सांगलीतही आता...नौका विहाराचा थरार

पर्यटनातून रोजगार निर्मिती असा नवा समाज जीवनाचा अर्थात विकासाचा पॅटर्न देशाच्या अनेक राज्यामध्ये विकसित होत आहे. स्थानिक नैसर्गिक आणि भौगोलिक परिस्थितीचा पुरेपूर वापर करुन अनेक राज्यात नवनवी पर्यटनस्थळे विकसित करुन स्थानिक तरुण-तरुणींचा पर्यटन विकासात सहभाग घेतला जात आहे. राज्यातही बऱ्यापैकी पर्यटन विकासावर राज्य शासनाने भर दिला असून आता सांगली जिल्ह्यानेही पर्यटन विकासात एक पाऊल पुढे टाकले आहे. आता पर्यटकांना सांगलीतही आता...नौका विहाराचा थरार अनुभवता येणार आहे.
जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सांगली जिल्हा डिजीटल जिल्हा बनविण्याबरोबरच पर्यटनातही जिल्ह्याची ओळख साऱ्या देशाला करुन देण्याचा चालविलेला प्रयत्न खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. सांगली जिल्ह्याचा पश्चिम भाग तसा निसर्ग संपदेने नटलेला असून पूर्व भागातही काही ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचा शासनाने तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातून पर्यटनावर भर दिल्याने आता जिल्ह्यातील ही नवनवी पर्यटनस्थळे वैविध्यपूर्णतेने नटली असून आता ती पर्यटकांना खुणावू लागली आहेत.

कृष्णा नदी काठावरील सांगली कृष्णाकाठ पर्यटन केंद्र तसेच बोरगाव येथील रामलिंग बेट पर्यटन केंद्र येथील नौका विहार केंद्रामुळे आता नौका विहारासाठी लांबवर कोकणात जायला नको. सांगली जिल्ह्यात एक चांगली व अनोखी अशी नौका-नयनाची सुविधा जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या पुढाकाराने उपलब्ध झाली आहे. शांत व विस्तीर्ण कृष्णामाईचा प्रवाह, कृष्णाईच्या काठावरची हिरवीगार शिवारं, निसर्गरम्य वातावरण तर ब्रिटीशकालीन आयर्विन पुल आणि नौका-विहार. रोजच्या दैनंदिन जीवनातील तोच-तोचपणा घालवायचा असेल व मनाला चैतन्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर कृष्णा नदीकाठी सांगली कृष्णाकाठ पर्यटन केंद्राच्या माध्यमातून सुरु झालेल्या नौका विहाराचा आनंद लुटायला चला आपणही निघूया.

21 नोव्हेंबर 1960 रोजी सांगली जिल्हा अस्तित्वात आला. जिल्ह्याच्या स्थापनेनंतर जिल्ह्याने विकास कामात फार मोठी आघाडी घेतली. कृष्णा, वारणा, मोरणा, वेरळा, माणगंगा, अग्रणी, नान्नी, बोर या नद्या सांगली जिल्ह्याला लाभल्या आहेत. सांगली जिल्हा सर्वच क्षेत्रात आघाडीवर असून लोककला, लोकनाट्य तसेच नाटक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही जिल्हा सुसंपन्न आणि गौरवशाली आहे. रंगभूमी क्षेत्रातही सांगलीने असाधारण महत्व प्राप्त केले आहे. सांगली ही मराठी नाट्याची पंढरी तर मिरज ही संगीताची गंगोत्री आहे. सांगली शहर हळदीसाठी तर मिरज शहर तंतूवाद्यासाठी देशात प्रसिद्ध आहे. सांगली शहरातील गणपती मंदीर हे सांगलीचे इतिहासदत्त आकर्षण आहे तर मिरज शहराच्या लौकिकात ख्वाजा शमशोद्दीन मिरासाहेब दर्गा हे एक आकर्षण आहे. हजारो हिंदू-मुस्लिम भक्तांचे ते श्रद्धास्थान आहे. याबरोबरच सांगलीतील स्टेट म्युझिअम, अंबराई उद्यान, हरिपूर येथील संगम, मिरजेतील ऐतिहासिक विहीर, भुईकोट किल्ला याबरोबरच चांदोली अभयारण्य, वारणा धरण प्रकल्प, बहे बोरगाव येथील रामलिंग बेट पर्यटन स्थळ, सागरेश्वर अभयारण्य, सोनसळ येथील चौरंगीनाथ पर्यटनस्थळ, दंडोबा हिल स्टेशन, खानापूर तालुक्यातील श्री शुक्राचार्य प्राचीन जागृत देवस्थान, श्री रेवणसिद्ध मंदीर, खरसुंडी येथील श्री खरसुंड सिद्धाचे प्राचीन देवस्थान, तासगाव येथील गणेश मंदीर, श्री क्षेत्र औदुंबर, बत्तीश शिराळा येथील नागपंचमी अशा विविधतेने नटलेला सांगली जिल्हा असून जिल्ह्यात पर्यटनाला फार मोठी संधी आहे.

