टिटवाळ्याचा महागणपती आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ठाणे जिल्ह्याचे वैशिष्ट्य

ठाणे परिसरास तब्बल दोन हजार वर्षाहून अधिक काळचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. सात वाहनांपासून शिल्पहारांपर्यंत अनेक राजवटींच्या खुणा ठाणे जिल्ह्यात सर्वत्र आढळून येतात. जिल्ह्यातील होणारे, कुलियात ही बंदरे (नालासोपारा, कल्याण) इसवी सनापूर्वीपासून प्रचलित आहेत. मुंबईलगत असल्याने ठाणे जिल्ह्याचे झपाट्याने नागरीकरण होत आहे. देशात सर्वात वेगाने नागरीकरण होणारा प्रदेश अशी ठाणे जिल्ह्याची ओळख आहे. गेल्या वर्षी झालेल्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार ठाणे हा देशातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा जिल्हा ठरला आहे. डोंगरी भाग, सागर आणि खाडीकिनारे, राज्यातील सर्वाधिक आदिवासींचे वास्तव्य तसेच विस्तारीत मुंबईचे वाढते नागरीकरण अशी विविधता हे जिल्ह्याचे ठळक वैशिष्ट्य आहे. अशा या ऐतिहासिक जिल्ह्यात पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे.
अनेक उत्तम प्रकारची पर्यटनस्थळे येथे आहेत. त्यांची माहिती घेऊ या.
येऊर
मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवलीचे एवढे मोठे जंगल हे जगातील एकमेव उदाहरण आहे. या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा काही भाग ठाण्यात मोडतो. अर्थात पूर्वी बोरीवलीपर्यंतचा परिसर ठाणे जिल्ह्याचाच एक भाग होता. ठाणे शहरातील उपवन येथून येऊरकडे जाणारा रस्ता आहे. शहराच्या अगदी जवळ घनदाट अरण्य पाहून पर्यटक आश्चर्यचकित होतात. येऊर हे एक आदिवासी खेडे आहे. याच परिसरात हवाई दलाचे एक केंद्रही आहे. विविध प्रकारच्या वनस्पतींनी हे जंगल समृद्ध असून येथे बिबटे, हरीण, काळवीट, मोर, ससे, कोल्हे, रानडूक्कर, सांबर, मगर आदी सर्व प्रकारचे प्राणी आढळून येतात. संजय गांधी उद्यानाच्या 110 कि.मी. जंगलापैकी 40 किलोमिटरचा परिसर येऊरमध्ये मोडतो. येथे विवेकानंद आश्रम, आयुर्वेद पंचकर्म केंद्रही आहे.

ठाणे रेल्वे स्थानकालगत येऊरकडे जाणारी बस ठराविक अंतराने सुटते. पाटोणपाड्यापर्यंत बसने येऊन पुढे जंगलात चालत जावे लागते. एका दिवसाच्या जंगल सफारीसाठी येऊर एक उत्तम ठिकाण आहे.
टिटवाळ्याचा महागणपती
मुंबईतील सिद्धीविनायक अथवा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथील महागणपतीची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. पौराणिक देवकथेनुसार या मंदिरात शकुंतला आणि दुष्यंत यांचा गंधर्व विवाह झाल्याचे मानले जाते. चिमाजी आप्पांनी वसई किल्ला जिंकल्यानंतर हे मंदिर बांधले, हा इतिहास आहे. संकष्टी, अंगारकी तसेच मंगळवारी येथे भाविक मोठ्या संख्येने येतात.

मध्य रेल्वेवरील कसारा मार्गावर टिटवाळा हे उपनगरी रेल्वे स्टेशन असून तिथून हे मंदिर तीन किलोमीटर अंतरावर आहे. रेल्वे स्थानकापासून भाविकांची ने-आण करण्यासाठी रिक्षा आणि टांगे उपलब्ध आहेत.
मलंगगड
ठाणे जिल्ह्यात कल्याणपासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंगगड हा महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन किल्ल्यापैकी एक मानला जातो. सह्याद्रीच्या अगदी अखेरच्या डोंगररांगेत असणारा किल्ला निसर्गप्रेमी, गिर्यारोहक आणि भाविकांचे आवडते ठिकाण आहे. गडावर मलंगबाबाचा दर्गा असून हिंदू -मुस्लिम धर्माचे भाविक येथे दर्शनासाठी येतात. भाविकांच्या सोयीसाठी याठिकाणी ट्रॉलीसेवा सुरु करण्यात येणार आहे. यापुढे पायऱ्या चढण्या-उतरण्याचा त्रास वाचेल. दरवर्षी माघ महिन्यातील पौर्णिमेला गडावर यात्रा भरते. त्यावेळी हजारो भाविक येथे येत असतात.

