स्थापना :
शिक्षणामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होत असतो. शिक्षणात राष्ट्रीय एकात्मता, धर्म, सहिष्णुता, जीवनपद्धती, आर्थिक प्रगती या तत्वांचा समावेश होतो. शिक्षणामुळे सदगुण आणि सद्प्रवृत्तींचा विकास होतो. आदींचे महत्त्व लक्षात घेऊन शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक धोरण आखून दि. १ जुलै १९८९ रोजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना केली. आज या विद्यापीठाचा वेल आकाशाला गवसणी घालू लागला आहे. संपूर्ण महाराष्ट्र हे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. समाजातील प्रत्येक वंचित घटकांना शिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण असे कार्य हे विद्यापीठ गेल्या २५ वर्षांपासून यशस्वीपणे करीत आहे.
ज्याला जिथं जिथं शिक्षण हवं, ते शिक्षण त्याला देण्याचं कार्य, हे केवळ मुक्त शिक्षणाच्या चळवळीतून देता येते. विद्यार्थ्याला त्याच्या सोयीच्या दृष्टीकोनातून जमेल त्या वेळेत शिक्षण घेण्याची जी संधी उपलब्ध होते, त्याला मुक्त शिक्षण प्रणाली असे म्हणतात. शिक्षणाची गरज ओळखून विविध अभ्यासक्रम या विद्यापीठाने सुरु केले. विशेष करून व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांच्या गरजा ओळखून व्यावसायिक अभ्यासक्रम सुरु करण्यात आले.
विद्यापीठाचे शिक्षणक्रम आणि पाठ्यपुस्तकांच्या संहिता विकसित करणाऱ्या आठ विद्याशाखांची निर्मिती करण्यात आलेली आहे. या विद्याशाखांमार्फत विविध प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर असे १६६ शिक्षणक्रम यशस्वीरित्या चालविले जात आहेत. या शिक्षणक्रमांत विविधता आहे. नाशिक, पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, आणि अमरावती येथे विभागीय केंद्रे कार्यरत आहेत.
पाठ्यपुस्तकांची निर्मिती :
विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमांसाठी आवश्यक असणारी पाठ्यपुस्तके या विद्यापीठाने स्वतःच प्रकाशित केली आहेत. विशेष म्हणजे स्वयं-अध्ययनाचे उद्दिष्ट लक्षात घेऊन या पुस्तकातील आशयाची मांडणी आणि पुस्तकांची निर्मिती खास वेगळ्या प्रकारची आहे. आतापर्यंत २५०० हून अधिक पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहे.
अद्ययावत ग्रंथालय :
विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात अद्ययावत, सुसज्ज अशा ग्रंथालयाची उभारणी करण्यात आली आहे. ग्रंथालयात ४६,९७१ पुस्तके, ६९ जर्नल्स, ३,३६२ सीडीज, २९६ ऑडीओ कॅसेट्स, २७७ व्हीडीओ कॅसेट्स उपलब्ध असून सुमारे ६,६०० एफ्स्को डेटाबेस, डेलनेट डेटाबेस आणि भारत सरकारच्या विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे आणि गुजरातच्या इम्फ्लीबनेट केंद्राच्या सहाय्याने सुमारे ५००० इलेक्ट्रोनिकचा जनरल डेटाबेस तसेच यशवंतराव चव्हाण संग्रहाचेही जतन करण्यात आले आहे.
अभ्यासकेंद्र :
केवळ १५ अभ्यासकेंद्रे आणि ३,७५७ विद्यार्थी असलेल्या या विद्यापीठाने गेल्या २५ वर्षांत देदीप्यमान कामगिरी केली. २०१४ पर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ४२०० हून अधिक अभ्यासकेंद्रे, तर विद्यार्थी संख्या सहा लाखांहून अधिक झाली आहे. आजवर ४२ लाख ८७ हजार ३८० विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याची भूमिका या विद्यापीठाने यशस्वीपणे पेलली आहे.
