रत्नागिरीतले नव्या स्वरुपातील मत्स्यालय बनले…फेव्हरेट टुरिस्ट डेस्टिनेशन

रत्नागिरी म्हटले की, डोळ्यासमोर येतो लांबच लांब भाट्ये आणि मांडवीचा सागरी किनारा… समुद्राच्या लाटा झेलत ताठपणाने उभा असलेला रत्नदुर्ग...देशभक्त लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान... स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पदस्पर्श लाभलेले पतितपावन मंदीर... इंग्रज काळातील बंदिवान राजाची स्मृती जागविणारा थिबा पॅलेस... पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या या यादीत आणखी एका नाविण्यपूर्ण ठिकाणाची भर पडली आहे ती म्हणजे दापोलीच्या डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत असणाऱ्या सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राच्या मत्स्यालय आणि संग्रहालयाची. गोड्या पाण्यातील व सागरी जीवनाची सफर घडविणारे हे ठिकाण आता फेव्हरेट टुरिस्ट डेस्टिनेशन ठरत आहे.

रत्नागिरीत सागरी जीवसृष्टीची ओळख करुन देणारे हे संग्रहालय यापूर्वीही कार्यरत होते. परंतु काही कारणास्तव त्याचे स्थलांतर झाल्याने आता रत्नागिरी शहरातील झाडगाव येथील नयनरम्य परिसरात ते नवीन वैशिष्ट्यांसह पुन्हा पर्यटकांच्या सेवेत कार्यरत झाले आहे. येथील मत्स्यालयात गोड्या व खाऱ्या पाण्यातील शोभिवंत मासे व पान वनस्पती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. गोडे पाणी विभागात 28 टाक्यांमध्ये अरोवाना, डिस्कस, कॅट फिश, टेट्रा, फ्लॅावर, सिल्व्हर शार्क आणि खारे पाणी विभागात 26 टाक्यांमध्ये मोनोअँजेल, केंड, बटरफ्लाय, लायन, निमो, गोबरा अशा विविध जातींचे मासे पाहायला मिळतात. गेल्या 50 वर्षांपासून जोपासलेली दोन जातीची समुद्री कासवेही मत्स्यालयाचे आकर्षण ठरत आहेत. तसेच 350 वेगवेगळ्या जातीची शास्त्रीय पद्धतीने रसायनामध्ये संग्रहीत मासे विद्यार्थी, संशोधकांसह पर्यटकांना सागरी जीवांची अधिक व्यापक पद्धतीने ओळख करुन देतात.

संग्रहालयातील 55 फुट लांब व 5 टन वजनाचा देवमाशाचा सांगाडा सागरी जीवांच्या भव्यतेची कल्पना पर्यटकांना करुन देतात. सागरी व गोड्या पाण्यातील मत्स्य जीवनाची शास्त्रीय पद्धतीने ओळख करुन देणारे मत्स्यालय आणि संग्रहालय हे विद्यार्थी, संशोधक, शेतकऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी महत्वाचे माध्यम ठरत आहे.
अवघ्या सात महिन्यात एक लाखाच्यावर पर्यटकांची भेट

मत्स्यालय आणि संग्रहालय नव्या स्वरुपात 11 डिसेंबर 2014 पासून कार्यरत झाल्यानंतर अवघ्या सात महिन्यातच महाराष्ट्रासह, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश येथील पर्यटकांचा ओघ याठिकाणी सुरू आहे. यामुळे गेल्या सात महिन्यात मत्स्यालयास भेट देणाऱ्या पर्यटकांचा आकडा एक लाखाच्यावर पोहोचला आहे.

पर्यटकांच्या वाढत्या ओघाबाबत बोलताना केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. हुकुमसिंह ढाकर सांगतात, पर्यटकांना याठिकाणी सागरी जीवनाबाबत शास्त्रीय माहिती सहज-सोप्या पद्धतीने सांगितली जाते. विविध शोभिवंत मासे, सागरी जीव यांच्या आकर्षक मांडणीमुळे मत्स्यालय पर्यटकांच्या पसंतीस उतरले आहे. येत्या काळात पर्यटकांची संख्या वाढतच राहणार असून त्यांच्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

निसर्गरम्य सागरी किनारा लाभलेल्या रत्नागिरी शहरात सागरातील जीवसृष्टीची माहिती देणारे हे केंद्र स्थलांतरानंतर अधिक प्रेक्षणीय आणि ज्ञानवर्धक ठरले आहे. त्यामुळेच पर्यटकांची पावलेदेखील सहजपणे या ठिकाणाकडे वळत आहेत. चला मग येताय ना ... सागरी जीवनाची अद्भुतरम्य सफर करण्यासाठी.
-विजय कोळी
प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी.

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India