आधुनिक डवरणी यंत्राच्या माध्यमातून बेरोजगारीवर मात

हिंगोली जिल्ह्यात बहुतांश भागात शेतीची कामे आधुनिक पद्धतीच्या यंत्रांचा वापर करून केली जातात. त्यामध्ये नांगरणी, पेरणी, वखरणी ही कामे ट्रॅक्टरद्वारे केली जातात.

परंतु जिल्ह्याच्या सेनगांव तालुक्यातील केंद्रा बु. परिसरातील काही सुशिक्षित बेरोजगार तरूणांनी बाजारात आलेली आधुनिक डवरे खरेदी करून पिके बहरल्यानंतर अंतर्गत मशागत आधुनिक डवरणी यंत्रांच्या साहाय्याने करण्यात येत आहे. सदरील तरूण शेतकऱ्यांकडून प्रती एकरी 400 ते 500 रूपये घेऊन डवरणी करून देत आहेत. या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार तरूणांना ही रोजगार उपलब्ध झाला आहे. तसेच सदरील डवरणी यंत्रांच्या साहाय्याने चांगल्या पद्धतीने पिकांची अंतर्गत मशागत होत असल्याने केंद्रा बु. परिसरातील शेतकरी पिकांची अंतर्गत मशागत डवरणीने करून घेत आहेत.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद, पंचायत समिती अंतर्गत असलेल्या कृषी विभागाकडूनही शेतकऱ्यांना अनुदानावर डवरणी यंत्रे उपलब्ध करून दिली जातात. तथापि, केंद्रा बु. येथील चार तरूणांनी एकत्र येऊन हंगामाच्या काळात डवरणी करण्याचा व्यवसाय सुरू केलेला आहे. शेतकरी वर्गाकडून विशेषत: अल्प व लघु भूधारक ज्यांच्याकडे स्वत:ची बैलजोडी/ ट्रॅक्टर नाहीत अशा शेतकऱ्यांनी अंतर्गत मशागती करिता सदरील तरूणांना प्रती एकरी चारशे ते पाचशे रुपये देऊन डवरणी करून घेतली जात आहे. या सुशिक्षित बेरोजगार तरूणांचा कोणत्याही प्रकारचं काम करण्याचा उत्साह व त्यातून शेतकरी वर्गाने त्यांना दिलेले काम यामुळे या तरूणांना सद्यस्थितीत बेरोजगारीवर मात केलेली आहे.

या तरूण मुलांच्या जिद्दीमुळे केंद्रा बु. परिसरात आधुनिक डवरणी यंत्रांच्या साहाय्याने पिकांची अंतर्गत मशागत करण्याकडे शेतकऱ्यांचाही कल वाढला आहे.
-संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India