Add caption |
यंदा प्रथमच आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत आय.आर.एस प्रणाली राबविण्यात आली. या प्रणालीअंतर्गत ठिकठिकाणी ई.ओ.सी (ईमर्जन्सी ऑपरेटिंग सेंटर) कार्यरत ठेवण्यात आले. या ठिकाणी डेप्युटी इंसिडन्ट कंमाडर म्हणुन नगरपालिकेचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, तहसिलदार आदिंची नियुक्ती करण्यात आली होती. जेणेकरुन विठ्ठल भक्तांची गर्दी योग्यरित्या हाताळता यावी.
चंद्रभागा वाळवंटाच्या स्वच्छतेबाबत उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते. या निर्देशाची व भाविकांच्या सुविधा बाबतची अंमलबजावणी योग्यरित्या व्हावी यासाठी वाळवंटात एक ई.ओ.सी कार्यरत ठेवण्यात आले होते. या ठिकाणी सांगोला नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके डेप्युटी इंसिडन्ट कंमाडर म्हणुन कार्यरत होते. ते स्वत:चे कर्तव्य अतिशय चोखरित्या बजावत असतांना त्यांच्या कानावर आवाजाचा एकच गलका आला... अरे...! तो बुडतोय, त्याला कोणीतरी वाचवा..! तो संपला..! आता तो बुडाला... अशा एक ना अनेक प्रतिक्रिया गर्दीत उपस्थित असणारे भाविक करीत होते. मात्र त्याला पाण्यात बुडण्यापासून वाचविण्याचे धाडस कोणीही दाखवत नव्हते. वाळवंट टेहळणीसाठी अग्निशामक दलाच्या वाहनावर चढलेल्या श्री.डाके यांच्या कानावर हा आवाजांचा गलका आदळला. क्षणार्धात स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता त्यांनी चंद्रभागेच्या पाण्यात उडी घेतली.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने विष्णुपद येथे नुकताच नव्याने बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी होते. श्री. डाके यांनी पाण्यात उडी घेतल्याचे पाहून अग्निशामक दलाच्या जवानांनी ताबडतोब जीवरक्षक बोट त्यांच्यापर्यंत आणली व त्यामध्ये बुडणाऱ्या युवकाला व श्री.डाके यांना बसविले. पोटात-तोंडात पाणी गेल्यामुळे त्या युवकाला बोलता येत नव्हते. प्राथमिक उपचारानंतर त्या युवकाने स्वत:चे नाव - तात्या बंडु काळे (40) सांगून औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मौजे सावरवडी येथील रहिवासी असल्याची माहिती दिली. स्थानिक राजकीय अपयशापोटी आपण आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितले.
काही का असेना--! चालता-बोलता एक जीवंत जीव वाचला.. नव्हे, त्याला वाचविण्यात यश आले याचे समाधान अग्निशामक दलाच्या जवानांसमवेत श्री.डाके यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होते. श्री.डाके यांच्या रुपाने विठ्ठलच पावल्याची भावना त्या युवकाच्या मनात निर्माण झाली असेल यात काही शंका नाही. अधिकाऱ्यातील माणुसपण जपणाऱ्या या ग्रेट माणसाला सलाम ठोकून मी, माझा सहकारी प्रविण पाटील याच्यासह वाळवंटातून उप माहिती कार्यालयाकडे निघालो.
-फारुक बागवान
9881400405
जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर
0 comments:
Post a Comment