राजापूर आणि संगमेश्वर तालुक्यात थंड व गरम पाण्याचे झरे

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर आणि संगमेश्वर तालुक्यात पर्यटकांना गरम आणि थंड पाण्याचे झरे, कुंडे आकर्षित करतात. चला तर मग जाणून घेऊया... राजापूर आणि संगमेश्वर तालुक्यातील पर्यटनाविषयी.

राजापूर तालुका
राजापूर तालुका धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. तालुक्याच्या विविध भागात प्राचीन आणि सुंदर मंदिरांना भेट देता येते. काजू प्रक्रिया उद्योगांना भेट देऊन ताजे काजूगर परतीच्या प्रवासात खरेदी करता येते. राजापूर तालुक्यात समुद्र किनारची सफरही तेवढीच आनंददायी असते. गड-किल्ल्यावरील भटकंतीचा आनंदही या सफरीत घेता येतो.

कनकादित्य मंदिर, कशेळी:
पावसपासून 18 किलोमीटर अंतरावर कशेळी गावात कनकादित्याचे प्राचीन मंदिर आहे. इथली सूर्यनारायणाची मुर्ती 900 वर्षांपूर्वीची आहे. मंदिर प्राचीन असल्याचा पुरावा मंदिरातील ताम्रपटावरून मिळतो. ताम्रपटावर शिलाहार राजांची वंशावळ दिलेली आहे. मंदिराचा परिसर शांत आणि रम्य आहे. जांभ्या दगडात सजलेला परिसर आणि परिसरातील इतर देवदेवतांची मंदिरे तेवढीच सुंदर आहेत. मंदिरात प्रशस्त सभामंडप आहे. या मंदिरातील मुर्ती सौराष्ट्रमधून समुद्रमार्गे आल्याचे सांगितले जाते. मंदिरात रथसप्तमीला मोठा उत्सव असतो. पावसपासून 13 किलोमीटर अंतरावर उजव्या बाजूस मंदिराकडे जाणारा रस्ता आहे.

महाकाली मंदिर, आडीवरे:कशेळीच्या कनकादित्य मंदिरापासून तीन किलोमीटर आणि पावसपासून 21 किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या डावीकडे आडीवरे गावी महाकालीचे जागृत दैवत आहे. येथे महाकालीसोबत महालक्ष्मी आणि महासरस्वतीची मंदिरेदेखील आहेत. हे पवित्र स्थान आद्य शंकराचार्यांनी 1324 मध्ये स्थापन केले अशी स्थानिकांची श्रद्धा आहे. नवरात्रात येथे मोठा उत्सव असतो.

वेत्ते समुद्रकिनारा:आडीवरे गावाच्या अलिकडे उजवीकडून जाणाऱ्या रस्त्याने गेल्यास चार किलोमीटर अंतरावर दाट झाडींमध्ये असलेला समुद्र किनारा दिसतो. किनाऱ्यावरून सुर्यास्त न्याहाळता येतो. जिल्ह्यातील इतर किनाऱ्यांप्रमाणे हा किनारा वाळूचा नसून खडकाळ आहे. त्यामुळे समुद्रीजीव अभ्यासकांसाठी येथील भटकंती विशेष असते. तसेच खडकाळ किनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर लाटांचे सौंदर्य खुलून दिसते.

आर्यदुर्गा मंदिर, देवीहसोळ:आडीवरे येथून दोन किलोमीटर अंतरावर धारतळे फाटा आहे. येथून सहा किलोमीटर अंतरावर आर्यादुर्गा मंदिर आहे. हे मंदिर पांडवकालीन आहे. कर्नाटकातील अंकोला येथील आर्यादुर्गा देवी देवीहसोळ गावातील देसाई यांच्या प्रार्थनेनुसार ज्या स्थानापर्यंत आली त्या स्थानावर हे मंदिर उभारण्यात आले, अशी आख्यायिका आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला जाकादेवीचे मंदिर आहे. राजापूरपासून उत्तरेला 11 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. पावसपासून हे अंतर 39 किलोमीटर आहे. मार्गशिर्ष महिन्यातील कृष्णाष्टमी आणि नवमीला दीड दिवसांची जत्रा या परिसरात भरते.

