उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

विद्यापिठाची स्थापना

उच्च शिक्षणाच्या प्रसारात त्या-त्या प्रादेशिक विद्यापीठांचा मोठा वाटा असतो. जळगाव, धुळे व नंदूरबार हे तीन जिल्हे कार्यक्षेत्र असलेल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा उच्च शिक्षणाच्या प्रसारात आणि संशोधनात मोलाचा वाटा आहे. खान्देशातील जनतेच्या आकांक्षेतून साकार झालेले उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आता ‘टेक ऑफ’ घेऊन उत्तुंग भरारी घेण्याच्या स्थितीत आहे. 15 ऑगस्ट 1990 रोजी विद्यापीठाची स्थापना झाली. एवढ्या कमी कालावधीत ‘अंतरी पेटवू ज्ञानज्योत’ हे ब्रीद वाक्य घेऊन खान्देशातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक या क्षेत्रात या विद्यापीठाने भरीव योगदान दिले आहे. सध्या या विद्यापीठाचे रौप्य महोत्सवी वर्ष सुरू आहे. या रौप्य महोत्सवी वर्षात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नॅक पुनर्मुल्यांकनाच्या तिसऱ्या टप्प्याला सामोरे गेले. मे - 2015 च्या पहिल्या आठवड्यात नॅकने या विद्यापीठाला ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली असल्याचे जाहीर केले. रौप्य महोत्सवी वर्षातील ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे. कुलगुरू प्रा.सुधीर मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली या विद्यापीठाची दमदार वाटचाल सुरू आहे. या विद्यापीठांतर्गत 190 महाविद्यालये व 27 मान्यताप्राप्त परिसंस्था कार्यरत आहेत. शैक्षणिकदृष्ट्या विद्यापीठाने अत्यंत चांगली प्रगती केली आहे. या विद्यापीठाला प्रा.एन.के. ठाकरे, प्रा.एस.एफ. पाटील, प्रा.आर.एस. माळी, डॉ.के.बी. पाटील असे चार कुलगुरू यापूर्वी लाभले आहेत. या सर्वांनीच विद्यापीठाच्या वाटचालीत महत्त्वाचे योगदान दिले आहे.

विस्तार
750 एकर भव्य परिसरात निसर्गाच्या सानिध्यात हे विद्यापीठ आहे. 13 प्रशाळा आणि एक संस्था (इन्स्टिट्युट), 4 सॅटेलाईट कॅम्पस या विद्यापीठात आहेत. इंडिया टुडे या देशपातळीवरील नियतकालिकाने 2013 मध्ये केलेल्या देशातील विद्यापीठांच्या सर्वेक्षणात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने देशात 40 वे स्थान प्राप्त केले तर करिअर 360 या नियतकालिकानेदेखील केलेल्या देशभरातील विद्यापीठांच्या सर्वेक्षणात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने 27 वे स्थान प्राप्त केले आहे.

अभ्यासक्रम
विद्यापीठाचा भर प्रारंभापासून नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांवर राहिला आहे. जागतिकीकरणाचे भान या विद्यापीठाला असल्यामुळेच स्पर्धेच्या युगात या विद्यापीठाचा विद्यार्थी टिकावा, त्याला रोजगाराच्या चांगल्या संधी प्राप्त व्हाव्यात यासाठी नवनवीन अभ्यासक्रम विद्यापीठामार्फत राबविले जातात. पारंपारिक अभ्यासक्रमांपेक्षा रोजगाराभिमुख अभ्यासक्रम राबविण्यावर या विद्यापीठाचा भर राहिला आहे. या विद्यापीठात ‘स्कूल सिस्टीम’ ची संकल्पना प्रारंभापासून राबविली जाते.

या विद्यापीठातील अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे - 
स्कूल ऑफ केमिकल सायन्सेस (एम.एस्सी. :- पॉलिमर केमिस्ट्री, पेस्टीसाइडस ॲण्ड ॲग्रो केमिकल्स, इंडस्ट्रीयल केमिस्ट्री, ऑरगॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, ॲनालिटीकल केमिस्ट्री), स्कूल ऑफ लाईफ सायन्सेस (एम.एस्सी. :- बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी), स्कूल ऑफ फिजिकल सायन्सेस (एम.एस्सी. :- मटेरियल सायन्स, एनर्जी स्टडीज, इलेक्ट्रॉनिक्स, एम.टेक :- व्हीएलएसआय टेक्नॉलॉजी), स्कूल ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेस (एम.एस्सी. :- कॉम्प्युटेशनल मॅथेमॅटिक, इंडस्ट्रीयल स्टॅटिस्टीक्स, तीन वर्षीय बी.एस्सी. ॲक्चुरियल सायन्स, स्कूल ऑफ इन्व्हायर्नमेंटल ॲण्ड अर्थ सायन्सेस (एम.एस्सी. :- इन्व्हायर्नमेंटल, अप्लाईड जिऑलॉजी, एम.ए/एम.एस्सी- ॲप्लाईड जिओग्राफी, ॲप्लाईल जिऑलॉजी, एम.टेक:-इन्व्हायर्नमेंटल सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी).

