पर्यटनासाठी खुणावणारे पालघर

पालघर जिल्ह्याकडे पर्यटनाचा एक नवीन पर्याय म्हणून बघितले जात आहे. या शहराला निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्य बहाल केले आहे. पर्वत रांगा, धबधबे, तलाव, पुरातन वास्तुकला, नयनरम्य सनसेट पॉइण्टस, आणि रेखीव मंदिरे या सुंदर आणि शांत शहराला एक परफेक्ट डेस्टीनेशन बनवतात. पालघर जिल्हा उद्या १ ऑगस्ट रोजी आपला पहिला वर्धापन दिन साजरा करीत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती खास महान्यूजच्या वाचकांसाठी.... चला या पर्यटन स्थळांना एकदा अवश्य भेट देऊन या निसर्गाचा आनंद लुटुया... 

दाभोसा आणि दादरकोपरा धबधबा

जव्हार पासून 18 कि. मी. वर तलासरी-सिल्व्हासा रोडवर हे सुंदर धबधबे आहेत. लेंडी नदीपासून वाहणारे पाणी डोगरांच्या दोन्ही बाजूने धबधब्याच्या रूपात खाली येते. दाभोसा हा मुख्य धबधबा असून उंची 300 फूट इतकी आहे. दादरकोपरा धबधबा हा उन्हाळ्यात कोरडा असतो म्हणून त्याला सुका धबधबा असेही म्हणतात. दोन्ही धबधबे हे सुमारे 600 फूट उंच डोंगरांनी वेढलेले आहेत. या भागात अनेक वनऔषधी वनस्पती आढळून येतात. फेब्रुवारी ते जुलै ही या धबधब्यास भेट देण्यासाठी आदर्श वेळ आहे.

शिर्पामाळ


3 शतकांपेक्षा ही जुने असे हे शिल्प शिवरायांच्या स्मरणार्थ बांधले गेले आहे. डोंगराच्या कडेवर असल्यामुळे शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी या भागाचा वापर केला जात असे. या भागातून संपूर्ण जव्हार शहरावर दृष्टीक्षेप टाकता येतो. सुरतच्या दिशेने कूच करताना शिवरायांनी याच भागत थांबून विश्रांती घेतली होती. जव्हारचे त्यावेळचे राजे पहिले विमशहा यांनी छत्रपतींना मानाचा शिरपेच देऊन जव्हारमध्ये स्वागत केले तेच हे ऐतिहासिक स्थळ. हिरव्यागार टेकडीवर फडकणाऱ्या भगव्याचे दृष्य अत्यंत सुंदर दिसते. जव्हारमध्ये अजून बरीच पर्यटन स्थळे आहे ज्यामध्ये दक्षिणमुखी मारूती मंदिर, वर्षभर सतत वाहणारा काळ मांडवी धबधबा, सुंदर आणि शांत खदखद तलाव, शिवरायांनी बांधलेला भोपाटगड किल्ला यांचा समावेश होतो.

जयविलास राजवाडा
जव्हारमधील सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू असलेला हा वाडा ‘राज बरी’ या नावाने सुद्धा ओळखला जातो. राजे यशवंतराव मुकणे यांनी बांधलेला हा राजवाडा मुकणे घराण्याच्या राजाला राहण्यासाठी बांधला होता. येणाऱ्या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी हा वाडा डोंगराच्या माथ्यावर बांधला आहे. आदिवासी संस्कृती दर्शवणारे कोरीवकाम, राजवाड्याची घुमटे आणि आजूबाजूला पसरलेले हिरवे जंगल ही या राजवाड्याची वैशिष्ट्ये आहेत. गुलाबी दगडातून तयार केलेल्या या अद्वितीय अशा वास्तुरचनेमुळे या वाड्याचा वापर अनेक फिल्म शूटस साठी केला गेला आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांपर्यंत हा राजवाडा पाहण्यासाठी खुला असतो. राजवाडा आतून पाहण्यासाठी माफक प्रवेश फी आकारली जाते.

हनुमान पॉइण्ट
शहराच्या मध्यवर्ती भागापासून सुमारे 1 कि. मी. अंतरावर एक हनुमानाचे प्राचीन मंदिर आहे. या पॉइण्टला हनुमान पॉइण्ट असे म्हणतात. तिन्ही बाजूने वेढलेली खोल दरी, दाट जंगले, जवळच्या राजविलास राजवाड्याची प्राचीन घुमटे, दूरवर दिसणारा ऐतिहासिक शहापूर माहोलीचा किल्ला आणि मोकळे आकाश असे नयनरम्य दृष्य येथून दृष्टीस पडते. रात्रीच्यावेळी येथून दिसणारा, कसाऱ्याच्या घाटातून जाणऱ्या ट्रेनचा प्रकाश एक वेगळाच अनुभव देऊन जातो.

