतं. मोगलांनी धारुर जिंकलं आणि गावाचं नाव फतेहाबाद असं ठेवलं. नेताजी पालकरांना याच किल्ल्यात कैदेत ठेवण्यात आलं होतं. धारुर किल्ला आणि परिसराबाहेर आणखीही प्रेक्षणीय स्थळं आहेत. बीडपासून हे अंतर 55 कि.मी. आहे.

अंबेजोगाईची योगेश्वरी माता
अंबेजोगाई शहर हे बीड जिल्याहीचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक चळवळीचं केंद्र समजल्या जाते. महाराष्ट्रामध्ये देवीची मुख्य पीठ आणि अनेक उपपीठे असली तरी अंबेच्या नावाने प्रसिद्ध असलेले अंबेजोगाई हे एकच शक्तीपीठ अस्तित्वात आहे. योगेश्वरी ही सर्वांचीच देवता असली तरी विशेषत: कोकणातील चित्पावन ब्राम्हणांची ही कुलस्वामिनी आहे. 'योगेश्वरी महात्म्य' या ग्रंथात देवीने दंतासूराचा वध करण्यासाठी अवतार घेतल्याची कथा मांडली आहे. बीडपासून 100 कि.मी. अंतरावर असलेले अंबाजोगाई शहरात मंदिराच्यावतीने भाविकांसाठी यात्री निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.

मराठीचे आद्यकवी मुकुंदराज
संस्कृत भाषेमधील वेदांत शास्त्रासारखं अवघड तत्वज्ञान सामान्य जनतेसाठी सोप्या मराठी भाषेमध्ये सांगणाऱ्या ग्रंथकारांमध्ये आद्यकवि पदाचा मान मुकुंदराजांना मिळाला आहे. जैनधर्मिय राजा जैत्रपाळ याला त्यांनी परमार्थ मार्गाचे ज्ञान दिले. 'विवेकसिंधू' हा मराठीतील आद्यग्रंथ आहे. मुकुंदराजांनी 'परमामृत ' हा ग्रंथ लिहिला. 'विवेकसिंधू' या ग्रंथाचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग आहेत. पूर्वार्धामध्ये 777 ओव्या आणि उत्तरार्धामध्ये 894 ओव्या आहेत. विवेकसिंधूमध्ये अव्दैतवादाची महती सांगितली असली तरी सामान्य जनतेसाठी राजयोगाचा मार्ग सांगितला आहे. राजयोग प्राप्तीचा सोपा मार्ग म्हणजे सगुणोपासना होय. विवेकसिंधूमध्ये प्रतिपादन केलेल्या विषयांचा सारांश परमामृत ह्या छोट्याशा ग्रंथात मुकुंदराजांनी सांगितला आहे. या ग्रंथांच्या 14 प्रकरणामध्ये एकंदर 303 ओव्या आहेत. अंबाजोगाई शहराच्या वायव्य दिशेस पाच किलोमीटर अंतरावर मुकुंदराजांची समाधी आहे.

संतकवी दासोपंत
संतकवी दासोपंत यांची अंबाजोगाई ही कर्मभूमी आहे. एकट्या गीतेवरच त्यांचे सहा निरनिराळे टीकाग्रंथ आहेत. त्यापैकी 'गीतार्णव' नावाचा ग्रंथ सव्वा लाख ओव्यांचा आहे. छापखान्याची सोय नसलेल्या 400 वर्षांपूर्वीच्या काळात आपलं बहुमोल साहित्य दीर्घ काळापर्यंत टिकून रहावं म्हणून त्यांनी पासोडी वस्त्रावर परिश्रमपूर्वक लेखन केलं. 40 फूट लांब अणि 4 फूट रुंद पासोडीवर दासोपंतांनी 'पंचीकरण' हा ग्रंथ लिहिला. ही दासोपंतांची पासोडी आजही त्यांच्या वारसांकडे येथे जतन करुन ठेवण्यात आलेली आहे. संगीताच्या क्षेत्रातही दासोपंतांनी अत्यंत मौलिक कार्य केलं आहे. दासोपंतांनी 'गीतार्णव', 'पदार्णव', 'गीतार्थबोध चंद्रिका' यासारखे ग्रंथ लिहिले.