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात बोरगावजवळ कृष्णा नदीच्या पात्रात रामलिंग बेट तयार झालं आहे. इस्लामपूरहून अवघ्या 10 किलोमिटर अंतरावर हे ठिकाण आहे. या निसर्गरम्य व कृष्णामाईच्या संथ वाहणाऱ्या प्रवाहात बालाजी बोट क्लब स्थापन केला आहे. बोरगाव-रेठरे रस्त्यावरील रामलिंग येथील कृष्णा नदीवरील भव्य पुलाच्या उजव्या बाजूला रामलिंग पुरातन मंदीर परिसर तर डाव्या बाजूला कृष्णेचे विस्तीर्ण पात्र व शांत डोह पसरलेला आहे. हे ठिकाण इतकं मोहीत करणारं आहे की, तिथं पोहोचल्यावर कृष्णेच्या शांत आणि मनाला उल्हासित करणाऱ्या पात्रात नौका विहाराला प्रवृत्त व्हायलाच होत.
सांगली कृष्णाकाठ पर्यटन केंद्र
सांगली नगरी ही कृष्णा नदीकाठी वसली असून कृष्णा आणि वारणा नद्यांचा संगम याच शहराजवळ असल्याने शहराच्या सौदर्यात आणखीनच भर पडली आहे. विस्तीर्ण नदी पात्र लाभलेल्या कृष्णा नदीकाठी स्व. वसंतदादा पाटील यांचे भव्य स्फूर्ती स्मारक विकसित केले असून या स्मारकाच्या संरक्षणासाठी कृष्णा नदीकाठी भव्य आणि आकर्षक पूर संरक्षक भिंतही उभारली आहे. तसेच माईघाट परिसरात स्वामी समर्थ मंदिरामुळे आणि अन्य पायाभूत सुविधामुळे या परिसरात पर्यटकांची आता गर्दी होऊ लागली आहे. अनेक पर्यटक सांगलीला आल्यानंतर सांगलीचे आराध्य दैवत असलेल्या गणपतीचे दर्शन घेऊन कृष्णा काठावरील या आकर्षक स्मारक स्फूर्तीस्थळास भेट देऊन पर्यटनाचा आस्वाद घेतात.

सांगलीच्या कृष्णा काठावरील माईघाट ते स्मारक परिसराला होऊ लागलेली नागरिकांची विशेषत: पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी या परिसरात कृष्णा नदीकाठावर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सांगली कृष्णाकाठ पर्यटन केंद्र विकसित करण्याची संकल्पना सांगलीतील मान्यवर व जानकारासमोर मांडली. भविष्यात सांगलीला पर्यटन क्षेत्रात आघाडीवर ठेवण्यासाठी कृष्णाकाठावर गोवा व अन्य राज्यातील बोटींगप्रमाणे सोय केल्यास देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटकांची रीघ लागेल, हा विश्वास डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी रॉयल कृष्णा क्लबच्या सहकार्याने सांगली कृष्णाकाठ पर्यटन केंद्राची स्थापना करुन नौकाविहारातून पर्यटन विकासावर भर दिला.

