1663 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी परळी व सातारचा किल्ला जिंकला. पुढे महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने हल्ला करुन हा किल्ला स्वत:च्या ताब्यात घेतला. 1706 मध्ये परशुराम प्रतिनिधीने हा किल्ला जिंकला व 1708 साली किल्ल्यावर शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला.
वीरांची खाण-रत्नांची भूमी
हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून ऐतिहासिक वारसा साताऱ्यास लाभला आहे. अफझलखानासारख्या बलाढ्य शत्रूस शिव छत्रपतींनी जिथून यमसदनी धाडले तो किल्ले प्रतापगड आजही ऐतिहासिक पराक्रमाची साक्ष देत उभा आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धर्मपत्नी तथा संभाजी महाराज यांच्या मातोश्री सईबाई या फलटणच्या निंबाळकरांच्या सुकन्या. छत्रपतींचे सरसेनापती हंबीरराव मोहिते हे स्वराज्याशी थेट रक्ताचे नाते जोडणाऱ्या सातारा जिल्ह्यातील तळबीडचे. जिद्द आणि चिकाटी तसेच ताकद आणि पराक्रमाच्या जोरावर दिल्लीवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याची मर्द मराठ्यांची जुनी आकांक्षा साकार करणारे शूर सरदार महादजी शिंदे यांचा जन्म (कण्हेर-खेड, ता.कोरेगाव येथील म्हणजे) सातारा जिल्ह्यातीलच. न्यायदानात ज्यांनी न्यायासनाचे स्थान उंचावले ते रामशास्त्री प्रभुणे क्षेत्र माहुलीच्या मातीत जन्मले.
पराक्रमी पुरुषांप्रमाणे महान धाडसी महिलांनीही या जिल्ह्यात जन्म घेतला. मेरी झाँसी नही दूंगी असे इंग्रजांना ठणकावून सांगणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई सातारा जिल्ह्यातील धावडशीच्या तांबे कुटुंबात जन्मली. स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या सावित्रीबाई फुले या नायगावच्या पांढरीत जन्मल्या तर महात्मा ज्योतिबा फुले खटाव तालुक्यातील कटगुणचे सुपुत्र.
देश स्वातंत्र्यासाठी 1857 मध्ये इंग्रजांनी सातारच्या गेंडामाळ येथील फाशीचा वड येथे मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावलेले व हौतात्म्य पत्करलेले 17 जण सातारा जिल्ह्यातीलच. इंग्रजी सत्तेशी लढताना वडूज येथे एकाच दिवशी नऊ जणांना हौतात्म्य पत्करावे लागले. औंधचे पंतप्रतिनिधी हे स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रेरणास्थान होते. परशुराम घार्गे, उमाशंकर पांडे यांचे हौतात्म्य, किसनवीर, बर्डे मास्तर, किसन अहिरे, नानकसिंह, पांडु मास्तर, नाथाजी लाड, शेख काका यासारख्या अनेकांची नोंद याठिकाणी घ्यावीच लागते. पुढे प्रति सरकारची स्थापना झाली. क्रांतीसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, राजाराम बापू पाटील यासारखे मातब्बर आणि थोर नेतृत्व पूर्वीच्या अखंड सातारा जिल्ह्यात जन्मले.
महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी शिक्षणाचं रोपटे लावले, ते जोपासलं, त्याचा वटवृक्ष केला तो सातारच्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी, बापूजी साळुंखेंनी. प्रति सरकारची संकल्पना इथल्याच क्रांतिसिंह नाना पाटलांची. देशाला प्रगतीची दिशा आणि विचारांचा आदर्श दिला यशवंतराव चव्हाण यांनी, त्यांना साथ मिळाली ती ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व.किसन वीरासारख्या असंख्य विचारवंत देशभक्तांची. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साताऱ्यातील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले.
6000 ते 6500 मि.मी. पाऊस पडणारे महाराष्ट्राचे चेरापुंजी समजले जाणारे 4500 फुट उंचावरील महाबळेश्वरही साताऱ्यातच. येथेच समर्थ रामदास स्वामींचे समाधीस्थळ सज्जनगड आहे.
