कोकणातील मिनी महाबळेश्वर : दापोली

हिरव्यागार डोंगररांगांवर ठिपक्यासारखी दिसणारी घरे, मोकळी हवा आणि शहरातून फेरफटका करतांना दिसणारे विविध रंगी पुष्पसौंदर्य हे दापोली शहराचे वैशिष्ट्य आहे. शहराच्या गजबजाटापासून दूर निसर्गाचे वरदान लाभलेल्या या शहराचे सौंदर्य पर्यटकांसाठी आकर्षण आहे. थंडगार हवेमुळे हे शहर 'मिनी महाबळेश्वर' म्हणून ओळखले जाते. पावसाळ्यात दापोली परिसराची भटकंती करताना बहावा, पेव, दयाळू, अग्निशिखा, मधूनच डोकविणारी विविधरंगी जास्वंद अशा अनेक फुलांचे सौंदर्य डोळ्याचे पारणे फेडते. समुद्र सपाटीपासून साधारण आठशे फूट उंचीवर असलेले हे शहर इंग्रजांच्या काळात 'दापोली कॅम्प' म्हणून परिचित होते. सुंदर समुद्र किनारे, किनाऱ्यावर हिवाळ्यात येणारे 'सी गल' पक्षी, याच दरम्यान मधूनच घडणारे डॉल्फीनचे दर्शन, समुद्र किनारचा मासोळी बाजार, ऐतिहासिक गड-किल्ले आणि इमारतींसाठी दापोली तालुका प्रसिद्ध आहे. अनेक थोर व्यक्तिमत्वांची खाण म्हणून हा परिसर ओळखला जातो.

दापोलीला जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरून म्हाप्रळ-मंडणगड-पालगडमार्गे रस्ता आहे. मंडणगड-दापोली हे अंतर 30 किलोमीटर आहे. मंडणगडहून कोकण भ्रमंती सुरू केल्यास वेळास-केळशी-आंजर्ले-मुरुडमार्गेदेखील दापोलीला येणे शक्य आहे. वेळास-दापोली हा दोन तासांचा प्रवास आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील खेड शहरातून दापोली 35 किलोमीटर अंतरावर आहे.

दापोली तालुक्यातील महत्त्वाची पर्यटन स्थळे :

पालगड:
मंडणगडपासून साधारण बारा किलोमीटर अंतरावर दापोली तालुक्यातील पालगड येथे पूज्य साने गुरुजींचे जन्मगाव आहे. या ठिकाणी पारंपरिक कोकणी पद्धतीच्या स्मारकात गुरुजींच्या जिवनातील अनेक प्रसंग छायाचित्रांच्या रुपात प्रदर्शित करण्यात आले आहेत. गावातील प्राथमिक शाळेत गुरुजींचे प्राथमिक शिक्षण झाले होते. ट्रेकींगची आवड असल्यास गावालगतच असलेल्या पालगड किल्ल्यावर जाऊन प्राचीन अवशेष पाहता येतात. मात्र किल्ल्याची भटकंती करतांना स्थानिकांची मदत अवश्य घ्यावी.

केळशी समुद्र किनारा:
मंडणगडची सफर पुर्ण करून दापोलीकडे जाताना वाटेवर केळशीचा समुद्र किनारा लागतो. नारळाच्या दाट झाडीतून समुद्राकडे गेल्यावर किनाऱ्यावर दाट सुरुबन लागते. समुद्र किनारा विस्तीर्ण असून उटंबर डोंगराजवळील कातळाच्या भागात विविध आकाराचे शंख-शिंपले सापडतात. शांत-निवांत वाटणाऱ्या या परिसरात वाहनांची वर्दळही कमी असल्याने पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटता येतो.

महालक्ष्मी मंदिर, केळशी:
केळशी गावाच्या दक्षिण टोकाला उटंबर डोंगराच्या पायथ्याशी पेशवाई काळातील महालक्ष्मी मंदिर आहे. मंदिर परिसरात तळे असून उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था आहे. मंदिराचा परिसर सुंदर आहे. संध्यासमयी सनईचे सूर कानावर येत असतांना पाय मंदिराच्या परिसरातच रेंगाळतात. मंदिराचे बांधकाम पेशवाई काळातील आहे. उटंबर डोंगरावरील वनराईच्या पार्श्वभूमीवर मंदिराचे सौंदर्य खुलुन दिसते.