सलग प्रथम स्थान :
देशभरातील १९८ विद्यापीठे आणि दूरशिक्षण संस्थांचे सर्वेक्षण ‘करिअर ३६०’ मासिकाच्या वतीने करण्यात आले. देशात राज्य पातळीवर काम करणाऱ्या सर्व मुक्त शिक्षण संस्थांमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने सन २०१० पासून २०१३ पर्यंत सलग तीन वर्षे प्रथम क्रमांकाचे स्थान टिकवून ठेवण्यात यश मिळवले आहे.
आंतरराष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार :
शिक्षणापासून वंचित असणाऱ्या समाज घटकांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी सुयोग्य असे शैक्षणिक तंत्रज्ञान केवळ मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याच्या हेतूने नव्हे तर, अत्याधुनिक शैक्षणिक तंत्रज्ञानाचा, अध्ययन पद्धतीत वापर करून टिकाऊ स्वरूपाचे शिक्षण देऊन शैक्षणिक क्रांती केली. याचमुळे ‘कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग’ या जागतिक संघटनेने ‘अवॉर्ड ऑफ एक्सलन्स’ हा सर्वोत्कृष्ट पुरस्कार या विद्यापीठाला दिला.
गौरवशाली विद्यार्थ्यांची परंपरा :
या विद्यापीठातून बी.ए. हा पदवी शिक्षणक्रम पूर्ण करून गतवर्षी अहमदनगर (शेवगाव) येथील ईश्वर कातकडे हे २०१०-११ मध्ये एमपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम, तर २०११-१२ मध्ये झालेल्या एमपीएससी परीक्षेत रमेश घोलप हे राज्यात प्रथम आल्याने विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. अलीकडेच मे २०१३ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत लातूरचा कौस्तूभ दिवेगावकर देशात पंधरावा व राज्यात प्रथम आला आहे. कौस्तुभनेही याच विद्यापीठातून बी.ए. पदवी शिक्षणक्रम पूर्ण केला आहे.
मुक्त शिक्षण प्रणालीद्वारे एमपीएससी/ यूपीएससी स्पर्धा परीक्षेत चांगले यश मिळविता येते हे सलग तीन वर्षांपासून दाखवून देत आहेत. तर मुक्त विद्यापीठातूनच पदवी शिक्षण घेऊन नाशिकच्या कविता ठोणगे हिनेही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर फौजदार झालेल्या पद्मशीला तिरपुडेच्या संघर्षाची कहाणी वंचित समाजातील महिलांना दिशा आणि बळ देणारी आहे.
मुक्त विद्यापीठाचीच पदवी घेत निर्मला खळे या शेतकऱ्याच्या मुलीने मुक्त शिक्षणाद्वारे थेट उंच अवकाशात भरारी घेऊन पायलट होण्याचे स्वप्न साध्य करण्याची किमया साधली आहे. अभ्यासातील सातत्य आणि कठोर परिश्रमाद्वारे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शेतमजुराचा मुलगा आज उपजिल्हाधिकारी झाला आहे. हवालदार ते उपजिल्हाधिकारी असा यशस्वी प्रवास ग्रामीण भागातील सिद्धार्थ वसंता भंडारे त्या तरुणाने केला आहे. अनुसूचित जातीतून राज्यात दुसरा येण्याचा मान मिळवून ग्रामीण भागातील तरुणांसमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे भंडारे यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून बी.ए. (पोलीस प्रशासन) पदवी संपादन करून स्वयं-अध्ययनावर भर देऊन यश मिळवले आहे.