सनसेट पॉइण्ट
जव्हारचा अजून एक प्रसिद्ध पॉइण्ट म्हणजेच सनसेट पॉइण्ट आहे. शहराच्या मध्यवर्ती भागापासून पश्चिमेला फक्त अर्धा किमी वर हा पॉइण्ट आहे. जोडप्यांचा लाडका असलेला हा पॉइण्ट सूर्यास्ताचे एक अप्रतिम दृष्य दाखवतो. येथून दिसणाऱ्या दरीचा आकार हा धनुष्यासारखा आहे म्हणून पूर्वी या भागाला ‘धनुकमळ’ असे म्हणत. येथून 60 कि. मी. दूर असलेल्या डहाणू जवळच्या महालक्ष्मी डोंगराचे सुंदर दृष्य दिसते. दरीमधल्या दाट गर्द झाडीवर पडणारी सूर्य किरणे पाहण्याचा अनुभव शब्दात वर्णन न करता येण्यासारखा आहे.

शिरगाव
शांतनिवांत सागरतीर, किनाऱ्यावरच शतकानुशतकांचा इतिहास सांगणारा दुर्ग आणि हिरव्यागार परिसराच्या कोंदणात वसलेलं शिरगाव हे मुंबई-ठाणेकरांसाठी एक निसर्गरम्य ठिकाण आहे. ठाणे जिल्ह्यातल्या पालघर तालुक्याला शांतनिवांत सागरतीर लाभला आहे. शिरगावचा किल्ला हा किनारी दुर्ग प्रकारातला असून तो पालघरच्या पश्चिमेला आहे. पालघरपासून 7 ते 8 कि.मी. अंतरावर शिरगावचा किल्ला आहे. शिरगावचा किल्ला पाहण्यासाठी आपल्याला प्रथम पालघरला पोहोचणं आवश्यक आहे. पोर्तुगीजांनी बांधलेल्या शिरगावच्या किल्ल्यावर छत्रपती संभाजीराजांनी इतर किल्ल्यांबरोबर हल्ला चढवला होता. पण तो त्यावेळी ताब्यात घेता आला नाही. पुढे चिमाजी आप्पांनी उत्तर कोकणाच्या मोहिमेत शिरगावचा किल्ला ताब्यात घेतला. गावाच्या मधोमधच किल्ला आहे. पोर्तुगीजकालीन वैशिष्ट्यपूर्ण बांधणी आणि मनोऱ्यामुळे किल्ला प्रथमदर्शनातच आकर्षून घेतो. पहिला दरवाजा पुर्वाभिमुख असून त्याच्या बाजूने ओवऱ्या आहेत. प्रवेशद्वाराच्या पुढे दुसरा दरवाजा आहे. दरवाजावरील नक्षीकाम पाहण्यासारखं आहे. दोन्ही दरवाजांच्यामध्ये पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. दुसऱ्या दरवाजातून आत गेल्यावर किल्ल्यामधील पडझड झालेल्या वास्तू दिसतात. किल्ल्याचा आकार फारसा मोठा नसल्याने गडफेरीला फार वेळ लागत नाही. तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. या पायऱ्यांवरून तटबंदीवर पोहोचल्यावर प्रवेशद्वाराच्या वर बांधलेल्या घुमटाकृती मनोऱ्यावर जाता येते. तटबंदीवरून किल्ल्याला फेरी मारता येते. पूर्वेकडील आयताकृती मनोऱ्यावरून शिरगावचं मनोवेधक दृष्य दिसतं. गडाचा आकार छोटा असल्याने बांधकामं आटोपशीर आणि कमी जागेत बसवलेली आढळून येतात. पश्चिमेकडील बुरूजावरून अथांग सागराचे रमणीय दृश्य दिसते. या बाजुच्या तटबंदीमधे एक चोर दरवाजाही आहे. किल्ल्यामधे असलेल्या ताडवृक्ष आणि त्यांच्या फांद्या सुंदर दिसतात.

कसं पोहोचाल?
मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील मनोर येथून पालघरला रस्ता जातो. पालघर रेल्वे स्थानकही आहे. शटल- मेल, लोकलने पालघरला जाता येते. तिथून शिरगावला जाण्यासाठी एस.टीची सोय आहे. एस.टी. थांब्यापासून लगेच किल्ल्याजवळ पोहचू शकतो.