याकूबबाबा दर्गा, केळशी:
महालक्ष्मी मंदिराच्या उजव्या बाजूने 'हजरत याकूबबाबा सरवरी रहमतुल्ला दर्ग्या'कडे जाण्यासाठी अरुंद रस्ता आहे. पाचच मिनीटात दर्ग्यापाशी पोहचता येते. याकूबबाबा सिंध प्रांतातून बाणकोटमार्गे केळशीला पोहोचल्याचे सांगितले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांची दाभोळ स्वारीची तयारी सुरू असतांना त्यांची व याकूबबाबांची भेट झाली. याकूबबाबांनी त्यांना स्वारीसाठी मार्गदर्शन केल्याचे वर्णनही या भागात ऐकायला मिळते. याठिकाणी डिसेंबर महिन्यात मोठा 'उरुस' होतो. या सोहळ्यात अनेक हिंदू व मुसलमान भावीक सहभागी होतात.

कड्यावरचा गणपती, आंजर्ले:
केळशीहून दापोलीकडे जाताना साधारण वीस किलोमीटर अंतरावर आंजर्ले गाव आहे. गावात प्रवेश करण्यापूर्वी उजवीकडे श्रीगणेशाचे जागृत दैवत आहे. या स्थानाला 'कड्यावरचा गणपती' म्हणून ओळखले जाते. या मंदिराकडे जाणारा रस्ता दाट झाडीतून जातो. मंदिराचा परिसर निसर्गरम्य आहे. देऊळ 11 व्या शतकातील असून त्याचा 1780 मध्ये जिर्णोद्धार करण्यात आला आहे. मंदिराच्या रचनेत प्राचीन भारतीय, मध्ययुगीन रोमन आणि अर्वाचीन पाश्चात्य वैशिष्ट्यांचा संगम झालेला दिसतो. मंदिराच्या समोरच्या बाजूस तळे आहे. मंदिराशेजारी असणाऱ्या शंकराच्या मंदिराची रचनादेखील तेवढीच रेखीव आहे. मंदिर परिसरात असलेल्या भक्तिधामात भाविकांसाठी निवास व भोजन व्यवस्था होते. (दूरध्वनी-02358-234300)

समुद्र किनारा, आंजर्ले:
श्रीगणेशाचे दर्शन घेऊन खाली उतरल्यावर आंजर्ले गाव आहे. गावातून अरुंद रस्ता समुद्राकडे जातो. आंजर्लेचा शुभ्र वाळूचा पट्टा असलेला समुद्र किनारा पर्यटकांना आकर्षित करतो. समुद्र किनाऱ्याची मजा लुटल्यावर दाट झाडीतून दापोलीकडे जाताना खाडीवर बांधलेल्या पुलावरून सुंदर दृष्य दिसते. अनेक बोटी या खाडीत विसावलेलया असतात. बोटींवरचे विविध रंगी झेंडे आणि बोटींचे रंग, शीड हे सर्व कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासारखे असते. दापोलीला हर्णे मार्गे न जाता वरच्या डोंगराच्या बाजूने गेल्यास आंजर्ले समुद्रतटाचे नयनरम्य दृष्य प्रत्येक वळणावर समोर दिसते. समुद्रात दिमाखाने उभा असलेला सुवर्णदुर्गदेखील दूरूनच नजरेस पडतो. रस्त्याच्या दोन्ही कडेला असलेल्या सुरुच्या झाडांमुळे हा प्रवासही सुखद वाटतो.

मुरुड:
आंजर्लेच्या खाडीला लागून असलेल्या डोंगररांगामधून प्रवास करून खालच्या बाजूस आल्यावर समोरच मुरुडचा समुद्र किनारा दिसतो. समुद्र शांत असला तर या ठिकाणी लहान तराफ्यातून जावून डॉल्फीनची जलक्रीडा पाहता येते. सकाळच्या वेळी या भागात 'सी गल' पक्षांचे थवे कॅमेऱ्यात कैद करता येतात. सकाळच्या स्वच्छ सुर्यप्रकाशात समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटांच्या पार्श्वभूमीवर किनाऱ्यावरून उंच झेपावणाऱ्या पक्षांचे मनोहारी दृष्य पाहायला मिळते.