सिद्धार्थच्या या यशामुळे मुक्त आणि दूरशिक्षण पद्धतीचं प्रभावीपण सिद्ध झालं आहे. याशिवाय राज्याच्या विविध भागातील असंख्य विद्यार्थ्यांनी एमपीएससी आणि यूपीएससी स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. तर पोलीस उपनिरीक्षकपदाच्या ऑगस्ट २०१३ मध्ये झालेल्या परीक्षेत आपण महाराष्ट्रातील मागासवर्गीय मुलींच्या गटात राज्यात प्रथम क्रमांकाचे यश संपादन केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हा उपनिबंधकांच्या परीक्षेत क्रांती काशिनाथ डोंबे ही मुलीतून राज्यात प्रथम आली. तर नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत जळगावच्या प्रवीण चव्हाण यांनीही यश मिळवले आहे.
कविता राऊतवर बालभारतीत धडा :
भारताची आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत उर्फ ‘सावरपाडा एक्सप्रेस’ हिच्या खडतर वाटचालीचा प्रवास मांडणारा प्रेरणादायी पाठ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या ‘यशवार्ता’ या मासिकाचे कार्यकारी संपादक संतोष साबळे यांनी लिहीला होता. या पाठाचा समावेश यंदा बालभारतीच्या इयत्ता पाचवीच्या नवीन अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. कविता राऊत ही सध्या मुक्त विद्यापीठातून पदवी शिक्षण घेत आहे.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात ‘बालभारती’ने सन् २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून या पाठाचा समावेश अभ्यासक्रमात केला आहे. मुक्त विद्यापीठाच्या ‘यशोगाथा’ या पुस्तकातून निवडण्यात आला. प्रतिकूलतेवर मात करीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धेवर मोहोर उमटविणाऱ्या कविता राऊत हिच्या संघर्षमय प्रवासावरील हा धडा आता राज्यातील सुमारे ५० लाख विद्यार्थ्यांना प्रेरणा देणार आहे. यामुळे मुक्त शिक्षणाचे अधिष्ठान अधिक मजबूत केले आहे.
दृक-श्राव्य केंद्र :
विद्यापीठाच्या शिक्षणक्रमांच्या छापील स्वयं अध्ययन साहित्याला पूरक असे दृक - श्राव्य साहित्य केंद्रामार्फत विकसित केले जाते. प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी अशा विविध स्तरांवरील ५५६ चित्रफिती आणि ६२६ ध्वनिफिती केंद्राने विकसित केल्या आहेत. ध्वनिफिती आणि चित्रफिती निर्माण करण्यासाठीची अत्याधुनिक उपकरणे केंद्राकडे उपलब्ध आहेत. केंद्रामार्फत दृक - श्राव्य कार्यक्रमांच्या निर्मिती बरोबर बहु माध्यमाच्या आधारे वितरणही केले जाते.
‘यशवाणी’ वेब रेडीओ आणि व्हीडीओ पोर्टल :
विद्यार्थांना त्यांच्या गरजेनुसार पूरक ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून दृक - श्राव्य केंद्राने निर्माण केलेले कार्यक्रम विद्यापीठाच्या अधिकृत http://ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर ठेवण्यात आले आहे. संकेतस्थळाच्या उजव्या बाजूला यशवाणी या लिंकवर क्लिक केल्यास श्राव्य कार्यक्रम विद्यार्थ्यांना ऐकता येतात. दृक-श्राव्य केंद्राने निर्मित केलेले २३३ व्हिडीओ कार्यक्रम संकेतस्थळावर ठेवलेले आहेत. त्यातील यादीत दर्शविल्याप्रमाणे कार्यक्रमाच्या नावावर क्लिक केल्यावर तो व्हिडीओ कार्यक्रम विद्यार्थ्यांना बघता येतो. या दोन्हीही सुविधांमार्फत विद्यार्थी हे दृक - श्राव्य कार्यक्रम कितीही वेळा ऐकू आणि पाहू शकतात. आजपर्यंत निरनिराळ्या शिक्षणक्रमांचे ६५० हून अधिक कार्यक्रमांची निर्मिती केली आहे. विद्यार्थ्यांना लवकरच त्या-त्या शिक्षणक्रमाच्या विषयानुसार लाभ घेता येणार आहे.