प्रमाणपत्र अभ्यासक्रम - इंडस्ट्रीअल सेफ्टी ॲण्ड मॅनेजमेंट (6 महिने कालावधी), इन्स्टिट्युट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (बी.टेक :- केमिकल इंजिनियरींग, पेंटस टेक्नॉलॉजी, पॉलिमर ॲण्ड प्लॅस्टिक टेक्नॉलॉजी, ऑईल, फॅटस ॲण्ड वॅक्सेस टेक्नॉलॉजी, फुड टेक्नॉलॉजी, एम.टेक :- केमिकल इंजिनियरींग, पॉलिमर टेक्नॉलॉजी, ओलिओ केमिकल ॲण्ड सरफॅक्टन्ट टेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी, फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी, फुड ॲण्ड फर्मन्टेशन टेक्नॉलॉजी, पेन्ट टेक्नॉलॉजी).

स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्सेस (एम.एस्सी. :- कॉम्प्युटर सायन्स, इ न्फार्मेर्मशन टेक्नॉलॉजी, एम.सी.ए. :- मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स), स्कुल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एम.बी.ए., बी.बी.एम., बी.बी.ए.), स्कूल ऑफ एज्युकेशन (एम.एड.), स्कूल ऑफ लॅग्वेजेस स्टडीज ॲण्ड रिसर्च सेंटर (एम.ए. :-इंग्रजी, मराठी, हिन्दी), स्कूल ऑफ आर्टस् ॲण्ड ह्युमॅनिटीज (एम.लिब. ॲण्ड इन्फाॅर्मेशन सायन्स, एम.ए.- संगीत (व्होकल, एम.ए.- इन्स्ट्रुमेन्टल (तबला, हार्मोनिअम) बी.ए.- ॲडिशनल संगीत (व्होकल, तबला),

एम.ए. :- मास कम्युनिकेशन, संरक्षणशास्त्र, मानसशास्त्र, स्कूल ऑफ सोशल सायन्सेस (एम.ए. :- इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, आंबेडकर विचार, तत्वज्ञान, स्त्री अभ्यास, तत्वज्ञान, एम.एस.डब्लू तसेच तीन महिन्यांचा लिंगभाव संवेदनशिलता प्रमाणपत्र अभ्यासक्रम ).

स्कूल ऑफ थॉट्स ( बुध्द, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी व साने गुरूजी अध्ययन आणि संशोधन)

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सध्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. ग्रामीण व आदिवासी बहुल भागात वसलेल्या या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील बहुसंख्य विद्यार्थी सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गातील आहेत. त्यामुळे त्यांना शिक्षण हेच उपजीविकेचे साधन वाटणे साहजिक आहे. अशा स्थितीत प्रचंड संख्येने उच्च शिक्षणाकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांना सध्याच्या स्पर्धेच्या जगात सक्षम बनविणारे शिक्षण देण्यासाठी नेमके काय करण्याची गरज आहे, हे जाणून विद्यापीठाने विकासाचे कार्य हाती घेतले. यासंदर्भात विद्यापीठ विकासाच्या संदर्भातील कृती आराखडा तयार केला. त्यात नेटवर्किंग, व्यावसायिक व गरजांवर आधारित अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांसासाठी करिअर प्रशिक्षण आणि प्लेसमेंट सेल, परीक्षा आणि मूल्यमापन पद्धतीत सुधारणा, शिक्षक व शिक्षकेतरांचे प्रशिक्षण यावर भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसाठी चार आणि विद्यार्थिंनींसाठी सहा वसतिगृहांची सुविधा विद्यापीठ परिसरात करण्यात आली आहे.

उच्च शिक्षणाचा विस्तार व गुणवत्ता दोन्हीचे संतुलन राखणे हे भविष्यातील मोठे आव्हान ठरणार आहे. हे आव्हान पेलण्याची तयारी विद्यापीठाने केली आहे. त्यासाठी नेटवर्किंगवर विद्यापीठाने लक्ष केंद्रित केले. महाविद्यालयातील प्रत्येक विभाग एकमेकांशी संगणकाद्वारे जोडलेला असणे, प्रत्येक महाविद्यालय एकमेकांशी जोडलेले असणे सर्व महाविद्यालये विद्यापीठाशी जोडून असणे व विद्यापीठ भारतातील व बाहेरील विद्यापीठांशी जोडणे अशा प्रकारच्या नेटवर्किंगचा समावेश आहे. डिस्टन्स एज्युकेशन (दूरशिक्षण) मार्फत पंधरा अभ्यासक्रम सुरु झाले आहेत.