गारेश्वर मंदिर वसई
तुंगारेश्वर पर्वताच्या कुशीत 2177 फुटांवर वसलेले हे महादेवाचे मंदिर फार जुने व प्रसिद्ध आहे . वसई तालुक्यातलं हे ठिकाण येथील निसर्ग सौंदर्यामुळे , धबधब्यांमुळे पर्यटकांचं हिवाळा व पावसाळ्यातलं खास आकर्षण बनलं आहे. परशुरामाच येथे वास्तव्य होते. विमालासूर या राक्षसाने तपश्चर्येने शंकराला येथे येऊन राहण्यास सांगितले व शंकराने दिलेल्या शिवलिंगाची स्थापना विमालासूर या राक्षसाने येथे केली अशी आख्यायिका आहे. तुंगारेश्वर हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग आहे. परंतु मुंबई पासून थोडसं लांब असलेलं हे ठिकाण कित्येक वर्षांपासून पर्यटकांचे मन रिझवत आहे. धबधब्याचा व थंडगार वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी या स्थळाला नक्की भेट द्या.

जीवदानी मंदिर
सतराव्या शतकात म्हणजेच सुमारे 350 वर्षांपूर्वी मुंबईपासून 60 किलोमीटर अंतरावर विरार येथे डोंगरावर जीवदान या किल्ल्याचा शोध लागला. तो पांडवांचा असल्याचे मानले जात होते. तेथील एका गुहेमध्ये जीवदानी आई जी आदिशक्तीचे स्वरूप आहे तिचा वास होता अशी मान्यता आहे. जीवदानी देवी ही 51 शक्तीपीठांपैकी एक आहे येथे रोज हजारो भाविक देवीचे दर्शन घ्यायला येतात. ही देवी नवसाला पावते असा या भाविकांचा विश्वास आहे. या मंदिराला 1500 पायऱ्या आहेत. पायऱ्या न चढता येणाऱ्यांसाठी रोप वे ची सोय देखील उपलब्ध करून दिलेली आहे. डोंगरावर पोहोचल्यावर थंड वातावरणात थकवा कुठच्या कुठे पळून जातो. तसेच शांत वातावरणात देवीची आराधनाही व्यवस्थित करता येते. नवरात्रीमध्ये तर हे मंदिर विशेष आकर्षण ठरते. 

डहाणूचा किल्ला
सध्याच्या घडीला या किल्ल्यावर तहसलीदार कार्यालय थाटलेलं आहे. एकेकाळी या किल्ल्याचा उपयोग व्यापारासाठी मोठ्या प्रमाणावर केला जायचा. आजही त्या ठिकाणी त्याच्या काही खुणा दिसतात. किल्ल्याची रचना व मांडणी व्यापारदृष्ट्या पूरक आहे. 

कसे पोहोचाल?
पश्चिम रेल्वेने डहाणू स्टेशन गाठायचं. तिथून बसने 15 मिनिटात किल्यावर पोहोचता येतं.

तारापूरचा किल्ला
या किल्ल्याची मांडणी पाहण्यासारखी आहे. खाडीलगत असलेल्या या किल्ल्याचा वापर मालमत्ता ठेवण्यासाठी केला जायचा. सध्या या किल्ल्याला कुलूप लावलेलं आहे. परंतु आत जाण्यास काही अडचण येत नाही. किल्ल्याच्या आतमध्ये गोड्या पाण्याच्या विहिरी आणि चिकू, नारळ यांच्या बागा पाहायला मिळतील. या किल्ल्याच्या तटबंदीतून शत्रूवर गोळीबार केला जायचा. आजही ते झरोके याठिकाणी पाहता येतील. तटबंदीवरून बिनदिक्कतपणे फिरता येईल इतका सुरक्षित हा किल्ला आहे.

कसे पोहोचाल?
बोईसर या रेल्वे स्थानकावर उतरून किंवा एसटी स्टॅण्डवर उतरून या किल्ल्याकडे जाता येते.

शिरगाव किल्ला
वेगळ्या प्रकारची माडाची बने या किल्ल्यात पाहता येतील. हेच या किल्ल्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. सात पानं असलेली ही माडाची बनं इतरत्र कुठेही आढळत नाहीत. शिवाय किल्ल्याचे घुमटाकृती प्रवेशद्वार, आणि आतील रेखीव बांधकामही पाहण्यासारखे आहे. किल्ल्यावर पाण्याची व्यवस्था नसल्याने आपल्याजवळ मुबलक पाण्याचा साठा असणं गरजेचं आहे. 

