सावरकरांची जन्मभूमि भगूर तर चांदवड अहिल्यादेवी होळकरांचा रंगमहाल

मंत्रभूमी..यंत्रभूमी...भाग-2
प्रदीर्घ सांस्कृतिक परंपरा आणि सुखद हवामानासाठी प्रसिद्ध असलेले नाशिक शहर मुंबई, पुणे, औरंगाबाद या महानगरांच्या केंद्रस्थानी आहे. मध्य रेल्वेच्या प्रमुख लोहमार्गावरचे हे एक प्रमुख स्टेशन असलेले नाशिक मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाने जोडले गेले आहे. चांदवडमध्ये अहिल्यादेवी होळकरांचा रंगमहाल, सावरकरांची जन्मभूमि भगूर अशी प्रसिद्ध ठिकाणेही नाशिक जिल्ह्यातील आहेत.

अहिल्यादेवी होळकरांचा रंगमहाल : 
चांदवड हे नाशिकपासून सुमारे 63 कि.मी. अंतरावरील मुंबई-आग्रारोडवरील हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा रंगमहाल व डोंगरावर प्रसिद्ध चंद्रेश्वराचे मंदिर आहे. खाली रेणुका देवीचे मंदिर आहे. हे महाराष्ट्रातील अनेक जणांचे कुलदैवत आहे.

सावरकरांची जन्मभूमि भगूर :
देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची ही कर्मभूमी आहे. भगूर नाशिक शहरापासून सुमारे 15 कि.मी. अंतरावर आहे. सावरकरांचा जन्म झाला ते ठिकाण आजही आपल्या आठवणी जपून आहे.

भारतीय नाणे संशोधन संस्था :
नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर अंजनेरीजवळ भारतीय नाणे संशोधन संस्था आहे. येथे भारताच्या जुन्या संस्कृतीची व इतिहासाची नाण्याच्या माध्यमातून ओळख होते. पुरातन काळापासून अर्वाचिन काळापर्यंतच्या विविध प्रकारच्या नाण्यांचा संग्रह येथे करण्यात आला असून अभ्यासकांना येथे संशोधन करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

दिंगबर जैन मंदिर :
नाशिकरोड देवळाली कॅम्प महानगर येथे शांतीनाथ कुंदकुंद दिंगबर जैन मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. भारतातील एकमेव 51 इंचाची पंचधातूपासून बनविलेली पद्मासन मुद्रा असलेली श्री शांतीनाथ दिगंबर जिनबिंब यांची मूर्ती असून भगवान श्री आठ बलभ्रदची 60 इंचाच्या खड्गासन मुद्रायुक्त मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या दिगंबर जैन मंदिर स्मारक परिसरात इंद्रसभा, राज्यसभा, जनकल्याण, शोभायात्रा अशी विलोभनीय दालने असून ते सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेतात.

बाल येशूचे मंदिर :
नाशिकरोड येथे सेंट झेव्हियर स्कूलच्या प्रांगणात हे बाल येशूचे मंदिर ख्रिश्चन धर्मियांनी उभे केले आहे. बाल येशूची अशा प्रकारची रम्यमूर्ती जगात फक्त युगोस्लाव्हियामध्ये आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात आबालवृद्ध मंदिराला मोठ्या संख्येने भेट देतात.

चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मारक:पांडवलेणीच्या पायथ्याशी नाशिकचे चित्रपट महर्षी कै.दादासाहेब फाळके स्मारक आहे.
पांडवलेण्याच्या पूर्वेस व उत्तरेस उतरणीवरून पावसाचे पाणी वाहून जाते. ते पाणी अडवून स्मारक परिसरात जलसंचयाची व्यवस्था करण्यात आली आहे. फाळके स्मारकामध्ये पुरातत्व दालन, तीन कलादालन, छोटे सिनेमा हॉल, खुला रंगमंच आहे. बुद्ध स्मारकात गौतम बुद्धाची सुंदर मुर्ती आहे.

बुद्ध स्मारक :कै.दादासाहेब फाळके स्मारक उद्यानाचा एक अविभाज्य भाग दिसावा, अशी रचना येथील बुद्ध स्मारकांची करण्यात आली आहे. स्मारक उद्यानापैकी पांडवलेण्याच्या प्रवेशद्वारावजळील पाच एकर जमिनीवर बुद्ध स्मारकांची उभारणी करण्यात आली आहे. या प्रवेशद्वारावर चार समप्रमाणात आसांची चार तोरणे उभारण्यात आली आहे.

साल्हेर मुल्हेर किल्ला :इ. स. 1206 मध्ये उभारण्यात आलेला हा किल्ला नाशिकपासून 97 किमी अंतरावर आहे. 1660 मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी मुल्हेर येथे वर्षभर होते. शिवाजी महाराज सुरतेची लूट नेताना येथे थांबले होते.