राक्षसभुवन
गेवराई तालुक्यामधील राक्षसभुवन हे गोदावरीच्या तीरावर वसलेलं शनिदेवाचे जागृत स्थान मानले जाते. शनि आमावस्येला देशभरातून हजारो भाविक याठिकाणी दर्शनाला येतात. ऐतिहासिकदृष्टयाही हे महत्त्वाचं स्थळ आहे. सुप्रसिद्ध राक्षसभुवनची लढाई निर्णायक स्वरुपात याच ठिकाणी लढली गेली. गोदावरीच्या उत्तर तीरावरील महानुभव पंथाचं पांचाळेश्वर हे ही महत्त्वाचे पवित्र स्थान आहे.

कपिलधार
वीरशैव पंथाचे पुनर्जिवन करणारे महात्मा बसवेश्वर तसेच शिवयोगी मन्मथ स्वामी यांनी कपिलधार याठिकाणी अनेक वर्षे तपश्चर्या केली. नयनरम्य डोंगरदऱ्यांचा हा प्रदेश असून याच ठिकाणी संख्या शास्त्रकार कपिल महामुनींनी तपश्चर्या केली होती. म्हणून या भागास कपिलधार असे म्हणतात. येथील धबधबा मनमोहक आहे. कपिलधार हे तीर्थक्षेत्र बीड शहरापासून साधारण 20 कि.मी.अंतरावर आहे.

कनकालेश्वर मंदीर
बीड शहराच्या पूर्वेस असलेलं कनकालेश्वर हे शिवशंकराचे मंदिर आहे. शिल्पकलेचा आणि वास्तूकलेचा हा एक सुंदर नमुना. या मंदिराचे बांधकाम यादवकालीन आहे. शिल्पाचे वैशिष्यं.य आणि पोत हे आजही या शिल्पावर स्पष्टपणे दिसतात. सर्व बाजूंनी पाणी आणि आत शिवालय आहे. 'पाण्यात देऊळ' पण मजबूत आणि भव्यदिव्य असून मंदिरातील आणि बाहेरचे कोरीव देवदेवतांचे विविध प्रकारचे शिल्प अगदी प्रेक्षणीय आणि डोळ्यांचं पारणं फेडणारे आहे. बीडचं ग्रामदैवत असल्यानं इथं दरवर्षी महाशिवरात्रीला फार मोठी यात्रा भरते. याच मंदिराच्या पूर्वेस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी बांधलेलं खंडेश्वरी देवीच मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे शहराचं भूषणच. आदिशक्ती माहूरवासिनी रेणूकादेवी सूर्यसुरी या भक्ताच्या विनंतीवरुन ही देवी इथं आली, अशी आख्यायिका आहे. दरवर्षी नवरात्रात येथे फार मोठी यात्रा भरते.

खजाना विहीर
बीड शहरापासून पाच कि.मी. अंतरावर खजाना बावडी ही विहीर आहे. ही विहीर हिजरी 991 मध्ये निजाम बादशहाच्या सलाबत खान नावाच्या सरदारानं बांधली. या विहिरीत सतत ठराविक पातळीवर पाच ते सहा फूट इतकंच पाणी असतं. या अद्भूत विहिरीद्वारे परिसरातील सुमारे 600 एकर जमिनीला पाणी दिलं जाते.

नायगाव मयूर अभयारण्य
बीड शहरापासून 25 कि.मी. अंतरावर पश्चिमेला असलेल्या नायगाव या गावाच्या परिसरात हे अभयारण्य आहे. 1994 साली शासनाने या अभयारण्यास मान्यता दिली. त्यामुळं महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील पहिलं मयूर अभयारण्य म्हणून नायगावला महत्त्व प्राप्त झाले आहे. या मयूर अभयारण्यात 10 ते 12 हजारांच्या दरम्यान मोरांची संख्या आहे. त्याचबरोबर तरस, लांडगे, कोल्हे, सायाळ, खोकड, रानससे, रानमांजर, काळवीट, हरिण, मुंगूस इत्यादी प्राणी देखील आहेत. या अभयारण्यापासून साधारण 40 कि.मी. अंतरावर निसर्गरम्य असा सौताडा धबधबा आहे. समाधानकारक पाऊस झालेला असेल तर जुलै ते सप्टेंबर या कालावधीत मनमोहक धबधबा या ठिकाणी पहावयास मिळतो.

असा हा बीड जिल्हा ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रसिद्ध व पर्यटकांना आकर्षित करणारा आहे. संत-महात्म्यांच्या परंपरेचा वारसा सांगणाऱ्या, धार्मिक, ऐतिहासिक व मनोहारी पर्यटनस्थळांना हौशी पर्यटकांनीच नव्हे तर प्रत्येकाने भेट देऊन या परंपरेचा अनुभव घ्यायलाच हवा.

-अनिल आलुरकर
जिल्हा माहिती अधिकारी, बीड.

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India