कल्याण रेल्वे स्थानकाजवळून ठराविक अंतराने मलंगगडासाठी बससेवा उपलब्ध आहे.
सिंहगड
मुरबाड तालुक्यात दक्षिण-पूर्वेला 16 किलोमीटर अंतरावर सिंहगड आहे. 1942 च्या ब्रिटीशांविरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी गामा पाटील या क्रांतिवीरांच्या बलिदानाने पावन झालेला हा परिसर निसर्गरम्य आहे. आताही हा परिसर निर्मनुष्य आहे. 1942 च्या चलेजाव आंदोलनात या क्रांतिकारकांनी गनिमी काव्याने इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले. ब्रिटीश सैनिकांनी कोतवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पकडण्यासाठी विशेष मोहिम राबवली. तेव्हा कोतवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सिंहगडाचा आश्रय घेतला. अखेर फितुरीमुळेच ब्रिटिशांना त्यांचा ठावठिकाणा कळला. या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी ठाणे-मुंबई परिसरातून इतिहासप्रेमी-गिर्यारोहक येतात.

कसे जाल :

सिंहगडला जाण्यासाठी मुरबाडहून धसईमार्गे उचलेगाव अथवा कल्याण-धसई बससेवा उपलब्ध आहे. मुरबाड तालुक्यातच म्हसा गावापासून 14 किलोमीटर अंतरावरील देहरी गावाजवळ सातवाहन काळाची आठवण करुन देणारा गेारक्षगड आहे. त्यालगत असणारा दुसरा सुळका म्हणजे मच्छिंद्रगड, गोरक्षगडाच्या पोटात एक विशाल गुहा असून तिथे पाण्याचे टाकही आहेत. पर्यटक या गुहेत मुक्कामही करु शकतात. तिकडे जंगलामुळे हा परिसर पर्यटकांना भुरळ घालतो.
अंबरनाथचे शिवमंदीर
इ.स. 800 ते 1200 या कालावधीत अपरान्त म्हणजे आताच्या ठाणे आणि रायगड जिल्ह्यात शिलहार राजांची सत्ता होती. शिलहार राजा शिवभक्त असल्याने त्यांनी त्यांच्या राज्यात 12 शिवमंदीरे बांधल्याचा उल्लेख सापडतो. त्यातील अनेक मंदिरे आता भग्न अवस्थेत असली तरी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील शिलहारकालिन शिवमंदीर तत्कालिन स्थापत्य आणि शिल्पकारांची साक्ष देत अजूनही उभे आहेत. मंदिरातील शिलार लेखातील उल्लेखानुसार इ.स. 1050 मध्ये या मंदिराची उभारणी पूर्ण झाली. या मंदिराने 954 व्या वर्षात पदार्पण केले आहे. या मंदिरावरील अप्रतिम कलाकसुरी डोळ्याचे पारणे फेडणारी आहे. मध्य रेल्वेवरील अंबरनाथ रेल्वे स्थानकापासून पूर्व विभागात मंदिराकडे जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध असतात.
काकोळे तलाव
अंबरनाथमध्ये मंदीर पाहण्यासाठी दिवसभराची वेळ काढून आलात तर जांभिवली गावाजवळील काकोळे तलावास अवश्य भेट द्या. कल्याण रेल्वे स्थानकाला पाणीपुरवठा व्हावा यासाठी ब्रिटिश काळात येथील तलावावर धरण बांधण्यात आले. त्यावेळी रेल्वेमार्ग उभारणीचे कंत्राट घेतलेल्या ग्रेट इंडियन पेनेन्सुला अर्थात जी.आय.पी. कंपनीनेच हे धरण बांधले. त्यामुळे याठिकाणास जी.आय.पी.टॅंक अथवा जांभुळतळा असेही म्हटले जाते. या तळ्याकाठी पूर्वी आढळणारी गर्द वनराई आता नामशेष झाली असली आणि तळ्याभोवती औद्योगिकरणाचा विळखा पडत असला तरीही अजूनही या तळ्याचे सौंदर्य अबाधित आहे.
शहाडचे बिर्ला मंदीर
कल्याणहून रेल्वेने टिटवाळ्याला जाताना वाटेत शहाड स्थानक लागते. येथे बिर्ला उद्येाग समूहाचा सेंच्युरी रेयॉन हा कारखाना आहे. याठिकाणी कंपनीने एक सुरेख विठ्ठल मंदिर बांधले आहे. बिर्ला मंदिर या नावाने ओळखली जाणारी ही वास्तू भव्य आहे. शिर्डी-शनि शिंगणापूरप्रमाणे भाविकांना टिटवाळा आणि बिर्ला मंदिरास एकाच फेरीत भेट देता येते.
माळशेज घाट
कल्याण नगर रस्त्यावर माळशेज घाट आहे. आतापर्यंत पावसाळी पर्यटनस्थळ म्हणून प्रचलित असले तरी लवकरच महाबळेश्वर आणि माथेरानप्रमाणेच एक बारमाही थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित होत आहे. एम.टी.डी.सी. आणि वन विभागाने घाट परिसरात विकासकामे हाती घेतली असून त्यातून पर्यटकांना सोयी उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. पावसाळ्यात दाट धुक्याची शाल वापरलेला हा डोंगर-दऱ्यांचा परिसर पर्यटकांना अक्षरश: वेड लावतो. आता घाटात पर्यटकांसाठी खास पॅाईंट केले जात आहेत. पर्यटकांच्या वाहनांसाठी रस्त्यावर दोन ठिकाणी पार्किंग व्यवस्था केली आहे.
एमटीडीसीकडून सुविधा
माळशेजच्या टोकावर एमटीडीसीची हॉटेल आणि निवास व्यवस्था असून आता तिथेही अधिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. एमटीडीसी हॉटेल्सपासून काही अंतरावर एक धरण असून तिथे दरवर्षी फ्लेमिंग पक्षी रशियातून हजारो मैलचे अंतर कापून येतात. माळशेज परिसर पर्यटन विकासाचा एक भाग म्हणून लवकरच मुरबाड तालुक्यातील कितबी येथे पर्यटनग्राम उभारले जात आहे. आदिवासींच्या घाटात राहण्याचा आनंद पर्यटकांना येथे मिळू शकेल. केवळ पावसाळ्यातच नव्हे तर बारमाही माळशेज घाटातील थंड, मोकळ्या हवेचा पर्यटकांना आता लाभ घेता येईल.