कसे पोहोचाल?
पश्चिम रेल्वे स्थानकाच्या पालघर या स्थानकावर उतरून तिथून शिरगावला जाण्याकरता बसची व्यवस्था आहे. 20 ते 25 मिनिटांचे अंतर पार करून या किल्ल्याजवळ पोहोचू शकतो.

केळवे माहिम
केळवे माहिम हा किल्ला पाणकोट व भुईकोट या दोन्ही प्रकारांमध्ये आहे. भुईकोट किल्ल्यात शितलाई देवीचं मंदिर आहे. येथून बीचवर सहजपणे जाता येतं. या किल्ल्याचा आकार स्टार म्हणजे चांदणीसारखा आहे. किल्लाच्या लगतच सुरूचं बन पसरल्यामुळे पर्यटकांची वर्दळ येथे मोठ्या प्रमाणावर असते. पोर्तुगिजांनी बांधलेला हा किल्ला उत्तम कलाकृतीचा एक उत्कृष्ट नमुना म्हणूनही ओळखला जातो. पाणकोट किल्ल्यात भरती ओहोटीची वेळ पाहूनच जावं लागतं. पानबुडीसारखा आकार असलेला हा किल्ला 75 फूट लांब व 40 फूट रूंद असून याची उंची 20 फुट आहे. बीचवर किल्ला असल्याने ओहोटीच्या वेळी किल्ल्यात आतमध्ये चालत जाता येतं. आतमध्ये गेल्यावर आठ झरोके पाहायला मिळतील. या झरोक्यामधून दांडा खाडीवर नजर ठेवली जायची. त्याकरता खास हा किल्ला बांधण्यात आला होता. दांडा खाडीलगत त्या काळात जवळपास 17 किल्ले होते आज त्यातील केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच किल्ले शिल्लक आहेत.

अर्नाळा
संपूर्ण नारळाच्या झाडांनी हे बेट व्यापलेलं आहे. बेटाच्या पश्चिम टोकावर किल्ला असल्याने भर वस्तीच्या बोळातून किल्ला गाठायचा. 

अर्नाळा किल्ल्याचं भक्कम प्रवेशद्वार पाहून किल्ल्याच्या बांधकामाची कल्पना येते. या महाद्वारावर व्यास किंवा व्याघ्र आणि हत्ती यांची सुबक शिल्पं कोरलेली आहेत. समोरच्याच कमानीवर वेली-फुलांची बुट्टी आपल्याला खिळवून ठेवते. उत्तराभिमुख असलेल्या या प्रवेशद्वारावर देवनागरीमध्ये शके 1659 मधला शिलालेख लिहिलेला आहे. इथून आत गेल्यावर पहारेकऱ्यांच्या देवड्या दिसतात. उजव्या हातालाच साधारण दहा फुटांवर छोटी देवडी दिसते. ही देवडी थेट प्रवेशद्वारावरील तटरक्षकांच्या इथे मिळते. संरक्षणाच्या योजनेचा एक मोठा नमुना आपल्याला इथे पाहायला मिळतो.

मुख्य गडात प्रवेश केल्यावर समोरच प्रशस्त शेती दिसते. या आखीव शेतीमुळेच गडाचं रूप खुलून दिसतं. सरळ पुढे चालत गेल्यावर उजव्या हाताला कौलारू घरासारखा दर्गा आहे. तर डाव्या हाताने चालत गेल्यास पूवेच्या तटाजवळ त्र्यंबकेश्वराचं मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरच टुमदार वटवृक्ष असल्याने इथे थोडा वेळ बसून विश्रांती घ्यायला हरकत नाही. इथे समोर गोड्या पाण्याचा तलाव बांधून घेतलेला आहे. तर तटांवर उत्खननात सापडलेल्या गणेशाच्या मूतीर्ची स्थापना केलेली आहे. इथूनच मागे वळून तटाच्या आतील बाजूने तटांवर जाण्यास पायऱ्या आहेत. या पायऱ्यांनी तटांवरच्या फेरीस सुरूवात करायची. एकूण नऊ बुरूज असलेला आणि तीन प्रवेशद्वार असलेला हा किल्ला इतिहासात स्वत:च वेगळं अस्तित्व ठेवून आहे.

