राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

स्थापना :

२००५ ह्या वर्षापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ असे नामाभिमान लाभलेल्या नागपूर विद्यापीठाची स्थापना ४ ऑगस्ट १९२३ रोजी झाली. आपल्या स्थापनेपासूनच हे विद्यापीठ मोठ्या निष्ठेने उच्च शिक्षण प्रसाराचे कार्य करीत आहे. मध्य भारतातील हे सर्वात जुने विद्यापीठ आहे. केवळ कला, विज्ञान, विधी आणि शिक्षण या चार विद्याशाखा, नागपूर, जबलपूर आणि अमरावती येथील सहा महाविद्यालये व त्यात शिकणारे ९१७ विद्यार्थी यासह सुरू झालेल्या या विद्यापीठाचा आजचा विस्तार आश्चर्यमुग्ध करणारा आहे.

विस्तार :

या विद्यापीठातून जबलपूर, अमरावती, सागर, गडचिरोली इत्यादी विद्यापीठे वेगळी झाल्यावर त्याचा भौगोलिक विस्तार कमी झाला असला तरी पूर्व विदर्भातील या विद्यापीठात आजमितीला ६६७ संलग्नित महाविद्यालये, विद्यापीठाचे ४० पदव्युत्तर शैक्षणिक विभाग आणि ३ संचालित महाविद्यालये यामधून दरवर्षी जवळपास ४ लक्ष विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. राष्ट्रीय अधिस्वीकृती व प्रत्यायन परिषदेने अर्थात नॅकने विद्यापीठाला ‘अ’ दर्जाचे मानांकन दिले आहे.

उज्ज्वल परंपरा :

विद्यापीठाला उच्च शैक्षणिक परंपरा तेजस्वी राष्ट्रीय व सामाजिक परंपराही लाभली आहे. राष्ट्रीय चळवळीच्या मुख्य प्रवाहात विद्यापीठाने सातत्याने योगदान दिले आहे. १९३०–१९३२ च्या दरम्यान असहकारिता आंदोलन सुरू असताना विद्यापीठाचे विधी महाविद्यालय जवळजवळ दोन महिने बंद होते. ‘वंदे मातरम्’ चळवळीत भाग घेण्याची शिक्षा म्हणून काढून टाकलेल्या उस्मानिया विद्यापीठाच्या जवळजवळ १५० विद्यार्थ्यांना विशेष वर्गात दाखल करून त्यांचे शैक्षणिक नुकसान या विद्यापीठाने टाळले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात दीक्षांत समारंभात दीक्षांत भाषणे देण्याकरिता तत्कालीन राष्ट्रीय नेत्यांना विद्यापीठाने निर्भयपणे निमंत्रित केले होते.

या विद्यापीठाला लोकाश्रयाची उज्ज्वल परंपरा लाभली आहे. विद्यापीठाच्या निर्मितीच्या काळातच दानशूर रावबहादूर डी. लक्ष्मीनारायण यांनी ५० एकर जमीन व ३६ लक्ष रुपये विद्यापीठाला दान दिले. उद्योगपती जमशेदजी टाटा, न्या. भवानीशंकर नियोगी, श्रीमती जानकीबाई ठाकूर, श्रीमती कमलाताई कोरके आदींनीही आपल्या वास्तू विद्यापीठाला दान केल्या. याच परंपरेत उद्योगपती जमनालाल बजाज ह्यांचे नातू राहुल बजाज ह्यांच्या औद्योगिक प्रतिष्ठानाने सीएसआर योगदान योजनतेतून विद्यापीठाला अलीकडेच १० कोटी रुपयांची देणगी दिली आहे. सीएसआर योजनेतून इतकी मोठी देणगी विद्यापीठाला मिळण्याची ही भारतातील पहिलीच घटना आहे. या निधीतून विद्यापीठाच्या महात्मा फुले शैक्षणिक विद्यापीठ परिसरात विद्यापीठाची अत्याधुनिक सोयींनी युक्त अशी भव्य प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे.

ग्रंथसंपदा :

विद्यापीठाचे मुख्य ग्रंथालय व विद्यापीठ परिसरातील ग्रंथालय ह्यातून आजमितीला ३,९८,९३७ ग्रंथ १४,३१३ हस्तलिखीते ११,६६४ पीएच.डीचे शोधप्रबंध २१५ नियतकालिके ३५,९०९ नियतकालिकांचे बांधिव खंड उपलब्ध आहेत. याशिवाय सुसज्ज इंटरनेट प्रयोगशाळेद्वारा (लॅब) विद्यार्थ्यांना आवश्यक त्या ग्रंथालय सेवा उपलब्ध झाल्या आहेत.