-प्रेक्षणीय स्थळे-
प्रतापगड:
छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. 1656 साली प्रतापगड बांधला. प्रतापगड महाबळेश्वरच्या पश्चिमेला आठ मैलावर असून किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 3543 फूट आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी 10 नोव्हेंबर 1659 रोजी शिवाजी महाराज-अफझलखान यांची ऐतिहासिक भेट झाली. त्यात अफझलखानाचा वध झाला. या महान पराक्रमामुळे छत्रपतींचा लौकिक चौमुलखी पसरला. या अतुलनीय पराक्रमामुळे शिवाजी महाराजांचे नाव साऱ्या दऱ्या-खोऱ्यात वाऱ्यासारखे पसरले.
शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी देवीचे अत्यंत सुंदर आणि ऐतिहासिक मंदिर आणि शिवछत्रपतींचा भव्य अश्वारुढ पुतळा गडावर असून गडाच्या पायथ्याशी अफझलखानाची कबर आहे. इ.स. 1818 पर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. त्यानंतर तो इंग्रजांच्या ताब्यात गेला.
सज्जनगड:
सातारा शहराच्या पश्चिमेला 12 किलोमीटर अंतरावर परळी येथे श्रीसमर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेला हा सज्जनगड. या गडाच्या पायथ्यापर्यंत एस.टी.बस जाते. गडावर जाण्यासाठी 750 पायऱ्या चढून जावे लागते. गडावर श्रीस्वामी समर्थ रामदासांची समाधी आहे. दास नवमीला तेथे मोठा उत्सव असतो. गडावर सतत पाणी असणारी दोन तळीसुद्धा आहेत.
इ.स. 1673 मध्ये शिवाजी महाराजांनी सज्जनगड हा किल्ला जिंकून घेतला. इ.स.1700 मध्ये मोगल फौजांनी तो काबीज केला. परंतु औरंगजेबाच्या हयातीत मराठ्यांनी सातारा परिसरातील किल्ले परत घेतले. इ.स.1818 मध्ये ब्रिटिश फौजांनी सज्जनगड आपल्या ताब्यात घेतला.
कुसबुद्रुक, कुसखुर्द, पळसावडे परिसरात मोरघळ येथे तीन मीटर उंचीची गुहा असून तिला तीन दालने आहेत.
अजिंक्यतारा :
सातारा शहराच्या दक्षिणेला असलेला मोठा किल्ला म्हणून अजिंक्यतारा हा किल्ला ओळखला जातो. अजिंक्यतारा, अजिमतारा किंवा मंगळाईचा डोंगर या नावानेही तो ओळखला जातो. पूर्वी या किल्ल्यावरुन शहर व सभोवताच्या विस्तीर्ण प्रदेशावर देखरेख करीत असत. या किल्ल्याच्या उतारावर शहराचा बराचसा भाग वसला आहे. अजिंक्यतारा शिलाहार वंशीय राजा दुसरा भोज याने 1190 मध्ये बांधला. 1673 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला. 1698 मध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी सातारा ही मराठी राज्याची राजधानी जाहीर केली.
महाबळेश्वर-पाचगणी:
महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देश पातळीवर लौकिकास आले आहे. जुने क्षेत्र महाबळेश्वर हे धार्मिक स्थळ आणि पंचनद्यांचा उगम म्हणून सर्वपरिचित आहे. महाबळेश्वर येथे कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री व गायत्री या पाच नद्यांचा उगम होतो. याठिकाणी ऐतिहासिक पंचगंगा मंदिर तसेच स्वयंभू शिवलिंगाचे महाबळेश्वर मंदिर आहे.
परिसरातील अनेक पॉईंटस हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरले आहेत. सनराईज किंवा विल्सन पॉईंट, आर्थर सीट पॉईंट, केट्स पॉईंट व त्यालाच जोडून असलेला नीडल होल पॉईंट किंवा हत्तीचा माथा, विल्सन पॉईंट, मंकी पॉईंट, लॉडविक पॉईंट, टायगर्स स्प्रिंग, कार्नेक पॉईंट, हेलेन्स पॉईंट, एलफिन्स्टन पॉईंट, बॅबींग्टन पॉईंट, बॉम्बे पॉईंट, फॉकलंड पॉईंट, बगदाद पॉईंट आदी वैशिष्ट्यपूर्ण पॉईंट महाबळेश्वर परिसरात आहेत. पावसाळ्यामध्ये महाबळेश्वर येथील लिंगमाळा धबधबा, चिनामन्स धबधबा, धोबी धबधबा नयनरम्य आनंद देतात.
