प्रदीर्घ सांस्कृतिक परंपरा आणि सुखद हवामानासाठी प्रसिद्ध असलेले नाशिक शहर मुंबई, पुणे, औंरगाबाद या महानगरांच्या केंद्रस्थानी आहे. मध्य रेल्वेच्या प्रमुख लोहमार्गावरचे हे एक प्रमुख स्टेशन असलेले नाशिक मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाने जोडले गेले आहे.
नाशिक सध्या चर्चेत आहे ते जुलै महिन्यात सुरू होणाऱ्या कुंभमेळ्यामुळे. दर बारा वर्षांनी येणारा हा भव्य सांस्कृतिक सोहळा अनुभवण्यासाठी जगभरातील पर्यटक नाशिकला येतात. विशेष पर्वणीच्यावेळी होणारे शाहीस्नान हा अत्यंत भव्य सोहळा असतो. देशातील साधु-संत या आनंद सोहळ्यात सहभागी होतात. पर्यटकांसाठी ही एकादृष्टीने पर्वणीच असते.
कुंभमेळ्यास उपस्थित राहण्यासोबतच नाशिक परिसरातील पर्यटनस्थळांना भेटी देणे हादेखील आनंदानुभव असतो. अनेक प्राचीन मंदिराबरोबरच विविध प्रेक्षणीय स्थळे या परिसरात आहेत. त्यातील महत्त्वाच्या स्थळांची माहिती येथे देण्यात येत आहे.
श्री सुंदर नारायण मंदिर
गोदावरी तटावर सुंदर नारायण मंदिर आहे. मंदिराची बांधणी 1756 मध्ये गंगाधर यशवंत चंद्रचुड यांनी केली. मंदिरात श्रीविष्णूच्या डावी-उजवीकडे लक्ष्मी व सरस्वती देवीच्या मूर्ती आहेत. सदरचे मंदिर हे गोदावरी तिरावर आहे. नाशिकरोड रेल्वे स्थानकापासून 8 कि.मी अंतरावर आहे.
सीता गुंफा
राम वनवासात असताना सीतेचे वास्तव्य ज्या ठिकाणी होते ते स्थान ‘सीता गुंफा’ म्हणून ओळखले जाते. सीता गुंफेजवळच पाच वटवृक्ष आहेत. प्रभूरामचंद्र पंचवटीत आले असतांना तेथील पाच वटवृक्षाजवळ जाताच पाच ऋषि कुमारांचा उद्धार झाला. परंतु ते वटवृक्ष मात्र आजही कायम आहेत, अशी भाविकांची श्रद्धा आहे. काळाराम मंदिराजवळ हे ठिकाण आहे. नाशिकरोड रेल्वे स्थानकापासून 8 कि.मी. अंतरावर आहे.
सोमेश्वर मंदिर
नाशिक बसस्थानकापासून सुमारे 8 कि.मी. अंतरावर गोदावरी नदीच्या काठी सोमेश्वर हे एक निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. येथे स्वयंभू सोमेश्वर भगवान शंकराचे मंदिर आहे. या मंदिराखालून एक गुप्त गंगा वाहत असून जवळच एका झाडाखालून तिचा प्रवाह प्रकट होऊन अव्याहत चालू असतो. अतिशय रमणीय व नयन मनोहर असलेला हा परिसर यात्रेकरूंना व चित्रपट सृष्टीतील निर्मात्यांना नेहमीच आकृष्ट करतो.
सप्तश्रृंगी गड
चांदवडच्या डोंगररांगेत नाशिकच्या उत्तरेस दिंडोरी तालुक्यात सुमारे 70 कि.मी अंतरावर सप्तश्रृंगी गड आहे. या गडावर सप्तश्रृंग निवासी देवीचे मंदिर आहे. भारतात देवीची 51 पिठे आहेत. त्यापैकी सप्तशृंगी देवी ही महालक्ष्मी असून तीच महाकाली व महासरस्वती आहे. महिषासूराचा वध केल्यानंतर विसावा घेण्यासाठी देवीने या गडावर वास्तव्य केले. गड नाशिकरोड रेल्वेस्टेशन पासून 90 किमी. तर नाशिक मध्यवर्ती बसस्थानकापासून 80 कि.मी. अंतरावर आहे. गडावर संस्थानच्या खोल्या निवासासाठी उपलब्ध आहेत.
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर
त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी वसले आहे. भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबकेश्वर हे एक प्रख्यात ज्योतिर्लिंग आहे. त्र्यंबकेश्वरचे मंदिर म्हणजे जुन्या व मनोहर अशा शिल्पाकृतीचा एक उत्कृष्ट नमुनाच आहे. गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वताच्या माथ्यावर झाला. गोदावरीचा मूळ उगम या पर्वतावर होऊन ती गंगाद्वारात उतरते. त्र्यंबकराज मूर्ती तळगाभाऱ्यात असून वालुकामय पिंडीतील तीन खाचा, ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे प्रतीक समजल्या जातात. मंदिरावर सुवर्ण कलशासह अप्रतिम कलाकृतीचे कोरीव काम केलेले आहे.
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांचे वडीलबंधु संत निवृत्तीनाथ यांनी त्र्यंबकेश्वर येथे समाधी घेतली असल्याने त्र्यंबकेश्वर हे संत, वारकरी आणि असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. निसर्गरम्य परीसर, पुरातन मंदिरे आणि पौराणिक महत्त्व यामुळेच त्र्यंबकेश्वर हे पर्यटकांसाठी मोठे आकर्षण आहे. त्र्यंबकेश्वर हे ठिकाण नाशिकरोड रेल्वे स्टेशन पासून 36 कि.मी. अंतरावर तर नाशिक मध्यवर्ती बसस्थानकापासून 28 कि.मी. अंतरावर असुन नाशिक मध्यवर्ती बसस्थानकापासून एस.टी. बसेसची जाण्यासाठी व्यवस्था आहे.
