डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे

पारंपरिक विद्यापीठांच्या तसेच स्वायत्त विद्यापीठांच्या बरोबरीने महाराष्ट्रातील तसेच देशविदेशातील विद्यार्थ्यांना विद्यादानाचे मदतकार्य तंत्रशास्त्राच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ करीत आहे. राज्यातील तंत्रशास्त्राचे एकमेव विद्यापीठ म्हणून या विद्यापीठाचा उल्लेख करावा लागेल. अत्यंत निसर्गरम्य अशा परिसरात या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली असून रायगड जिल्ह्याच्या शैक्षणिक वैभवात या विद्यापीठामुळे निश्चितच मोठी भर पडलेली आहे.

स्थापना :

तंत्रज्ञानात विकास: (Development Through Technology) हे बोधवाक्य घेऊन महाराष्ट्र शासनाने 1989 साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची स्थापना रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील लोणेरे येथे केली. राज्यातील एकमेव तंत्रशास्त्र विद्यापीठ म्हणून या विद्यापीठाची ओळख आहे. महाराष्ट्रातील अभियांत्रिकी व तंत्रशास्त्राचे एकमेव केंद्र म्हणून अल्पावधित या विद्यापीठाने नावलौकिक मिळविला आहे. 

विस्तार :

मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 वर लोणेरे येथे 525 एकर एवढ्या विस्तृत परिसरात उभारणी करण्यात आलेली आहे. महाड शहरापासून 22 कि.मी. तर माणगाव शहरापासून 10 कि.मी. अंतरावर तर रायगड किल्ल्यापासून 22 कि.मी. अंतरावर हे विद्यापीठ आहे. ठाणे, बेलापूर, नागोठणे पाताळगंगा, रोहा, महाड अशा औद्योगिक वसाहतींच्या सानिध्यात या विद्यापीठाचा परिसर व्यापलेला आहे. त्यामुळे येथील तंत्रज्ञानाचा उपयोग या औद्योगिक क्षेत्रासाठी होत आहे. 

अभ्यासक्रम :

तंत्रज्ञान विद्यापीठ असल्यामुळे या विद्यापीठामध्ये अभियांत्रिकी व तंत्रशास्त्रचे पदवीसाठी 8 व पदविकेसाठी 8 असे शैक्षणिक विभाग आहेत. यामध्ये केमिकल इंजीनिअरिंग, सिव्हील इंजीनिअरींग, कॉम्प्युटर इंजीनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजीनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँन्ड टेलिकम्युनिकेशन इंजीनिअरिंग, इन्फॉरमेशन इंजीनिअरिंग, मेकॅनिकल इंजीनिअरिंग, पेट्रोकेमिकल इंजीनिअरिंग आदींचा समावेश आहे. तसेच पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचाही समावेश करण्यात आला असून बी.टेक. 4 वर्षांचा अभ्यासक्रम, एम.टेक. 2 वर्षांचा अभ्यासक्रम, पी.एच.डी.चा 2 वर्षांचा अभ्यासक्रम, तर तीन वर्षांचा डिप्लोमाचा तसेच एक वर्ष कालावधीचा ॲडव्हान्स डिप्लोमाचाही समावेश आहे. विद्यापीठात जवळपास सर्व विद्याशाखांचे मिळून 4 हजार विद्यार्थी तंत्रशास्त्राचा अभ्यास करीत आहेत. 

विविध उपक्रम :

केवळ शैक्षणिक नव्हेच तर इतर महत्त्वाचे उपक्रमही विद्यापीठामार्फत राबविले जातात. राज्यपाल महोदयांचा महत्त्वाचा असा समजला जाणारा उपक्रम म्हणजे इंद्रधनुष्य. हा सांस्कृतिक कलाविष्कारांना वाव देणारा युवा महोत्सव असतो. राज्यातील सर्व विद्यापीठांचे विद्यार्थी यात सहभाग घेऊन सांस्कृतिक कलांचा आविष्कार येथे दाखवितात. दोन वर्षापूर्वी या इंद्रधनुष्याचे आयोजन लोणेरे विद्यापिठात यशस्वीरित्या करण्यात आले आणि तंत्रज्ञान विद्यापीठ असूनही सांस्कृतिक महोत्सवाचे यथार्थ असे सुरेख दर्शन विद्यापीठाने दाखवून दिले. याखेरीज विद्यापीठाचा नियमित असा वार्षिक स्नेहसंमेलनाचा 'अभियंता वसंत' हा कार्यक्रम असतो. ॲन्युअल होस्टेल डे सारखे उपक्रमदेखील विद्यापीठाच्या वस्तीगृहातून राबविले जातात. एन.एस.एस., एन.सी.सी.सोबतच क्रीडाविषयक उपक्रम वार्षिक क्रीडा स्पर्धा देखील विद्यापीठात नियमितपणे घेतल्या जातात. वादविवाद, वकृत्व, निबंध आदींचेही आयोजन होते. अभियांत्रिकी हा वार्षिक अंकही प्रकाशित केला जातो. 

त्यामुळे केवळ तंत्रज्ञानाचे विद्यापीठ म्हणून या विद्यापीठाकडे न पाहता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याकडेही विद्यापीठाचे लक्ष असते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.वासुदेव एन. गाडे (प्रभारी) यांच्या नेतृत्वात व कुलसचिव डॉ.विकास सरगडे यांच्या मार्गदर्शनात या विद्यापीठाचे कार्य सुरू आहे. केवळ कोकणातीलच नव्हे तर राज्यातील तसेच देशातील विद्यार्थ्यांसाठी तंत्रशास्त्राचे महत्त्वाचे विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. 

संपर्क :

या विद्यापीठाशी http://dbatuonline.com संकेतस्थळासोबतच दुरध्वनी क्रमांक : 02140-275081, 275212 व फॅक्स क्रमांक : 02141-275040, 275142 यावर संपर्क केला जाऊ शकतो.

- डॉ.राजू पाटोदकर,
जिल्हा माहिती अधिकारी, रायगड-अलिबाग.

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India