महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ

स्थापना :

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापिठाने आपल्या स्थापनेच्या सतराव्या वर्षात पदार्पण केले आहे. मोठ्या जोमाने आणि शक्तीने शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी वर्ध्यातील हे एकमेव विद्यापीठ करत आहे. वास्तविक हे विद्यापीठ आपल्या विकासाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर मार्गक्रमण करीत आहे. या विद्यापीठाची परिकल्पना शिक्षणाची एक पर्यायी संस्था म्हणून करण्यात आली आहे.

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा (महाराष्ट्र) हे सातपुडा पर्वतरांगांच्या सानिध्यात विकसित भारतीय संसदेत 1996 मध्ये पारित अधिनियमाअंतर्गत 1997 मध्ये एक केंद्रीय विद्यापीठ म्हणून स्थापित करण्यात आले आहे. देशातील हे एक पहिले आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी सेवाग्राम (वर्धा) येथून जवळपास दहा किलोमीटर अंतरावर मुंबई - नागपूर महामार्गावर 212 एकराच्या भूमीत कार्यरत आहे. दीर्घकाळ चाललेल्या प्रयत्नांमधून हे विद्यापीठ आकारास आलेले आहे.

अभ्यासक्रम:

हिंदी भाषा आणि साहित्याची उत्तरोत्तर प्रगती यासह ज्ञानाच्या विविध विषयांमध्ये अध्ययन, शोध आणि प्रशिक्षणाचे समर्थ माध्यम म्हणून हिंदीचा सम्यक विकास हा या विद्यापीठाचा मुख्य हेतू आहे. देशी आणि विदेशी भाषांसह हिंदीचे तुलनात्मक अध्ययन आणि आधुनिकतम व अद्यतन ज्ञान-सामुग्रीचे हिंदीत भाषांतर व विकास करणे हेही या विद्यापिठाच्या प्राधान्यक्रमात समाविष्ट आहे. हे विद्यापीठ सेवाग्राम आणि पवनार आश्रमाच्या श्रृंखलेत गांधीवादी आधुनिक आवर्तनाचा आंतरराष्ट्रीय आश्रम होय. जिथे भाषा, साहित्य, संस्कृती, अनुवाद आणि निर्वचन, मानव्य आणि सामाजिक शास्त्रे, व्यवस्थापन आणि शिक्षण या विद्यापीठा (Schools) अंतर्गत पदवी, पदव्यूत्तर, शोध आणि डिप्लोमा इत्यादी विविध रोजगाराभिमुख अभ्यासक्रम चालविले जातात. वर्धेशिवाय कोलकाता आणि अलाहाबाद येथेही विद्यापीठ प्रादेशिक केंद्रे आहेत. तिथे विविध अभ्यासक्रमाचे अध्ययन-अध्यापन होत आहे.

वैश्विक स्तरावर एक उत्कृष्ट मानक स्थापित करत असलेल्या या विद्यापीठाचा आलेख महात्मा गांधी यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा शहरातून आंतरराष्ट्रीय पटलावर झळकत आहे.

हिंदी केवळ साहित्य आणि चिंतनाची भाषा न राहता ती आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिपक्व भाषांप्रमाणे विकसित व्हावी यासाठी हे विद्यापीठ जागतिक पातळीवर कार्यरत आहे. विदेशातील विद्यापीठे आणि संस्थांमध्ये हिंदी तसेच हिंदी माध्यमातून विविध विषयांमध्ये अध्ययन आणि शोध करण्यासाठी हे विद्यापीठ समन्वयकाची भूमिका बजावत आहे. म्हणूनच येथे विदेशातील अनेक विद्यापीठांचे विद्यार्थी अध्ययन करण्यासाठी येतात. विश्वविद्यालयाने विदेशी विद्यार्थ्यांकरिता हिंदीचा अभ्यासक्रम आणि विदेशी हिंदी शिक्षकांकरिता ओरिएंटेशन अभ्यासक्रम राबवून आपल्या जागतिक वैभवतेचे प्रतिमान गाठले आहे.