कृषिविज्ञान केंद्र :
कृषिविज्ञान प्रत्यक्ष शेतात नेऊन यशस्वी करण्यासाठी १९९४ मध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांनी या विद्यापीठात कृषिविज्ञान केंद्राची स्थापना केली. कष्टकरी, शेतकरी, ग्रामीण युवक-युवतींना कृषितंत्रज्ञानाचे अद्ययावत व्यावसायिक प्रशिक्षण देणे हे सर्वात महत्त्वाचे कार्य या केंद्रामार्फत केले जाते. शेतकऱ्यांच्या मूलभूत गरजांचा आणि संबंधित प्रदेशातील हवामान, पिके, साधनसामग्री या बाबींचा बारकाईने विचार करून प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
विद्यार्थ्यांबरोबर शेतकऱ्यांनाही शेतीच्या तंत्रज्ञानाची ओळख आणि माहिती व्हावी, शेती उद्योगाला चालना मिळावी म्हणून शेती पूरक व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात आले. कृषिविज्ञान केंद्राच्या परिसरात तसेच ओसाड जमिनीवर निरनिराळे उपक्रम राबवून नंदनवन फुलविण्यात आले आहे. कृषिविज्ञान केंद्रातून सेंद्रिय खताचा वापर केल्याने द्राक्षे, पेरू, आंबा, चिकू, नारळ यांची लागवड केली असून विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणक्रमांची प्रात्याक्षिके दाखविण्याबरोबरच चांगले उत्पादन मिळते.
अध्यासने :
विद्यापीठात कुसुमाग्रज अध्यासन, सावित्रीबाई फुले अध्यासन, वामनदादा कर्डक अध्यासन आणि महात्मा गांधी अध्यासन अशी चार अध्यासने सुरु करण्यात आली आहेत. या अध्यासनांतर्गत त्यांची साहित्य संपदा जतन करून ठेवण्यात आली आहे.
विविध पुरस्कार :
साहित्य, कला, संगीत, क्रीडा, नाट्य, समाजसेवा आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. विशाखा काव्य पुरस्कार, बाबूराव बागुल गौरव पुरस्कार, रुक्मिणी पुरस्कार, श्रमसेवा पुरस्कार, ज्ञानदीप पुरस्कार, डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार असे वेगवेगळे पुरस्कार देण्यात येतात.
ठळक वैशिष्ट्ये :
काम करता-करता शिक्षण, शिक्षणापासून वंचितांना पुन्हा नव्याने शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, प्रमाण शिक्षणक्रमापासून तर संशोधनापर्यंत सर्व शिक्षणक्रम येथे उपलब्ध, बारावीपर्यंत शिक्षण न घेऊ शकणाऱ्या विद्यार्थांनाही पूर्व परीक्षा देऊन पदवी आणि त्यापुढे संशोधानापर्यंत शिक्षण घेण्याची संधी, अध्ययनासाठी बहुमाध्यमांचा वापर, आवडी व सवडीनुसार स्वतःच्या गतीने शिक्षणक्रम पूर्ण करण्याची संधी, प्रमाणपत्र/ पदवी/ संशोधन पदव्या पदव्युत्तर शिक्षण इतर विद्यापीठांशी समकक्ष, अद्ययावत मूल्यमापन पद्धतीद्वारे परीक्षा आयोजन, आकाशवाणी, दूरदर्शन, दृक-श्राव्य चित्रफितींद्वारे घरबसल्या मार्गदर्शन, इस्रोच्या सहकार्याने महाराष्ट्रातील ५५ ठिकाणी व्हर्चुअल क्लासरूमद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, अध्ययनाच्या संदर्भात लवचीक धोरण, पारंपरिक महाविद्यालयात शिकत असताना मुक्त विद्यापीठातील शिक्षणक्रम शिकण्याची संधी.
