सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात आघाडीचा जिल्हा म्हणजे जळगाव

महाराष्ट्रात वैभवशाली, संपन्न सांस्कॄतिक, धार्मिक क्षेत्रात आघाडीचा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा, अशी या जिल्ह्याची ओळख आहे.

परिचयः
हल्लीच्या धुळे, जळगाव व नंदूरबार या दोन्ही जिल्ह्यांचा प्रदेश मध्ययुगीन काळापासून खान्देश या नावाने ओळखला जातो. तथापि प्रशासनाच्या दृष्टीने ब्रिटीशांनी 1906 मध्ये खान्देशचे पूर्व खान्देश व पश्चिम खान्देश असे दोन जिल्ह्यात विभाजन केले. जळगाव मुख्यालय असलेला 10 तालुके व तीन पेठ्यांचा मिळून पूर्व खान्देश जिल्हा होता.

1917 मध्ये पारोळा व त्यानंतर भडगाव व मुक्ताईनगर या पेठांना तालुक्यांचा दर्जा देण्यात आला. 1956 मधील राज्य पुनर्रचनेत मुंबई राज्यात समाविष्ठ असलेला पूर्व खान्देश हा जिल्हा 1960 मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्याचा एक जिल्हा म्हणून राहिला. 10.10.1960 पासून महाराष्ट्र शासनाने नावात बदल केल्याने पूर्व खान्देश हा जिल्हा जळगाव जिल्हा या नावाने ओळखला जावू लागला. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या 3 जून 1999 च्या अधिसुचनेनुसार भुसावळ आणि एरंडोल तालुक्याचे विभाजन करुन अनुक्रमे बोदवड आणि धरणगाव हे दोन नवीन तालुके निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात 23 जून 1999 पासून 15 तालुके आहेत.

भौगोलिक रचना :
जळगाव जिल्हा तापी नदीच्या मध्य खोऱ्यात महाराष्ट्र राज्याच्या वायव्य पूर्वेस 20 अंश उत्तर अक्षांश व 74.55 अंश ते 76.28 अंश पूर्व रेखांश यादरम्यान या जिल्ह्याचे अस्तित्व आहे. जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेस व ईशान्येस मध्यप्रदेश या राज्याच्या सीमा आहेत. आग्नेय दिशेस बुलढाणा, दक्षिणेस औरंगाबाद, नैऋत्येस नाशिक तर पश्चिम वायव्येस धुळे या जिल्ह्यांच्या सीमा आहेत.
जळगाव जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे
उनपदेव ता. चोपडा
उन-अप म्हणजे गरम पाणी खान्देशातील भाषेत वुना देव म्हणजे ज्याने हे उष्ण पाणी निर्माण केले तो देव. असे अर्थ बोलीभाषेतील जाणकार सांगतात. उनपदेव हे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अडावद गावाच्या शिवारात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आहे. हे ठिकाण अनादी काळापासून उपासक व साधुसंतांचे स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. याठिकाणी नैसर्गिक उष्ण पाण्याचे अखंड झरे असून पाणी एका गोमुखाद्वारे पडून प्राचीन काळात बांधलेल्या कुंडातून सतत वाहते. या पाण्याचे सर्वसाधारण उष्ण तापमान 60 ते 70 अंश सेल्सिअस इतके असते. हे पाणी गंधकयुक्त असल्याने शरिराला व्याधीमुक्त करते, असे वैज्ञानिक कारणही सांगितले जाते.

उष्ण पाण्यात स्नान केल्याने चर्मरोगाचे निवारण होते असा अनेकांचा अनुभव आहे. याबद्दल एका दंतकथेनुसार, शरभंग ऋषींकरिता या पाण्याची निर्मिती प्रभू श्रीरामचंद्रानी केली होती. शरभंग ऋषींचे शरीर दुर्गंधीयुक्त होते व त्यास छिद्रे पडली होती. प्रभू श्रीरामचंद्र, लक्ष्मण व सीता वनवासात भ्रमण करीत करीत शरभंग ऋषींच्या आश्रमात आले. तेव्हा शरभंग ऋषींनी श्रीराम यांची पूजा केली व श्रीरामाकडून वर मागितला. तेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांनी अग्निबाण मारुन उष्ण पाण्याची निर्मिती केली. शरभंग ऋषींनी त्या पाण्यात आंघोळ केली व त्यांना दिव्य शरीर प्राप्त झाले.