अभ्यासक्रम :

प्रत्येक ज्ञानशाखेतील शिक्षणाची ध्येय आणि उद्दीष्ट निश्चीत करून अध्ययनाचा अनुभव देणारे आदर्श अभ्यासक्रम विद्यापीठाने तयार केले आहेत. विद्यापीठाच्या व्यापक विकासासाठी काही नव्या विभागांची, केंद्रांची आणि अभ्यासक्रमांची निर्मिती विद्यापीठाने केली आहे. सत्र २०११–२०१२ पासून मॉलिक्युलर बॉयोलॉजी ॲन्ड जेनेटीक इंजीनिअरींग, वाणिज्य, पदव्युत्तर बुद्धीस्ट आणि पदव्युत्तर जनसंवाद हे विभाग तसेच २०१२–२०१३ पासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारा व उर्दू हे विभाग सुरू केले आहेत. त्याचप्रमाणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये फोरेन्सिक सायन्स हा पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे. भविष्यात पाच वर्षाच्या कालावधीचा इंटिग्रेटेड, इनोव्हेटीव, इंटर डीसीप्लिनरी अभ्यासक्रम विथ चॉइस बेस्ड क्रेडीट सिस्टीम सुरू करण्याचा मानस आहे. नागपूरजवळच उभारण्यात येत असलेल्या मिहान प्रकल्पाकरिता नवीन अभ्यासक्रमांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. नवीन अभ्यासक्रमांचे अध्ययन केंद्र, विदेशी विद्यापीठाच्या सहकार्याने ड्युएल डिग्री, उद्योगसंस्थांच्या आणि तज्ज्ञांच्या मदतीने विशीष्ट विषयांचे अभ्यासक्रम, प्रशिक्षण आणि संशोधन सुरू करण्याचाही विद्यापीठाचा प्रयत्न करीत आहे. संशोधनातून ज्ञानाची निर्मीती व ज्ञानामधून विकास साध्य करण्यासाठी संशोधन व उद्योजकता यांची सांगड घातली जात आहे. त्याकरिता टेक्नॉलॉजी पार्क, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट अँड ट्रान्सफर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन सेंटर, ह्युमन रिसोर्स ट्रेनिंग इत्यादी प्रकल्प उद्योजकांच्या सहकार्याने राबविण्याचा आणि नाविण्यपूर्ण असा एम.टेक, पीएच.डी प्रोगाम सुरू करून विद्यार्थ्यांना विशीष्ट क्षेत्रात आधुनिक संशोधन करून उत्तम करिअर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नरत आहे.

विद्यापीठात सत्र २०१२– २०१३ मध्ये सेमीस्टर पद्धती सुरू करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने सर्व अभ्यासक्रमांचे नूतनीकरण करून ते अद्ययावत करण्यात आले असून त्यांची अंमलबजावणी आणि मूल्यमापन क्रेडीट पद्धतीने करण्यात येत आहे.

अध्यापनास संशोधनाची जोड दिल्यास त्याची गुणवत्ता वाढते, म्हणून संशोधनाचा गुणात्मक विकास करण्याकरिता विद्यापीठाने विविध शैक्षणिक संस्थासोबत सामंजस्य करार केलेले आहेत. नागपूर येथील नीरी व सीएसआयआर या संस्थांबरोबर तसेच ॲनाकॉन व झीम लॅबोटेरीज यांचे सोबत करण्यात आलेल्या करारामार्फत होणारे संशोधन, शैक्षणिक क्षेत्रात आणि औद्योगिक क्षेत्रात विकासाला गती देणारे आहे.

विद्यापीठ समाज व उद्योग यांच्या विविध प्रश्नांवर योग्य उपाययोजना सूचविण्याकरिता मूलभूत आणि तर्कशुद्ध संशोधन राबवित असून त्याकरिता विविध संस्थामार्फत आर्थिक अनुदान प्राप्त झाले आहे. यामध्ये स्पेशल असिस्टंन्स प्रोगाम, मेजर रीसर्च प्रोजेक्ट, फिस्ट प्रोग्राम इत्यादींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना या प्रकल्पांतर्गत संशोधन शिष्यवृत्ती प्राप्त होऊन संशोधन क्षेत्रातील नवीन आव्हाने अवगत होत आहेत. विद्यापीठाने पुढील १० वर्षातील उद्दीष्ट्ये निश्चीत केली असून ती साध्य करण्याकरिता व्हिजन डॉक्युमेंट आणि मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. यामध्ये पाचवर्षीय एकात्मिक पदव्युत्तर अभ्यासक्रम, स्कूल ऑफ इंजीनिअरींग, सायन्सेस ॲण्ड टेक्नॉलॉजी, एकात्मिक आचार्य पदवी इत्यादींचा समावेश करण्यात येत आहे. बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये २०२० पर्यंत जीईआर २० टक्क्यांवर वाढविण्यासाठी या बाबींचा उपयोग होणार आहे.