नवीन अभ्यासक्रम देखील विद्यापीठाने सुरु केले आहेत. यामध्ये रसायन प्रशाळेअंतर्गत अनॅलिटीकल केमिस्ट्री, संख्याशास्त्र विभागात ॲक्च्युरियल सायन्स, केमीकल टेक्नॉलॉजी विभागातंर्गंत नॅनो टेक्नॉलॉजी व इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे व्हीएलएसआय टेक्नॉलॉजी हे अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. विद्यापीठाने नंदूरबार येथे स्थापन केलेल्या एकलव्य प्रशिक्षण केंद्रामार्फत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी. व इतर स्पर्धात्मक परीक्षांसाठी मार्गदर्शन केंद्र सुरु केले आहे. ज्यामुळे पदवीनंतर या स्पर्धात्मक स्पर्धांना बसण्यासाठी त्याचा फायदा होतो. याशिवाय तज्ज्ञ मंडळींना बोलावून निवासी शिबीरेही घेतली जातात. नंदूरबारच्या या उपकेंद्राची स्वत:ची वास्तू आहे. नंदूरबार येथे आदिवासी अकादमी स्थापन केली जाणार असून त्यासाठी राज्य सरकारने 25 एकर जमीन देण्याचा प्रस्ताव नुकताच मान्य केला आहे. देशात अत्यंत आगळी-वेगळी अशी ही अकादमी राहणार आहे.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विज्ञान-तंत्रज्ञान संस्थांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळावी यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण व अशा संस्थांशी अधिकाधिक संवाद वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. उद्योगांमध्ये प्रशिक्षणाची संधी, विद्यार्थ्यांची कौशल्ये वाढविणाऱ्या कार्यशाळांचे आयोजन, विद्यार्थ्यांना सॉफ्टस्कीलच्या संदर्भात प्रशिक्षण देणे, वेळेचे व्यवस्थापन व मुलाखत तंत्र इत्यादी संबंधी मार्गदर्शन दिले जाते. नेट, सेट व इतर स्पर्धा परिक्षांसाठी मार्गदर्शनाची सुविधा निर्माण केली आहे. चाणक्य स्पर्धा परीक्षा योजना केंद्र सुरु करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांबाबत प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्याचे कार्य या मार्फत केले जाते.

परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करून परिक्षेत व मूल्यांकनात होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी बार कोड पद्धतीचा वापर केला जात आहे. सत्र पद्धत आता सुरु झाली आहे. पारंपारिक गुणदानाऐवजी श्रेयांक पद्धतीचा अवलंब सुरू केला आहे.

विद्यापीठातील प्राध्यापक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सातत्याने सहभागी होतात. विद्यापीठाने आतापर्यंत एकंदर 16 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था आणि विद्यापीठे यांच्यासोबत सामंजस्य करार केले आहेत. अलिकडच्या काळात सॅप-इआरपी प्रणाली विद्यापीठात सुरु करण्यात आली असून ही प्रणाली सुरु करणारे हे देशातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. विद्यापीठात सायन्स पार्क प्रकल्प उभारला जाणार आहे. विद्यापीठात थ्रीडी मिनी थिएटर, तारांगण इत्यादी प्रकल्पही नियोजित असून विज्ञानाविषयी गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी म्हणून विज्ञान मोबाईल व्हॅन आणण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांसाठी कल्याणकारी योजना

कला, क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्यादृष्टीने विविध प्रकारच्या सुविधा व योजना अंमलात आणल्या आहेत. विद्यार्थी कल्याण विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी अधिकाधिक भर देण्यात येत असून यापुढे राष्ट्रीय सेवा योजना मार्फतही विविध उपक्रम हाती घेतले जातात. विद्यार्थी आर्थिक अडचणींअभावी शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी विद्यापीठाने विविध योजना आखून अंमलात आणल्या आहेत.

कर्मवीर भाऊराव पाटील ‘कमवा व शिका’ योजना, एकलव्य विद्याधन योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह विद्यार्थी सहाय्यता योजना, कुलगुरू वैद्यकीय निधी योजना, विद्यार्थी सामूहिक सुरक्षा अपघात विमा योजना इत्यादी योजनांचा यामध्ये समावेश आहे. विद्यार्थ्यांना ई-सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाविद्यालयांना संलग्नता देण्याविषयी व प्राध्यापकांना मान्यता (ॲप्रुव्हल) देण्याचे काम विद्यापीठाने आता ऑनलाईन सुरू केले आहे. यामुळे विद्यापीठाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आली आहे.

संपर्क
या विद्यापिठाशी संपर्क साधण्याकरिता दूरध्वनी क्रमांक ०२५७-२२५७२५० या क्रमांकावर संपर्क साधता येईल अथवा अधिक माहिती जाणून घेण्यासाठी http://www.nmu.ac.in/ या वेबसाईटलादेखील भेट देऊ शकता.


सुनिल पाटील,
जनसंपर्क अधिकारी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव.

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India