गरम पाण्याचा झरा असलेल्या हौदाच्या पश्चिम बाजूलगतच जमिनीत शरभंग ऋषीची गुफा असून, या गुफेत शिवलिंग आहे. कोरीव दगडातील या गुफेत जाताना वेगळेच थ्रील अनुभवायला मिळते. आत गेल्यावर मात्र निरव शांतता आणि गारवा जाणवतो. उनपदेव येथील झरे बाराही महिने सुरु असल्याने तेथे नेहमीच गर्दी आढळून येते. झऱ्यांच्या भोवती सुसज्ज तलाव व धर्मशाळा आहे. पौष महिन्यात याठिकाणी महिनाभर यात्रा असते. उष्ण पाण्यात स्नान करण्यासाठी व निसर्गरम्य वनसृष्टीचा आनंद लुटण्यासाठी दूरदूरचे पर्यटक येथे येत असतात.

निसर्गरम्य उंच सातपुडा पर्वतातील पहिल्या पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या उनपदेवचा परिसर आता एक पर्यटनस्थळ म्हणून नावारुपाला येत आहे. उत्तरेला उंच डोंगर आणि जंगलाचा परिसर असल्याने संपूर्ण परिसरात एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते. दुर्मिळ पक्ष्यांचा सहवासही सागाची बहुसंख्य झाडे असलेल्या जंगलात लाभतो. या परिसरात लहान-लहान आदिवासी पाडेही आहेत. पर्यटकांसाठी सुविधाही पुरविण्यात आल्या आहेत. दुय्यम मोठे स्नानकुंड, स्ट्रीट लाइट्स, घनदाट वनराईत वनभोजनाची व्यवस्था अशा निसर्गसंपन्न पार्श्वभूमीमुळे या परिसराचे महत्त्व दिवसागणिक वाढत आहे.

उनपदेव परिसरात मुरलीधर, राम, सीता, लक्ष्मण, हनुमान, महादेव, गणपती आणि शनी या देवांची मंदिरे असल्याने पर्यटनाबरोबरच धार्मिक स्थळ म्हणूनही याकडे पाहिले जाते. मंदिराच्या खालच्या बाजूला भरीव दगडाला लागून असलेल्या गोमुखातून साडेसात मीटर लांब व पावणेदोन मीटर उंचीच्या मोठ्या तांबड्या विटांनी बांधलेल्या हौदात गरम पाणी पडते. गोमुखातून पडलेल्या पाण्याचे तापमान सुमारे 60 अंश सेल्सिअस असते.

उनपदेवला कसे जाल?हे ठिकाण जळगाव शहराच्या उत्तरेस 80 किमी व चोपडा गावाच्या पूर्वेस 20 किमी अंतरावर आहे. जळगावपासून बस किंवा खासगी वाहनांची मदत घ्यावी लागते. याठिकाणी जाण्यासाठी थेट रेल्वेमार्ग नाहीत. रेल्वेमार्गाने जाणाऱ्यांसाठी जळगाव व भुसावळ या स्थानकांवर उतरुन पुढील प्रवास हा बसने करावा लागेल.

मनुदेवी ता. यावल
सातपुड्याच्या पर्वतरांगात निसगरम्य वनराईत वसलेल्या यावल तालुक्यात श्री क्षेत्र मनुदेवीचे स्थान आहे. श्रीमनुदेवीचा उल्लेख सप्तशक्तीपीठ या ग्रंथात मार्कण्डेय ऋषींनी केला आहे. या मंदिरात विष्णू, शंकर व पार्वती यांच्या देखील मुर्त्या आहेत. इ. स. 1251 मध्ये या मंदिराचा शोध लागला. तेव्हाचा गवळी राजा ईश्वरसेन याने या हेमाडपंथी मंदिराची स्थापना केली. या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात गवळी वाड्याचे अवशेष अजूनदेखील पाहावयास मिळतात. हे पवित्र स्थळ सातपुड्याच्या पायथ्याशी निसर्ग सौंदर्याने नटलेले असून बाजूस रमणीय धबधबा वाहत असतो. पावसाळ्यात याची सुंदरता अधिकच मनमोहक असते. खान्देशातील बऱ्याच लोकांचे कुलदैवत श्रीमनुदेवी आहे. मार्गर्शीष महिन्यात, नवरात्रात व अष्टमीस येथे नवचंडी यज्ञाचे आयोजन केले जाते. हे स्थान चोपडा-यावल रस्त्यावर असून आडगाव फाट्यापासून पुढे 7 किमी आहे. मनुदेवीला जाण्यासाठी चोपडामार्गे तसेच भुसावळमार्गे यावलला जाता येते. तेथून यावल-चोपडा रस्त्यावर सात किमी अंतरावर मनुदेवी हे तीर्थक्षेत्र आहे.

