मराठवाडा विभाग राज्य पुनर्रचनेच्या निजामकालीन संस्थानात समाविष्ट होता. हिंगोली उपविभाग हा तत्कालीन ब्रिटीश राजवटीच्या विदर्भ भागास लागून असलेला भूभाग निजाम संस्थानच्या सिमेवरील भाग म्हणून ओळखला जात होता. हिंगोली येथे तत्कालीन निजामाचे लष्करी ठाणे होते. लष्करी तुकड्या, लष्कराचे दवाखाने, घोडदळ व लष्कराच्या उपयोगासाठी जनावरांचा दवाखाना येथे होता. इ.स. 1803 मध्ये टिपू सुलतान-मराठा युद्ध व इ. स. 1857 मध्ये नागपूरकर भोसले यांची लढाई जनतेने पाहिली व अनुभवली आहे. आर्मी व मराठी सेनेने इंग्रजांचा केलेला यशस्वी प्रतिकाराचीही येथील जनता साक्षी आहे. हिंगोली येथे असलेल्या लष्करी छावणीमुळे हे शहर पूर्वीपासून हैदराबाद राज्यातील महत्वाचे शहर म्हणून प्रसिद्धी पावलेले आहे.
लष्करी ठाणे असलेल्या या शहरातील वस्त्यांना पूर्वीपासून प्रचलित असलेली पलटण, रिसाला, तोफखाना, पेन्शनपुरा, सदर बाजार ही नावे आजही कायम आहेत. हिंगोली जिल्ह्याची पर्यटनाकडे वाटचाल सुरू असून दसरा महोत्सवाची देशपातळीवर दखल घेतली गेली आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात 1956 साली झालेल्या राज्य पुनर्रचनेत मराठवाडा विभाग तत्कालीन मुंबई राज्यास जोडण्यात आला. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर तत्कालीन परभणी जिल्ह्याचा हा भाग महाराष्ट्र राज्याचा घटक झाला. महाराष्ट्र राज्याच्या 39 व्या वर्धापनदिनी म्हणजे 1 मे 1999 रोजी आकाराने विस्तीर्ण असलेल्या परभणी जिल्ह्याचे विभाजन करून हिंगोली हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला. जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळांची थोडक्यात माहिती घेऊया...
हिंगोली शहर
हिंगोली हे जिल्ह्याचे मुख्यालय असून या शहरास निजामकालीन लष्करी ठाणे म्हणून ऐतिहासिक महत्व आहे. परभणी शहरापासून 78 कि. मी. तर नांदेडपासून 90 कि.मी. अंतरावर हिंगोली शहर आहे. हिंगोली रेल्वे मार्गाने जोडलेले आहे तसेच हे या भागातील प्रमुख बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. एकाधिकार कापूस खरेदी योजना सुरू होण्यापूर्वी मराठवाड्यातील हिंगोली हे एक कापूस खरेदी-विक्री व्यवहाराचे प्रमुख केंद्र होते. त्यामुळे या परिसरात जिनींग प्रेसींग फॅक्टरीज अस्तित्वात आहेत. शहरापासून जवळच जलेश्वर हे मंदिर विस्तीर्ण तळ्याच्या परिसरात वसलेले असून या तलावात विविध रंगाची कमळाची मनमोहक फुले असल्यामुळे हा परिसर निसर्गरम्य झाला आहे.
दसरा महोत्सव
हिंगोली शहरात स्वर्गीय मानदासबाबा यांनी 151 वर्षांपूर्वी दसरा महोत्सव सुरू केला. दसरा महोत्सवानिमित्त 10 दिवस विविध सांस्कृतिक, सामाजिक, मनोरंजनपर तसेच प्रदर्शनी व रावणदहन आदी उपक्रम राबविले जातात. सुमारे दीडशे वर्षांची परंपरा लाभलेला मराठवाड्यातील हिंगोली येथील दसरा महोत्सव देशवासियांसाठी आकर्षण ठरला आहे. दसरा किंवा विजयादशमी म्हणजे सत्प्रवृत्तीने असत्यावर व सदगुणांनी दुर्गुणांवर मिळवलेला विजय होय. पौराणिक संदर्भानुसार श्रीरामाने रावणावर मिळविलेला विजय साजरा करण्यासाठी प्राचीन काळापासून देशभरात विजयादशमी उत्साहाने साजरी केली जाते. कर्नाटकात म्हैसूर येथे वाडियार या राजघराण्याने सुरु केलेला दसरा महोत्सव देशभरात प्रसिद्ध आहे. जवळजवळ तितकीच प्रदीर्घ परंपरा हिंगोलीच्या सार्वजनिक दसरा महोत्सवाला लाभली आहे.
हिंगोली व म्हैसूरच्या दसरा महोत्सवातील मुख्य फरक म्हणजे म्हैसूरच्या दसऱ्याला राजाश्रय लाभला तर हिंगोलीच्या दसऱ्याला लोकाश्रय. हा लोकाश्रय इतका उदार आहे की म्हैसूरच्या खालोखाल क्रमांक दोनचा दसरा म्हणून हिंगोलीच्या दसऱ्याची देशपातळीवर दखल घेतली गेली आहे.
फार पूर्वी कयाधू नदीच्या काठावरील खाकीबाबा मठाच्या आवारात दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाची परंपरा सुरु झाली, असे शहरातील जुनी-जाणती मंडळी सांगतात. नंतर ही पंरपरा हिंगोलीकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली. या उत्सवाची व्याप्ती वाढू लागताच मठाची जागा अपुरी पडू लागली आणि शहराच्या मध्यभागी असलेल्या सध्याच्या रामलीला मैदानावर या महोत्सवाचे भव्य प्रमाणात आयोजन होऊ लागले. आता हा महोत्सव हिंगोलीतील समस्त जाती-धर्मांच्या लोकांच्या सार्वजनिक जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.