कौशल्याधिष्ठीत शिक्षण :
विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी विद्यापीठातील मानव्यविद्या व सामाजिकशास्रे, वाणिज्य व व्यवस्थापन, शिक्षणशास्र, विज्ञान व तंत्रज्ञान, संगणकशास्र, निरंतर शिक्षण, आरोग्य विज्ञान, कृषिविज्ञान या विद्याशाखा आणि शैक्षणिक सेवा विभागाच्या अनेक शिक्षणक्रमांचे पर्याय उपलब्ध आहेत. या विद्याशाखांच्या पदवी, पदविका आणि पदव्युत्तर शिक्षणक्रमांखेरीज युवावर्गात अतिशय लोकप्रिय झालेल्या मीडिया क्षेत्रात जाण्यासाठी पत्रकारिता पदवी, पदविका शिक्षणक्रम, बी.ए. (मराठी, हिंदी आणि उर्दू) बी.कॉम. (मराठी आणि इंग्रजी), मानवी हक्क, ग्रंथालय व्यवस्थापन, गांधी विचार दर्शन, ग्राहक संरक्षण, सहकार व्यवस्थापन, हॉटेल आणि पर्यटन व्यवस्थापन, इन्शुरन्स, बँकिंग, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, बिझनेस मॅनेजमेंट, माहिती तंत्रज्ञान, कॉम्प्यूटर हार्डवेअर -सॉफ्टवेअर, मोबाइल दुरुस्ती, शिवणकाम, ब्युटीपार्लर व्यवस्थापन, प्लंबर, फिटर, वायरमन, वाहन दुरुस्ती, औद्योगिक सुरक्षा, शालेय माहिती तंत्रज्ञान, फॅशन डिझायनिंग, इंटेरिअर डेकोरेशन, सायबर सिक्युरिटी, ऑटोमोबाइल, टीव्ही-व्हीसीडी मॅकेनिक, फायर अॅड सेफ्टी इंजीनिअरींग मॅनेजमेंट, अन्नप्रक्रिया आणि संवर्धन, कृषिशास्त्र, शेतीशास्त्र असे वेगवेगळे कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम शिकण्याची संधी सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाली आहे.
अभ्यासक्रम :
रिक्षा, टॅक्सीचालक हे नेहमीच दुर्लक्षित राहिलेले असतात. त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणून उच्च शिक्षण देऊन समाजात सन्मान प्राप्त करून देण्यासाठी बी.ए. (रोड ट्रान्सपोर्टेशन), उद्योग जगताच्या आधुनिक गरजांसाठी सायबर सिक्युरिटी, सप्लाय चेन मॅनेजमेंट, प्रॉडक्शन आणि ऑपरेशन मॅनेजमेंट, बी.कॉम. फायनान्स आणि बँकिंग, लष्करी जवानांसाठी पूर्वतयारी आणि बी.ए., यंत्रमाग कामगारांच्या कौशल्याला समाजमान्यता देण्यासाठी बी.ए. इन टेक्सटाईल, घरोघरी गॅस सिलिंडर वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बी.ए. ग्राहकसेवा, महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी तसेच अधिकाऱ्यांसाठी बी.ए. (पोलीस प्रशासन), नेव्हल डॉकयार्ड कर्मचाऱ्यांसाठी अभियांत्रिकी क्षेत्रातील पदविका, सलून व्यवसाय पदविका, बी.एस्सी. (इंडस्ट्रीयल ड्रग्ज सायन्स) आणि एम.पी.एस.सी./यू.पी.एस.सी.च्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याच्या दृष्टीने बी.ए. (पब्लिक सर्व्हिसेस) व एम.ए. (पब्लिक सर्व्हिसेस) हे शिक्षणक्रम सुरू करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे काही शिक्षणक्रम मराठीबरोबरच हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांतही उपलब्ध आहेत. औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बी.एस्सी. (इंडस्ट्रीयल सायन्स) तसेच बी.एस्सी. (ड्रग सायन्स) शिक्षणक्रम ल्युपिन फार्मास्युटीकलच्या सहकार्याने सुरू आहे. तसेच (एम.