या जलदुर्गाची उभारणी गुजरातच्या सुलतानाने इ.स. 1516 मधे केली. पुढे 1530 मधे हा किल्ला पोर्तुगिजांनी आणि त्यानंतर 1737 मध्ये मराठ्यांनी जिंकला. या जलदुर्गाच्या रक्षणासाठी मराठ्यांनी दोन हजारी सैन्य गडावर ठेवलं होतं. असे दाखले इतिहासात सापडतात. 

कसे पोहोचाल?
पश्चिम रेल्वेचं विरार रेल्वे स्टेशनवर जायचं. विरारपासून 14 किमीवर अर्नाळा कोळीवाडा आहे. तिथे बससेवा चांगली आहे. किंवा वसईहूनही अर्नाळ्याला जाण्यासाठी दर अर्ध्या तासाला बसेस आहेत.

वसईचा किल्ला
चिमाजी आप्पांनी मिळवलेला वसईचा विजय ही घटना मराठ्यांनी भारतातून पोर्तुगीज सत्तेचे उच्चाटन करण्याचा जो संकल्प केला होता, त्यापैकी एक महत्त्वाचा टप्पा होय. म्हणूनच आजही या ऐतिहासिक प्रसंगाची आठवण भारतीयांच्या हृदयास तीव्रतेने जाऊन भिडते. समृद्ध अशी ऐतिहाससिक पार्श्वभूमी लाभलेला हा किल्ला व्यवस्थितपणे पाहण्यासाठी हातात किमान दोन दिवस हवेत. नाहीतर घाईघाईत हा किल्ला नीटपणे पाहता येणार नाही. वसई किल्ला जिंकल्यावर चिमाजी आप्पांनी किल्ल्यात 27 जुलै 1739 रोजी मारूतीच्या मूर्तीची स्थापना केली. इतकंच नव्हे तर चिमाजी आप्पांनी विजयासाठी वगोश्वरी देवीस नवस केला होता. त्याप्रमाणे विजय मिळाला. मग पेशवे बाळाजी बाजीराव यांनी वगोश्वरीचे देऊळ बांधले. त्याचबरोबर चिमाजी आप्पांचा पुतळा, वगोश्वरी देवीचं मंदिर, नागेश्वरी मंदिर, बाजारपेठ, तलाव, अनाथालय, भुयारं अशी नानाविध आकर्षणे या किल्ल्यावर असल्याने हे सर्व पाहण्यासाठी व अनुभवण्यासाठी गाठीशी किमान दोन दिवस हवेत.

डहाणू – बोर्डी बीच व महालक्ष्मी
डहाणू हे समुद्रकिनाऱ्याला लागूनच विस्तारलेले शहर आहे. डहाणू ते बोर्डी असा 17 किलोमीटरचा किनारा विस्तारला आहे. डहाणूला स्वच्छ, सुंदर व शांत समुद्रकिनारा लाभला आहे. मत्स्यव्यवसाय, फळे, भाज्या व चीकू यासाठी डहाणू प्रसिद्ध आहे. येथून जवळच डहाणूचा किल्ला आहे. डहाणूवरूनच आपण नरपडचा समुद्रकिनारा तसेच येथून 27 कि.मी. अंतरावर असलेल्या उंच डोंगरावरील श्री महालक्ष्मीचे जागृत स्थानही पाहू शकतो. डहाणूचीमहालक्ष्मी देशातल्या एकावन्न शक्तिपीठांपैकी एक आहे. डहाणू फळझाडांच्या रांगांनी सजलेले आहे. चिक्कूसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

महालक्ष्मीची यात्रा चैत्र महिन्याच्या पौर्णिमेपासून कृष्णपक्षातील अष्टमीपर्यंतमंदिराच्या सभोवती असलेल्या विशाल मैदानात भरते. डहाणू तालुक्यातील बोर्डीयेथे उदवाडा हे पारशी लोकांचे पवित्र स्थळ आहे. डहाणू रेल्वे स्थानकापासून 15 कि.मी. अंतरावर बोर्डी बीच आहे. हा अतिशय शांत व सुरक्षित बीच आहे. तसेच डहाणू आगर येथील केवडावंतीचे मंदिर व हनुमान मंदिर ही मंदिरे प्रसिद्धआहेत.

पालघर जिल्हयातील डहाणू-बोर्डीचे समुद्रकिनाऱ्यंना रेल्वे किंवा बसमार्गाने जातायेते. बोर्डी येथे एम.टी.डी.सी. चे निवासस्थाने उपलब्ध आहेत.

-मनीषा पिंगळे
जिल्हा माहिती अधिकारी, पालघर

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India