यशवंतगड:यशवंतगड किल्ला जैतापूर खाडीच्या काठी उभारलेला आहे. किल्ल्याच्या उत्तरेस अर्धा किलोमीटर अंतरावर नाटे गाव आहे. किल्ल्यास दोन दिशेने खाडीच्या पाण्याचा विळखा असतो. किल्ल्याचा परिसर सात एकरचा आहे. किल्ल्याची उभारणी 16 व्या शतकात विजापूर शासकांच्या कारकिर्दीत झाली आहे. किल्ल्याला भेट दिल्यावर रस्त्याच्या बाजूने असलेली किल्ल्याची मजबूत तटबंदी आणि काही अवशेष पाहता येतात. राजापूर-नाटे 35 किलोमीटर अंतर आहे. तर आडीवरेपासून पाच किलोमीटर अंतरावर नाटे फाटा आहे. येथून आठ किलोमीटर अंतरावर किल्ला आहे.

मुसाकाजी बंदर:यशवंतगडपासून तीन किलोमीटर अंतरावर आंबोळकडे जाणाऱ्या रस्त्यावर डावीकडे मुसाकाजी बंदर आहे. बंदर लहान असले तरी समुद्राचे नितळ पाणी मन प्रफुल्लित करते. बंदरावर बोटींसाठी जेट्टी बांधण्यात आली आहे. निवांतपणे समुद्र किनारची सफर करण्यासाठी हे योग्य स्थान आहे.

आंबोळगड:यशवंतगडहून पुढे गेल्यावर पाच किलोमीटर अंतरावर आंबोळगड आहे. गावात प्रवेश करताना डावीकडे समुद्र किनारा दृष्टीपथास पडतो. गावात शिरल्यावर एस.टी.स्टँडजवळ हा किल्ला आहे. किल्ल्याच्या तटबंदीच्या अवशेषावरून या किल्ल्याची ओळख होते. किल्ला पाच हजार 600 चौ.मीटर क्षेत्रात उभारला आहे. तटबंदीच्या काळ्या बेसाल्ट खडकावरून हा किल्ला शिलाहार काळात अकराव्या शतकात बांधला गेला असावा, अशी माहिती मिळते. किल्ल्यावरील विस्तारलेला वटवृक्ष पर्यटकांसाठी आकर्षण आहे.

श्री गगनगिरी महाराज आश्रम, आंबोळगड:आंबोळगड गावातल्या रस्त्याने पुढे गेल्यावर श्री गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे. आश्रमात सुंदर दत्त मंदिर आहे. महाराजांनी तप केलेल्या जागेचा परिसर शांत जरी असला तरी या भागात समुद्राच्या लाटांचे रौद्ररुप अनुभवायला मिळते. गगनगिरी महाराज ज्या गुहेत तपश्चर्या करीत त्या गुहेला भेट देता येते. या आश्रमाला भेट दिल्यावर निसर्गाच्या सहवासाबरोबर तपोभूमीला भेट दिल्याचा आनंददेखील मिळतो.

अंजनेश्वर, मीठगवाणे:आंबोळगडहून जैतापूरमार्गे गेल्यास 15 किलोमीटर अंतरावर मीठगवाणे गाव आहे. राजापूरपासून हे अंतर साधारण 30 किलोमीटर आहे. गावाचा रस्ता श्री अंजनेश्वर मंदिरापर्यंत जातो. मंदिरातील विहिरीचे पाणी गोड आणि पाचक आहे. या पाण्याने त्वचारोग बरे होतात अशी भक्तांची भावना आहे. मंदिर सातशे वर्षांपूर्वीचे आहे. पूर्वी या परिसरात असलेल्या 'आंजणी' वृक्षाच्या रानात पिंड सापडल्याने त्यास अंजनेश्वर हे नाव देण्यात आले. मंदिर परिसरात भक्तांसाठी सुविधा आहे. (संपर्क-02353-224269)

गरम पाण्याचे झरे, उन्हाळे:मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताना राजापूरपासून दोन किलोमीटर अंतरावर (अंजनेश्वरहून 30 किलोमीटर अंतरावर) रेल्वेस्टेशनकडे जाणारा मार्ग आहे. येथून तीन किलोमीटर अंतरावर उन्हाळे गाव आहे. गावात शिरण्यापूर्वी शिवमंदिर असून या मंदिर परिसरातील भिंतीपलीकडून गंधकयुक्त गरम पाण्याचे झरे वाहतात. परिसरात असलेल्या गोमुखातून 24 तास धारा वाहते. जमिनीतून येणारे उकळते पाणी त्वचारोगनाशक असल्याची येथे येणाऱ्या भक्तांची भावना आहे.