मुरुड गावाकडे जाणारा रस्ता दाट झाडीतूनच जातो. खाडी ओलांडून जातांना विविधरंगी पक्ष्यांचे दर्शन घडते. हे थोर समाजसुधारक धोंडो केशव कर्वे यांचे गाव. गावात शिरताच डाव्या बाजूस त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे दर्शन घडते. थोडे पुढे जाऊन वळल्यावर समुद्राकडे जाणारा रस्ता आहे. दोन्ही बाजूला असणाऱ्या उंचच उंच नारळ-पोफळीच्या झाडीतून किनाऱ्याकडे जाताना मजा वाटते. रस्त्याला लागूनच दुर्गादेवीचे पुरातन मंदिर आहे. विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यावर क्रीकेट किंवा फुटबॉल खेळायला पर्यटकांना आवडते. किनाऱ्यावरील स्टॉलवर क्रीडा साहित्य भाड्याने देण्याची व्यवस्था आहे. या परिसरात आने 'बीच रिसॉर्ट' पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज आहेत. सोबतच निवास-न्याहरी योजने अंतर्गत घरगुती राहण्याची व्यवस्थाही बऱ्याच ठिकाणी आहे.

हर्णे बंदर:
मुरुडपासून हर्णे बंदर 7 किलोमीटर अंतरावर आहे. गावत जाण्यासाठी दाट नारळाच्या झाडीतून गेलेला अरुंद रस्ता आहे. गाव ओलांडून गेल्यावर कोळ्यांची वस्ती लागते. या वस्तीला लागूनच हर्णे बंदर आहे. मासेमारीसाठी या बंदराचा उपयोग होतो. बंदराला लागून असलेले दिपगृह कोकण किनारपट्टीवरील सर्वात जुने दिपगृह आहे. धक्क्याला लागून असलेल्या कनकदुर्गच्या पायऱ्या चढून वरच्या बाजूस गेल्यास हे दिपगृह दिसते. सकाळी लवकर हर्णे बंदरावर गेल्यास इथला मासेबाजार पाहता येतो. सकाळी किनाऱ्याला लागलेल्या नौकामधून ताजे मासे उतरविले जातात. विविध रंग आणि आकाराचे मासे पाहणे ही खास पर्वणी असते. पारंपरिक वेशातल्या कोळ्यांचे जीवनही इथे जवळून पाहता येते. रस्त्याने जाताना कोळ्यांची जाळी कशी विणली जातात तेदेखील पाहायला मिळते.

सुवर्णदुर्ग, हर्णे:
कोकणातील हा महत्वाचा जलदुर्ग आहे. समुद्र किनाऱ्यापासून अडीचशे मीटर अंतरावर 8 एकर क्षेत्रात हा किल्ला विस्तारलेला आहे. जिल्ह्यातील सर्वात उंच परकोट किल्ला म्हणूनही हा किल्ला ओळखला जातो. अखंड तटबंदी असलेल्या या किल्ल्याला केवळ दोनच दरवाजे आहेत. किल्ल्यात निकामी झालेल्या अनेक तोफा बघायला मिळतात. किल्ला बघायला लहान बोटीतून जावे लागते. हा किल्ला कान्होजी आणि तुळाजी आंग्रेंच्या पराक्रमाचा साक्षीदार आहे.

कनकदुर्ग, फतेहगड, गोवा किल्ला:
हर्णे समुद्र किनाऱ्याला लागून सुवर्णदुर्ग किल्ल्याचे उपकिल्ले म्हणून कनकदुर्ग, फतेहगड आणि गोवा किल्ला हे तीन किल्ले ओळखले जातात. सुवर्णदुर्गकडे जाताना प्रथम गोवा किल्ल्याचे दर्शन घडते. किल्ल्याचा मुख्य दरवाजा उत्तरेस असून तटाजवळ मारुतीची मुर्ती आहे. किल्ल्याची तटबंदी चांगल्या अवस्थेत आहे. गोवा किल्ल्याच्या डाव्या बाजूस फतेहगड आहे. या गडाच्या सर्व खुणा लुप्त झाल्या असून या ठिकाणी कोळ्यांची वस्ती झालेली आहे. कनकदुर्गच्या बाजूने केवळ तटबंदीचा काहीसा भाग दृष्टीपथास पडतो. हर्णे धक्क्याला लागून कनकदुर्ग आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या असून तटबंदीचा भाग पडलेला आहे. दोन एकर परिसरातील या किल्ल्याच्या तीन बाजूंनी समुद्र आहे.