संपूर्ण महाबळेश्वर आणि आसपासच्या गावांना वेण्णा तलावातून पाणीपुरवठा करण्यात येतो. सौंदर्याने नटलेल्या महाबळेश्वरच्या पसिरातील पर्यटकांचे हे एक महत्वाचे जलविहाराचे ठिकाण आहे. याशिवाय महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, मध, जॅम, क्रशेस, चिक्की पर्यटकात प्रसिद्ध आहे. येथील माल्कमपेठ या नावाने प्रसिद्ध असलेली बाजारपेठ पर्यटकांचे आणखी एक आकर्षण आहे. महाबळेश्वर येथे सध्या पर्यटकांची बारमाही गर्दी असते.
पाचगणी हेही थंड हवेचे ठिकाण असून तेथील टेबल लँड या ठिकाणास भेट दिल्याशिवाय पर्यटक परतत नाहीत. सिडनी पॉईंट, पारसी पॉईंट, डेव्हील्स किचन, मॅप्रो गार्डन याशिवाय मॉरल रिआर्मामेट सेंटरही येथे आहे. पाचगणी हे निवासी शाळांसाठी प्रसिद्ध असून देश-विदेशातून विद्यार्थी शिक्षणासाठी याठिकाणी येत असतात.
कसे जाल :
जवळचे विमानतळ :- पुणे 120 कि.मी.
रेल्वे- जवळचे रेल्वे स्थानक वाठार स्टे. (ता. कोरेगाव) परंतु यापेक्षा पुणे रेल्वे स्थानकच अधिक सोयीचे आहे.
एसटी बसेस- पुणे-वाई-महाबळेश्वर 120 कि.मी.,
मुंबई -महाबळेश्वर (महाडमार्गे) 247 कि.मी.
औंध:
पूर्वी संस्थानिकांच्या जहागिरीचे औंध हे मुख्यालय होते. पंतप्रतिनिधींचा येथे मराठा स्थापत्य शैलीतील दुमजली वाडा येथे पाहण्यासारखा आहे. किन्हईचे कुलकर्णी पदाचे वंशपरंपरागत अधिकार असलेले त्र्यंबक कृष्णा हे पंतप्रतिनिधी घराण्याचे पूर्वज. या घराण्यातील रामचंद्र अमात्याच्या पदरी असलेल्या परशुराम त्रिंबकास छत्रपती राजाराम महाराजांनी 1690 मध्ये सरदारकी आणि सुभा लष्कर व समशेरजंग हे किताब दिले होते. 1909 पासून भगवानराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी अधिकारारुढ होते.
यमाई देवी:
औंध गावाच्या नैऋत्येस 240 मीटर अंतरावरील टेकडीवर यमाई देवीचे मंदिर आहे. मंदिराभोवती तटबंदी असून तिला दहा बुरुज आहेत. तटबंदीस उत्तरेस व दक्षिणेस प्रवेशद्वारे आहे. हे प्रारंभिक मध्ययुगातील तारकाकृती मंदिर असून त्यास मुखमंडप व गर्भगृह आहे. गाभाऱ्यात यमाई देवीची पाषाणातील पूर्वाभिमुखी मूर्ती आहे. जवळच पाण्याचे तळे आहे. यमाई देवीची मोठी यात्रा दरवर्षी पौष पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत असते.
औंध वस्तुसंग्रहालय:
सातारा व कोल्हापूर या मुख्य शहरांना जोडणारे औंध हे गाव संस्कृतीचे अनेक अवशेष आजही जतन करीत आहे. त्यात आठ हजारापेक्षा जास्त वस्तू असलेले हे वस्तुसंग्रहालय 1938 साली बाळासाहेब पंतप्रतिनिधींनी बांधले. विविध प्रदेशात निर्माण झालेली व त्या-त्या प्रदेशाची वैशिष्ट्ये सांगणारी ऐतिहासिक चित्रे, संगमरवरातून कोरलेली शिल्पे, कोरीव काम केलेल्या धातूच्या व लाकडाच्या वस्तू, हस्तीदंती कोरीव कलाकृती आणि स्ट्राँगरुममधील मौलिक ऐतिहासिक रत्ने यांचे दुर्मिळ दर्शन याठिकाणी पाहावयास मिळते. हे वस्तु संग्रहालय आज महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय विभागाच्या ताब्यात आहे. दरवर्षी हजारो पर्यटक या वस्तुसंग्रहालयाला भेट देतात.