मनुदेवीला जाण्यासाठी यावल, जळगाव, भुसावळ, चोपडा येथून बससेवा उपलब्ध आहे.

पाल ता. रावेर
सातपुडा पर्वताच्या एका पठारावर रावेर तालुक्यात पाल हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण वसलेले आहे. हे निसर्गरम्य पर्यटनस्थळ रावेरच्या 22.4 किमी पश्चिमेस आहे. आदिवासींसाठी निर्माण केलेले सातपुडा विकास मंडळ व आदिवासी आश्रमशाळा येथे कार्यरत आहे. पाल येथील जुन्या किल्ल्याचे बुरुज, तट व इतर अवशेष या स्थळाची प्राचीनता दर्शवतात. आभीर अधिपतींचे राज्य असताना येळो त्यांचे स्थानिक मुख्यालय होते. पुढे सत्तेत आलेल्या फारुकीचे देखील येथे ठाणे असावे. ब्रिटीश राजवट आली तेव्हा पाल पूर्णत: निर्जन होते व तेथे जंगली श्वापदांचा सुळसुळाट होता. पालच्या जुन्या मशिदीच्या प्रवेशद्वारावर राजेशाही कमान आहे. मशीद 8.1 मी. लांब व तेवढीच रूंद असून काळ्या दगडात बांधलेली आहे. परंतु चुन्याचा वापर केलेला नाही. मशिदीसमोरील खांब ढासळले असले तरी मूळ वास्तू सुस्थितीत आहे. मशिदीमागे 60 मी. लांब व तेवढ्याच रूंदीचा हत्तीवाडा आहे. काहीजण यास हत्ती बांधण्याची जागा संबोधत असले तरी ती बाजारहाटाची बंदिस्त सुरक्षित जागा असावी.

हत्तीवरुन येथे बाजारहाट करता येत असावा. मशिदीपासून किल्ल्याकडे फरसबंदी मार्ग होता. किल्ल्यातून फरसबंदी मार्गाने सुकी नदीकाठच्या नागझरीजवळ उतरता येते. येथे दाट झाडी असून नागझरी कुंडात गोड पाणी पडते. या 9 मी. रुंद व 15 मी लांबीच्या जलाशयास किल्ल्यातील विहिरीतून झरे आहेत असे सांगतात. या जलाशयाला 15 नागमुख्य असून त्यातून पाणी सुकी नदीत जाते. गावाजवळील टेकडीवर पालचा ऋषींचे स्मारक आहे. सन 1956 मध्ये खोदकाम करताना पुरातन काळातील दगडी बांधकामाची, सांडपाणी निचऱ्याची व्यवस्था केलेली आढळली. या पुरातन किल्ल्यात महमंद तुघलक कालीन नाणीही सापडली आहेत. पाल येथे आभीरराज कालीन पुरातन मोठ्या विटात बांधलेले महादेव मंदीर आढळले आहे. येथे बऱ्याच ठिकाणी गवळी मुर्ती सापडल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने येथे वनक्षेत्र कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारले आहे. येथेच हरिण पैदास केंद्रही आहे.