व्याघ्रेश्वर मंदिर, आसूद:
पर्यटनादरम्यान प्रवासाचा थकवा घालविण्यासाठी मुरुडपासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या आसूदगावाला आवर्जुन भेट द्यावी. गावातील जोशी बागेजवळ व्याघ्रेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. सुमारे 800 वर्षापूर्वीचे हे शंकराचे जागृत स्थान अनेकांचे कुलदैवत आहे. गर्भागृहाला लागून असलेल्या सभामंडपात पाषाणनंदीची भव्य मूर्ती आहे. मंदिराच्या शेजारून वाहणाऱ्या भातखंडी नदीचा नयनरम्य परिसर भाविकांचा थकवा दूर करतो. मंदिराच्या समारेच्या बाजूस कोरीवकामाचा अप्रतिम अविष्कार पाहायला मिळतो. प्रवेशभागाजवळ दिपमाळ आहे. मंदिराशेजारीच ग्रामदैवत झोलाईदेवीचे मंदिर आहे.

केशवराज मंदिर, आसूद:
व्याघ्रेश्वर मंदिरापासून पाचच मिनिटात आपण आसूदबागजवळ पोहचतो. दापोलीपासून आसूदबाग 6 किलोमीटर अंतरावर आहे. नारळ-पोफळीच्या दाट बागा, वाळत खातलेल्या सुपाऱ्या, आणि पांरंपरिक पद्धतीची कोकणी टूमदार घरांचे सौंदर्य इथे पाहायला मिळते. आसूदबागला दाबकेवाड्यापासून खालच्या बाजूस पायवाट जाते. गाडी येथेच पार्क करून खालच्या बाजूस श्री केशवराज मंदिराकडे पायवाट जाते. काही सेंकंद पायी चालल्यावर स्वर्गातील सौंदर्याची जाणीव होईल, असा हिरवागार निसर्ग आपल्या सभोवती असतो. झुळझुळ वाहणारे पाणी, पोफळीची सरळ उभी असलेली झाडे, रस्त्यावर पडलेला गुलागीशार जामच्या फुलांचा सडा, हवेतला गारवा...अशा रम्य वातावरणातील भटकंती स्मरणीय अशीच असते. कोटजई नदीचे पात्र ओलांडून डोंगररावरील मंदिराकडे जावे लागते. मंदिर पेशवेकालीन असून श्री विष्णूची सुंदर मुर्ती गाभाऱ्यात आहे. हे दैवत श्री लक्ष्मी केशवराज म्हणूनही परिचीत आहे. मंदिराच्या परिसरात असणाऱ्या गोमुखातून थंड आणि शुद्ध पाणी चोवीस तास वाहत असते. दगडाच्या चिंचोळ्या नालीतून हे पाणी खाली आणले गेले आहे. केशवराजाचे दर्शन घेतल्यानंतरही परिसरातून बाहेर पडावेसे वाटत नाही. निसर्गाचा हा अद्भूत अविष्कार एकदातरी अनुभवायला हवा.

दापोली शहर: 
आसूद गावापासून दापोली केवळ 6 किलोमीटर अंतरावर आहे. दापोली थंड हवचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. दापोलीला आल्यावर कोकण कृषी विद्यापीठाला आवर्जुन भेट द्यावी. 1972 मध्ये स्थापन झालेल्या या विद्यापीठात कृषी क्षेत्राशी निगडीत अनेक नवे प्रयोग अचंभीत करणारे तेवढेच शेतीत रुची असणाऱ्यांसाठी उपयुक्त आहेत. विद्यापीठातील विविध उद्यानांची रचनादेखील तेवढीच सुंदर आहे. विद्यापीठाच्या माहिती केंद्रात कृषी प्रदर्शन पाहता येते.

दापोली परिसरातील फळबागांचा उपयोग करून अनेक ठिकाणी कृषी पर्यटन केंद्रे विकसीत करण्यात आली आहेत. या पर्यटन केंद्रांमधून झाडावरून नारळ काढणे, जलक्रीडा, बैलगाडीची सफर, कलम करणे, नारळ सोलणे, चूलीवर स्वयंपाक करणे, रात्री जाखडी खेळणे, कोकणी भोजन प्रकार आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. कृषी पर्यटन केंद्रात दिवस घालविल्यास 'कोकणी लाईफस्टाईल'ची मजा लुटता येते.