कास पठार:
कास पुष्प पठाराने पर्यटनाच्या क्षेत्रात देशातच नव्हे तर जागतिक नकाशावर सातारा जिल्ह्याचा लौकिक नोंदविला आहे. सौंदर्याची अनोखी खाण असणारे कास पुष्प पठार हे पश्चिम घाटासह वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजेच जागतिक वारसा स्थळामध्ये युनेस्कोकडून नुकतेच समाविष्ट करण्यात आले आहे. आज साताऱ्याच्या पर्यटनाची ओळख खऱ्या अर्थाने सातासमुद्रापार झाली आहे. सातारा शहरापासून अवघ्या 23 कि.मी. वर धरतीवरच्या स्वर्गरूपाने साक्षात कास पुष्प पठार वसले आहे. सध्या कास पठार हे विविध जातींच्या फुलांनी बहरत असून पर्यटकांची रिघ कास पठाराच्या दिशेने सुरु झाली आहे.
कास पठार हे वर्ड हेरिटेज कमिटीने जुलै 2012 मध्ये मान्य केलेल्या पश्चिम घाटातील 39 ठिकाणापैकी एक आहे. 21 देशांच्या सभासदासमोर पश्चिम घाटाला जागतिक वारसास्थळाचे नामांकन मिळाले आहे. त्यातील कास पठार हे फुलांसाठी एकमेव नैसर्गिक वारसास्थळ म्हणून नामांकन प्राप्त झालेले ठिकाण आहे. कास पुष्प पठाराचे नैसर्गिक आणि निसर्गदत्त देणगीची जोपासना करून या पठाराचा विकास करण्यात वन विभागाने पुढाकार घेतला आहे.
संकेतस्थळ: www.kas.ind.in
शिवसागर तलाव, बामणोली, तापोळे:सातारा शहराच्या पश्चिमेला यवतेश्वराचा डोंगर. या डोगराच्या कुशीत श्री शंकराचे स्थान आहे. श्रावणामध्ये हजारो भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात.
यवतेश्वरपासून पुढे 16 कि.मी. अंतरावर कास तलाव आहे. या तलावाचे पाणी सातारा शहरासाठी बंद पाईपने पुरविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. दुर्गम आणि डोंगराळ भागातील या तलावाच्या परिसरात जंगली श्वापदे आहेत. हे ठिकाण सहलीचे केंद्र बनले आहे. या तलावावरुन पुढे काही अंतरावर कोयना धरणाच्या पाणलोटातील शिवसागर हा जलाशय आहे. हा भाग दाट झाडीने व्यापलेला आहे.
वन विभागाने जतन केलेला नैसर्गिक वृक्षवाढीचा प्रदेश शिवसागराच्या किनाऱ्यावर आहे. बामणोली तसेच तापोळा ही जलाशयाच्या काठावरील हिरवाईने नटलेली गावे महाबळेश्वरच्या टप्प्यात असल्याने व बोटिंगसारख्या सुविधा तेथे उपलब्ध झाल्याने नवीन पर्यटनस्थळे म्हणून या गावांचा झपाट्याने विकास होत आहे.
धावडशी:
साताऱ्याच्या वायव्येस नऊ कि.मी.अंतरावर धावडशी हे गाव आहे. ब्रम्हेंद स्वामींना 1928 मध्ये छत्रपती शाहूकडून इनाम म्हणून मिळालेले हे गाव होते. ब्रम्हेंद्र स्वामी छत्रपती शाहूंचे राजगुरु व पेशव्यांचे गुरु होते. सन 1945 मध्ये ब्रम्हेंद्र स्वामी निर्वतल्यानंतर छत्रपती शाहूंनी त्यांच्या समाधीवर मंदिर बांधले. मंदिर उत्तराभिमुखी, अतिशय रेखीव आहे. गाभाऱ्यात भार्गवरामाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे.