सन 1855 पासून परंपरा लाभलेल्या या महोत्सवाचे समस्त हिंगोलीवासियांनी अभिमानाने जतन केले आहे. भाद्रपद पोर्णिमेला बांसाफोड या कार्यक्रमाद्वारे सार्वजनिक दसरा महोत्सवाच्या तयारीला सुरुवात होते. घटस्थापना ते रामराज्याभिषेक असा 9 ते 10 दिवस चालणारा हा महोत्सव म्हणजे हिंगोलीकरांच्या एकात्मतेचे उत्कृष्ट उदाहरण होय.
औंढा नागनाथ
भारतातील बारा प्रसिद्ध ज्योतिर्लिंगापैकी एक औंढा नागनाथ हे 8 वे ज्योतिर्लिंग आहे. या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी असून मुख्य मंदिराभोवती बारा ज्योतिर्लिंगाचे लहान मंदिर आहे. याठिकाणी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते तसेच श्रावणातील प्रत्येक सोमवारी येथे भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येतात. औंढा नागनाथ तालुक्याचे ठिकाण असून हिंगोली पासून 24 कि.मी. अंतरावर आहे. परभणी व नांदेड शहरापासून औंढा नागनाथ साधारणत: 55 ते 60 कि.मी. अंतरावर आहे. राज्य शासनाच्या वतीने तीर्थक्षेत्र विकास योजनेत औंढा नागनाथचा समावेश करण्यात आला असून याठिकाणी केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून भक्तनिवास, बालोद्यान, रस्ते, आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राचा सर्वसमावेशक विकासाचा प्रस्ताव मंदिर प्रशासनाने तयार केलेला आहे. येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे विश्रामगृह पर्यटकांना राहण्यासाठी उपलब्ध आहे. मंदिरापासून 1 कि.मी. अंतरावर प्रेक्षणीय असे नागनाथ उद्यान आहे.
नर्सी नामदेव
नर्सी हे संत नामदेव महाराजांचे जन्मस्थान असून त्यांचा इ.स. 1270 मध्ये जन्म झाला होता. नर्सी हे कयाधू नदीच्या काठी वसलेले आहे. येथे प्रत्येक महिन्याच्या एकादशीस व आषाढी एकादशीस मोठी यात्रा भरते. हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनास येतात. संत नामदेव महाराज हे शिख समाजाचे आदरणीय संतपुरूष असल्याने नांदेड येथील गुरूद्वारा बोर्डाच्या पुढाकाराने येथे गुरूद्वारा, नदीवरील घाट वाहतुकीचे रस्ते, विश्रामगृह आणि व्यापारी संकुल बांधण्याची योजना कार्यान्वित होत असून त्यात महाराष्ट्र शासनाचे मोठे योगदान आहे.
नर्सीचा तीर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश करण्यात आला असून या निधीतून जोडरस्ते, अंतर्गत रस्ते, यात्री निवास, वाहनतळ, सांस्कृतिक सभागृह, निवास व्यवस्था, स्वच्छतागृह पाणीपुरवठा, बाग-बगीच्या, विद्युतीकरण आदी कामे सुरू आहेत. हिंगोली शहरापासून 17 कि.मी. अंतरावर नर्सी नामदेव असून प्रती पंढरपूर म्हणून नर्सीची ओळख आहे.
आसेगाव
हिंगोली जिल्ह्यातील आसेगाव ता. वसमत हे गाव जैन धर्मियांचे पवित्र तीर्थस्थान आहे. या गावात संपूर्ण महाराष्ट्रातील व इतर भागातील जैन भाविक मोठ्या प्रमाणात येतात.
सिद्धेश्वर धरण
औंढा नागनाथ तालुक्यातील पूर्णा नदीवर सिद्धेश्वर धरण बांधण्यात आलेले आहे. सदर धरणाचा परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्यासाठी 1 कोटी 30 लाख रुपयांची योजना पूर्ण झाली असून यामध्ये बाग बगीचा, सुशोभीकरण, पर्यटक निवास, अंतर्गत रस्ते व पोच मार्ग निर्माण करण्यात आले आहेत.
याशिवाय औंढा व वसमत तालुक्याच्या सिमेवर बाराशीव हनुमान मंदीर असून मंदिराची जागा परिसरातील 12 गावांची सीमा एकाच ठिकाणी येतात म्हणून बाराशीव हनुमान मंदीर असे नाव पडले आहे. तसेच सेनगाव तालुक्यातील खैरीघुमट येथे हटकर समाजाचे पुरातन मंदीर आहे.
औंढा तालुक्यातील अंजनवाडा येथील महादेव मंदीर, सिद्धनाथ मंदीर, शिरड शहापूर येथील जैनमंदीर, कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील जटाशंकराचे मंदीर व लमाणदेव यात्रा, हजरत सय्यद नुरोद्दीन ऊर्फ नुरीबाबा यांचा दर्गा व हिंगोली शहरातील चिराग शहा तलाव आदी धार्मिक व इतर प्रेक्षणीय स्थळे पाहता हिंगोली जिल्ह्याची पर्यटनाकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून येते.
संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली.
हिंगोली जिल्ह्याची पर्यटनाकडे वाटचाल; दसरा महोत्सवाची देशपातळीवर दखल
Posted by
rajeshkhadke
on Tuesday, 11 August 2015
Labels:
पर्यटन
0 comments:
Post a Comment