राजापूरची गंगा :उन्हाळे गावातूनच गंगातीर्थकडे जाण्यासाठी रस्ता आहे. वाहनाने जायचे असल्यास दीड किलोमीटर पुढे जावे लागते. गावातील शाळेच्या पटांगणालगत असलेल्या मोकळ्या जागेत 14 कुंडे आहेत. ही कुंडे काळ्या पाषाणाने बनलेली आहेत. दर तीन वर्षांनी याठिकाणी गंगा प्रकट होते आणि ही कुंडे पाण्याने भरून वाहू लागतात. वटवृक्षाखाली असलेल्या कुंडातून प्रथम गंगा प्रकट होते. गंगा प्रकट झाल्यानंतर दोन महिने हा प्रवाह सुरू राहतो. या काळात या स्थानाला तीर्थयात्रेचे स्वरुप प्राप्त होते. गंगा प्रकट होणे ही नैसर्गिक घटना मानली जाते. अभ्यासकांसाठी ही घटना मोठे आकर्षण आहे.

श्री धुतपापेश्वर मंदिर:रत्नागिरीहून आडिवरेमार्गे राजापूरकडे जाताना अर्जुना नदीच्या पुलाखालून धूतपापेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता आहे. राजापूर जवळील धोपेश्वर गावी धुतपापेश्ववराचे पुरातन मंदिर आहे. मंदिराच्या जवळच असलेल्या धबधब्याचे दृश्य पावसाळ्यात अधिकच मनोहारी दिसते. हे शंकराचे मंदिर असून मंदिरात मोठी पिंड आहे. मंदिराचा परिसर अत्यंत रम्य आहे. मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव होतो. (पर्यटकांच्या सुविधेसाठी दूरध्वनी-02353-222950)
संगमेश्वर तालुका
संगमेश्वर तालुका ऐतिहासिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. शिवकालीन इतिहासाची साक्ष देणारे किल्ले, प्राचीन मंदिरे आणि गरम पाण्याचे झरे पर्यटकांना आकर्षित करतात. दाट झाडी आणि वळणाचे रस्ते कोकणातील भटकंतीचा मनमुराद आनंद देतात. मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताना संगमेश्वरी मोदकांची चव घ्यायलादेखील पर्यटक विसरत नाहीत. शास्त्री नदीतटाचा हिरवागार परिसर प्रवासाचा आनंद वाढविणारा आहे. संगमेश्वरला छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली नौका 'संगमेश्वरी' तयार केली, असे इथे सांगितले जाते. महामार्गालगतच नदीच्या तटावर मोठ्या झोपडीवजा जागेत नौका तयार करण्याचे काम सुरु असते. नौकाबांधणीचे काम पाहणे हा महानगरातील पर्यटकांसाठी नवा अनुभव असतो.

श्री क्षेत्र मार्लेश्वर:संगमेश्वर तालुक्यात देवरुखपासून 18 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या निसर्गरम्य दऱ्याखोऱ्यात वसलेले श्री क्षेत्र मार्लेश्वर हे श्री शंकराचे देवस्थान म्हणून ओळखले जाते. डोंगराला वळसा घालून उंच कड्यावर गेल्यावर एका गुहेत हे देवस्थान आहे. मकर संक्रांतीला येथे मोठी यात्रा भरते. या डोंगरावर एक मोठा धबधबा असून त्याखाली स्नान करण्यासाठी भाविकांची खूप गर्दी असते. पावसाळ्यात डोंगरावरून कोसळणाऱ्या धबधब्यांची शोभा अवर्णनीय असते. हिरवागार परिसर आणि विविध पक्ष्यांच्या सहवासात पायवाटेवरून चालताना थकवा जाणवत नाही. मकर संक्रांतीच्या दिवशी येथे मोठा उत्सव असतो. रत्नागिरी ते मार्लेश्वर 63 किलोमीटर अंतर आहे. संगमेश्वरहून देवरुखमार्गे देखील मार्लेश्वरला जाता येते.

