बुलढाणा: जगातील एकमेव खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर; सिंदखेडराजा शिवाजी महाराजांचे आजोळ

बुलढाणा जिल्हा अजिंठा आणि सातपुडा पर्वताच्या कुशीत नयनरम्य नैसर्गिक सौंदर्याच्या कृपाछायेत विदर्भाच्या पश्चिम अंगाला विसावला आहे. विदर्भाचे महाद्वार म्हणून हा जिल्हा ओळखला जातो. राजमाता जिजाऊ माँ साहेबांचे माहेर आणि छत्रपती शिवरायांचे आजोळ असल्याने हा जिल्हा महाराष्ट्राचे मातृकुल म्हणून सुपरिचित आहे. आंतरराष्ट्रीय भूगर्भ शास्त्रज्ञांचे आकर्षण ठरलेले आणि जगातील एकमेव खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर याच जिल्ह्यात आहे. ऐतिहासिक, पौराणिक, आध्यात्मिक, साहित्यिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला हा जिल्हा मराठी मनाचा आणि अस्मितेचा मानबिंदूच होय. आपण जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती घेऊ...
पर्यटन स्थळे
-लोणार-
वैशिष्ट्य-
खाऱ्या पाण्याच्या विस्तीर्ण व नैसर्गिक सरोवराने बुलढाणा जिल्ह्यास आंतरराष्ट्रीय किर्ती मिळवून दिली आहे. 30 ते 50 हजार वर्षांपूर्वी झालेल्या अशनी पातामुळे सुमारे पावणे दोन किलोमीटर व्यासाचे आणि 10 ते 11 कि. मी. परिघाचे एक प्रचंड विवर तयार झाले आहे. लोणारचा उल्काघाती खळगा हा जगातील ज्ञात विवरामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा असून बेसॉल्ट खडकात निर्माण झालेले जगातील एकमेव विवर आहे. लोणारच्या सरोवराची प्राचीन साहित्यात पंचाप्सर सरोवर किंवा विराजतिर्थ या नावाने दखल घेतलेली आढळते. या सरोवराचा आणि परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने योजना आखली आहे.

पौराणिक आख्यायिकेनुसार ‘लवणासुर’ नावाच्या राक्षसाला विष्णूने मारले. त्याच्या नावावरूनच या सरोवरास व या परिसरास ‘लोणार’ नाव मिळाले. सरोवराच्या परिसरात दाट जंगल आहे. या जंगलात विविध पक्षी, माकडे, साप, सरडे, मुंगूस, कोल्हा, हरिण इत्यादी प्राणी पाहावयास मिळतात. येथील जंगलातील जैववैविध्य वाखाणण्याजोगे आहे.

सुविधा
लोणार येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे निवास संकुल आहे. तसेच खाजगी हॉटेल्सही आहेत. लोणार सरोवर शहरापासून 2.5 किलोमीटर अंतरावर आहे.

पोहोचण्याचा मार्ग
लोणार सरोवरापासून औरंगाबाद विमानतळ (१२२ कि.मी) सर्वांत जवळचे विमानतळ आहे. मुंबई-भुसावळ मार्गावरील मलकापूर हे सर्वांत जवळचे रेल्वे स्टेशन आहे तर जालना रेल्वे स्टेशन येथून ९० कि.मी. अंतरावर आहे. मुंबई, नागपूर, पुणे, मलकापूर, खामगाव, औरंगाबाद, अजंठा, बुलढाणा, जळगाव या शहरांशी लोणार बस व्यवस्थेने जोडले आहे.

संपर्क
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, अमरावती विभागीय कार्यालय -0721 2661611/12, फॅक्स- 0721 2661612, वेबसाईट-www.maharashtratourism.gov.in

-सिंदखेडराजा-
वैशिष्ट्य
असामान्य राजपुरुष स्वराज्य संस्थापक महाप्रतापी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाईंचे हे माहेर. याठिकाणी राजे लखुजी जाधव यांची समाधी व त्यांच्या राजवैभवाची साक्ष देणारी बरीच स्मारके, भवने, तलाव, महाल व तट आजही कायम आहेत. राजे जगदेवरावांनी बांधलेले राजे लखुजीरावांचे स्मारक चांगल्या स्थितीत आहे. स्मारकाची लांबी, रुंदी व उंची समान असून वर घुमट आहे. राजे लखुजी महाराजांच्या दगडी महालाचा तीन मजली दर्शनीय भाग कायम आहे. सिंदखेड राजा येथेच नीळकंठेश्वर व रामेश्वर ही महादेवाची प्राचीन मंदिरे आहेत.

