मेनी मुडस्... अर्थात ‘वाघां’चे...

कुणी वाघासोबत स्वत:चा फोटो काढून घेतंय..
कुणी वांघांची माहिती अतिशय काळजीपूर्वक वाचतंय..
अहाहा किती छान वाटतंय आज, असं कुणी तरी म्हणतंय..
अरे बाप रे, आपल्या राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प आहेत हे मला माहितच नव्हतं, बरं झालं या प्रदर्शनाच्या निमित्ताने कळालं... असं कुणी तरी म्हणतंय..
अरे रे, यामुळेच वाघांची संख्या कमी होतेय असं म्हणत कुणी तरी वाघांची संख्या कमी होण्याची मागची कारण वाचून हळहळतंय...
वाघ वाचलेच पाहिजेत अशी आग्रही भूमिका कुणी तरी घेतंय..
काय देखणा प्राणी आहे.... असं म्हणत महिलांचा ग्रुप वाघाच्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वावर जाम खुष झालाय.
आपल्या देशात २२२६ आणि राज्यात फक्त १९० वाघं आहेत? ही संख्या नक्कीच वाढली पाहिजे अशी इच्छा कुणी तरी व्यक्त करतंय..
कुणी वाघांच्या ‘मेनी मुडस्’ वर तर कुणी वाघांच्या कुटुंबाच्या फोटोच्या प्रेमात पडलंय, बघ नं... तो छावा किती क्युट आहे.... त्याची नजर बघ.... किती वेध घेतेय काळजाचा.... असं म्हणत कुणी तरी शिकारीचा वेध घेणाऱ्या वाघाच्या नजरेचाच वेध घेतंय... 
आता मी नक्की या सहा व्याघ्र प्रकल्पांना भेट देणार... असा निग्रह कुणी तरी करतंय...
कुणी तरी निवांतपणे खुर्चीत बसून वाघांवर तयार करण्यात आलेल्या चित्रफितीचा आनंद घेतंय... 
आज मंत्रालयाचं रुपचं पालटलंय... नेहमीच्या मरगळलेल्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद आहे, उत्साह आहे... मळलेल्या वाटेपलिकडचं काही तरी पहायला-अनुभवायला मिळतेय याची खुशी सर्वत्र दिसतेय... मंत्रालय म्हणजे केवळ एक शासकीय इमारत नाही... याची जाणीव आज प्रकर्षाने झालीय... लाखो मुंबईकरांप्रमाणे गर्दीच्या लोंढ्यात स्वत:ला ढकलून देऊन कामासाठी मंत्रालयात येणारा मुंबईकर कर्मचारी-अधिकारी वर्ग आज सुखावलाय... 
कारण आज मंत्रालयात साक्षात ‘वाघोबा’ अवतरले आहेत. आज मंगळवार असल्याने मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने मंत्रालयात येणारी नेहमीची गर्दी ही या वेगळ्या वातावरणाचा आस्वाद घेतांना दिसत आहे. आपल्या कामाचं काय झालं किंवा होणार हा विचार मनात घेऊन आलेल्या या माणसांची पावलं आज आपोआप प्रदर्शनाच्या ठिकाणी थबकतांना दिसताहेत..

२९ जुलै हा जागतिक व्याघ्र दिन. 
या दिनाचे औचित्य साधून राज्यातील व्याघ्र प्रकल्प, व्याघ्र संवर्धनाची माहिती देणारे प्रदर्शन आज मंत्रालयात तळमजल्यावर आयोजित करण्यात आलं होतं... हे प्रदर्शन पाहिल्यानंतर त्याची तारीफ केल्याशिवाय कुणालाच राहावत नव्हतं... 
गर्दीत हरवलेल्या मुंबईकरांना असे विरुंगळ्याचे क्षण आणि निसर्गाचे सान्निध्य किती हवहवेसे असते... त्यासाठी ते किती हपापलेले असतात हे यावरून दिसून येत होतं.. एवढच कशाला? कुठल्याही पर्यटनस्थळांना गेलं की आपण आपले फोटो तिथे काढून घेतो... पण आज प्रदर्शनातील वाघोबांचे मेनीमुडस् लोकांना भुरळ पाडत होते... 
प्रदर्शनातील प्रत्येक माहिती फलक लोकांच्या मनात वाघांबद्दलचे औत्सुक्य वाढवत होता तसाच तो भेट देण्याचे निमंत्रण ही देत होता... कारण ती माहिती वाचल्यानंतर आणि तिथलं सृष्टीसौंदर्य नजरेत भरल्यानंतर प्रत्येकाला एकदा तरी तिथे जाण्याची इच्छा आवरता येत नव्हती... 
हे संपूर्ण व्याघ्र वैभव आज मंत्रालयात मांडण्यामागचा उद्देशही एक प्रकारे तोच होता. महाराष्ट्र हे दऱ्याखोऱ्या, गडकिल्ले, सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि विशाल समुद्र किनारा लाभलेले एक वैभवसंपन्न राज्य... इथली वनराई विलक्षण लक्षवेधी... हे सगळं ‘वनवैभव’ लोकांसमोर जावं, राज्यातील वन पर्यटनाला चालना मिळावी आणि आपलं हे व्याघ्र वैभव राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन ते जागतिक आकर्षणाचं केंद्रबिंदू व्हावं हाच त्या मागचा उद्देश होता. या प्रदर्शनाने तो एक प्रकारे खरा ही ठरवला...
प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्यावेळी तर तळमजल्यापासून सातव्या मजल्यापर्यंत झालेली लोकांची दाटीच या प्रदर्शनाचे यश सांगून जात होती. दररोज आपल्या सवयीनं सरकणारे सरकते जिने ही आज थांबले होते. त्याच्या प्रत्येक पायरीवर उभा असलेला माणूस आज हे प्रदर्शन डोळ्यात साठवून ठेवायचा प्रयत्न करत होता.. त्या प्रदर्शनातून देण्यात आलेला संदेश मनात रुजवून घेत होता.
वन आणि पर्यटन विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित झालेलं हे व्याघ्र प्रदर्शन केवळ आनंदाचा भाग उरलं नव्हतं ते जनजागृतीचं एक सशक्त व्यासपीठ ही ठरलं होतं.

-डॉ. सुरेखा म. मुळे
वरिष्ठ सहाय्यक संचालक (माहिती)

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India