मैमतगड:रत्नागिरीपासून 65 किलोमीटर अंतरावर आणि देवरुखपासून 20 किलोमीटर अंतरावर पूर्वेस हा किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी निगुडवाडी गाव आहे. किल्ल्यावर चढण्यासाठी कच्च्या वाटेने पायथ्यापर्यंत वाहन जाते. त्यानंतर दोन ते तीन किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागतो. किल्ला 12 एकर परिसरात पसरलेला आहे. सरळसोट पर्वतकड्यामुळे तीन बाजूंनी किल्ल्याला नैसर्गिक तटबंदी लाभली असून एका बाजूने बांधीव तटबंदी आहे. किल्ल्याला एकूण आठ बुरुज आहे. किल्ल्यात एकूण तीन तोफा आहेत.

टिकलेश्वर मंदिर, देवरुख:देवरुख हे संगमेश्वर तालुक्यातील मुख्यालयाचे ठिकाण आहे. या परिसरातील तळवडे गावाजवळील उंच डोंगरावर असलेले टिकलेश्वराचे मंदिर मुख्य रस्त्यावरूनही दिसते. मंदिर परिसरात कुंडे आहेत. कुंडांमधील गार पाणी प्रवासाचा थकवा दूर करते. परिसरातील भव्य विस्तार असलेले औंदुंबराचे झाड पर्यटकांसाठी विशेष आकर्षण आहे. बाजूला असलेल्या कुंडी घाटातील सौंदर्य पर्यटकांना भुरळ पाडणारे आहे. देवरुखपासून तळवडे गाव चार किलोमीटर अंतरावर आहे. गावापासून मंदिराचे अंतर दोन किलोमीटर आहे. गिर्यारोहणाचा आनंद घेण्यासाठी डोंगरावर जावे. अत्यंत अरुंद पाऊलवाटेने डोंगर चढावा लागतो.

प्रचितगड:या किल्ल्यास उचितगड किंवा श्रृंगारपूरचा किल्ला म्हणूनही ओळखले जाते. किल्ला पाच एकर जागेत उभारण्यात आला आहे. श्रृंगारपूर हे छत्रपती संभाजी महाराजांचे सासर होते. या गावापासून आठ किलोमीटर अंतरावर पूर्वेस सह्यद्रीच्या पर्वतरांगेत हा किल्ला आहे. किल्ल्यात बांधीव तळी, देवी भवानीचे मंदिर, किल्लेदाराचे निवासस्थान आणि कडेलोटाचे ठिकाण आहे. किल्ल्यावर चार तोफा आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी श्रृंगारपूर जिंकून प्रचितगडाची मजबूत बांधणी केली. किल्ला चढण्यासाठी अत्यंत अरुंद वाट असल्याने स्थानिकांच्या मदतीनेच गिर्यारोहणाची आवड असणाऱ्यांनीच किल्ल्यावर गेलेले बरे. इतर पर्यटकांसाठी परिसरातील सह्याद्रीचे सौंदर्य भुरळ पाडणारे आहे. संगमेश्वर-श्रृंगारपूर हे अंतर 12 किलोमीटर आहे.

धोदवणे धबधबा:प्रचितगड किल्ल्याच्या परिसरातील पाज नावाच्या भागात थंडगार पाण्याचे झरे आहेत. उन्हाळी हंगामातही येथे पाणी असल्याने जंगल सफरीचा आनंद घेता येतो. याच भागात 200 फुटावरून कोसळणारा धोदवणे हा धबधबा आहे. हे शास्त्री नदीचे उगमस्थान आहे. संगमेश्वरपासून 15 किलोमीटर अंतरावर नायरी तिवरे रस्त्यावर हा धबधबा आहे. याच परिसरात असलेल्या कुंडी घाटाजवळ गोठणे येथे सह्याद्रीच्या पर्वतराजीत असलेले दाट जंगल आहे. गवे, रानकोंबडी, हरणे आदी वन्य प्राण्यांचे दर्शन येथून घडते. याठिकाणी नैसर्गिक मध मिळतो. ट्रेकिंगची आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी हे भटकंतीचे उत्तम ठिकाण आहे.

