रानवाटा...

जाणून घेऊया महाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने

सुट्टी लागली की आपण सहसा राज्याबाहेरील पर्यटनस्थळे पाहण्याला प्राधान्य देतो... पण वनांनी समृद्ध अशा महाराष्ट्रात अनेक अशी अभयारण्ये आहेत ज्यांना भेट दिल्याशिवाय आपली भ्रमंती पूर्ण होऊ शकत नाही. या रानवाटांवरून जाताना केवळ आपल्या समृद्ध वनांचीच नाही तर या वनांमध्ये वास करणाऱ्या विविध प्राणी, पशु-पक्षी आणि फुलांचीही माहिती मिळते. ही निसर्गसंपदा आपल्याला सुखावून टाकते. आपल्या अशांत मनाला शांत करते. इथे रंगीबेरंगी फुलपाखरं आहेत, इथं आहे वनांचा राजा सिंह, इथे आहेत वाघोबा, इथे आहे गवा आणि हरणे, इथे आहेत चिवचिवाट करणारे असंख्य प्रकारचे पक्षी... वाळलेल्या गवतावरून सरपटणारे प्राणीही आपले लक्ष वेधून घेतात. इथे खळखळाट करणाऱ्या नद्या आहेत, इथे आहे कमालीची शांतता आहे.. तुमच्या श्वासांचीही लय जाणवून देणारी.

कधी अचानक दचकायला लावणारी तर कधी अचानक लक्ष वेधून घेणारी चित्रविचित्र हालचाल ही येथे आहे... शोभेच्या झाडांबरोबर औषधी वनस्पतींचा एक सुंदर खजिना इथे आहे. आकाशाला गवसणी घालणारे वृक्ष आणि दाटीवाटीने उभे राहिलेले बांबू... सगळंच कसं मनोहारी आहे...

महाराष्ट्र... एक असं राज्य जिथे गडकिल्ल्यांचा एक वैभवशाली इतिहास आहे. जिथे ७२० कि.मी लांबींचा सुंदर समुद्र किनारा आहे... जिथे ज्योतिर्लिंग आणि लोकांची असंख्य श्रद्धास्थानं असलेली शक्तीपीठं आहेत, इथे आहे सुंदर वनांचा खजिना... त्यामुळे पर्यटनाच्यादृष्टीने महाराष्ट्रात काय पाहिजे असं जर कुणी विचारलं तर “जो जे वांछिल तो ते लाभो” असं भरभरून देणाऱ्या साऱ्याच गोष्टी या महाराष्ट्रात आहेत. इथे साहसी खेळ प्रकारासाठी असंख्य ठिकाणं आहेत... गावरान मेवा उपलब्ध करून देणाऱ्या आणि आपली रसना तृप्त करणारे असंख्य खाद्य प्रकार आपल्यासाठी उपलब्ध आहेत... अशा या सर्वगुण संपन्नतेने समृद्ध असलेल्या महाराष्ट्रातील वनांची आणि अभयारण्यांची माहिती या लेख मालिकेतून देण्याचा प्रयत्न आहे. ही मेजवानी आहे खास आपल्या सर्वांसाठी... चला तर मग जाणून घेऊया राज्यातील अभयारण्याची ही एकत्रित माहिती...

तुम्हाला माहिती आहे ? आपल्या महाराष्ट्रात सहा राष्ट्रीय उद्याने, ४७ अभयारण्ये, चार संवर्धन राखीव क्षेत्र अशी एकूण ५७ वन्यजीव संरक्षित क्षेत्रे आहेत. त्याचे एकूण क्षेत्रफळ १००५४.१३ चौ.कि.मी. म्हणजे राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या ३.२६ टक्के इतके आहे.

राज्यातील १९ संरक्षित क्षेत्रांचा समावेश करून (पाच राष्ट्रीय उद्याने आणि १४ अभयारण्ये) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, नागपूरचा पेंच व्याघ्र प्रकल्प, अमरावतीचा मेळघाट व्याघ्र प्रकल्प, कोल्हापूरचा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प नवेगाव-नागझिराचा व्याघ्र प्रकल्प आणि बोरचा व्याघ्र प्रकल्प असे सहा व्याघ्र राखीव क्षेत्र तयार करण्यात आले आहेत. यापैकी बोर व्याघ्र प्रकल्पाची कार्यवाही सध्या सुरु आहे.

आता अभयारण्याची ही यादी पहा आणि ठरवा... आपण आपल्या वनांनी समृद्ध असलेल्या महाराष्ट्रातील किती अभयारण्यांना खरंच भेट दिली आहे ?

