क्रांती ज्योत

अहमदनगर येथील क्रांती ज्योती महिला मंडळ हे कल्पक आणि धाडसी उपक्रम आयोजित करण्यासाठी प्रसिद्ध आहे. नेहमीच्या महिला मंडळापेक्षा या मंडळाचे उपक्रम हे जसे कौतुकास्पद आहेत, तसेच ते इतर महिला मंडळांसाठी मार्गदर्शकही आहेत.

या मंडळाच्या प्रमुख उपक्रमांपैकी एक म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील वीर पत्नी आणि विधवा यांच्यासाठी दरवर्षी संक्रांतीला हळदीकुंकू समारंभ आयोजित केला जातो. या समारंभात आवर्जून फक्त वीर पत्नी आणि विधवांना आमंत्रित केले जाते आणि त्यांचा सन्मान केला जातो. जे सुवासिनीचे लेणे असते ते त्यांना आदरपूर्वक दिले जाते. दरवर्षी नवरात्रातही खणा नारळाने ओट्या भरल्या जातात. एरवी या वीरपत्नी आणि विधवांना त्यांच्या कुंटुबियांकडून, नातेवाईकांकडून, शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून अवहेलनेने पाहिले जाते. कुठल्याही शुभ कार्यात त्यांना सहभागी करुन घेतले जात नाही. त्यांचे हे दु:ख, शल्य ओळखून क्रांतीज्योती महिला मंडळाच्या अध्यक्षा बेबीताई गायकवाड यांनी 2012 पासून हा उपक्रम सुरू केला. दिवसेंदिवस या उपक्रमास वाढता प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या वर्षी 35, दुसऱ्या वर्षी 99 आणि तिसऱ्या वर्षी 350 वीरपत्नी व विधवा स्त्रिया या हळदीकुंकू समारंभात आनंदाने व अभिमानाने सहभागी झाल्या. काही वीरपत्नी, विधवांबरोबर त्यांचे सासु-सासरेही यावेळी अगत्याने उपस्थित राहतात आणि आपल्या मुलांच्या आठवणीने गहिवरुन जातात.

काही सासू-सासऱ्यांना आपल्या विधवा सुनांचे दु:ख न बघितल्या गेल्याने त्यांनी आपल्या सुनांच्या पुनर्विवाहाचा प्रस्ताव बेबीताई गायकवाड यांच्यापुढे मांडला आणि त्यांनी ही कल्पना उचलून धरली. त्यांचे पती अशोक गायकवाड यांनीही पत्नीच्या या शुभकार्यात पूर्ण साथ देण्याचे ठरविले आणि त्यातूनच त्यांनी सासर-माहेरच्या लोकांची समजूत घालून त्यांचे मनपरिवर्तन केले. यासाठी जवळपास 6 महिने गेले. शेवटी यश आले आणि दोन विधवांचा पुनर्विवाह घडून आला. विशेष म्हणजे या विवांहामध्ये या दोघींच्याही सासू सासऱ्यांनी पुढाकार घेतला, ही खचितच आगळीवेगळी बाब आहे. या दोन विवाहांमुळे यापुढे असे आणखी विवाह होऊ लागतील असा विश्वास बेबीताई गायकवाड यांना वाटतो. आतापर्यंत महाराष्ट्रभरातून जवळपास असे 50 हून अधिक प्रस्ताव आल्याचे त्यांनी सांगितले.

श्रीमती गायकवाड यांनी आदिवासी पाड्यातील नऊ विधवा स्त्रियांच्या 12 मुलांना दतक घेतले असून त्यांचे संगोपन आणि शिक्षणाकडे त्या लक्ष देत आहे. अर्थात जागेअभावी ही मुले स्वतंत्रपणे न ठेवता त्यांच्या घरीच ठेवण्यात येऊन त्यांच्याकडे लक्ष दिले जात आहे. पुढे जागा उपलब्ध झाली की या मुलांसाठी वसतीगृह उभारण्याचा आणि विधवांसाठी पुनर्वसन व स्वयंरोजगार केंद्र उभारण्याचा श्रीमती गायकवाड यांचा मानस आहे.

समाजापासून दूर झालेल्या घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करुन घेण्यासाठी मंडळ सतत प्रयत्नशील असते. यासाठी कुष्ठधाम मध्ये महात्मा फुलेंची जयंत साजरी करणे, वृद्धाश्रमामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे असे कार्यक्रम दरवर्षी आयोजित केले जातात.

गेल्या 11 वर्षापासून सामाजिक कार्यात समरस होणाऱ्या बेबीताई गायकवाड यांना असे वाटते की, कायदे आणि नियम बदलून फक्त समाज परिवर्तन होणार नाही तर समाजाची मानसिकता बदलने गरजेचे आहे. बेबीताई ठिकठिकाणी समाज प्रबोधनाची व्याख्याने देण्यासाठी जात असतात. समाजातील अनिष्ठ रूढी, परंपरा बदलण्यासाठी गावोगावी महिला मंडळांनी कार्यरत राहिले पाहिजे, महिलांनीच महिलांना प्रतिष्ठा दिली पाहिजे यासाठी त्या सतत कार्यरत असतात. सासुने, नणंदेने त्या सुनेची आई आणि बहीण म्हणून भूमिका बजावली तर महिलांच्या समस्या मोठ्या प्रमाणात सुटू शकतील या भूमिकेतून त्या व त्यांचे मंडळ कार्यरत आहेत.

अवघ्या नववी पर्यंत शिक्षण झालेल्या श्रीमती बेबीताई गायकवाड या उदरनिवार्हासाठी कॉलेज विद्यार्थ्यांना जेवणाचे डबे पुरविण्याचे तर पती अशोक गायकवाड भाजी विकण्याचे काम करतात. अशा बिकट आर्थिक परिस्थितीत स्वत:च्या दोन मुलांचे संगोपन, शिक्षण पूर्ण करीत असतानाच त्यांनी क्रांतीज्योती महिला मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करित राहणे ही नक्कीच इतरांना प्रेरणा देणारी गोष्ट आहे.

आकाशवाणी, दूरदर्शन, खाजगी वृत्तवाहिन्या, प्रथितयश वृत्तपत्रांमधूनही बेबीताईंच्या कामाची प्रशंसा झाली असून त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. श्रीमती बेबीताई गायकवाड यांना कविता करण्याचा आणि वाचनाचा देखील छंद आहे. वेगवेगळ्या कवी संमेलनातून त्यांनी काव्य वाचन केले आहे. तसेच विविध अंकांतून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

अधिक माहितीसाठी संपर्क : श्रीमती बेबीताई गायकवाड, क्रांतीज्योती महिला मंडळ, अहमदनगर,
मोबाईल क्र. : 9623482421
- देवेंद्र भुजबळ

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India