धावडशीच्या तांबे घराण्यात जन्मलेली मेरी झाँसी नही दुंगी ! असा नारा देणाऱ्या झाशीच्या राणीचे धावडशी हे जन्मगाव. आजही तिच्या वाड्याचे काही अवशेष याठिकाणी पाहावयास मिळतात. मेरुलिंग धावडशी येथील ब्रम्हेंद्र स्वामी यांचा मठ व तळी प्रसिद्ध आहेत.
ठोसेघर:
सातारा तालुक्यातील ठोसेघर येथील धबधबा पाहण्यास पावसाळी हंगामात तरुणाई लोटलेली असते. हे स्थळ सातारा येथून 36 कि.मी. अंतरावर आहे. चाळकेवाडी येथील पठारावर उभारलेला पवन ऊर्जा प्रकल्प हेही एक आकर्षक स्थळ ठरले आहे.
वाई:
कृष्णा नदीच्या तीरावर वसलेले वाई हे दक्षिण काशी म्हणून संबोधले जाते. येथे विश्वकोश निर्मितीचे कार्य चालू आहे. वाईनजिकच्या मेणवली येथे नाना फडणवीस यांचा सुप्रसिद्ध वाडा आहे. सव्वा एकराच्या प्रशस्त जागेत बांधलेल्या या वाड्यात विविध प्रकारची कलाकुसर दिसून येते.
पाली:
पुणे-बंगलोर महामार्गावर काशिळच्या पश्चिमेस सुमारे सात कि.मी. अंतरावर असलेले पाली येथील खंडोबा मंदिर लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असून ते तारळी नदीच्या तीरावर वसलेले आहे. पौष महिन्यात याठिकाणी मोठी यात्रा भरते.
कोयना धरण:
संपूर्ण राज्याला वरदान ठरलेले कोयना हे धरण पाटण तालुक्यातील कोयना नदीवर बांधलेले आहे. 1960 साली हे धरण बांधण्यात आले. धरणाची पाणी साठवण क्षमता 98.78 टीएमसी एवढी आहे. या धरणातील जलाशयास शिवसागर जलाशय म्हणून ओळखले जाते. तापोळा ते कोयनानगर अशी बोटींगची सुविधाही पर्यटकांसाठी याठिकाणी उपलब्ध आहे.
कोयनानगरचे पंडित नेहरु स्मृति उद्यान
कोयना जलाशयाच्या शिवसागरात भारतीय अभियंत्यांनी चौथ्या टप्प्यात लेक टॅपिंगचा अभिनव प्रयोग यशस्वी केला. कोयनानगर परिसरात अलिकडेच अत्याधुनिक पद्धतीने उभारलेले पंडित जवाहरलाल नेहरु स्मृति उद्यान हेही पर्यटन केंद्र म्हणून उदयास आले आहे. आबालवृद्धांची तेथे वर्दळ असते. पर्यटन विकास महामंडळातर्फे येथे पर्यटन विकासाचे प्रयत्न जोमाने सुरु झाले आहेत.
वनकुसवडे- पवनऊर्जा:
साताऱ्यापासून 45 कि.मी.अंतरावर पाटण तालुक्यातील वनकुसवडे पठारावर 50 मीटर उंचीच्या मनोऱ्यावर तीन पात्यांच्या विंड टरबाईनद्वारे वाऱ्याच्या गतिज ऊर्जेचा वापर करुन विद्युत जनित्रे फिरवली जातात. यातून पवनऊर्जा निर्माण केली जाते. आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प येथे साकार होत आहे. आज येथे 857 पवन विद्युत जनित्रांच्या सहाय्याने 313 मेगावॅट वीज निर्माण केली जाते.
मांढरदेव:
वाईच्या उत्तरेला नऊ कि.मी.अंतरावर महादेव डोंगराच्या रांगेत मांढरदेव हे ठिकाण काळुबाई देवीच्या स्थानासाठी प्रसिद्ध आहे. वाई व शिरवळहून येथे जाता येते. सन 1850 मध्ये मंदिरावर शिखर बांधले. मंदिरात मध्यभागी काळुबाई देवीची स्वयंभू मूर्ती मखरात असून ती चांदीच्या पत्र्याने मढविलेली आहे. येथे पौष शुद्ध 15 ला मोठी यात्रा भरते.