सुविधा
येथे मराठा सेवा संघाने जिजाऊ सृष्टी नावाने स्थळ विकसित केले आहे. याठिकाणी निवासाची व्यवस्था आहे. तसेच गावामध्ये खाजगी हॉटेल्सही आहेत. येथे पुरातत्व विभागाचे कार्यालय आहे.

पोहोचण्याचा मार्ग
सिंदखेड राजापासून औरंगाबाद विमानतळ सर्वांत जवळचे विमानतळ आहे (140 कि.मी). तसेच मुंबई-भुसावळ मार्गावरील मलकापूर हे सर्वांत जवळचे रेल्वे स्टेशन आहे, तर जालना रेल्वे स्टेशन येथून ९० कि.मी. अंतरावर आहे. मुंबई, नागपूर, पुणे, मलकापूर, खामगाव, औरंगाबाद, अजंठा, बुलढाणा, जळगाव, अकोला या शहरांशी लोणार बस व्यवस्थेने जोडले आहे.

-शेगाव-
श्री संत गजानन महाराज यांचे मंदीर असलेल्या या गावाला विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले जाते. संत गजानन महाराज प्रगटदिन आणि रामनवमीला येथे मोठी यात्रा भरते. श्री संत गजानन महाराज संस्थानद्वारा उभारण्यात आलेल्या 300 एकर क्षेत्रातील आनंदसागर प्रकल्प (अध्यात्मिक केंद्र व मनोहरी उद्यान) भाविकांचे आणि पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे.

सुविधा
श्री संत गजानन महाराज संस्थानचे भव्य भक्त निवास येथे आहेत. तसेच आनंद सागर पर्यटन केंद्राजवळ आनंद विहार पर्यटन निवास संकुल आहे. याठिकाणी विविध प्रकारच्या खोल्या उपलब्ध आहेत. तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या हॉटेलचीही सोय येथे आहे.

पोहोचण्याचा मार्ग
शेगाव शहर मध्य रेल्वेच्या मुबई-नागपूर मार्गावर आहे. तसेच विमानमार्गे औरंगाबाद जवळचे विमानतळ आहे. त्याचप्रमाणे शेगाव हे मुबई, ठाणे, पुणे, सांगली, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, जळगाव, शिर्डी, बडोदा, सुरत बस व्यवस्थेने जोडल्या गेले आहे.

संपर्क- 
संपर्क क्रमांक- 07265 253018, 252018 संकेतस्थळ- www.gajananmaharaj.org

-अंबाबरवा आणि भिंगारा-
वैशिष्ट्य
ही गावे सातपुडा डोंगरात असून ती थंड हवेची ठिकाणे आहेत. येथे गोंड, भिल्ल, कोरकु हे आदिवासी लोक राहतात. अंबाबरवा अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. या अभयारण्यामध्ये 102 चौ.कि.मी. क्षेत्र राखीव दर्जाचे असून 22.62 चौ.कि.मी. क्षेत्र खासगी क्षेत्रात आहे. अशाप्रकारे अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ 127.10 चौ.कि.मी. आहे. या अभयारण्यामध्ये हरिण, कोल्हा, बिबट्या, रानडुक्कर आदी प्राणी आहेत. अभयारण्याची उत्तर दिशा सातपुडा पर्वताला लागून आहे.

पोहोचण्याचा मार्गअंबाबरवा अभयारण्य व भिंगारा थंड हवेचे ठिकाणासाठी जवळचे रेल्वे स्टेशन शेगाव व नांदुरा आहे. शेगावमार्गे बसने वरवट बकाल, संग्रामपूर, टुनकी, वसाली व अंबाबरवा येथे जाता येते. भिंगारासाठी नांदुरामार्गे आसलगाव, जळगाव-जामोद व बऱ्हाणपूर रस्त्याने जाता येते.

संपर्क
वन विभागाच्या शिबिर कार्यालयाचा क्रमांक 9881923683
-निलेश तायडे,
माहिती सहाय्यक, बुलढाणा.

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India