रॉयल कृष्णा बोटींग क्लबचे नौकाविहारातील साहस आणि कामगिरी पाहून त्यांच्या मदतीने गेल्या दीड महिन्यापूर्वी नौकाविहाराचा नाविण्यपूर्ण उपक्रम हाती घेतला. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या उपक्रमाची पाहणी करुन कौतुक केले. सांगलीच्या पर्यटन विकासाला चालना देणाऱ्या सांगली कृष्णाकाठ पर्यटन केंद्र उपक्रमास त्यांनी जिल्हा नियोजन समितीतून नाविण्यपूर्ण योजनेतून विद्युतविषयक कामासाठी निधी देण्याची तयारी दर्शविली.

या उपक्रमानुसार सांगलीच्या कृष्णाकाठी असलेल्या वसंतदादा पाटील स्मृतीस्थळ आणि माईघाट परिसरात तसेच नदीच्या पैलतीरी सांगलीवाडी परिसरात ‘सांगली कृष्णाकाठ पर्यटन केंद्र’ शासन योजना आणि लोकसहभागातून विकसित करण्यात येत आहे. याबाबतचे आवश्यक ते सर्व प्रस्ताव सर्व संबंधित यंत्रणांमार्फत तयार करण्यात येत असून कृष्णाकाठी विकसित होणारे हे केंद्र तीन टप्प्यात करण्याचा मानस जिल्हाधिकारी श्री. गायकवाड यांनी व्यक्त केला. सांगली कृष्णाकाठ पर्यटन केंद्राच्या पहिल्या टप्प्यात बोटींची व्यवस्था, जवळपास 5 हजार पर्यटक व नागरिक बसू शकतील अशी व्यवस्था, आयर्विन पुलापासून ते नव्या पुलापर्यंत विद्युत व्यवस्था, अलिकडील काठावरील पूर संरक्षक भिंतीप्रमाणे पैलतीरी सांगलीवाडीच्या बाजूलाही पूर संरक्षक भिंत, कलरफूल लायटींग अशा व्यवस्था करण्याचा मानस आहे. सांगली कृष्णाकाठ पर्यटन केंद्राच्या मदतीने जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि महापूराच्यावेळी आपत्तीग्रस्तांसाठी बचाव आणि मदत कार्यही केले जाणार आहे. असा दुहेरी लाभ या सांगली कृष्णाकाठ पर्यटन केंद्राचा मिळू शकणार आहे.

सांगली कृष्णाकाठावर ‘सांगली कृष्णाकाठ पर्यटन केंद्र’ विकसीत करताना ॲग्रो टूरिझमही कसे वाढेल याबाबत विचार सुरु असून सांगलीचा कृष्णाकाठ पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. नजीकच्या काळात तो अधिक आकर्षक बनविण्यावर अधिक भर देण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा संकल्प आहे. महाराष्ट्राला वरदान असणारी कृष्णा नदी सांगली जिल्ह्यात 90 कि.मी. प्रवाही आहे. या नदीच्या पात्रात सांगलीच्या कृष्णाकाठी प्रशासनाने पर्यटन विकासाच्या उद्देशाने प्रताप जामदार, दत्ता पाटील आणि सहकाऱ्यांच्या रॉयल कृष्णा बोट क्लबच्या सहकार्याने सांगली कृष्णाकाठ पर्यटन केंद्र विकसित करुन आधुनिक नौका विहार हा पर्यटन उपक्रम सुरु केला आहे.

सांगली येथे रॉयल कृष्णा बोट क्लबच्या वतीने ऑलम्पिकच्या धर्तीवर होणाऱ्या स्पर्धांचे खेळ तसेच पारंपरिक होड्यांच्या स्पर्धांचे आयोजन व प्रशिक्षणही उपलब्ध होत आहे. सांगली कृष्णाकाठ पर्यटन केंद्राच्यावतीने रॉयल कृष्णा बोट क्लबच्या सहकार्यातून कृष्णा नदीकाठी सुरु केलेल्या या आधुनिक नौका विहारातील बोटींचा थरारही सांगलीकरांसह अन्य जिल्ह्यातील नागरिक विशेषत: पर्यटक अनुभवत आहेत.
-एस.आर. माने,
जिल्हा माहिती अधिकारी, सांगली.

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India