श्री क्षेत्र मेहूण ता. मुक्ताईनगरचांगदेव गावाजवळ मुक्ताईनगरपासून 8 कि.मी. अंतरावर तापी नदीकाठी सध्याचे पुनर्वसित मेहूण गाव आहे. येथे संत मुक्ताईचे स्मृती मंदिर होते. ते आता हतनूर धरणाखाली आले आहे. येथे संत मुक्ताईचे समाधीस्थान आहे. येथून 1 कि.मी. अंतरावर संत चांगदेव महाराजांचे समाधीस्थान चांगदेव आहे. येथे पुरातन हेमाडपंथी सोमेश्वर महादेवाचे मंदीर आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी कार्तिक वद्य त्रयोदशीला क्षेत्र आळंदी येथे समाधी घेतली.

संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यानंतर संत मुक्ताबाईंनी शके 1219 वैशाख वद्य 12 ला ( इ. स. 1296) तापीतीरी समाधी घेतली. भुसावळपासून सुमारे 20 किमीवर मुक्ताईनगरजवळ कोथळी येथे संत मुक्ताईचे मंदीर आहे. तेथूनच जवळ मुक्ताईनगरला संत मुक्ताईचे नवीन मंदीर बांधण्यात आले आहे. संत मुक्ताईभोवती एक अदभूत रम्यतेचे वलय आहे. मेहूण हे मुक्ताबाई या बालयोगिनेचे स्मारक म्हणून ओळखले जाते. माघ वद्य दशमी ते द्वादशी असे तीन दिवस येथे मोठी यात्रा भरते.

श्री क्षेत्र चांगदेव ता. मुक्ताईनगरहठयोगी संत श्री चांगदेव यांचे मंदीर मुक्ताईगरपासून 4 किमीवर पूर्णा व तापी नदीच्या संगमावर आहे. हे हेमाडपंथी मंदीर काळ्या संगमरवरी शिळा एकावर एक रचून बांधलेले आहे. जेथे या दोन नद्यांचा संगम होतो तेथे महादेव मंदीर आहे. चांगदेव मंदीर बरेच प्राचीन असून त्याचा उल्लेख अबुल फजल यांच्या ऐने अकबरीत आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर बाळबोध लिपीतील काही मजकूर आहे. श्री क्षेत्र चांगदेव मंदीर हे 18 व्या शतकात बांधलेले आहे. मंदिराजवळून वाहत असलेल्या तापी व पूर्णा नद्यांना पूर्वी अनुक्रमे चंद्रकन्या व सुर्यकन्या अशी नावे होती. या दोन्ही नद्यांच्या पवित्र संगमाची जागा म्हणजे आताचे चांगदेव. याठिकाणी चांगदेव महाराजांनी 1400 वर्षे तपश्चर्या केली, असे म्हणतात. याच मंदिरात नंतर श्री चांगदेव महाराजांच्या मुर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

चांगदेव मंदिराच्या बाहेर गरुडाची मूर्ती आहे. याच गरुडावरुन महाराजांनी पृथ्वीभ्रमण केलेले आहे. चांगदेव मंदीर हे सहा महिन्याच्या रात्रीत बांधून पूर्ण केलेले आहे.

श्री क्षेत्र हरताळे ता. मुक्ताईनगरसुमारे 850 वर्षांपूर्वी याच ठिकाणी महानुभाव श्री चक्रधर स्वामी यांनी भेट दिलेली आहे. भोजन घेऊन मुक्काम केलेला आहे. त्या स्थळांना भक्तासह भोजनस्थान, व्याघ्रभेट व वस्तीस्थान अशी नावे आहेत. त्याठिकाणी महानुभाव मंदीर आहे. वरती टेकडावर श्रावणबाळ समाधी व त्यांच्या आई-वडिलांची समाधी स्थळे आहेत. याठिकाणी प्रत्येक पौर्णिमा व चक्रधर स्वामी जयंती महोत्सवाच्या वेळी यात्रा भरते.

पदमालय ता. एरंडोलपदमालय हे एरंडोल तालुक्यात एरंडोलपासून 11 किमी अंतरावर व जळगाव जिल्ह्याच्या मुख्यालयापासून 50 किमी अंतरावर वसलेले आहे. या तिर्थक्षेत्री अतिप्राचीन व दुर्मिळ असे डावी व उजवी सोंड असलेल्या गणेशाचे मंदीर आहे. मंदिराचा परिसर नयनरम्य असून मंदिराच्या समोरच मोठा तलाव आहे. या तलावात विविध छटा असलेल्या कमळाची फुले उमलतात. प्रत्येक संकष्ट चतुर्थीस व अंगारकी चतुर्थीस विविध जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गणेश भक्त या पावन तिर्थस्थळी गणेशच्या दर्शनाला येतात. श्री गणेश पुराणात उपासना खंडातील चार अध्यायात श्रीक्षेत्र पदमालयातील मुर्तींचा उल्लेख आहे. या मुर्ती स्वयंभू असल्याची श्रद्धा आहे. या संस्थानाला माधवराव पेशवे यांनी सनद दिली होती.