फ्लेमिंगोचा थवा आकाशात उडू लागला की त्यांच्या लालरंगाच्या पंखामुळे जणू काही आगीचा लोळच हवेत असल्यासारखे दिसते. म्हणूनच त्यांना मराठीत अग्निपंखी हे नाव आहे. पावसाळ्यात माळशेज घाटातील डोंगर कड्यावरुन पांढऱ्याशुभ्र पाण्याचे धबधबे वाहू लागतात. तीव्र वेगाच्या त्या पाण्याच्या धारेखाली भिजण्याचा आनंद अवर्णनीय असतो. दाट धुके असते.

कसे जाल :कल्याणहून माळशेजमार्गे पुणे अथवा नगर जिल्ह्यात जाणाऱ्या एसटी बस नियमित उपलब्ध आहेत. कल्याणहून अडीच तासात माळशेजला येता येते.

अर्थात ठाणे जिल्ह्यातील यापेक्षा अधिक लहान-मोठी पर्यटन स्थळे आहेत. वर्षांगणिक काही नव्या पर्यटन स्थळांची भर पडत आहे. 21व्या शतकातील शहर अशी ख्याती असणाऱ्या नवी मुंबई परिसरातील गवळीदेव आणि पांडवकडा हे दोन धबधबे पावसाळी पर्यटकांचे विशेष आवडीचे आहेत. नवी मुंबईतील महापे नाक्यापासून रिक्षाने 15 मिनिटात गवळीदेव धबधब्यांपर्यंत पोहोचता येते. पांडवकडा धबधबा कोकणभवन परिसरात आहे. भारती विद्यापीठामागील डोंगरावरुन हा धबधबा कोसळतो, नवी मुंबईतील खारघर रेल्वे स्थानकात उतरुनही या धबधब्याकडे जाता येते.

ठाणे जिल्ह्याची सीमा असणाऱ्या वांगणी तसेच माथेरानच्या वाटेवरही पावसाळ्यात अनेक धबधबे दिसतात. गर्दींची ठिकाणे सोडून शांत ठिकाणी येऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांना हा परिसर खुणावतो. बदलापूर जवळील भोज गावाजवळचे कुंडेश्वर हे ठिकाणही सहलीसाठी आदर्श आहे.

संकलन- जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे.

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India