जगभरातील हिंदी वाचकांना भारतेंदुपासून तर आतापर्यंतचे कॉपीराइट मुक्त महत्त्वपूर्ण हिंदी साहित्य उपलब्ध करवून देण्याचा विडा विद्यापीठाने उचलला आहे. हिंदी समय डॉट कॉम (hindisamay.com) या संकेतस्थळाच्या माध्यमातून हे काम जगभरात पोहोचविले जात आहे. येथे जे विषय शिकविले जातात ते खूप कमी विद्यापीठांमध्ये शिकविले जातात. जसे, स्त्री अध्ययन, संवाद व माध्यम अध्ययन, अनुवाद, फिल्म आणि थिएटर, विकास आणि शांती अध्ययन, दलित आणि अनुसूचित जमाती अध्ययन, बौद्ध अध्ययन, मानवशास्त्र, मनोविज्ञान, हिंदी साहित्य, तुलनात्मक साहित्य, भाषा तंत्रज्ञान, मास्टर ऑफ सोशल वर्क, मास्टर इन पब्लिक हेल्थ, शिक्षणशास्त्र, डायस्पोरा, फोरेंसिक सायन्स, एम. कॉम, आणि एमबीए आदी. या विषयांमध्ये एम. ए., एम.फिल. पीएच.डी. तथा पदविकापर्यंतचे शिक्षण उपलब्ध आहे. याशिवाय मराठी, उर्दू, संस्कृत, इंग्रजी, चिनी, स्पॅनिश, जपानी, फ्रेंच आणि पाली या भाषांमध्ये सर्टिफिकेट, डिप्लोमा आणि एडवांस्ड डिप्लोमा शिकविण्यात येत आहे. चालू शैक्षणिक सत्रात बीएड या दोन वर्षीय अभ्यासक्रमाची सुरूवात या ठिकाणी झाली आहे. बी. एड. सुरू करणारे हे देशातील प्रथम केंद्रीय विद्यापीठ आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाकडून घेण्यात येणारी नेट परीक्षा आणि इतर स्पर्धात्मक परीक्षांकरिता विश्वाविद्यालयात विद्यार्थी तयार करण्यात येतात. उच्च शिक्षणात नवी उंची गाठण्यासाठी हे विद्यापीठ अग्रेसर आहे आणि याचाच एक भाग म्हणून नुकत्याच नॅक (NAAC) द्वारा करण्यात आलेल्या निरीक्षण आणि मूल्यांकनामध्ये विश्वेविद्यालयाला ए ग्रेड प्रदान करण्यात आला आहे. उच्च शिक्षणात होत असलेल्या बदलांमध्ये विद्यापीठ स्वत:ला सुसंगत ठेवते आणि या दिशेने विश्वविद्यालयाने चालू शैक्षणिक सत्रापासून चित्रपट निर्मिती, अभिनय आणि मंच विन्यास या विषयांमध्ये बॅचलर ऑफ व्होकेशनल आणि हिंदी ऑनर्स, पत्रकारिता आणि जनसंवाद ऑनर्स, बी. एस. डब्ल्यू आणि बी. कॉम. आनर्स हे विषय सुरू केले आहेत. प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला येथे कंप्यूटर शिकणे आवश्यक आहे आणि त्यासाठी त्याला एक स्वतंत्र पेपर द्यावा लागतो. माहिती आणि तंत्रज्ञानाशी विद्यार्थी अवगत असावा यासाठी येथे प्रयत्न करण्यात येतात.

सुविधा :
विद्यापीठाचा संपूर्ण परिसर वाय-फाय आहे. येथील समृद्ध ग्रंथालयात ज्ञानाचे भव्य भंडार आहे. विद्यार्थ्यांना त्याचा लाभ सुटीच्या दिवशीही घेता येतो, हे विशेष. ग्रंथालयात ऑनलाइन ग्रंथ देवाण-घेवाणाची सुविधा उपलब्ध आहे. विद्यापीठाच्या अनेक योजना आहेत ज्यात मौलिक आणि मानक-ग्रंथांचे प्रकाशन, दुर्लभ पांडुलिपी, चित्र, दस्तावेजांचा संग्रह, विश्वाकोश आणि संदर्भ-कोशांची निर्मिती यांचा समावेश आहे. विद्यापीठाचे त्रैमासिक पत्रिका बहुवचन, द्वैमासिक समिक्षात्मक पत्रिका पुस्तक वार्ता आणि द्वैमासिक समाचार पत्रिका हिंदी विश्वा यांचे नियमित प्रकाशन करते. विश्वाविद्यालयात विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया प्रारंभ झाली आहे. अर्ज ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे.

संपर्क :
या विद्यापिठाशी त्यांच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, पोस्ट : हिंदी विद्यापीठ, गांधी हिल्स, वर्धा-442001 (महाराष्ट्र) या पत्त्यावर अथवा फोन क्रमांक 07152-251661 आणि www.hindivishwa.org या संकेतस्थळावर संपर्क केला जाऊ शकतो.
संकलन- जिल्हा माहिती कार्यालय, वर्धा

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India