एकाच पीठावर एक उजव्या सोंडेचा व दुसरा डाव्या सोंडेचा अशा स्वयंभू प्रवाळयुक्त श्री गजाननाच्या मुर्ती येथेच पाहावयास मिळतात. पदमालयापासून दोन किमी अंतरावर भीमकुंड आहे. येथे भीमाने बकासुराचा वध केल्याचे दंतकथेत सांगितले जाते. पदमालय पर्यटनस्थळाच्या विकासासाठी शासनाने तरतूद केली असून याठिकाणी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते.

पाटणादेवी ता. चाळीसगावपाटणादेवी येथील प्राचीन मंदिराची स्थापना शके 1128 मध्ये झाली असून हे मंदीर हेमाडपंथी कलेचा उत्कृष्ट नमूना आहे. हे मंदीर यादवकालीन असून गौताळा अभयारण्यात येते. हे स्थान पार्वतीचे शक्तीपीठ असून याचा उल्लेख देवी भागवतमध्ये आहे. श्री चंडीकामाता बऱ्याच कुळांची कुलस्वामीनी असून या पवित्र जागृत स्थळाच्या दर्शनासाठी असंख्य भाविक येत असतात. प्रख्यात गणितज्ज्ञ भास्कराचार्य यांचा जन्म पाटणचाच. त्यांचा येथे जोतीर्विद्येचा खूप मोठा आश्रम होता. भास्कराचार्यांना शून्याचा शोध येथेच लागला असे म्हटले जाते. त्यांच्या यज्ञकुंडाचे अवशेष अजूनही पाहावयास मिळतात. मंदिराजवळील परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला असून येथून 3 किमी अंतरावर पितळखोरा लेणी आहे. येथे निसर्ग परिचय केंद्रातून परिसरातील वनसंपदेची माहिती देण्यात आली आहे. धवलतीर्थ केदारकुंड असून दोन डोंगरी नद्यांचा उगम येथे आहे. येथे जवळच महर्षी वाल्मिकींची समाधी आहे. पाटणादेवी येथे प्रतिवर्षी चैत्र पौर्णिमेस मोठी यात्रा भरते. शारदीय नवरात्री उत्सवाचे वेळी यात्रा, भगवती महापुजा, होमहवन इत्यादी कार्यक्रम होतात. वर्षभर याठिकाणी भाविकांची वर्दळ सुरु असते. याठिकाणी जाण्यासाठी चाळीसगाव येथे रेल्वेने अथवा एस.टी.ने पोहोचता येते. तेथून एस.टी.सह खाजगी वाहनांची सेवाही उपलब्ध असते.

कला महर्षी केकी मूस कलादालन, चाळीसगावचाळीसगाव रेल्वे स्टेशनजवळच असणाऱ्या दगडी बैठ्या वास्तूत कला महर्षी के. की. मूस यांचे कलादालन आहे. मुंबई येथील पारसी कुटुंबात 3 ऑक्टोबर 1992 रोजी केकी मूस यांचा जन्म झाला. हे पारसी कुटुंब 1920 मध्ये चाळीसगाव येथे आले होते. केकी यांनी कलाशिक्षण व फोटोग्राफी यासाठीच आपले जीवन वाहून घेतले. सन 1935 ते 1938 या काळात केकी ब्रिटनच्या शेफील्ड नगरातील बेनेट महाविद्यालयातून उपयोजित कलेचे शिक्षण घेवून बाहेर पडले आहेत. युरोपातल्या अनेक कलातिर्थ्यांना भेटी दिल्या. युरोप प्रवासात छायाचित्रांनी त्यांना वेड लावलं. 1938 नंतर त्यांनी घरात कायमचे बंदिस्त करुन घेतले.