कर्णेश्वर मंदिर:संगमेश्वर येथे अलखनंदा, वरूणा आणि शास्त्री या नद्यांचा संगम होतो. मुंबई-गोवा महामार्गावरून रत्नागिरीकडे येताना शास्त्री नदीचा पूल ओलांडल्यावर डावीकडून या संगमस्थळाकडे जाणारा रस्ता आहे. हा रस्ता कर्णेश्वर मंदिराजवळ पोहोचतो. हे मंदिर प्राचीन हेमाडपंथी प्रकारातील आहे. मंदिराचा परिसर अत्यंत शांत आणि रम्य आहे. पांडवांनी अज्ञातवासाच्या काळात आपला सहावा भाऊ कर्ण याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले, अशी कथा येथे प्रचलित आहे. मंदिर अप्रतिम शिल्पकलेचा नमुना आहे. महाद्वाराजवळ अष्टभैरव द्वारपाल, नंदीमंडप, त्रिपूरी खांब, मुख्य मंडप, विविध मुर्त्या, भिंतीवर कोरलेल्या शंकर, नृत्यांगना, किन्नर, यक्ष-यक्षिणी, देव, दानव आदी प्रतिमा प्राचीन शिल्पवैभव आपल्या समोर ठेवतात. मंदिराच्या पलिकडच्या पाऊलवाटेने संगमापर्यंत जाता येते. कसबा संगमेश्वर नावाने ओळखल्या जाणाऱ्या या परिसरातील विविध मंदिरांमध्ये हेमाडपंथी शिल्पांची अप्रतिम कलाकुसर पाहायला मिळते.

छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक:संगमेश्वरपासून जवळच कसबा या गावात सरदेसाई यांचा वाडा आहे. या वाड्यात छत्रपती संभाजीराजे असताना त्यांना औरंगजेबाने अटक केली. त्यांचा अतोनात छळ करून तुळापूर येथे त्यांचा क्रूर वध केला. संभाजी महाराजांची स्मृती जपण्यासाठी गावात त्यांचा अर्धपुतळा आणि स्तंभ स्मारकरुपाने उभारण्यात आला आहे.

गरम पाण्याची कुंडे:मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या आरवली, गोळवली टप्पा, राजवाडी या गावात गरम पाण्याची कुंडे आहेत. आरवली आणि राजवाडी गावातील कुंडात स्नान करण्याची सुविधा उपलब्ध आहे. महामार्गावरील प्रवासादरम्यान काही क्षण विश्रांती करताना या कुंडाना भेट देता येते. राजावाडी येथे हैद्राबादच्या इंडियन जिओलॉजीकल रिसर्च इन्स्टिट्यूटतर्फे संशोधन करण्यात येत आहे.

शिवमंदिर, बुरबांड:आरवली पासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या बुरबांड गावातील शिवमंदिरात अप्रतिम शिल्पकला पाहायला मिळते. या परिसरात प्राचीन काळात 'आमणा' वृक्ष मोठ्या संख्येने होते. त्यामुळे या मंदिराला 'आमनायेश्वर' या नावाने ओळखले जाते. मंदिर परिसरात पाच तीर्थ आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यातून सारंगीसारखा नाद ऐकू येतो.

भवानगड:रत्नागिरीपासून 56 किलोमीटर आणि संगमेश्वरपासून 15 किलोमीटर पूर्वेस भवानगड आहे. राजवाडी ग्रामपंचायतीत समाविष्ट असलेली शिर्केवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी गोळवली-राजवाडीमार्गे रस्ता आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील तुरळमार्गेदेखील दुसरा रस्ता आहे. हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. किल्ल्याची लांबी 158 मीटर आणिा रुंदी 32 मीटर आहे. किल्ल्याच्या तटबंदीचे भग्न अवशेष उरले असून किल्ल्यावर भवानीदेवीचे मंदिर आहे. हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याची डागडुजी करताना बांधले आहे. दरवर्षी पौष महिन्यात देवीचा उत्सव साजरा करण्यात येतो.

संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India