पंचवटी धार्मिक क्षेत्र
वनवास काळात प्रभू रामचंद्राचे वास्तव्य पंचवटीमध्ये होते. साहजिकच हा परिसर पवित्र असून सर्व तीर्थक्षेत्रे येथे आहेत. गोदावरीच्या पात्रामध्ये स्नानाच्या बऱ्याच जागा असून त्यास तीर्थ व धार्मिक कुंडे म्हणतात. ही तीर्थे पुढीलप्रमाणे आहेत. पीतृ तीर्थ, गालवतीर्थ, ब्रह्मतीर्थ, ऋणमोचन तीर्थ, कण्वतीर्थ, पापनाशक तीर्थ, विश्वतीर्थ, श्रोततीर्थ, कोटीतीर्थ, अग्नीतीर्थ, शुक्लतीर्थ, अस्थिवलाय तीर्थ तसेच रामगया तीर्थ, अरुणा, सूर्य, चक्र, आश्विनी, रुद्रयोगी विष्णू, योगी, आदी तीर्थही आहेत. पंचवटीमध्ये अनेक पवित्र मंदिर असून बहुतेक प्राचीन आहेत.
काळाराम मंदिर : प्रभु रामचंद्राच्या वास्तव्याचे जागेवरील हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिरात सर्व आजूबाजूंनी ओऱ्या असून मंदिरात प्रभू रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मणाच्या सुरेख मूर्ती आहेत. पूर्वेस नगारखाना असून पश्चिमेभिमुख मारुतीरायाची मुर्ती आहे. सरदार ओढेकरांनी हे मंदिर 1782 मध्ये बांधल्याचे सांगतात. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस येथे मोठा उत्सव चालतो. रामनवमीस रामजन्म थाटात साजरा होतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात याच ठिकाणी मंदिर प्रवेशाचा ऐतिहासिक सत्याग्रह झाला होता.
नारोशंकर मंदिर : गोदावरी तीरावर प्रभु रामेश्वराचे हे मंदिर नारोशंकर राजेबहादुर यांनी 1747 मध्ये बांधले. 18 व्या शतकातील उत्तम शिल्पकलेचा नमुना म्हणून मंदिराची ओळख आहे. मंदिराच्या दर्शनी प्रवेशद्वारावर मोठी घंटा टांगलेली आहे. ही घंटा पोर्तुगिजांवरील विजयाचे प्रतिक आहे.
मुक्तीधाम : नाशिक पासून 8 कि.मी अंतरावर नाशिकरोड येथे मुक्तीधाम हे कै.जयरामभाई बिटको यांनी बांधलेले मंदिर असून येथे सर्व प्रमुख देवांच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्यात गीतेचे 18 अध्याय कोरण्यात आले आहेत. भाविकांच्या निवासाची व भोजनाचीही सोय आहे.
पांडवलेणी : नाशिकच्या नैऋत्येस आग्रारोड अंजनगिरी पर्वताच्या रांगेत वर निमूळते होत गेलेले शंखाच्या आकाराचे तीन पिरॅमिडच्या आकाराचे डोंगर आहेत. लांबून ते डोंगर अग्नि ज्वालाप्रमाणे दिसतात. यावरुन त्यांना त्रिरश्यमी असे नांव पडले आहे. मध्यभागीच्या डोंगरावर पांडव लेणी आहेत. या लेणी जैन राजांनी बनविल्या असून 2000 वर्षे प्राचीन आहेत. यामध्ये 29 गूंफा आहेत. आतील भगवान गौतम बुद्धाच्या आणि बोधीसत्वाच्यामूर्ती प्रेक्षणीय आहे. पांडवलेणी नाशिकरोड रेल्वे स्थानकापासून 8 कि.मी. अंतरावर तर मध्यवर्ती बसस्थानकापासून 9 कि.मी. अंतरावर आहेत.
चांभार लेणी : नाशिकच्या उत्तरेस पाच मैलावर म्हसरूळजवळ जैनांची गजपंथी लेणी आहेत. त्याला हल्ली चांभारलेणी असे नाव प्राप्त झाले आहे. गजंपथी टेकडीच्या पायथ्याजवळील म्हसरूळ या गावी 1942 साली पारसनाथ मंदिर बांधण्यात आले. ही लेणी 11 व्या शतकात बांधली गेली असून ती जैनांच्या पवित्र तीर्थांपैकी मानली जातात. पौष महिन्यात दर रविवारी येथे यात्रा भरते.
टाकेद तीर्थ : नाशिकपासून 71 कि.मी. व इगतपुरी पासून 26.3 कि.मी. अंतरावर असलेले टाकेद हे गांव या ठिकाणी रावण सीतेला नेत असता जटायुशी युद्ध झाले ते ठिकाण आहे. दरवर्षी टाकेद या ठिकाणी महाशिवरात्रीस मोठी यात्रा भरते.
कपिलधारा तीर्थ : इगतपुरीपासून जवळच कावनाई येथे कपिलधारा तीर्थ आहे. कपिलमुनीने अनेक वर्षे येथे तपश्वर्या केली आहे. तसेच शेगांवच्या गजानन महाराजांनी याच ठिकाणी एक वर्ष तपश्चर्या केली आहे. येथे कामाक्षी देवीचे मंदिर असून चैत्र शुद्ध पौर्णिमेस यात्रा भरते. नाशिकपासून हे अंतर 40 किमी आहे.
-संकलन: जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक.
0 comments:
Post a Comment