संशोधनातील ज्ञानाच्या संधी आणि विकास साधण्याकरिता संशोधन आणि उद्योजकता यांची सांगड घालणे आवश्यक आहे. त्याकरिता विद्यापीठामध्ये टेक्नॉलॉजी पार्क अंतर्गत विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. विद्यापीठामध्ये उपलब्ध असलेले शैक्षणिक तंत्रज्ञान व संशोधनाच्या सोयी उद्योजकांना आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे प्रशिक्षण, रोजगार, संशोधन आणि अध्यापन इत्यादी बाबतीत औद्योगिक क्षेत्रासोबतचे सहकार्य प्रभावीपणे करण्यात येत असून विद्यार्थ्यांना या क्षेत्रात भविष्यात संधी उपलब्ध करून देण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. शैक्षणिक अध्यापन आणि संशोधनामध्ये सतत गुणात्मक उंची वाढविण्याकरिता विद्याविषयक आणि प्रशासकीय अंकेक्षण दरवर्षी विद्यापीठामार्फत करण्यात येत असून त्यामध्ये आढळून आलेल्या त्रुटी दूर करण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे.

योजना :

शिक्षणाचा प्रसार करताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याकरिता राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी कल्याण योजना, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, स्वयंरोजगार माहिती, क्रीडा प्रशिक्षण, निरंतर शिक्षण इत्यादी माध्यमातून विद्यापीठात भरीवपणे कार्य करण्यात येत आहे. विद्यापीठाचे विद्यार्थी विविध पातळ्यांवर व विविध क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक यश प्राप्त करीत आहेत.

अलीकडेच २६ सप्टेंबर २०१४ ला विद्यापीठाचा १०० वा दीक्षांत समारंभ अत्यंत दिमाखदार पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाचे प्रमुख अतिथी भारताचे पूर्व राष्ट्रपती भारतरत्न ए.पी.जे. अब्दूल कलाम होते. विद्यापीठाच्या या महान उपलब्धीबद्दल अब्दूल कलाम ह्यांनी धन्योद्गार काढले.

दिग्गज विद्यार्थ्यांची परंपरा :

विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांच्या प्रभावळीत नक्षत्रांसारखी तेजाळणारी नावे आहेत. देशाचे भूतपूर्व उपराष्ट्रपती न्या. हिदायतुल्ला, माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव, भूतपूर्व राज्यपाल बॅ.रा.सू.गवई, माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक, ज्येष्ठ नेते ए.बी.बर्धन, वर्तमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमेरिकी विधी मंडळाच्या सदस्य श्रीमती स्वाती दांडेकर इत्यादी राजकीय धुरिणांचा त्यात समावेश आहे. तसेच न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, न्या. रुमा पाल आणि बाबा आमटे, डॉ. शिवाजीराव पटवर्धन, डॉ. अभय बंग, डॉ. प्रकाश आमटे इत्यादी न्यायालयीन व सामाजिक सेवा क्षेत्रातील झळाळणारी नावे त्यात आहेत. याबरोबरच सूपक कॉम्प्युटरचे जनक डॉ. विजय भटकर, ख्यातनाम अभिनेते प्रेमनाथ व अब्रार अल्वी, यशस्वी सिने दिग्दर्शक राजकुमार हिराणी व संजय सुरकर, जादूई आवाजाचे धनी हरीश भिमानी, ख्यातनाम नाटककार प्रा. महेश एलकुंचलवार, कविवर्य ग्रेस व डॉ. यशवंत मनोहर आणि वक्ता दशसहस्त्रेषू प्राचार्य राम शेवाळकर तसेच जगतविख्यात टेनीसपटू प्रदीप गंधे व प्रसिद्ध टी.व्ही.पत्रकार पुण्यप्रसून वाजपेयी आदींचा या प्रभावळीत अंतर्भाव आहे.

विद्यापीठाच्या पायाभरणीच्या काळात अत्यंत निष्ठावान व दूरदर्शी नेतृत्व विद्यापीठाला लाभले. महात्मा गांधींच्या व्यक्तीमत्वाने प्रभावित झालेले सर फ्रँक फ्लाय यांच्यासारखे कुलपती आणि सर बिपीनकृष्ण बोस यांच्यासारखे संस्थापक कुलगुरू विद्यापीठाला लाभावेत ही खरोखरच भाग्याची गोष्ट होती. भूतपूर्व कुलगुरू सर न्यायमुर्ती भवानीशंकर नियोगी यांनी 'नागपुरातील प्रत्येक झाड आणि प्रत्येक वीट ही सर बिपीनकृष्ण बोस यांचे गोडवे गात असते', असा कृतज्ञता पूर्वक केलेला उल्लेख अतिशय सार्थ आहे.

संपर्क :

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाबाबतची सविस्तर माहिती www.nagpuruniversity.org या वेबसाईटवर जाणून घेता येईल. कुलगुरूंशी vc@nagpuruniversity.nic.in या ई-मेल वर तर कुलसचिवांशी registrar@nagpuruniversity.nic.in यावर संपर्क केला जाऊ शकतो.

-श्याम धोंड
माध्यम समन्वयक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India