महाराष्ट्रातील “पक्षीतीर्थ” नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य

मोकळ्या आकाशात भरारी घेणारा बहिरी ससाणा...ध्यानस्थ साधूसारखा पाण्यात उभा असलेला बगळा... एरव्ही चटकन न दिसणारा नर्तक, धनेश, करकोचे असे विविध पक्षी इथे मनसोक्त बागडत असतात. माणसांच्या सिमेंट-काँक्रिटच्या दुनियेपासून लांब या अभयारण्यामध्ये नेहमी भरते पक्ष्यांची शाळा... आणि ही अनोखी शाळा पहायची असेल तर एकदा तरी महाराष्ट्राचं भरतपूर असं ज्या अभयारण्याला संबोधलं जातं त्या ‘मधमेश्वर’ पक्षी अभयारण्याला भेट द्यायला हवी.

गोदावरी आणि कादवा नदीच्या संगमाच्या प्रवाहावर नांदूर मधमेश्वर दगडी धरण बांधण्यात आले आहे. धरणाच्या खालच्या बाजूला नदी पात्रातील खडकावर नांदूर मधमेश्वराचे पुरातन मंदिर आहे. धरणातील जलाशयाचे पाणी दोन्ही बाजूने कालव्याद्वारे औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी गावांना देण्यात आले आहे.

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, जागतिक वन्यजीव निधी आणि वनविभाग महाराष्ट्र यांच्या संयुक्तिक प्रयत्नाने निर्माण झालेलं नांदूर मधमेश्वर हे एक सुरेख पक्षी अभयारण्य आहे. संपन्न जैव विविधतेचा अनुभव घेण्यासाठी एक उत्कृष्ट असं स्थान आहे. नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यात हे अभयारण्य वसलेलं असून त्याचं एकूण क्षेत्रफळ १००.१२ चौ.कि.मी आहे. १९८६ साली हे क्षेत्र अभयारण्य म्हणून अधिसूचित करण्यात आले. जलाशयातील उथळ पाणी, पाण्यातील विपूल जलचर, विविध पाण वनस्पती, किनाऱ्याला असलेली वनराई आणि जवळच्या सिंचित शेतातील पिकं यामुळे पक्षांसाठी हे आकर्षणाचे ठिकाण झाले असून त्यांच्या निवासासाठी एक उत्तम स्थळ गणलं गेलं आहे. हे महाराष्ट्रातील एक उत्तम ‘पक्षीतीर्थ’ आहे. पक्षी निरीक्षणातून येथे २४० हून अधिक प्रकारचे पक्षी असल्याचे आढळून आले आहे. येथील जलाशयात २४ जातीचे मासे आहेत. परिसरात ४०० हून अधिक प्रजातीच्या वनस्पतींची विविधता आहे.

या परिसरात उदमांजर, कोल्हे, मुंगूस, लांडगे, बिबटे, विविध प्रकारचे साप दिसून येतात. अभयारण्यात पक्षी सुची तयार करण्यात आली आहे आणि दरवर्षी पक्षी गणनेनंतर ती सुधारित (अपडेट) केली जाते. नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यातील पक्षी अधिवासाची संपन्नता तसेच दुर्मिळ पक्ष्यांचे अस्तित्त्व लक्षात घेऊन हे क्षेत्र ‘भारतीय पक्षीतीर्थ जाळ्या’त समाविष्ट करण्यात आले आहे.

अभयारण्यात टिल्स, पोचार्ड, विजन, गडवाल, शॉवलर, पिनटेल, क्रेन, गारगनी, टर्नस, गुज, पेलिकन, गॉडविट, सॅण्ड पायपर, क्रेक, श्यांक, कर्ल्यु, हॅरियर, प्रॅटिनकोल, गल यासारखे स्थलांतरित पक्षी आढळतात. त्याचप्रमाणे पाणकोंबडी, मुग्ध बलाक, गायबगळे, मध्यम बगळे, खंड्या आयबीस, स्टॉर्क यासारखे पक्षीही दिसून येतात. जलाशयाजवळ गवतीमाळ असल्याने आणि मोठ्या प्रमाणात वृक्ष असल्याने अनेक जातीचे लहान मोठे स्थानिक-स्थलांतरित पक्षांचा‍ वावर दिसून येतो. पाणकावळे, पाणडुबी, रोहित, चमचा, धनवर कुट यासारखे पक्षीही येथे आढळतात.

चित्तवेधक हालचाली, आवज आणि रंगसंगतीने लक्ष वेधून घेणारे हे विविध आकाराचे पक्षी या अभयारण्यात सहजतेने आपल्याला पहायला मिळतात. गोदावरीचा रम्य परिसर, हिरवीगार वनराई, दूरवर पसरलेला जलाशय आणि देश-विदेशातील पक्षी निरीक्षणाचा अभूतपूर्व आनंद यामुळे हे अभयारण्य पक्षी निरीक्षकांसाठी नंदनवनच ठरले आहे. या परिसरात सृष्टी सौंदर्यासोबत आध्यात्मिक सुरही गुंजत राहतात. येथील मंदिरांनी या क्षेत्राला अधिकच सौंदर्य प्राप्त झाले आहे. नदीच्या काठावरील मधमेश्वर मंदिराचा उल्लेख हिंदू पुराणातही आढळतो. हिरवाईने नटलेल्या परिसरात आवश्यक साधने घेऊन मुक्तपणे भटकायचे, निसर्ग, वनस्पती व पक्ष्यांचे सौंदर्य कॅमेराबद्ध करायचे, जलाशयावरून येणारा गार वारा अंगावर झेलायचा... थोडं थकलं तर तिथेच झाडाखाली पक्षांच्या किलबिलाटात विश्रांती घ्यायची.... असा मनस्वी आणि मनमुराद आनंद देणारं हे अभयारण्य एकदा तरी पहायला हवं असं आहे.

सप्टेंबर ते मार्च हा या अभयारण्याला भेट देण्याचा उत्तम कालावधी आहे. नाशिक-नांदूर मधमेश्वर अभयारण्याचे अंतर ४० कि.मी. चे आहे. नाशिक चांदोरी फाटा-सायखेडा-शिंगवेमार्गे चापडगाव निरीक्षण गॅलरी व खाणगावथडी निसर्ग निर्वचन केंद्रात जाता येते. निफाड-नांदूर मधमेश्वर अभयारण्याचे अंतर केवळ १२ कि.मी. चे आहे. निफाड-दिंडोरी तास-नांदूर मधमेश्वरमार्गे खाणगावथडी निसर्ग केंद्र आणि चापडगाव निरीक्षण गॅलरीला जाता येते.

सिन्नर-नांदूर मधमेश्वर अभयारण्याचे अंतर २५ कि.मी. चे आहे. सिन्नर-बारगाव पिंप्री, मांजरगावमार्गे चापडगाव निरीक्षण गॅलरी आणि खाणगावथडी निसर्ग केंद्राला भेट देता येते.

-डॉ. सुरेखा म. मुळे.
संदर्भ: वन विभाग

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India