पर्यटन समृद्ध पालघर

निमित्त एक वर्ष पूर्ण झाल्याचे...
ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन 1 ऑगस्ट 2014 रोजी पालघर जिल्ह्याची निर्मिती शासनाने केली आहे. येत्या 1 ऑगस्ट 2015 रोजी याला एक वर्ष पूर्ण होत आहे. महाराष्ट्रातील 36 वा जिल्हा म्हणून निर्माण झालेल्या जिल्ह्याचे मुख्यालय पालघर हेच आहे. एक तारखेला या जिल्ह्याचा वर्धापनदिन आणि महसूल दिनही येत असल्याने जिल्ह्याविषयीची माहिती खास महान्यूजच्या वाचकांसाठी...


निसर्गाने पालघर जिल्ह्याला भरभरुन दिले आहे. 70 कि.मी.चा समुद्र किनारा, गर्द जंगले, पर्वतरांगा, खळाळते धबधबे, गड किल्ले अशा विविध अंगांनी संपूर्ण जिल्हा नटलेला आहे. अशा निसर्गसंपन्न आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक, पारंपरिक कला यांनी संपन्न असलेला हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून नावारुपाला येण्यासाठी ठोस, आखीव नियोजन करण्यात येत आहे.

पालघर जिल्हा हा मुंबईपासून अत्यंत जवळ आहे. मुंबईहून इथे येण्यास दळणवळणाची साधने मुबलक प्रमाणात उपलब्ध असणे, ही या जिल्ह्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने मोठी उपलब्धी आहे. पर्यटकांना आकर्षित करणारे गड, समुद्रकिनारे, धरणे, जंगले या गोष्टी इथे मोठ्या प्रमाणात आहेत.

जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये पर्यटनास समृद्ध अशी विविध स्थळे आहेत. जव्हार तालुक्यामध्ये शिरपा माळ, दाभोसा आणि हिरडपाडा धबधबा, जामसर, भोपटगडचा गड, डहाणू तालुक्यात डहाणूचा समुद्र किनारा, बोर्डी, चिंचणी, महालक्ष्मी मंदीर, तलासरीमध्ये जाई विलास पॅलेस, पालघर तालुक्यात सातिवली, कोकनेर, मेघराज मंदीर, जलसर, वसईतील अर्नाळा, बुद्ध स्तूप-(सोपारा), मोखाड्यातील सुर्यमाळ-सनसेट पॉईंट, देवबंध, वाशाळा, ओसरविरा तलाव, वाडा तालुक्यातील कोहोई किल्ला अशी कित्येक पर्यटनस्थळे पर्यटकांना आकर्षित करणारी आहेत.

जव्हार तालुक्याला पालघर जिल्ह्यातील महाबळेश्वर म्हणून संबोधले जाते. आदिवासी लोकवस्ती असलेला हा दुर्गम भाग आहे. इथे येणाऱ्या पर्यटकांना आदिवासी बंधूंचे ग्रामीण जीवन, तेथील संस्कृती, परंपरा यांचा जवळून अनुभव घेता येतो. शिवाय या लोकांशी संवाद साधण्याचीही संधी मिळते. येथील तारपा नृत्याचेही सायंकाळी आयोजन केले जाते. याबरोबरच या लोकांनी स्वत: बनविलेल्या कलाकृतीच्या वस्तू पर्यटकांना आवडल्यास विकत घेता येतात. डहाणू, बोर्डी, चिंचणी या समुद्र किनाऱ्याजवळून जाणाऱ्या रस्त्यावरुन सफर करणे हीदेखील पर्यटकांसाठी पर्वणी ठरते. हे किनारे सुरुची झाडे, नारळ व फळाफुलांनी बहरलेले आहेत.

कृषी पर्यटन ही संकल्पना रुजविण्यास इथे प्रचंड प्रमाणात वाव आहे. चिकू महोत्सवासारखे उपक्रम कृषी पर्यटनास चालना देणारे ठरतील. याठिकाणी चिकूपासून बनणारे पदार्थ पर्यटकांना दाखविता येऊ शकतील. अशा महोत्सवाद्वारे स्थानिक लोकांच्या कला-कौशल्याच्या वस्तू, चिकूपासून बनणारी उत्पादने दाखविता येतील. याबरोबर चिकूच्या बागांमध्ये फिरता येईल.

मोहडा म्हणून मुखवट्यांचा फेस्टिव्हल हा पालघरमधील एक प्रसिद्ध उत्सव आहे. चैत्र महिन्यात तीन दिवस हा उत्सव चालतो. या उत्सवात विविध भारतीय देव-देवतांचे 52 मुखवटे परिधान केले जातात. मोखाडा, कटदान, भारसाट मेट, डेंगाची मेट, वेहेल पाडा (ता. विक्रमगड), जव्हार, पोयशेट कोकाडा या गावांमध्ये बोहडा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

पर्यटन ही येथील आर्थिक उन्नतीला चालना देणारी महत्वाची बाब ठरेल यात शंका नाही. स्थानिक कला, संस्कृती, उत्सव या माध्यमातून जिल्ह्याची प्रतिमाही जतन करण्यास मदत होते. याशिवाय स्थानिकांना मिळकतीचे साधन व रोजगारही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. त्यामुळे इथल्या पर्यटनस्थळांचे जतन करुन त्यांचा अधिकाधिक विकास व्हावा यादृष्टीने प्रशासन निश्चितपणे प्रयत्नशील आहे.

पूर्वीपासून या जिल्ह्यात असलेल्या पर्यटनस्थळांमध्ये अधिक सुविधा उपलब्ध करुन ती समृद्ध करण्यात येतील. साहसी पर्यटनाअंतर्गत अर्नाळा, बोर्डी, डहाणू, झाई याठिकाणी पॅरासेलिंग, वॉटर स्कॉईंग, बोटींग अशा सुविधा पर्यटकांना उपलब्ध करुन देण्याबाबत प्रस्तावित आहेत. अर्नाळा, भोपटगड, अशेरी गड, गंभीर गड, इथे ट्रेकींग व तुंगारेश्वर, कनेट हिल्स, मोखाडा, जव्हार इत्यादी ठिकाणी पॅराग्लायडिंग देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

पालघर जिल्हा निर्मितीस एक ऑगस्टला वर्ष पूर्ण होत आहे. भविष्यात पालघर हा एक पर्यटन जिल्हा म्हणून नावारुपाला येईल. पर्यटन क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करील यात शंका नाही.

-दत्ता भडकवाड
उपजिल्हाधिकारी, पालघर.

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India