कॉम., एम.एस्सी.) विषय संप्रेषण, बी.एड., एम.एड., बी.ए. जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या पदवी / पदविका असे अनेक शिक्षणक्रम उपलब्ध आहेत. यापैकी संगणकाचे बहुतेक शिक्षणक्रम हे ऑनलाइन आहेत. याशिवाय सेवांतर्गत शिक्षकांसाठी बी. एड., एम.एड., शालेय व्यवस्थापन पदविका, एम.ए., बी.टेक. (मरीन इंजिनिअरिंग), एम.ए. (लोकप्रशासन) इ. चा समावेश आहे. या शैक्षणिक वर्षापासून निरनिराळ्या विद्याशाखांतर्गत २१ नवीन शिक्षणक्रम सुरु करण्यात आलेत. त्यात बीबीए (बीपीएम), बी.एस्सी. (सीएसए), डिप्लोमा इन बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट, अॅडव्हान्स डिप्लोमा इन बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट, इंडस्ट्रीयल सायन्स, इंडस्ट्रीयल कॉम्प्यूटर सिस्टीम अॅडमिनिस्ट्रेशन, बीबीए (बिझिनेस प्रोसेस मॅनेजमेंट), चर्मकला कौशल्ये विकसन, मूल्य शिक्षण, पदव्युत्तर पदविका डिप्लोमा इन इ-एज्युकेशन इन डिजिटल सोसायटी, बी.एस्सी. (जनरल), बी.एस्सी. (नॉटिकल सायन्स), एम. एस्सी. मॅथेमॅटिक्स आणि एम. एस्सी. (एनव्हायरमेंटल सायन्स), अॅक्युप्रेशर (प्रमाणपत्र), डिप्लोमा इन अॅक्युप्रेशर आणि हॉस्पिटल असिस्टट तसेच बी.एस्सी. (ऑटोमोबाईलटेक्निक्स), बी.एस्सी. (कन्स्ट्रक्शन प्रॅक्टीसेस), बी.एफ.ए. (चित्रकला/ मूर्तीकला/सिरामिक), एनर्जी ऑडीट अॅड मॅनेजमेंट, एमबीए (फॅशन बिझिनेस) या शिक्षणक्रमांचा समावेश आहे.
थोडक्यात... विद्यापीठाचे शिक्षणक्रम पूर्ण केल्यानंतर रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात.
वैशिष्ट्ये :
या विद्यापीठाने रोजगाराभिमुख शिक्षणक्रमांवर अधिक भर दिलेला आहे. शिक्षणक्रम शुल्कात अध्ययन साहित्य, तज्ज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन, वेब रेडीओ, दृक-श्राव्य माध्यम आणि मोबाईलद्वारे मार्गदर्शन, पुढील शिक्षणाच्या (व्हर्टिकल मोबिलिटी) उपलब्ध, कमवा व शिका योजनेचा लाभ, एकावेळी अधिक शिक्षणक्रमांना प्रवेश घेण्याची संधी, दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पूर्वतयारी शिक्षणक्रम पूर्ण केल्यास याच वर्षी प्रथम वर्ष पदवी शिक्षणक्रमास प्रवेश घेता येईल. अशा विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ष उत्तीर्ण केल्यास त्यांना बारावी शैक्षणिक अर्हतेचे अर्थात पोलीस शिपाई भरती वा शासकीय किंवा खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांत किंवा बढतीत संधी अथवा अन्य लाभ मिळू शकतात.
कमवा व शिका योजनेंतर्गत शिक्षणक्रम :
औद्योगिक क्षेत्रातील विविध संस्थांच्या सहकार्याने शिका व कमवा योजनेंतर्गत विद्यावेतन आणि नोकरीची संधी असलेले शिक्षणक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यात बी.एस्सी. (इंडस्ट्रीयल ड्रग सायन्स), डिप्लोमा इन इंडस्ट्रीयल ड्रग सायन्स, हॉस्पिटल सहायक, डिप्लोमा इन फार्मा मॅन्युफॅक्चरिंग अँड पॅकेजिंग, अभियांत्रिकी पदविका, बीबीए (बीपीएम), बी.एस्सी. (सीएसए) आणि डिप्लोमा इन बिझिनेस प्रोसेस मॅनेजमेंट या शिक्षणक्रमांचा समावेश आहे.