कलातपस्येसाठी केकी आयुष्यभर अविवाहित राहिले. छायाचित्रणाची टेबल टॉप ही विशेष पद्धत म्हणजे एखाद्या विषयाला अनुसरुन लहान मोठ्या साहित्याच्या मदतीने तसे वातावरण प्रसंगाचे सेट तयार करावयाचे व त्याचे असे छायाचित्र घ्यावे की पाहणारास ते प्रत्यक्ष त्या-त्या ठिकाणी जाऊन घेतलेले छायाचित्र असावे असे वाटते. केकींना या प्रकारात असंख्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. कॅमेरा व ब्रश हाताळण्याबरोबरच ते सतारही खुबीने वाजवित होते. त्यांचे श्रेष्ठत्व पाहूनच रॉयल सोसायटी ऑफ आर्ट या संस्थेने त्यांना मानद सदस्य केले होते.

गांधी तीर्थ, जळगावयेथील गांधीवादी विचारवंत व उद्योजक भंवरलालजी जैन यांनी जैन हिल्स परिसरात उभारण्यात ‘गांधी तीर्थ’ साकारले आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते या गांधीतीर्थचे उद्घाटन झाले आहे. निसर्गरम्य परिसरात महात्मा गांधी यांचे जीवनचरित्र, साहित्य, घडामोडी, त्यांची अहिंसा मार्गाची चळवळ, देश-विदेशातील त्यांच्या चळवळींची आठवण करून देणारे हे तीर्थ म्हणजे एक विद्यापीठच ठरले आहे. महात्मा गांधींच्या जीवनावर आधारित एक विशाल संग्रहालय म्हणून गांधीतीर्थकडे पाहता येईल. महात्मा गांधीजींचे विचार समाजात रुजवणे तसेच सत्य, अहिंसा, शांती आणि परस्पर सहकार्याची भावना जागतिक पातळीवर विकसित करणे हा गांधी रिसर्च फाऊंडेशनचा मुख्य उद्देश असून त्यादृष्टीने हे संग्रहालय उभारण्यात आले आहे.

जैन हिल्स परिसरातील निसर्गरम्य अशा आमराई असलेल्या भागात चार एकर क्षेत्रात सुमारे ६५ हजार चौरस फूट परिसरात गांधी तीर्थ साकारले आहे. या विशाल भवनात ग्रंथालय, वाचनालय, संग्रहालय, अभिलेखागार, सभागृह स्थापन करण्यात आले आहे. गांधीजींनी आपल्या जीवनात बऱ्याच वृत्तपत्रांचे संपादन केले व अनेक वृत्तपत्रात त्यांचे लेखसुद्धा प्रकाशित झाले. त्यांच्या त्या मूळ प्रतींचा संग्रह येथे करण्यात आला आहे. आचार्य विनोबा भावे व त्यांच्यावर अन्य लेखकांनी लिहिलेली ७६० पुस्तके येथे उपलब्ध आहेत. १९३६ चे अधिवेशन फैजपूर येथे पार पडले. महात्मा गांधींनी अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले होते. त्यावेळी त्यांनी घातलेली सुताची माळ, चप्पल, आंघोळीचा दगड रिसर्च फाऊंडेशनमध्ये उपलब्ध आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशनमध्ये गांधी व विनोबा भावे यांच्याशी संबंधित प्रकाशित-अप्रकाशित साहित्य, ऑडिओ-व्हिडीओ, छायाचित्र, दस्तावेज, तिकिटे, लिफाफे, नाणे व नोटा संग्रहित करण्यात आल्या आहेत. महात्मा गांधींच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग शिल्पे, लेझर शो आदींच्या माध्यमातून साकारण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे व मल्टीमिडीया तंत्राचा वापर करुन याठिकाणी गांधी जीवनाचे दर्शन घडविले जाते.

याठिकाणी पोहोचण्यासाठी जळगाव येथे रेल्वेने अथवा एस.टी.ने पोहोचता येते. जळगाव शहरापासून चार किमी अंतरावर शिरसोली रोडवर (जळगाव- पाचोरा) हे ठिकाण आहे.
-संकलनः जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव.

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India