महाराष्ट्राच्या नकाशावरील अगदी पूर्वेकडच्या कोपऱ्यात असणारा भंडारा जिल्हा. 11 लाखांच्यावर लोकसंख्या असलेला आणि नैसर्गिक सौदर्यासोबतच नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असा हा जिल्हा आहे. एवढ्या छोट्या जिल्ह्यात एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 1/3 क्षेत्र जंगलाने व्यापलेले आहे. या जिल्ह्यात न्यू नागझिरा, उमरेड कऱ्हांडला आणि कोका अशी तीन अभयारण्य नव्याने घोषित झाली आहेत. यामुळे पर्यटनाला चालना मिळू लागली आहे.
भंडारा-गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्या न्यू नागझिरा व नागझिरा अभयारण्याला लागूनच असलेले 10,013 हेक्टर वनक्षेत्र शासनाने 2013 मध्ये अभयारण्य म्हणून घोषित केले. या अभयारण्याला ‘कोका अभयारण्य’ असे नाव देण्यात आले. ब्रिटीश काळात ‘ओल्ड रिझर्व्ह फॉरेस्ट’ म्हणून जे जंगल ओळखले जात होते त्याच भागाला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आहे.
अभयारण्यातील प्राणीहे अभयारण्य वन्य जीवांसाठी उत्कृष्ट अधिवास असल्याचे निदर्शनास आल्यामुळेच या जंगलाला वन्य प्राण्यांसाठी ‘संरक्षित’ केले आहे. या अभयारण्याच्या क्षेत्रात वाघ, बिबट, गवा, अस्वल, काळविट, नीलगाय, सांबर, रानकुत्रे, चितळ, रानडुकर इत्यादी प्राणी आहेत. त्याचबरोबर अनेक पक्षांच्या अधिवासाने व जैवविविधतेने जंगल श्रीमंत झाले आहे.
या अभयारण्याचा विकास डिसेंबर 2013 पासून सुरु झाला असून 25 नैसर्गिक पाणवठे आहेत. ज्याठिकाणी वन्य प्राण्यांना पाणी उपलब्ध नाही, त्याठिकाणी विंधन विहीरी बांधण्यात आल्या आहेत. पाणी पिण्यासाठी सिमेंट टाक्या तयार करण्यात आल्या आहेत. टाकीत सतत पाणी रहावे म्हणून सौर ऊर्जेवर चालणारे पंप बसविण्यात आले आहेत. या अभयारण्यात जाण्यासाठी चंद्रपूर या गावी प्रवेशद्वार करण्यात आले आहे. पर्यटकांना जंगल सफारीसाठी 5-7 गाड्या सोडण्यात येत आहेत.
गावातीलच 12 वी पास मुलांना गाईडचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. अभयारण्यातील जंगल सफारीचा मार्ग 46.5 कि.मी.चा आहे. या अभयारण्यात वन्य प्राण्यांचे दर्शन सातत्याने होत असल्यामुळेच पर्यटकांचा ओढा या अभयारण्याकडे वळला आहे.
अभयारण्याला जायचे कसे ?
नागपूर-भंडारा हे 65 कि.मी. अंतर असून भंडाऱ्याहून चंद्रपूर हे प्रवेशद्वार 19 कि.मी. आहे. चंद्रपूर प्रवेशद्वारापासून 3 जिप्सींची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच स्वत:चे वाहनही जंगल सफारीसाठी वापरता येते.
जंगल सफारीची वेळ
पर्यटकांना जंगल सफारीकरिता सकाळी 5 ते 9.30 आणि दुपारी 3 ते 6.45 या कालावधीत जाता येते.
बुकिंग
अभयारण्याला भेट देण्यासाठी ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था आहे तसेच स्पॉट बुकिंग चंद्रपूर या प्रवेशद्वारावर उपलब्ध आहे. एकावेळी 5 ते 7 गाड्या सोडण्यात येतात.
राहण्याची व्यवस्था
अभयारण्यात इको डेव्हलपमेंट कमिटीचे दोन टेंट (तंबू) आहेत. त्यामध्ये राहण्याची व जेवण्याची व्यवस्था आहे.
-मनीषा सावळे, जिल्हा माहिती अधिकारी, भंडारा.
कोका अभयारण्यामुळे भंडाऱ्याच्या पर्यटनाला चालना
Posted by
rajeshkhadke
on Tuesday, 11 August 2015
Labels:
पर्यटन
0 comments:
Post a Comment