संकरित बियाणे उद्योगाचा जालना जिल्हा

जालना जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या मध्य भागात स्थित असून मराठवाडा विभागात येतो. आधी औरंगाबाद जिल्ह्याचा भाग असणारा जालना जिल्हा १ मे १९८२ रोजी वेगळा केला गेला. जालना जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७६१२ चौ.कि.मी आहे तर लोकसंख्या १६,१२,३५७ इतकी आहे.

जिल्हा संकरीत बियाणे-प्रक्रिया, स्टिल रिरोलींग, बीडी व कृषी-आधारित उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. महिको, महिंद्रा, बेजो शितल या महत्त्वाच्या संकरित बियाणे उद्योग जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यातील पर्यटनाविषयीची माहिती घेऊया...

राजूरचा गणपती

भोकरदन तालुक्यात राजूर येथे गणेशाचे (राजुरेश्वर) प्रसिद्ध देवस्थान आहे. जालन्यापासून भोकरदन मार्गावर 25 कि.मी. वर हे मंदिर आहे. प्रत्येक चतुर्थीला येथे मोठी यात्रा भरते. नव्याने मंदिराचे बांधकाम करण्यात आले असून हे मंदिर भव्य स्वरुपात आहे.

राजूर येथे जाण्यासाठी जालना व औरंगाबाद येथून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस तसेच खासगी वाहने उपलब्ध आहेत.

जांब समर्थ मंदिर

समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म जांब समर्थ येथे झाला आहे. हे गाव घनसावंगी तालुक्यात पूर्वेस अंबडहून 50 किमीवर आहे. दरवर्षी येथे रामनवमीला भव्य यात्रा भरते. जांब समर्थ येथे जाण्यासाठी जालना व अंबड येथून राज्य परिवहन महामंडळाच्या बसने जाता येते.

मत्स्योदरी देवी मंदिर

अंबड या तालुक्याच्या शहरात मत्स्योदरी देवीचे पुरातन मंदिर आहे. नवरात्रीच्यावेळी येथे यात्रा भरते. मंदिर परिसर नयनरम्य आहे. जालना येथून राज्य परिवहन महामंडळाच्या बसने जाता येते.

आजुबाई मंदिर

भोकरदन तालुक्यातील अन्वा येथे आजुबाई मंदिर आहे. येथे पुरातन मठ आहे. हे मंदिर प्रसिद्ध असून मठावर आणि मठातील अखंड दगडावर रेखीव मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा मठ वेरुळ लेण्यातील 16 व्या लेणीसारखा प्रेक्षणीय आहे. जालना येथून राज्य परिवहन महामंडळाच्या बसने जाता येते.
संकलन- जिल्हा माहिती कार्यालय, जालना.

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India