पाणलोट विकासामुळे .... कचरेवाडीत भाजीपाला व फळपिके जोमात

कृषी विभागाच्या गतिमान पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमातून तासगांव तालुक्यातील कचरेवाडी गावात माती तसेच सिमेंट नालाबांध, कंपार्टमेंट बंडिग आणि शेततळ्यांच्या उभारणीचे भरीव काम झाल्याने ऐन दुष्काळातही कचरेवाडीत खरीप तसेच रब्बी हंगामातील पिकांबरोबरच भाजीपाला आणि फळबागांचे क्षेत्र वाढण्यास मदत झाली आहे. पाणलोट विकास कार्यक्रमामुळे कचरेवाडीत भूगर्भात दीड ते दोन मिटरनी पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली आहे. ही किमया केवळ पाणलोट विकासाचीच आहे. त्यामुळेच जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानालाही फार मोठे महत्व असून या कार्यक्रमाद्वारे भविष्यात सांगली जिल्हा टंचाईमुक्त होण्यास मदत होणार आहे.

तासगांव तालुक्यातील कचरेवाडी येथे कृषी विभागाने गावकऱ्यांच्या सहकार्यातून गतिमान पाणलोट विकास कार्यक्रमातून जलसंधारणाच्या विविध प्रणाली यशस्वीरित्या राबविल्याने गावाच्या शिवारातील पाणी पातळीत दीड ते दोन मीटरनी वाढ होऊन गावाच्या कृषी विकासाला गती लाभली आहे. गेल्यावर्षी तसेच अलिकडे झालेल्या अवकाळी पावसाचा थेंब-न-थेंब या जलसंधारण प्रणालीमध्ये अडविला गेला, आणि पाणलोट विकासाच्या कामामुळेच की काय, आज कचरेवाडीमध्ये ज्वारी, उडीद, मूग, सोयाबीन, भुईमूग पिकाबरोबरच भाजीपाला आणि फळबागांच्या शेतीला गती लाभली आहे. जिल्ह्याचा पूर्वभाग तसा अवर्षण प्रवण क्षेत्रात मोडतो, तासगाव तालुकाही त्याला अपवाद नाही. या तालुक्यातील जनतेने पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेल्या या दुष्काळावर जलसंधारणातून मात करण्याचा संकल्प केला, कृषी विभागाने त्यांचा संकल्प सिद्धीस नेण्यास मोलाची मदत करुन जलसंधारणातून पाणीसाठे निर्माण करण्याचं महान काम कचरेवाडीत झाले आहे. आता तर शासनाने जलयुक्त शिवार अभियानातून शिवारात पाणीसाठे निर्माण करण्यावर भर दिला असून या अभियानाला शासनाने गती दिली आहे. 

तासगांव तालुक्यातील दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून जलसंधारणांतर्गत मोठ्या प्रमाणावर शेततळी तसेच माती आणि सिमेंट नालाबांधांची कामे केल्याने जमिनीवर पडणाऱ्या पावसाचे पाणी शेतात अडविण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. कचरेवाडीत कृषी विभागाच्या सहकार्यातून जलसंधारणांतर्गत 450 हेक्टरवर कंपार्टमेंट बंडीग, 45 हेक्टरवर मूलस्थानी जलसंधारण, 3 शेततळी, 5 सिमेंट नाला बांध, 2 माती नाला बांध तसेच जुन्या तलावातील गाळ काढणे अशा पाणलोट विकासाच्या कामामुळे कचरेवाडीत 113 टीसीएम पाणीसाठा उपलब्ध झाला. या कार्यक्रमांतर्गत मजगीची कामे झाल्यामुळे मूलस्थानी जलसंधारणास महत्व आले. माती नाला बांध सिमेंट नाला बांध तसेच गाळ काढण्याच्या भरीव कामामुळे कचरेवाडीच्या पाणीपातळीत दीड ते दोन मीटरने वाढ झाली. जवळपास आठ महिने कालावधीसाठी पाणी उपलब्ध होऊ लागले. जलसंधारण प्रणालीमुळे जमिनीची धूप थोपवून जमिनीचा पोत सुधारण्यास मदत झाली. या सर्व कार्यक्रमामुळे गावातील विहिरी आणि बोअर पुन्हा पुनरज्जिवीत होण्यास मदत झाली.

गेल्या दोन वर्षातील दुष्काळ निवारणासाठी तातडीच्या उपाययोजना म्हणून कृषी विभागाच्या माध्यमातून हाती घेतलेल्या पाणलोट विकासाच्या कार्यक्रमाची उपयुक्तता डोळ्यासमोर ठेवून राज्य शासनाने नुकतेच जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले असून या जलयुक्त शिवार अभियानामुळे जिल्ह्यातील दुष्काळी पट्‌ट्यातील जनतेला खऱ्या अर्थाने जलसंधारण प्रणालीद्वारे पाणलोट विकासाची नवी दिशा मिळून पिण्याचं तसेच शेतीला संरक्षीत पाणी उपलब्ध होण्यास शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाची फार मोठी मदत होणार आहे. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान 141 गावामध्ये प्रभावीपणे राबविले जात असून या अभियानाच्या अंमलबजावणीवर जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी व्यक्तीश: लक्ष केंद्रीत केले आहे. तर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे आणि रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी सुचिता भिकाणे यांनी जलयुक्त शिवार अभियान अधिक गतिमान करण्यास गावकरी आणि शासन यंत्रणेला बरोबर घेऊन घेतलेला पुढाकार खऱ्या अर्थाने महत्वाचा आहे.

पाणलोट क्षेत्र विकासातून माथा ते पायथा या जलसंधारण प्रणालीमुळे कचरेवाडी गावातील शिवारात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा थेंब न थेंब जलसंधारण प्रणालीमध्ये साठवून तो पुन्हा जमिनीत मुरविण्यास गावकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. नुकतेच शासनाने जाहीर केलेले जलयुक्त शिवार अभियानही प्रभावीपणे राबवून ते यशस्वी करण्याचा संकल्पही गावकऱ्यांनी केला आहे. जलसंधारणंतर्गत पाणलोट विकासाचा कार्यक्रमाद्वारे कचरेवाडीत घेण्यात आलेल्या सिंमेंट तसेच माती नालाबांधासह अन्य जलसंधारण प्रणालीमुळे जमिनीवर पडणाऱ्या पावसाचा थेंब न थेंब अडवला गेला, त्यामुळे भूगर्भात पाण्याची पातळी वाढविण्यास मदत होत आहे. या अभियानामुळे कचरेवाडीच्या शिवारात भूगर्भात पाणीसाठा निर्माण होत असल्यामुळे गावाच्या शिवारातील बोअर तसेच विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शिवारात भाजीपाला आणि फळबागासारखी नगदी पिके घेण्यास सुरुवात केली आहे. 

- एस. आर. माने
जिल्हा माहिती अधिकारी, सांगली.

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India