अ.क्र
अभयारण्य/ राष्ट्रीय उद्यानाचे नाव
जिल्हा
क्षेत्र (चौ.कि.मी)
अंबाबरवा अभयारण्य
बुलढाणा
१२७.११०
अंधारी अभयारण्य
चंद्रपूर
५०९.२७०
अनेर डॅम अभयारण्य
धुळे
८२.९४०
भामरागड अभयारण्य
गडचिरोली
१०४.३८०
भीमाशंकर अभयारण्य
पुणे-ठाणे
१३०.७८०
बोर अभयारण्य
वर्धा-नागपूर
६१.१००
चांदोली राष्ट्रीय उद्यान
सांगली-सातारा-कोल्हापूर-रत्नागिरी
३१७.६७०
चपराळा अभयारण्य
गडचिरोली
१३४.७८०
देऊळगाव-रेहेकूरी अभयारण्य
अहमदनगर
२.१७०
१०
ज्ञानगंगा अभयारण्य
बुलढाणा
२०५.२१०
११
माळढोक अभयारण्य (पुनर्रचित)
सोलापूर-अहमदनगर
१२२९.२४
१२
गौताळा औत्रमघाट अभयारण्य
औरंगाबाद-जळगाव
२६०.६१०
१३
गुगामल राष्ट्रीय उद्यान
अमरावती
३६१.२८०
१४
जायकवाडी पक्षी अभयारण्य
औरंगाबाद-अहमदनगर
३४१.०५०
१५
कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य
अहमदनगर
३६१.७१०
१६
कारंजा-सोहळ काळवीट अभयारण्य
अकोला
१८.३२१
१७
कर्नाळा फोर्ट पक्षी अभयारण्य
रायगड
१२.१५५
१८
काटेपूर्णा अभयारण्य
अकोला
७३.६९०
१९
कोयना अभयारण्य
सातारा
४२३.५५०
२०
लोणार अभयारण्य
बुलढाणा
३.८३१
२१
मालवण सागरी अभयारण्य
सिंधुदुर्ग
२९.१२२
२२
मयुरेश्वर सुपे अभयारण्य
पुणे
५.१४५
२३
मेळघाट अभयारण्य
अमरावती
७८८.७५०
२४
नायगाव मयूर अभयारण्य
बीड
२९.९०१
२५
नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य
नाशिक
१००.१२०
२६
नरनाळा अभयारण्य
अकोला
१२.३५०
२७
नवेगाव राष्ट्रीय उद्यान
गोंदिया
१३३.८८०
२८
नागझिरा अभयारण्य
भंडारा-गोंदिया
१५२.८१०
२९
पैनगंगा अभयारण्य
यवतमाळ-नांदेड
४२४.८९०
३०
पेंच राष्ट्रीय उद्यान
नागपूर
२५९.७१०
३१
फणसाड अभयारण्य
रायगड
६९.७९०
३२
राधानगरी अभयारण्य
कोल्हापूर
३५१.१६०
३३
सागरेश्वर अभयारण्य
सांगली
१०.८७७
३४
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
मुंबई( ठाणे)
८६.९६५
३५
ताडोबा राष्ट्रीय उद्यान
चंद्रपूर
११६.५५०
३६
तानसा अभयारण्य
ठाणे
३०४.८१०
३७
टिपेश्वर अभयारण्य
यवतमाळ
१४८.६३२
३८
तुंगारेश्‍वर अभयारण्य
ठाणे
८५.७००
३९
वान अभयारण्य
अमरावती
२११.००६
४०
यावल अभयारण्य
जळगाव
१७७.५२०
४१
ऐडशी रामलिंगघाट अभयारण्य
उस्मानाबाद
२२.३७४
४२
मानसिंगदेव अभयारण्य
नागपूर
१८२.५८०
४३
नवीन नागझिरा अभयारण्य
गोंदिया-भंडारा
१५१.३३५
४४
नवेगाव अभयारण्य
गोंदिया
१२२.७५६
४५
नवीन बोर अभयारण्य
नागपूर
६०.६९
४६
नवीन माळढोक पक्षी अभयारण्य
उस्मानाबाद
०१.९८
४७
भोरगड संवर्धन राखीव क्षेत्र
नाशिक
३.४९३
४८
उमरेड करांडला अभयारण्य
नागपूर-भंडारा
१८९.२९
४९
कोलामार्का संवर्धन राखीव
गडचिरोली
१८०.७२
५०
ताम्हिनी अभयारण्य
पुणे-रायगड
४९.६२
५१
कोका अभयारण्य
भंडारा
९७.६२४
५२
मुक्ताई भवानी अभयारण्य
जळगाव
१२२.७४
५३
न्यू बोर विस्तारित अभयारण्य
वर्धा
१६.३१
५४
मामडापूर संवर्धन राखीव
नाशिक
५४.४६
५५
प्राणहिता अभयारण्य
गडचिरोली
४२०.०६
५६
सुधागड अभयारण्य
रायगड-पुणे
७७.१२८
५७
ईसापूर अभयारण्य
यवतमाळ-हिंगोली
३७.८०३

एकूण क्षेत्रफळ चौ.कि.मी

१००५४.०१३

डॉ. सुरेखा म. मुळे.
(अभयारण्ये संदर्भ: वन विभाग)

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India