सोपी शिक्षण पद्धती :
मुक्त विद्यापीठातील शिक्षणपद्धती ही दूरस्थ शिक्षणपद्धती आहे. येथे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी स्थळ, काळ, वेळेचे बंधन नसते. ते आपल्या गरजेनुसार घरी राहून शिक्षण घेऊ शकतात. यासाठी या विद्यार्थांना स्वयं - अध्ययन पद्धतीचा वापर करावा लागतो. या पद्धतीत अध्ययनासाठी व्हिडीओ सीडी, संगणक, इंटरनेट, वेबसाईट, व्हीएलसी यासारखी माध्यमे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. प्रत्येक शिक्षणक्रमानुसार स्वयं - अध्ययन साहित्यही तयार करण्यात येते. ते प्रत्येक विद्यार्थाला देण्यात येते.
शिक्षणक्रमांचे विकसन :
समाजाच्या गरजा ओळखून त्याप्रमाणे शिक्षणक्रमाचे विकसन करण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने आठ विद्याशाखा सुरु केल्या आहेत. त्यात मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे, वाणिज्य व व्यवस्थापन, शिक्षणशास्त्र, विज्ञान व तंत्रज्ञान, संगणकशास्त्र, निरंतर शिक्षण, कृषिविज्ञान आणि आरोग्य अशा आठ विद्याशाखांचा समावेश आहे. तसेच शैक्षणिक सेवा विभाग, सहयोग व विशेष उपक्रम केंद्र आणि विविध शिक्षणक्रमांच्या ध्वनिचित्रफितीची निर्मिती करण्यासाठी दृक-श्राव्य केंद्रही कार्यरत आहे.
प्रगतीचे पाऊल :
देशात एकूण १४ मुक्त विद्यापीठे आहेत. एक राष्ट्रीय स्तरावर आणि १३ राज्यस्तरावर असलेल्या मुक्त विद्यापीठांपैकी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ देशातले राज्य स्तरावरील चौथे मुक्त विद्यापीठ आहे. आज सर्व क्षेत्रांत प्रगती साधून बदल करून शिक्षणक्रम, अभ्यासकेंद्रे, मार्गदर्शक प्राध्यापक, विद्यार्थी या सर्वांच्या सहकार्याने विद्यापीठाने आपले अनोखे स्थान मिळविले आहे. अभ्यासकेंद्रे, पाठ्यपुस्तकांचा दर्जा, मूल्यमापन, गुणवत्ता, ई-लर्निंगची उपलब्धता, उत्तीर्ण होण्याचे प्रमाण, व्यवहारातील पारदर्शकता, समाजातील विशेष वंचित घटकांसाठी विशेष शिक्षणक्रम आणि शिक्षण प्रक्रियेला साहाय्यभूत अशी कार्यक्षम व्यवस्था उभारली आहे.
ग्लोबली लिंक होण्यासाठी विद्यापीठाने जागतिक मुक्त विद्यापीठाची गंगोत्री असलेल्या युनायटेड किंगडम येथील मुक्त विद्यापीठाशी तसेच कॅनडा व श्रीलंका येथील विद्यापीठांशी संबंध दृढ केले आहेत. मलेशियातील अनिवासी भारतीयांनाही उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी एडसीलच्या सहकार्याने अलीकडेच शैक्षणिक करार केला आहे. केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा वेगळा ठसा उमटविण्याचा कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांचा सततचा ध्यास विद्यापीठाला निश्चितच प्रेरणादायी ठरेल.
-संतोष साबळे
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ
0 comments:
Post a Comment