म्हसवडची श्री सिद्धनाथ यात्रा, वाई, लिंब गोवे, क्षेत्र माहुली व कराड येथे कृष्णामाईचा उत्सव भाविक मोठ्या भक्तीभावाने साजरा करतात. कारखेल (ता.माण) येथे संताजी घोरपडे यांचे स्मारक आहे.
कराड येथील प्रीतिसंगम:
कराड येथील कृष्णा-कोयनेचा संगम हा आता केवळ संगमच न राहता ज्येष्ठ नेते स्वर्गिय यशवंतराव चव्हाण यांच्या या प्रितिसंगमावरील समाधीमुळे येथे स्थानिक जनतेबरोबरच राजकीय नेते, पर्यटक यांचीही वर्दळ वाढली आहे. कराडमधील यशवंतराव चव्हाण स्मृति सदनही सदैव गजबजलेले असते. येथील अद्ययावत कृष्णा हॉस्पिटलमुळे परिसरातील जनतेस वैद्यकीय सेवेचे नवे दालन खुले झाले आहे. यशवंतराव चव्हाण स्मृति सदन आणि वेणूताई चव्हाण प्रतिष्ठान वस्तु संग्रहालय, मनोरे ही कराडची वैशिष्ट्ये आहेत.
शिखर शिंगणापूर:
पुराण, इतिहास, धर्म आणि राजकारण यांचा समन्वय साधणारे शिखर शिंगणापूर हे ठिकाण डोंगराच्या माथ्यावर हे मंदीर आहे. चैत्र अष्टमीच्या दिवशी शिव पार्वतीच्या विवाहाचा सोहळा येथे पार पडतो. देवालयाच्या गाभाऱ्यातील शालूंकेत असलेली दोन लिंग शिवशक्तीची प्रतिके असून ती स्वयंभू आहेत असे मानले जाते. गर्भगृह, अंतराळ, सभामंडप, मुखमंडप आणि नंदीमंडप यांचा मंदिरात समावेश आहे.
गोंदवले:
दहिवडीच्या आग्नेयेस आठ कि.मी.अंतरावर गोंदवलेकर महाराजांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. येथे दास संप्रदायातील या महाराजांचा जन्म 1845 मध्ये व मृत्यू 1918 मध्ये झाला. येथे त्यांची समाधी असून लाखो भाविक दर्शनाला येतात. मंदिराचे संपूर्ण बांधकाम आधुनिक पद्धतीचे असून ते 1936-37 मधील आहे. गावाच्या उत्तरेस 300 वर्षांपूर्वीचे भीमाशंकराचे मंदिर सुस्थितीतील आहे.
चाफळ:
पुणे-बंगलोर महामार्गावरील उंब्रजच्या पश्चिमेला 10 कि.मी. अंतरावर कृष्णेची उपनदी मांडच्या उजव्या तीरावर चाफळ गाव वसलेले आहे. रामदास स्वामींच्या वास्तव्याने या गावास धार्मिक व ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. रामदास स्वामी बारा वर्षाच्या तीर्थाटनानंतर आल्यानंतर त्यांनी येथे मारुतीची स्थापना केली. समर्थांनी स्वहस्ते श्रीरामाचे मंदिर येथे बांधले. शिवाजी महाराजांनी या मंदिरासाठी 300 होन दान दिले. मंदिरात राम, सीता, लक्ष्मण यांच्या मूर्तीची 1648 मध्ये स्थापना केली. जीर्ण झालेले हे मंदिर उद्योगपती अरविंद मफतलाल यांनी 1972 मध्ये नव्याने बांधून दिले. मकर संक्रांतीच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणात महिला दर्शनासाठी येतात.