पन्हाळकाजी लेणी:
दापोली दाभोळ रस्त्यावर 15 किलोमीटर अंतरावर नानटे गाव आहे. गावाच्या अलिकडे डाव्या बाजूला सुप्रसिद्ध पन्हाळेकाजी लेण्यांकडे जाण्यासाठी रस्ता आहे. साधारण 20 किलोमीटर अंतर डोंगरराळ भागातून प्रवास केल्यावर कोटजाई आणि धाकटी नद्यांच्या संगमावर या लेण्यांच्या रुपात शिल्पकलेचा अद्भूत नमुना पाहायला मिळतो. बाराव्या शतकातील ताम्रपट येथे सापडला आहे. गाणपत्य आणि नाथ संप्रदायातील लेणी आणि शिल्प असलेल्या 29 गुंफा येथे आहेत. गणपतीची सुंदर मुर्ती पर्यटकांचे लक्ष आकर्षुन घेते. लेण्यात असलेल्या स्तंभावरील कोरीव कामही कलाकुसरीचा उत्तम नमुना आहे. नाथपंथीय साधकांची शिल्पेदेखील या ठिकाणी पाहायला मिळतात. परतीच्या प्रवासात केळील-मळे मार्गे दापोली-दाभोळ मार्गावर परतता येते.

चिखलगाव:
मळेपासून दापोलीकडे जाताना चार किलोमीटर अंतरावर चिखलगाव हे लोकमान्य टिळांचे मुळ गाव आहे. दापोलीपासून हे अंतर साधारण 18 किलोमीटर आहे. चिखलगावला टिळकांच्या वाड्याचेच नुतनीकरण करून त्याठिकाणी लोकमान्य टिळकांचे मंदिर उभारण्यात आले आहे. लागूनच असलेल्या जागेत त्यांच्याच स्मृतीत प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली आहे. चिखलगावचा परिचय आणखी एका कारणाने करून दिला जातो. राजा आणि रेणु दांडेकर या दाम्पत्याने ग्रामीण भागातील गरजूंसाठी मोठाशैक्षणिक प्रकल्प येथे उभा केला आहे. या प्रकल्पाला अभ्यासू पर्यटक आवर्जुन भेट देतात.

श्री चंडिकादेवी मंदिर, दाभोळ:
दापोलीपासून 30 किलोमीटर अंतरावर श्री चंडिकादेवीचे जागृत देवस्थान आहे. दाभोळच्या खाडीपासून 5 किलोमीटरवर हे मंदिर आहे. हिरव्यागार परिसरात डोंगरातील एकसंध पाषाणात कोरीव काम करून देवीची मुर्ती आणि गाभारा उभारण्यात आला आहे. मंदिराच्या दारातच भव्य प्रवेशद्वार आणि दिपमाळ आहे. नंदादीपाच्या प्रकाशात गुहेत जाऊन देवीचे दर्शन घ्यावे लागते. मंद प्रकाशात दिसणारी देवीची मुर्ती नजरेत साठवून घ्यावीशी वाटते. नंदादीपांनी प्रकाशीत गुहेतील वाटही तेवढीच सुंदर दिसते. गुहेत प्रदक्षिणा मार्ग तयार करण्यात आला आहे. गाभाऱ्यात विजेचा वापर केला जात नाही. मंदिराशेजारी असलेल्या आणखी एका गुहेतून पाण्याचा मोठा प्रवाह बाहेर आलेला दिसतो. भाविक या ठिकाणी स्नानदेखील करतात. हा प्रवाहकुंड पांडवकालीन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिराला भेट दिल्याचे येथे सांगितले जाते.

माँसाहेब मशिद, दाभोळ:
दाभोळच्या धक्क्यावर येताच मशिदीची भव्य आणि कलात्मक वास्तू पर्यटकांचे लक्ष आकर्षुन घेते. अप्रतिम कोरीव काम आणि कलाकुसरीचा नमुना या मशिदीच्या प्रत्येक भागात पाहायला मिळतो. विजापूरच्या शाही जामा मशिदीची प्रतिकृती असलेल्या या भव्य वास्तूत स्थापत्य कलावैभवाची झलक पहायला मिळते. विजापूरची राजकन्या मॉसाहेब आयेशाबिबी हीने 1659 मध्ये खराब हवामानामुळे मक्का प्रवास न करता आल्याने धार्मिक कार्य करण्याच्या हेतून चार वर्षात या मशिदीचे काम करून घेतले. त्याकाळात ही वास्तू उभारण्यासाठी 15 लाख रुपये खर्च आल्याचे सांगितले जाते. ही मशिद 'अंडा मशिद' नावाने ओळखली जाते.

दापोलीची भटकंती संपवून गुहागरला जाताना वाहनाने प्रवास करण्याऐवजी फेरीबोटने जाणे सोईचे आहे. दाभोळच्या खाडीतून बोटीने वाहनासह माफक शुल्क भरून जाता येते. त्यामुळे तीन तासाचा प्रवास कमी होतो. शिवाय संध्याकाळी खाडीतील सौंदर्य अनुभवता येते.
संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India