गारगोटी संग्रहालय :

सदरचे गारगोटी संग्रहालय हे सिन्नर येथील माळेगाव एमआयडीसी क्षेत्रामध्ये आहे. नाशिकपासून 28 कि.मी. अंतरावर असलेल्या या संग्रहालयात हिरासदृश्य विविध प्रकारची मौल्यवान खनिजे आहेत. रंगीबेरंगी खडक, स्फटिके याठिकाणी आकर्षकपणे प्रदर्शित केलेले आहेत.

मांगी तुंगी मंदिर:
मांगी तुगी मंदिर नाशिकपासून 125 किमी. अंतरावर सटाणा तालुक्यात आहे. समुद्र सपाटीपासून 4343 फुट उंचीवर मांगी शिखर तर समुद्र सपाटीपासून 4366 उंचीवर तुंगी शिखर आहे. मांगी तुंगीच्या पायथ्याशी ‘भिलवाडी’ हे गाव आहे. येथे साधना केल्याने मोक्ष प्राप्ती होते अशी मान्यता आहे.

मांगी शिखर:
मांगी शिखराची उंची जास्त नसली तरी येथे सराईत गिर्यारोहकच चढू शकतात. शिखराच्या पायथ्याशी भगवान महावीर, आदिनाथ, पार्श्वनाथ, हनुमान, वाली, सुग्रीव इत्यादींच्या 356 कोरीव मुर्ती आहेत. गुफांमध्ये देखील काही कोरीव काम आढळते. या ठिकाणी ‘मांगीगिरी मंदीर’ आहे.

खंडोबा मंदीर:
हे मंदिर देवळाली छावणी परिसरात लहान टेकडीवर वसलेले आहे. मंदिर 500 वर्ष जुने आहे. भगवान शिव श्री खंडोबाचा अवतार घेऊन मल्ल दैत्य व मणी दैत्य या दोघांचा वध केल्यानंतर या टेकडीवर विश्रामासाठी आले, अशी मान्यता आहे. म्हणून या मंदिरास ‘विश्रामगड’ असे म्हटले जाते. या टेकडीला ‘खंडोबाची टेकडी’असे म्हणतात.

अण्णा गणपती नवग्रह सिद्धपीठ:हे मंदिर नव्यानेच वालदेवी नदीकाठी देवळाली परिसरात बांधण्यात आले असून नवग्रहांना समर्पित आहे. श्री गणेशाची भव्य इमारत व नवग्रहांची एकाच ठिकाणी असलेली मंदिरे हे इथले वैशिष्ट्य आहे.

गोदावरी मंदीर:
रामकुंडाजवळ असलेले हे मंदीर 1775 मध्ये गोपिकाबाई पेशवे यांनी बांधले होते. या मंदिरात गोदावरी व भगिरथ देवतांच्या मुर्ती आहेत. हे मंदीर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी 12 वर्षांतून एकदा उघडले जाते आणि सिंहस्थ कालावधीत 13 महिने उघडे असते.

गोंदेश्वर- हेमाडपंथी मंदीर:नाशिकपासून 40 किमी. अंतरावर सिन्नरजवळ हे मंदीर आहे. नाशिकरोड रेल्वे स्टेशनपासून हे अंतर 32 किमी. आहे. सुंदर शिल्पकलेचा नमुना म्हणून मंदिराचा परिचय आहे.

धर्मचक्र प्रभाव तिर्थ विल्होळी:नाशिक शहरापासून 12 किमी. विल्होळी गावात हे मंदिर आहे. पवित्र त्रिलोकनाथ मंदिर तीन मजली आहे. मंदिराबाहेर सिद्धांचल, अबू, गिरनार व सामेतशिखर यांच्या प्रतिकृती आहेत. तळमजल्यावर भगवान महावीरांची 12 फुट उंचीची मुर्ती आहे. मुर्तीच्याभोवती चार मुलनायक आहेत.

धम्मगिरी, इगतपुरी: इगतपुरी येथे आंतरराष्ट्रीय विपश्यना अकादमीची स्थापना करण्यात आली आहे. नाशिकपासून 40 किमी. अंतरावर मुंबई-आग्रा महामार्गाला लागूनच हे केंद्र आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ध्यानकेंद्र म्हणून याचा परिचय आहे. शांततेचा सुंदर अनुभव घेण्यासाठी जगभरातील नागरिक येथे येतात.

गुरूद्वार, मनमाड:श्री गुरुगोविंदसिंह यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मनमाड येथील गुरूद्वार येथे शीख बांधव दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात. गुरुद्वार ट्रस्टतर्फे भाविकांना मोफत लंगर, निवास, आरोग्य आदी सेवा पुरविल्या जातात. नाशिक-मनमाड अंतर 88 किमी. आहे.
-संकलन- जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक.

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India