पुसेगाव:
सातारच्या पूर्वेला पंढरपूर रस्त्यावर 36 कि.मी.अंतरावर येरळा नदीच्या तीरावर पुसेगाव वसले आहे. नाथपंथींच्या अकरा लिंगापैकी एक येथे आहे. येथे सेवागिरी महाराजांची समाधी आहे. त्यांनी अनेक कल्याणकारी कामे करुन 10 जानेवारी 1947 मध्ये येथे समाधी घेतली. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीला मोठी यात्रा याठिकाणी भरते. त्यावेळचा रथोत्सव प्रसिद्ध आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी कामे केली जातात.
अन्य महत्वाची ठिकाणे:
निसर्ग सान्निध्याने नटलेल्या आणि डोंगर-दऱ्या-खोऱ्यांनी व्यापलेल्या या जिल्ह्यातील लहान-मोठ्या गडकोट किल्ल्यांची संख्या 25 हून जास्त आहे.
तालुकावर गडकोट किल्ल्यांची विभागणी अशी :
• वाई- खंडाळा: कमळगड, पांडवगड, वैराटगड, केंजळगड.
• जावळी-महाबळेश्वर: प्रतापगड,मकरंदगड, वासोटा.
• सातारा-कोरेगाव: अजिंक्यतारा, सज्जनगड, चंदन-वंदन, नांदगिरी.
• पाटण: दातेगड उर्फ सुंदरगड, गुरपावंतगड, भैरवगड, जंगली जयगड.
• कराड: सदाशिवगड, वसंतगड.
• फलटण-माण: ताथवडा उर्फ संतोषगड, वारुगड, महिमानगड.
• खटाव- वर्धनगड आणि भूषणगड.
लहान-मोठे गडकोट किल्ले आजही इतिहासकालीन महापुरुषांच्या थोर पराक्रमाची साक्ष देत उभे आहेत.
यापैकी प्रतापगड, मकरंदगड, संतोषगड, वारुगड, महिमानगड, वर्धनगड, भूषणगड, सदाशिवगड हे किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले. आगाशिव डोंगर येथील लेण्या, वाई येथील मेणवलीचा नाना फडणीस यांचा वाडा आदी जिल्ह्यातील अनेक प्रेक्षणीय ठिकाणे पर्यटकांना साद घालतात.
गडकोट किल्ले, अनेक प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळे, निसर्गरम्य ठिकाणे, ऐतिहासिक स्थळे, वस्तुसंग्रहालये, धरण जलाशय परिसरातील निसर्ग सान्निध्याने व्यापलेली स्थळे, जंगले, तीर्थक्षेत्रे, उद्याने, पावसाळ्यातील धबधबे अशा मनोहारी निसर्ग सौंदर्याने नटलेला सातारा जिल्हा पर्यटकांना नेहमीच भुरळ घालीत आला आहे.
प्रमुख स्थळांचे साताऱ्यापासूनचे अंतर
ठिकाण
|
कि.मी.
|
किल्ले प्रतापगड व भवानी माता मंदिर
|
83
|
सज्जनगड : श्री रामदास स्वामींची समाधी
|
12
|
शिखर शिंगणापूर- शंभु महादेवाचे देवालय
|
89
|
धावडशी - ब्रम्हेंद्रस्वामी मंदिर
|
15
|
पाली- श्री खंडोबाचे देवालय
|
33
|
चाफळ - श्रीराम मंदिर
|
43
|
ठोसेघर - धबधबा
|
36
|
औंध- यमाई देवालय/वस्तु संग्रहालय
|
43
|
श्री क्षेत्र महाबळेश्वर- तीर्थक्षेत्र
|
72
|
बामणोली- निसर्ग सौंदर्य
|
36
|
महाबळेश्वर- थंड हवेचे ठिकाण
|
65
|
चाळकेवाडी - पवन ऊर्जा प्रकल्प
|
40
|
कोयना धरण, विद्युत प्रकल्प
|
98
|
धोम धरण
|
44
|
वाई तीर्थक्षेत्र (दक्षिण काशी)
|
35
|
फलटण- श्रीराम मंदिर
|
63
|
गोंदवले बु. ब्रम्हचैतन्य स्वामी महाराज समाधी
|
72
|
पाचगणी - थंड हवेचे ठिकाण
|
49
|
पुसेगाव- सेवागिरी महाराज
|
35
|
संकलन: जिल्हा माहिती कार्यालय, सातारा.
0 comments:
Post a Comment